अपेक्षा ...सासूबाईंच्या

Relationship Between Mother In Law And Daughter In Law


अपेक्षा ...सासूबाईंच्या

" अहो सानेबाई ,सूनबाई आणायची तयारी सुरू आहे का तुमची ? ऐकले आम्ही असे . " एका मैत्रीणीने सानेबाईंना विचारले.

किट्टी पार्टीत खाणेपिणे,वेगवेगळे गेम्स खेळणे ,गप्पा गोष्टी याबरोबरच असे विषय असणे म्हणजे स्वाभाविकचं..

तिच्या या प्रश्नाला दुजोरा देत एक दोन मैत्रीणींनी पुन्हा तोच प्रश्न सानेबाईंना विचारला.

सानेबाई - " हो, माझ्या मोठ्या मुलासाठी ,मनीष साठी मुली पाहत आहोत आम्ही ."

गोखलेबाई - " काय आहेत तुमच्या अपेक्षा ? म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुम्हांला सून म्हणून ? "

सानेबाई - " जास्त काही अपेक्षा नाही, मनीष आणि नील माझी दोन्ही मुलं , दिसायला रूबाबदार, देखणे आणि स्वभावाने ही खूप चांगले आहेत. अभ्यासात खूप हुशार होती पहिल्यापासून. आपल्या हुशारीमुळे आणि खूप अभ्यास करून सर्व परीक्षा चांगल्या गुणांनी पास होत गेले. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून आज ते चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहेत.
त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीचं...
आई म्हणून त्यांचे कौतुक करतांना मला खूप अभिमान वाटतो. मगं त्यांना बायको ही चांगलीचं मिळावी एवढीचं अपेक्षा ."

सर्व मैत्रीणी - " हो,खरचं तुमची दोन्ही मुले खुप गुणी आहेत . तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार ही केले आहेत.कोणालाही अभिमान वाटावा अशी मुले आहेत तुमची."

देसाईबाई - " चांगली मुलगी म्हणजे कशी हवी ? "

सानेबाई - " रंगाने,रुपाने चांगली म्हणजे माझ्या देखण्या मनीषला अनुरूप , उच्चशिक्षित ,घरंदाज कुटुंबातील ,संस्कारी आणि आम्हांला सर्वांना सांभाळून घेणारी.
तुमच्या कोणाच्या ओळखीत असेल तर सांगा कोणी ?"

सर्वजण हो म्हणाल्या.

एका मैत्रीणीने विचारले " अहो सानेबाई तुम्ही मुलगी शोधत आहात पण तुमच्या मनीषने जर अगोदरचं कुठे शोधून ठेवली असेल तर ? काही प्रेमप्रकरण वगैरे? मनीष दिसायला चांगला, नोकरीही चांगली त्यामुळे मुलींना आवडत असेल तो ! "

सानेबाई - " तसे काहीही नाही.
तसे काही असते तर त्याने आम्हांला सांगितले असते.सर्व गोष्टी सांगत असतो तो आम्हांला."

" खूप चांगली व आज्ञेतील आहेत हो तुमची मुले " असे गोखले बाई म्हणाल्या .


हो,हो खरचं आजकाल अशी मुले असणे म्हणजे भाग्यचं ...
नाही तर कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी ऐकायला मिळतात , ज्या ऐकून मन थक्क होऊन जाते.

आमच्या यांच्या एका मित्राच्या मुलाचे एका मुलीबरोबर प्रेम होते ,आईवडिलांना माहितच नव्हते जेव्हा घरातून पळून गेले आणि लग्न केले तेव्हा समजले दोघांच्या घरातील व्यक्तींना. लग्नाला विरोध करतील म्हणून घरात सांगितलेच नाही.

आईवडिलांना किती वाईट वाटले असेल !
पण शेवटी मायेपोटी मुलाला आणि सूनबाईला
घरात प्रवेश दिला."

असे पवार बाई सर्वांना सांगत होत्या.

सानेबाई - " नको बाई,असे कोणत्याच आईवडिलांच्या बाबतीत घडू नये. किती स्वप्न पाहतात आईवडील आपल्या मुलांसाठी आणि मुले असे वागतात.

बरे झाले देवा ! माझी दोन्ही मुले चांगली आहेत . "

"आम्हांला लग्नाला बोलवायचे विसरु नका हं सानेबाई ! "
असे दोघी तिघी मैत्रीणी बोलल्या.

