फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड-4

तणावातून बाहेर यायला मित्र लग्नाला जायला आग्रह धरतो
"माणसं सोडून गेलीयेत फक्त, कंपनी अजूनही शाबूत आहे"

माधवच्या त्या शब्दांनी मितांशला काहीसा धीर आला,

तो उठला आणि पोटभर जेवला. माधवला बरं वाटलं. दुपारचं जेवण आटोपलं.

मितांश या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. पण मनातून ती गोष्ट लवकर जात नव्हती. विचारात तो इतका गढून जाई की आपण काय करतोय याचं त्याला भान रहात नसे.

माधवला काळजी वाटू लागली, तो म्हणाला..

"मितांश, माझं ऐक. इथे असं एकटं राहून राहून तू जास्त नैराश्यात जाशील. तू एक काम कर, बॅग घे आणि लग्नाला जा. तिथे भरपूर माणसं असतील, तुझे नातेवाईक असतील, सर्वांच्या सोबत असलास की मनातल्या विचारांना लगाम मिळेल"

"आणि तिथे विचारलं तर काय सांगू? अमेरिकेत माझी बंद पडलेली कंपनी आहे असं?"

माधव पेटला, त्याने ओढत मितांशला लॅपटॉप जवळ नेलं. त्याच्या कंपनीची वेबसाईट उघडली, त्यांनी बनवलेले e-learning सॉफ्टवेअर उघडले..आणि म्हणाला,

"कंपनी बंद पडली ना? मग हे काय आहे? हे कुणी तयार केलंय? कुणाचं आहे? इथे कुठे दिसतंय का की सदर कंपनी बंद झाली आहे म्हणून? खाली बघ, इथे काय लिहिलंय..Founder: Mr. Mitansh Patil."

मितांश काहीसा भानावर आला, माधव अगदी योग्य प्रकारे त्याला भानावर आणत होता.

"पटलं ना? मग तू तिकडे गेलास की सांग..कंपनी आहे माझी अमेरिकेत.. सुरू आहे आणि इकडे सुट्टी काढुन आलोय.."

माधवच्या बोलण्यात खरंच दम होता..

"तस्मादूत्तीष्ठ कौंतेय.." असं महाभारताच्या रणांगणावर त्या माधवाने अर्जुनाला विचारलं होतं,

आणि इकडे या माधवाने मितांशला..

माधवचं ऐकत मितांश लग्नाला जायला तयार झाला. त्याने आपली बॅग घेतली आणि गाडी काढत तो निघाला. या गडबडीत आई बाबांना कळवायचं राहून गेलं होतं की मी येतोय म्हणून.

गावाकडे तो खूप वर्षांपूर्वी गेलेला. आता रस्ता फारसा आठवत नव्हता. मॅप नुसार थोडाफार जवळ गेला तो, पण नेटवर्क गेलं आणि तो अर्ध्यातच थांबला. एकाला रस्ता विचारला आणि त्यानुसार तो पोहोचला.

लग्नघर पाहुण्यांनी भरलेलं होतं. घराला झेंडूच्या माळा लावल्या होत्या, सर्वजण कामात होते. दुपारचा मांडव चा कार्यक्रम झाला होता, आता हळदीची तयारी सुरू होती.

तोच त्याच्या मावसभावाने त्याला पाहिलं आणि तो ओरडला,
"मितांश दादा आलाय.."

🎭 Series Post

View all