Mar 03, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

फक्त गप्प बसणचं माझ्या हाती

Read Later
फक्त गप्प बसणचं माझ्या हाती


कथेचे नाव - फक्त गप्प बसणंच माझ्या हाती
विषय - अहिंसा एक मानवता धर्म
स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी

मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात वाढलेल्या मनिषाला पहिल्यापासूनच एकत्रित कुटुंबाचं आकर्षण होत. एकच आत्या, एकच मामा, आत्या कॅनडाला तर मामा बेळगावला, त्यामुळे भेटीगाठी क्वचितच. इतरही कोणाकडे फारसं जाणं येणं नाही, लहान असताना आई बरोबर जायची आजोळी पण आजी आजोबा गेले आणि आईचं माहेरी जाणं कमी झालं. आपल्या मैत्रिणींना जेव्हा आपल्या चुलत आत्ये, मामेभावंडांबरोबर सणवार एकत्रित साजरे करताना बघायची तेव्हा तिला फार अप्रूप वाटायचं. हिंदी चित्रपट, मालिका बघून तर तिला आपल्याला असच सासर मिळायला हवं अस सारखं वाटू लागलं आणि म्हणूनच एकत्रित कुटुंबात रहाणाऱ्या हेमंतच स्थळ आलं तेव्हा कुठलेही आढेवेढे न घेता तीने लगेचच होकार दिला, दोघंही एकमेकांना अनुरूप असल्यामुळे सोयरीक पटकन जमली.

घर, संसार, प्रेमळ नवरा, मुलं, हसतखेळत गुण्यागोविंदाने नांदणार कुटुंब असं सर्वसामान्य मुलींसारख स्वप्न उराशी बाळगून मनिषाचा हेमंतसह गृहप्रवेश झाला.

मनिषाच्या जाऊबाई शिक्षिका होत्या तर मोठे दिर बँकेत उच्च अधिकारी होते. सगळ्यात मोठे शिवाय दोघेही कमवते म्हणून त्यांच्या शब्दाला घरात मान होता. लहान दिराचं मेडिकल स्टोअर होत, भर वस्तीत असल्यामुळे  चांगलं चालत होत. जाऊबाई सुद्धा जास्त वेळ दुकानातच असत. मनिषाच्या नवऱ्यालाही बऱ्यापैकी पगार होता पण मोठ्या दोघांच्या तुलनेत त्यामानाने कमी होता यावरून घरात सारखं बोललं जायंच, हेमंतला कमी लेखलं जायचं, लहानमुलांसमोर आपल्याला नवऱ्याला बोललेलं मनिषाला खटकायचं, जन्मदात्री आई उदरी वाढलेल्या आपल्या मुलांमध्ये दूजाभाव कसा करू शकते याचं नवल वाटायचं.

मोठ्या दोन्ही मुलांच्या लग्नात योग्य सरबराई झाली,  मनिषाच्या माहेरच्यांनी चांगलाच ठेंगा दाखवला सासूबाई नेहमी असे टोमणे मारायच्या, मनिषाच्या आईवडिलांनी रीतीप्रमाणे सागळं केलं होत तरी सासूबाई नाराज असायच्या. जावा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकायच्या, त्यात दोघी जावा बड्या घरच्या मुली होत्या, माहेरी सुबत्ता होती, माहेराहून येताना भरभरून घेवून येत होत्या. यावरूनही सासूबाई कुरकुर करायच्या. महिन्या दोन महिन्यांची येऊन नणंदबाई सुद्धा आईचे कान भरायच्या.

नव्याची नवलाई संपताच मनिषाच्या डोळ्यासमोर हे सगळं घडू लागलं, दिसत तसं नसत, दुरून डोंगर साजरे याचा प्रत्यय येऊ लागला, बाहेर समाजात वावरताना या लोकांचं वागणं वेगळं आणि एकमेकांशी वागताना वेगळं हे समजू लागलं, जो तो आपले रंगढंग दाखवू लागला, आपसातील मदभेद, हेवेदावे समोर येऊ लागले आणि  मनिषाच्या स्वप्नांचा भोपळा खळकन फुटला.

मोठ्यांना प्रतिउत्तर करायचं नाही, सासूसासऱ्यांना आईवडिलांच्या जागी मनायचं या संस्कारात मनिषा लहानाची मोठी झाली असल्यामुळे काही बोलत नव्हती, शांतपणे सगळं ऐकून घेत होती, पण कधीतरी हेमंतशी बोलताना भडका उडायचा, दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटायची, "तू इतका शांत कसा राहू शकतोस, का सहन करतोस" मनीषा त्याला म्हणायची.

"समोरचा चुकीचं वागला म्हणून आपणं तसं वागू नये, त्या़ंच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ? त्यांची चूक त्यांना कळेल, जास्त अपेक्षा करू नये" यावर हेमंत मात्र ठाम असायचा. त्याच जितकं प्रेम मनिषावर होत तितकच आपल्या आईवडिलांवर होत, आईच्या बाबतीत तर तो जास्तच हळवा होता, आईवडिलांबद्दल त्याला जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर होता. मनिषाला हे सगळं मान्य होत पण विनाकारण अन्याय सहन करणं पटत नव्हतं. दोघांच्या कुरबुरी बेडरूम बाहेर जायला लागताच, सासूबाईंनी उलटसुलट सांगत हेमंतला मनिषाविरुद्ध भडकवलं. वाद घालून काहीच साध्य होणार नाही, हेमंत आपल्याला दुरावेल हे चाणाक्ष मनिषाने वेळीच ओळखलं व हेमंतच्या प्रेमाखातर गप्प बसायचं, त्यांच्यासारखं काहीसं अहिंसात्मक धोरण स्वीकरायचं ठरवलं. नोकरी केली तर जरा घराबाहेर पडता येईल, या वातावरणापासून दूर गेलं तर मनशांती लाभेल म्हणून नोकरी शोधायचं ठरवलं.

