ओझं अपेक्षांच

Expectations From Others


अपेक्षा ही मानवी स्वभावाची  एक सहजप्रवृत्ती ...

अपेक्षा म्हणजे आपल्याला हवं ते दुसऱ्या कडून मिळावं,आपण जे काही कर्म करतो त्याबदल्यात आपल्याला काही तरी प्राप्त होणे अशी इच्छा ...आशा..

जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण अपेक्षांचे ओझे बाळगत असतो आणि आपण इतरांवर लादत ही असतो.आई-वडिलांची मुलांकडून, मुलांची आई-वडिलांकडून ,नातेवाईक, मित्रमैत्रिणी, समाज यांची आपल्या कडून आणि आपली त्यांच्या कडून असते काही तरी  अपेक्षा....

जस जसे आपण मोठे होत जातो तसतसे अपेक्षा वाढत जातात .कुटुंबात,समाजात स्वतः चे एक स्थान निर्माण झाले तर आपल्या कडून कुटुंबाची,समाजाची अपेक्षा वाढत जाते.

जो व्यक्ती चांगले कार्य करतो,सर्वांना मदत करतो अशा व्यक्तींकडून इतरांना जास्त अपेक्षा असतात.  शिक्षकही वर्गात हुशार विद्यार्थ्यांकडून  चं चांगल्या गुणांची अपेक्षा ठेवतात. राजकीय क्षेत्र,क्रीडा क्षेत्र,उद्योग क्षेत्र,सामाजिक क्षेत्र इ. अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून समाज,देश यांच्या खुप अपेक्षा असतात.

व्यक्तीचे गुण,स्वभाव, कार्य असे सर्व पाहून त्याच्या कडून अपेक्षा ठेवल्या जातात. सद्वर्तनी लोकांकडून चांगल्याच अपेक्षा असतात. तर दुरवर्तनी लोकांकडून चांगल्या वर्तनाची काय अपेक्षा?

आपण कोणाकडून कशाची तरी अपेक्षा ठेवली आणि त्यांनी ती पूर्ण नाही केली तर आपण दुःखी होतो.सर्व दुःखाचे मूळ कारण असते अपेक्षा ठेवणे...जर आपण कोणाकडून अपेक्षाच ठेवली नाही तर आपण दुःखी होणारचं नाही. आपण काही तरी काम करतो तेव्हा साहजिकच त्या कामाचे फळ आपल्याला हवे असते म्हणजेच त्या कर्माकडून आपण ठेवतो ती अपेक्षा..

काही वेळेला आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले तेव्हा खुप आनंद होतो आणि अपेक्षेप्रमाणे नाही झाले तर खुप वाईट वाटते, त्या व्यक्तीचा खुप राग येतो,कधी कधी स्वतः चा ही राग येतो की आपण का अशा व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो?

 कदाचित कधीतरी आपल्याकडून ही कोणाचा तरी अपेक्षाभंग होत असेल ? 

आपल्याला हे कळतं ही नसणार .

आपले सर्व चांगले होत रहावे आणि देवाने आपल्याला चांगले ठेवावे अशी अपेक्षा आपण देवाकडून करत असतो.पण देवाची ही आपल्या कडून काही तरी अपेक्षा असेल चं ना ?चांगल्या विचारांची,चांगल्या वर्तनाची ...

अपेक्षा करणे,अपेक्षा ठेवणे चांगले असते पण अपेक्षा कोणत्या व्यक्ती कडून आणि कोणत्या प्रकारची करतो यावर ते अवलंबून असते.समोरचा व्यक्ती आपली अपेक्षा पूर्ण करू शकतो का?काही वेळेस परिस्थिती अशी असते की इच्छा असूनही आपली अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही .

अपेक्षा ठेवल्याने दुःख होते म्हणून 

आपण कितीही ठरविले की,अपेक्षा ठेवू नये पण जीवन जगत असताना घर,संसार, समाज,देश,मानवी नाते यात कोठेतरी , कधीतरी ,कोणीतरी कोणत्या तरी अपेक्षेसाठी  जगत असतो ....

अनेकदा आपला अपेक्षाभंग होत असतो म्हणून दुःखी न होता त्यातून काही तरी शिकले पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे आणि जीवन आनंदाने जगता आले पाहिजे.


अपेक्षाभंगामुळे

दुःखी होते मन

पण अपेक्षेशिवाय 

नाही आपले जीवन


चांगल्या गोष्टींची 

आपण करावी अपेक्षा

आणि अपेक्षा पूर्तीची
करावी प्रतीक्षा