सानेबाई - " म्हणजे काय? बोलवणारच लग्नाला तुम्हां सर्वांना."

नंतर नाश्ता आल्यामुळे खाण्याकडे सर्वांनी मोर्चा वळवला व वेगळ्या गप्पांना विषय मिळाला.


आईबाबा आपल्यासाठी मुलगी शोधता आहेत हे मनीषला माहित होते.पण त्याने वधू संशोधन सिरीयसली घेतलेले नव्हते. त्याला अजून लग्नच करायचे नव्हते पण आईला सूनबाई आणण्याची घाई झाली होती आणि त्यासाठी त्याच्या पाठी लागली होती.

आईला नाराज करू नये म्हणून त्याने वधू संशोधनाला संमती दर्शवली. आणि तेव्हापासून सानेबाईंचा सूनबाई संशोधनाचा उत्साह अनेक पटींनी वाढला होता.

मनीषसाठी मुलींची स्थळे येत होती. मुली पाहण्यासाठी मनीषपेक्षा त्याच्या आईलाच जास्त उत्सुकता राहत होती. काही मुलींना फोटो पाहूनच नकार दिला जात होता. सानेबाईंनी होणाऱ्या सूनबाईची जशी प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली होती त्यात त्या बसत नव्हत्या. त्यामुळे फोटो पाहूनच नकार...

मुलीचा फोटो आवडला आणि प्रत्यक्षात बघण्याचा कार्यक्रम झाला तर आवाज चांगला नाही, उंचीला कमी,बोलण्यात स्मार्ट नाही. असे कारण असायचे . तर कधी मुलीला आईच नाही ,तर कुठे मुलीला वडिलच नाही ,कोणाला भाऊच नाही अशीही कारणे होती.

अशा अनेक कारणांमुळे अनेक मुली नाकारल्या गेल्या होत्या. मनीष ला एक दोन मुली आवडल्या होत्या पण त्याच्या आईला नाही आवडल्या म्हणून त्यांना नकार दिला जायचा.
मनीषला कधीकधी वाटायचे \" हे सर्व अती होत आहे.\" पण तो आईला तसे बोलूही शकत नव्हता. आईला वाईट वाटेल म्हणून..

त्याचे वडीलही त्याच्या आईला गंमतीने म्हणायचे , " मी तुला पाहायला आलो होतो तेव्हा इतका विचार मी केला असता तर आपले लग्नच झाले नसते. मी तुझ्यापेक्षा छानचं होतो दिसायला आणि तु उंचीनेही कमी होती तरी केलेच ना मी तुझ्याशी लग्न..."

मनीषची आई - " हो ,का ? मला वाटले मी तुम्हांला आवडले होते ."

मनीषचे वडील - " हो,तू आवडलीचं होती मला म्हणून तर लग्न केले ना !
सर्वच मनासारखे भेटत नाही . मी अगदी परिपूर्ण मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला असता तर अजूनही लग्न झाले नसते माझे .."

मनीषची आई - "काहीतरीच तुमचे."

मनीषचे वडील - " हो,खरे तेचं सांगतो आहे.
सर्व मनासारखं कधी घडत नाही . आपण स्वतः ही परिपूर्ण नसतो . आपल्यातही काहीतरी कमतरता असते. तरीही आपण इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा बाळगत असतो.नाही का ? "

मनीषची आई - " तुमचे म्हणणे बरोबर आहे . पण तेव्हाचा आपला काळ वेगळा होता आणि पूर्वी तर मुलामुलींची आवड कोणी विचारत नव्हते. मुलीला घरकाम यायला हवे आणि मुलगा कमावता असला म्हणजे झाले. एवढा विचार करूनचं लग्ने होत असतं .
दिसण वगैरे या गोष्टींना तेव्हा एवढे महत्त्व नव्हते.

तरीही नवराबायकोचे नाते शेवटपर्यंत टिकून राहत असे.

आणि आता मुलामुलींनी एकमेकांना पसंत केल्यानंतर देखील अनेकांचे संसार व्यवस्थित होत नाही. घटस्फोटाच्या घटना घडत असतात.

