फक्त एकच क्षण भाळण्याचा बाकी सारे क्षण संभाळण्याचे.

नवराबायकोच्या नात्यातल्या छटा अधोरेखित करणारी कथा.

आज परत सकाळी सकाळी सई आणि तेजस मधे वाद झाला. वाद वाढतच गेला पार भांडणा पर्यत पोचला आणि दोघांमधे अबोला होऊनच थांबला. तेजस रागारागाने डबा न घेताच आॕफीसमधे गेला. आजकाल वारंवार व्हायच हे.  सई हताशपणे बघतच राहीली. ' हाच का तो तेजस ज्याच्याशी लग्न करायचे म्हणून हट्ट केला, बाबांना मनवले. इतका कसा बदलला हा?'  सईच्या डोक्याची नुसती वैतागवाडी झालेली. तिने आॕफीसमधे फोन करुन सुट्टी घेतली.

सई आणि तेजस यांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने झाले. लग्नानंतरचा एक महिना तर पटदिशी उडाला. नंतर मात्र एकमेकांच्या सवयी, दोष खूपायला लागलेत. शाब्दिक बोचकारे करण्याची जणू चढाओढच सुरु झाली.

बेडवरचा ओला टाॕवेल उचलतांना सईचा तिळपापड उडाला. "किती आळशी असाव एखाद्याने? नुसता लोळत असतो. शिवाय मला सारख नाचवतो. सगळ हातात लागत याला" सई करवादली.  अवघ्या दोन महिन्यां पूर्वी तेजस च्या कमांडींग नेचर वर फिदा असलेली ती आता धुसफुसत होती.

तेजसचा मित्र परिवार भरपूर मोठा. लग्न झाल्यावर दर शनिवार रविवार तो मित्रांना जेवायला बोलवायचा. पहिल्यांदा  उत्साहाने सगळ करणाऱ्या सईला, नंतर नंतर सुगरणपणाचे लेबल मिळविण्यासाठी आठवडाभरानंतर मिळणारी सुट्टी किचनमधे घालवणे जड जायला लागले. बोलघेवडा, माणूसवेडा  अशा तेजसवर भाळलेली ती आता या सगळ्याचा त्रास होऊन कंटाळली होती.

सईला काही सुचेनासे झाले. अशावेळी हमखास आठवणारी व्यक्ती म्हणजे आजी. सई लगोलग उठली आणि आजीकडे आली. पोरीचे काहीतरी बिनसले आहे हे आजीने लगेच ताडले. आधी  सईला गरमागारम जेवायला वाढले. समोर ताट येताच सईला भुकेची जाणीव झाली. जेवता जेवता आजीनाती च्या गुजगोष्टी सुरु झाल्या.

अचानक सईने आजीला विचारले, 'अग आजी तुझे आणि आजोबांचे भांडण व्हायच का ग'?  अग भांडण तर व्हायच ग पण एका मर्यादे पर्यतच ताणायच याची जाण आम्हाला होती. आजी च्या मुखातुन इतक्या वर्षाचा अनुभव बोलता झाला. सई तुमच्या आणि आमच्या पिढीतला ठळक फरक काय आहे सांगू का. तुम्ही आधी भाळता आणि खरी ओळख पटते तेव्हा ते संभाळता येत नाही म्हणून उगाळत बसता. आम्ही मात्र आधी एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी जपतो, संभाळतो अशी एकमेकांची सवय होत असतांना एका क्षणी परस्परांवर भाळतो, स्वीकारतो आणि हो हे भाळण जन्मभरासाठी संभाळतो बर पोरी. आजी मिश्किलपणे हसत बोलली.

इकडे तेजस रागारागाने घरुन निघाला पण त्याच्या मनातला राग काही जात नव्हता. किती बदलली सई. लग्नाआधी किती छान तयार होऊन भेटायला यायची. तिच्या या निटनेटकेपणावर आणि चटपटीत वागण्यावरच तर तो मोहीत झाला होता. आता तर ती सदा बेंगरुळ अवतारातच असते. जेवतांना किती तो मचमच आवाज करते ही. भानच नसते अगदी. लग्नाआधी जेवायला कितीकदा बाहेर गेलेलो तेव्हा नाही लक्षात आल ते. प्रेमात माणसे आंधळी होतात तसे आपण बहिरे झालो होतो की काय? तो  स्वतःशीच चरफडला.

Lunch break मधे याच्या जवळ डबा नाही हे कळताच तेजस चा मित्र याला बाहेर घेऊन गेला आणि जेवतांना मोलाचा सल्ला देता झाला. अरे संसार सुखाचा करायचा असेल तर काय बोलायच याच्या पेक्षा काय नाही बोलायच ते समजण आवश्यक आहे. हो, आणि घरची लक्ष्मी रुसली तर आपणच मनवायच रे. आपल्या भरवशावर सगळा माहेरचा पाश तोडून येतात रे त्या. तेजस मनोमन समजला.

आजीकडून सई आली तीच नवा उत्साह घेऊन. छानशी तयार झाली. घर आवरले आणि तेजसला मेसेज केला. मेसेज वाचताच तेजस लगोलग घरी निघाला. आनंदाचे डोही आनंद तरंग आलेत.
मित्राच्या आत्मीयतेने सल्ला देणारे नातेवाईक आणि नातेवाईकांसारखे हक्काने सावरणारे मित्र लाभलेले तेजस आणि सई नशीबवानच.