फॅमिली ऑन रेंट ! पार्ट 2

.


" अच्छा. अरे आजच्या काळात कुणाला वेळ असतो रे फोन करून सांगायला. मी स्टेटस अपडेट केलं होतं पण तू बघितलं नसेल. " दादा म्हणाला.

" अच्छा. रवीचा वाढदिवस आहे दादा. " पारस म्हणाला.

" चिंता नको. गिफ्ट पाठवले आहे. " दादा म्हणाला.

" गिफ्ट नको दादा , तू हवा आहेस. रवीला काकाकाकूंचे प्रेम हवे आहे. " पारस म्हणाला.

" अरे आम्ही आताच युरेनसवर शिफ्ट झालोय. किमान वर्षभर तरी परवानगी नाही भेटणार पृथ्वीवर जायची. एक काम कर ना. तूच ये ना इकडं. काय उरले आहे रे पृथ्वीवर ? नुसतं ग्लोबल वॉर्मिंग. " दादा म्हणाला.

" दादा , कुलिंग मशीन्समुळे घरी थंड वाटते. बाहेर पडण्यासाठी स्पेशल जॅकेट आणि खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घालून जावे लागते. " पारस म्हणाला.

" आपल्या दुप्पट वजन असत त्याचे. प्राणी पक्षी जंगल सर्वकाही नामशेष झाले. " दादा म्हणाला.

" नाही. त्यांचे जीन्स लॅबोरेटरीमध्ये जतन करून ठेवले आहेत. शास्त्रज्ञ म्हणत आहेत की ते पृथ्वीवर ओझोनचे कृत्रिम आवरण बनवतील आणि त्यानंतर वातावरण पूर्ववत होईल. " पारस म्हणाला.

" हे शास्त्रज्ञ सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोक असतात. नुसतं पोकळ आश्वासने देत असतात. त्यांचा सर्व कुटुंब कबिला गुरू ग्रहावर सुरक्षित ठेवला आहे. कारण त्यांना माहिती आहे की पृथ्वी काही वर्षातच नष्ट होईल. " दादा म्हणाला.

" दादा , मलाही खूप इच्छा आहे पृथ्वी सोडण्याची पण हे घर. आपल्या कितीतरी आठवणी आहेत या घरासोबत. " पारस म्हणाला.

" सर्वात महत्वाचं जगणं असत. जिवंत असाल तरच नव्या आठवणी बनवशील. भावनेत अडकशील तर तुझ्यासोबत सर्व कुटुंबही जाईल तुझे. म्हणून म्हणतो पृथ्वी सोड. युरेनसवर ये. एकदिवस सूर्य गिळेल पृथ्वीला आणि सर्व नष्ट होईल. ठेवतो. " दादा म्हणाला.

पारसने भावाचा फोन कट केला. पारसला लगेचच दुसरा कॉल आला.

" हॅलो कोण ?" पारस म्हणाला.

" मी प्रशांत बोलतोय. सर तुम्ही फॅमिली शोधत आहात का? " प्रशांत म्हणाला.

" म्हणजे ?" पारस म्हणाला.

" म्हणजे तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी फॅमिली हवी आहे का ? पण काही कारणामुळे तुमच्या घरचे त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत. " प्रशांत म्हणाला.

" होय. तुम्हाला कसे कळले ?" पारस म्हणाला.

" सर , आजकाल ग्राहकांना तहान भूक लागली तरी आम्हाला लगेच कळते. असो. तुम्ही कार्यक्रम कोणता आहे तो सांगा. " प्रशांत म्हणाला.

" मुलाचा वाढदिवस आहे माझा. " पारस म्हणाला.

" तुम्हाला जर तो पारंपरिक पद्धतीने साजरा करायचा असेल तर आम्ही त्यातही मदत करू शकतो. " प्रशांत म्हणाला.

"म्हणजे ?" पारस म्हणाला.

" म्हणजे हल्ली कितीतरी जणांना आपल्या घराणातल्या प्रथा , परंपरा माहिती नसतात. ते सांगायला आईवडील जवळ नसतात. मग अश्यावेळीही आम्ही मदत करतो. " प्रशांत म्हणाला.

" ठीक आहे. पण तुम्ही माझ्या फॅमिलीला इथं आणू शकाल का ?" पारस म्हणाला.

" नाही. आमच्या कंपनीचे नाव आहे फॅमिली ऑन रेंट. म्हणजे आम्ही विविध कार्यक्रमासाठी फॅमिली भाड्याने पुरवतो. शिवाय जर संस्कृती , प्रथा परंपरा जाणून घ्यायची असेल तर तशीही सोय आहे. " प्रशांत म्हणाला.

" ठीक आहे. किती चार्जेस आहेत तुमची ?" पारस म्हणाला.

पारसने सर्व बोलणी केली. रवीच्या मुखावर आनंद बघण्यासाठी तो खूप आतूर झाला होता.

क्रमश..

🎭 Series Post

View all