आता सर्व बदलत चालले आहे. मुलगा आणि मुलगी दोघे एकमेकांना अनुरूप असायला हवी. रंग,रूप,गुण ,शिक्षण या सर्व गोष्टीं एकमेकांना साजेशा हव्यात .
आणि मी एकटीचं अशी नाही की होणाऱ्या सूनबाईबद्दल अशी अपेक्षा ठेवणारी. प्रत्येक स्त्रीला वाटते ,आपल्या मुलाला चांगली बायको मिळावी आणि आपला मुलगा सुखात रहावा.
एवढीचं तर साधी अपेक्षा ना माझी ? "

" हो,गं बाई बरोबर आहे तुझे .. तू काय बोलू देते का समोरच्या व्यक्तीला! बोलण्यात तू नेहमी हरवतेस मला..."

असे गंमतीने मनीषचे वडील त्याच्या आईला म्हणाले.

मनीषची आई - " तुम्ही पण हुशार आहात बोलण्यात म्हटलं. बरं आपलं हे सर्व राहू दया. मनीषच्या लग्नाचा विचार करू या आणि मुली बघण्याचे प्रयत्न सुरू ठेवू या. "


असेचं प्रयत्न करता करता एक दीड वर्ष निघून गेले.

मनीषला तर अगोदरच या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता आणि त्यात आईचे असे वागणे त्यामुळे तो या सर्व गोष्टींना खूप वैतागला होता. त्यामुळे त्याने ठरवले की आता जी पण मुलगी पाहू तिला होकार दयायचा आणि आईला कसेही करून समजावून सांगायचे.

थोड्याच दिवसांत ओळखीतील व्यक्तीकडून मनीषसाठी एक मुलगी सांगून आली. मनीषची आई तर नेहमीप्रमाणे उत्सुक होतीचं पण मनीषही ठरविल्याप्रमाणे या मुलीला होकार देवून वधूसंशोधन मोहीमेला पूर्णविराम देणार होता.

ठरल्या दिवशी मनीषचे आईवडील, मनीष मुलगी बघण्यास गेले . मुलगी पाहताच मनीषला मनातूनच आवाज आला \"ही मुलगी आपल्याला आवडली\" . \"या मुलीबद्दल आपल्याला वेगळेचं फिलिंग वाटत आहे. मुळात आपल्याला लग्न वगैरे या गोष्टीत अडकायचे नव्हते पण आईच्या आग्रहाखातर मुली पाहत होतो. काही मुली आवडल्या ही होत्या पण आता जी फिलिंग वाटते आहे ती तेव्हा वाटत नव्हती.
आता हीच मुलगी आपली पत्नी म्हणून आपल्या घरात येणार .\"
असे मनीषने मनातल्या मनात ठरविले. पण मनातले लगेच काही बोलला नाही. आईबाबांचे काय मत असेल याचा तो अंदाज घेत होता.

आईबाबांनी तिथेच काही न सांगता \" आम्ही पुढचे कळवतो\" असे सांगून कार्यक्रमाचा समारोप केला.

घरी आल्यानंतरही मनीषने मनातील काही सांगितले नाही . आईबाबांचे मत जाणून घ्यायचे होते.

बाबांनीच मनीषला विचारले," काय मग,आवडली का प्रिया?"

मनीष काही बोलायच्या आधीच त्याची आई म्हणाली," सर्व काही चांगले आहे पण आपल्या मनीषपेक्षा ती रंगाने थोडी सावळी आहे.
मनीष किती गोरागोमटा !
कसा दिसेल त्यांचा जोडा ? "

मनीषचे वडील - " अगं ,थोडासा तर फरक आहे. बाकी सर्व गोष्टी तर चांगल्या आहेत ना ! तू जर प्रत्येक वेळी असे करीत राहीलीस तर मनीषचे लग्न होणे कठीण!
मनीष,तुझे काय मत ? "


मनीष - "बाबा, मला प्रिया आवडली आहे . आता फायनल, ह्याच मुलीशी मी लग्न करणार ..."


मनीषची आई - " अरे पण ...."


मनीष - "आई, आता पण वगैरे काही नाही. मला प्रिया आवडली आहे आणि तु ही तिचा सून म्हणून आनंदाने स्विकार कर.."

मनीषचे वडील - " मला पण प्रिया आवडली आहे . सर्व काही व्यवस्थित आहे त्यामुळे नकार देण्यास काहीही अर्थ नाही."

मनीषची आई - " अजून एक दोन मुलींचे सांगून आले आहे. त्या पाहून घेऊ मग ठरवू ना पुढचे."


मनीष - " आई, आता पुरे गं मुली पाहणे .मला कोणतीच मुलगी पाहयची नाही आता. लग्न करणार तर प्रियाशी ."

