अस्तित्व... एक लढाई

वास्तवाचा चटका लावणारी काल्पनिक कथा

सदर कथा काल्पनिक असून वास्तवाचा चटका लावणारी...

"तर आता मी आपल्या प्रमुख पाहुणे म्हणजेच सुखदा मॅडम ना ह्या मंचावर आमंत्रित करून त्यांनी आजवर ह्या संस्थेसाठी केलेल्या अथक परिश्रमा बद्दल व्यक्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करते." साध्या वेशातील मध्यम बांध्याची एक स्त्री, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेली ती स्टेजवर आली. हातात माईक घेतला अन् ती बोलू लागली.

सुखदा... नाव जरी सुखद वाटतं असलं तरी नावाप्रमाणे माझ्या आयुष्यात काहीच सुखद नव्हत. अशिक्षित, घरात अठरा विश्व दारिद्र्य, एका वेळेचे अन्न देखील मुश्किलीने मिळायचे. तरीही भांडी घासून घराला भार लावायची. पण त्यातून मिळणारे पैसे देखील अपुरे पडत होते. नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने काही काळानंतर मी वेश्याव्यवसायत अडकले गेले. ऐकुन क्षणभर गोंधळले असाल ना.. 'वेश्या' हा शब्द ऐकूनच आता तुमच्यातल्या कित्येकांच्या भुवया उंचावल्या असतील. नाही का..? त्याचा अर्थ लगेच समजला असेल. जो लोकांनी सोयीस्कर रित्या लावून ठेवला आहे पण मुळात वेश्या ह्याचा अर्थ वेगवेगळी वेशभुषा परिधान करणारी कलाकार असायला हवा होता असं मला तरी वाटत. कारण बघा ना, कोणी इथे कोणा लहान मुलाचा बाप व्हायला तयार नसत मग आई ला आई वडील बनून दोन्ही च्या भूमिका कराव्या लागतात, धंदा करत असल्याने तसं पाहिलं तर बिझनेस वुमन, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज कन्विंस करणारी सेल्स गर्ल, आमचा जो दलाल आहे आणि अक्का त्यांच आम्ही सगळ ऐकतो ते जे सांगतील तसं करतो, कितीही ओरडले तरीही आम्ही उलट बोलत नाही. तसं तुमचं देखील असतं ना बॉस आणि एम्पलॉई च नात. मग त्या अर्थी आम्ही पण एम्पलॉई वाटू शकतो. स्पष्ट बोलायला गेले तर, आम्हाला रोज रात्री वेगवेगळ्या पुरुषांच्या त्यांना हवं तस लागणार खेळणं सुद्धा व्हावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी चा अर्थ काय कमी आहेत का एक वेश परिधान करणारी कलाकार म्हणून. पण नाही आपण किती पुढारलेल्या विचारांचे आहोत असं असण्याचा लोक फक्त आव आणतात, ते प्रत्यक्षात खरंच नसतं.

आमच्या इथे किती जण येतात कोणाला आमच्या विषयी पुस्तक लिहायचं असतं, कोणाला आमच्या जीवनावर आधारित चित्रपट तर कोणाला यू ट्यूब वर शॉर्ट फिल्म बनवायची असते म्हणून येतात लोक. काही अपवाद वगळता त्यातले काही लोकं तर मला माझा रेट ही विचारून गेलीत. का ते कळलंच असेल. आम्हीही सांगतो त्यांना आमची कर्मकहाणी. मग जाताना आम्हाला काही देऊन जातात. पुन्हा येतो सांगून कधीच दिसत नाही. आम्हालाही आशा नसते.

आम्हाला तुमच्या कडून काहीही नको ना आम्ही अपेक्षा ठेवत. पण कधी तुम्ही आमची मुलाखत घेताना त्या सभ्य लोकांबद्दल विचारता जे रोज इथे आपला चेहरा लपवून येतात आणि जाताना काहीच न केल्याचे आव आणून निघून जातात. कधी तुम्ही त्या लोकांची मुलाखत घेतली आहात का..?

आम्हाला प्रश्न विचारता अगदी खोलात जाऊन पण कधी त्या लोकांना प्रश्न विचारावेसे नाही वाटत का तुम्हाला ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत..?

आमची कहाणी ऐकून तुम्हाला दुःख अनावर होत पण कधी त्या क्रूर लोकांच्या ह्या कृत्यामुळे तुमचा राग उफाळून येत नाही का?
का त्या लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू घेत नाही, का आम्हीच दरवेळी आमचं जीवन तुमच्या समोर मांडायच..?

काळजी नका करू मला हे प्रश्न खुप आधी पडायचे पण आता जाणून घ्यायची इच्छा नाहीये. मला त्या सो कॉल्ड सभ्य लोकांची काळजी वाटते जे आयुष्यभर स्वतःशी खोटं वागत असतात तेही एका क्षणिक सुखासाठी.