सुना आल्यापासून मनिषाच्या सासूबाई स्वयंपाकघरात फिरकत नव्हत्या. पोथी, भजनपूजन, मैत्रिणी यात मग्न असायच्या. मनिषाच लग्न झाल्यापासून दोघी जावांनी इतके वर्ष आम्हीच केलं नोकरी, मुलं लहान अश्या सबबी सांगत आता तूच कर म्हणत घर कामातून अंग काढून घेतलं. मनिषा नोकरीला गेली तर दोन्ही वेळेचा दहा - अकरा माणसांचा स्वयंपाक, चहानाश्ता, पैपाहुणे सगळं आपल्या माथी पडेल म्हणत तिघींनिही तिच्या नोकरी करण्याला कडाडून विरोध केला. नेमकी त्याचवेळी मातृत्वाची चाहूल लागली आणि मनिषाची नोकरीची शोधमोहीम पूर्णपणे बारगळली.

मनिषाची गोड बातमी ऐकून सुद्धा कुटुंबीयांचे वागणं, घरातलं वातावरण बदललं नव्हत. मनीषा आणि हेमंतच गप्प बसणं त्यांच्या पथ्यावर पडलं होत. मनिषाने आता कसलाही विचार न करता आपल्या बाळावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. आला दिवस शांतपणे ढकलायचं ठरवलं.

कालांतराने मोठ्या दिरांच प्रमोशन झालं, ट्रान्स्फर ऑर्डर आली, जाऊबाईंनी खटपट करून त्या गावी नोकरी मिळवली व थोडेच दिवसात दोघंही तिकडे शिफ्ट झाले. तर थोड्याच महिन्यात मधल्या दिराचे दुकान रस्ता रुंदीकरणात बरेचसे गेले, नवीन जागेसाठी त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले, वडिलांनी नकार देताच दोघांचे चांगलेच भांडण झाले. "भावाचे लग्न, घरात डागडुजी करताना सगळा पैसा खर्च झाला, मला गरज आहे तेव्हा मात्र नाही बोलता" वाद विकोपाला जाताच मधले दिर, जाऊ वेगळे राहू लागले.

दोन्ही मुलं अचानकपणे वेगळी राहू लागल्याने सासूबाईंनी अंथरूण पकडले, सासरे पण खूप खचले. मानिषाने शुश्रुषा करत त्यांना आधार दिला, तिने आणि हेमंतने सावरल्यामुळे दोघं यातून बाहेर आले आणि मनिषाबद्दल अचानक सासूबाईंना प्रेमाचे भरते आले, घरातील प्रत्येक निर्णय हेमंतला विचारून घेतला जाऊ लागला. त्यांना मान दिला जाऊ लागला, कौतुक होवू लागलं. त्यांच्या लेकीचे जरा जास्तच लाड होवू लागले.

मधली भांडून वेगळी झाली होती, मोठीने परगावी, नोकरीचे कारण देत, वेळ नाही म्हणत हात वर केले होते, इकडे यायला तयार नव्हती, सासूबाईंना आता होत नव्हते. इतके दिवस मुलगा नाही तुला काही अधिकार नाही म्हणत वार्षिक कुलाचारापासून मनिषाला वंचित ठेवणाऱ्या सासूबाई आता तिला सगळं आवर्जून करायला संगत होत्या. 'इतके दिवस मी चालत नव्हते, आता मी केले तर चालते'  या आपल्या सासूच्या विचारांचे मनिषाला नवल वाटत होते.

दोन्ही मोठ्या मुलांनी पाठ फिरवल्यामुळे, ह्या वयात काही कमी जास्त झालं तर हेमंत आणि मनिषाच बघणार‌ याची जाणीव झाल्यामुळे असेल अथवा स्वतःची चूक समजल्यामुळे, दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे सासुसासरे मनिषाशी चांगले वागू लागले, तीचे गुणगान गावू लागले. मनीषाच्या गप्प बसण्याचा, हेमंतच्या अहिंसेचा विजय झाला होता.

मनिषाला हवं असलेलं प्रेम, माया, मानपान सगळं तिला मिळू लागलं होतं, पण लग्न झाल्यानंतर आपल्या कुटुंबीयांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल मानावं असं ज्यावेळी वाटतं होत त्यावेळी हे झालं नव्हतं आणि आता लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर आता तिला ह्याचं काहीचं अप्रूप राहील नव्हतं.

आपल्या सासरच्यांप्रती तिचं प्रेम एकदम अटून गेलं होत. ती फक्त कर्तव्य आणि जवाबदारी म्हणून आपल्या सासूसासऱ्यांकडे बघत होती. आपल्या नवऱ्याला दिलेल्या शब्दाखातर आपल्या कर्तव्यात कसूर न करता आपली जवाबदारी गप्प बसत निर्विकारपणे निभावत होती.


©️®️ मृणाल महेश शिंपी.
09.10.2022
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मृणाल महेश शिंपी

House Wife

वाचनप्रेमी

//