"आता मुलाचे आणि वडिलांचे एकमत झाले तर मी तरी कशाला आडकाठी आणू..."

असे नाराजीच्या स्वरात मनीषच्या आईने सांगून पुढच्या गोष्टींना अप्रत्यक्षपणे संमती दाखवली.

मुलीकडील सर्वांना तर मनीष आवडलाच होता. त्यामुळे इकडचा होकार जाताच दोघांकडील लोकांच्या संमतीने लग्नाचे ठरविले.

पुढील सर्व कार्यक्रम छान झाले आणि लग्न ही खूप छान झाले. लग्नात सर्वांनी खूप मौजमजा केली.
आणि सूनबाईचा घरात प्रवेश झाला. घरात सर्व आनंदी होते. फक्त सासूबाई वरवर आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत होत्या. मनातून नाराज होत्या कारण सूनबाई त्यांच्या पसंतीची नव्हती ना...

प्रियाविषयीचे आईचे मत घरात मनीषला ,त्याच्या भावाला व बाबांना माहित होते. पण त्यांनी मनावर घेतले नाही. आलेली सून सासूबाईंचे मतपरिवर्तन करणार हे ते जाणून होते.

इतर नातेवाईकांनाही सूनबाई आवडली होती. नवीन जोडप्याला सर्वांचा आशीर्वाद ही मिळाला.

"सूनबाईपेक्षा मनीष थोडा उजळ रंगाचा आहे ..."

अशी एक दोन जणांची कुजबूज सासूबाईंनी ऐकली होती.त्यामुळे सासूबाईंच्या नाराजीत अजून भर पडली होती.

प्रत्येक ठिकाणी अशी लोकं असतात ज्यांना चांगल्यापेक्षा काही तरी वाईट शोधण्यात ,चुका शोधण्यात आनंद मिळत असतो.

सासूबाई प्रियाला काही त्रास वगैरे देत नव्हत्या पण मनमोकळेपणाने बोलतही नव्हत्या,वागतही नव्हत्या. घरातील सर्व प्रियाशी छान बोलत होते.
प्रियाला फक्त सासूबाईंचे वागणे थोडे वेगळे वाटत होते आणि त्याबद्दल तिने मनीषला विचारले ही .मनीषने तिला समजावून सांगितले " थोडे दिवस वाट पहा . आई खूप चांगली आहे ,ती तुझ्याबरोबर छान वागेल.तू फक्त शांतता ठेव आणि आहे तशी छान वागत रहा सर्वांबरोबर. "

सासूबाई सोडून प्रियाचे घरातील सर्वांबरोबर चांगले जमले होते. सासूबाईंशी ही ती छान वागत होती पण सासूबाई योग्य प्रतिसाद देत नव्हत्या.
प्रिया घरातील काम आणि नोकरी व्यवस्थित सांभाळीत होती.

सासूबाईंनाही प्रियाचे वागणे,बोलणे सर्व दिसत होते.ती कुठेही चुकीचे वागत नव्हती . सर्वांशी छान वागत होती. कामेही चांगली करीत होती. त्यामुळे उगाचच काहीतरी चुका काढाव्यात असे सासूबाईंच्या मनाला पटत नव्हते. आणि प्रियाच्या येण्याने मनीषही खूप आनंदी होता . आपल्यावर पहिल्यासारखेच प्रेम करतो. काळजी घेतो. त्यामुळे त्यांना प्रियाचा राग वगैरे आला नाही.

आणि आपण आजारी पडलो तेव्हा प्रियाने रजा घेऊन आपली किती सेवा केली ,काळजी घेतली . आपण तिच्याशी मनात किंतु ठेवून वागत असलो तरी ती आपल्याशी छान ,मनमोकळेपणाने वागते,आपली काळजी घेते. हा विचार सासूबाई करीत होत्या.

फक्त दिसायला सुंदर असणे म्हणजे सर्व काही असते ..
असे नाही.
तर त्याबरोबर स्वभाव, गुण,वागणूक या ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. शरीराने सुंदर असण्यापेक्षा मनाची सुंदरता अधिक महत्त्वाची असते. असे त्यांना समजू लागले,पटू लागले.

मग हळूहळू त्यांचे प्रियाविषयीचे असलेले मत बदलू लागले. आणि त्यांनी तिचा मनापासून सूनबाई म्हणून स्विकार केला आणि आपल्या गुणी सूनबाईचे गुणगान गाऊ लागल्या.