आयुष्यात काहीतरी करण्याची स्वप्न होती पण आज केवळ मजबुरी मुळेच इथे आहे. इथे कोणतीही मुलगी स्वतःहून येत नाही. मजबुरी, फसवणूक नाहीतर बळजबरी ने इथे आलेली असते. काही जणींचे सौदे तर त्यांच्या घरच्यांनी च केलेले असतात. माझ्या मामाच्या ओळखीमुळे च तर आज मी इथे आहे. आणि मामा त्याचा मोबदला दर महिना आईला पाठवलेल्या पैश्यातून घेतो.

मी लहान असताना माझी ही खुप इच्छा होती की मी खूप शिकेन आणि डॉक्टर बनेन. तशी मी अभ्यासात खुप हुशार होते. पहिला क्रमांक मी सहावी पर्यंत सोडलाच नाही. पण नंतर फी न भरल्याने मला वार्षिक परीक्षेत बसू दिलं नाही. माझी बहिण खुप लहान होती त्यावेळी. काहीही करेन पण तिला मोठं माणूस बनवणार म्हणजे बनवणार हे मनाशी पक्क केलं. आई बाबांशी भांडून तिला मी शिक्षण घ्यायला लावत होते. इथे आल्या नंतर माझ्या कमाईतून मी वेळेवर तिची फी भरत होते. भरपूर मेहनत घेतली. रात्री सोबत दिवसा देखील लोकांचा त्रास ओढावून घेतला. मग मेडिकल ला प्रवेश मिळाला तस मी ठरवलं की आपण लोन काढू आणि दरमहा हफ्ता देऊन फेडून टाकू. ज्या बँकेत लोन काढलं त्या माणसाने देखिल मला सोडलं नाही पण माझ्या मेहनत घेण्याच्या मागे फक्त माझं स्वप्न दिसत होत. आता लवकरच ती मला या पाशातून मुक्त करेल अशी स्वप्न पडू लागली. अपेक्षेप्रमाणे तिची खूप छान प्रगती होत असताना पाहून मी जितकं कष्ट घेतले, जितका त्रास काढला त्याच चीज होताना दिसतं होत. शेवटी तो दिवस आलाच. मी झोपले होते अंग पूर्ण ठणकत होतं. जाग आली तशी पाहिलं तर माझी बहिण माझ्या बाजूला. तिने मला उठवलं आणि माझे आभार मानू लागली. आम्ही दोघी एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. बाजूला असलेल्या साऱ्या जणी मला कौतुकाने पाहत होत्या. तिथल्याच एकीने अचानक माझ्यावर पाणी शिंपडल आणि माझं स्वप्न तुटलं.

माझ्या रूममध्ये राहणारी मला उठवत होती पण उठत नसताना पाहून पाणी शिंपडल तिने. जाग येताच मी ओरडले तशी तिने पेपर माझ्या हातात ठेवून म्हणाली तुझी बहिण डॉक्टर झाली. आपल्या बाजूच्या जिल्हात मोठं हॉस्पिटल आहे ना तिकडे आता रुजू होणार. आज तिचा गावात गौरव करण्यात येणार आहे. तिचे बोलणे ऐकून मला माझं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान वाटल. माझे अश्रू काही थांबेना. मी छान आवरून मावशी कडून परवानगी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. सगळ्यांना माझ कौतुक वाटलं होतं तेव्हा. मी आमच्या घरासमोर पोहचली तशी पाहिलं की लहानपणी जस मी घर सजवायची अगदी तसचं माझं घर दिसत होत. रांगोळी काढून त्यात भरलेले रंग मला सुखवत होते. मला ते माझ्या पुढील सुंदर वाटचाली साठी खुणवत होते अस जाणवलं. मी घरात पाऊल टाकताच वातावरण वेगळं झाल. माझ्या घरचे मला किळसवाण्या नजरेने पाहत होते. मला फिकीर नव्हती. मला फक्त माझ्या बहिणीला पाहायचं होतं. पण पाहते तर काय तिच्या नजरेत ही माझ्याविषयी अभिमान सोडून तीच किळसवाणी नजर होती. मी त्या नजरेने स्तब्ध च झाले. घरात खूप शिवीगाळ झाली माझ्यावर. माझे आई वडील जे तिच्या शिक्षणाच्या विरोधात होते आज तेच मला तिच्या शिक्षण करण्यामागचं यश मिरवत असताना दिसले. आणि ती एका कोपऱ्यात मला त्याच नजरेने पाहत होती. तिला माझी खुप लाज वाटतं होती. शेवटी मी जाताना तिने माझ्यासमोर पुन्हा आमच्या जीवनात न येण्यासाठी हात जोडले.

त्यानंतर ते आजपर्यंत मी कधीच मागे वळून नाही पाहिल. तेव्हा कितीतरी दिवस तिच्यासाठी घेतलेल्या लोन चे हफ्ते भरता भरता अंग ठणकत होत आणि तीव्रतेने मला नको त्या पाहिलेल्या सप्नांची जाणीव व्हायची. तिच्या डोळ्यातले माझ्याबद्दल असणारे तिरस्काराची भावना सतत डोळ्यांपुढे येत राहायची. तेव्हाच ठरवलं आपण काहीच चुकीचे केले नाही आणि हे सिध्द करून दाखवूनच राहायचं. ह्या सगळ्यासाठी मी अक्कांकडून परवानगी मिळवून तर घेतली होती. पण मदतीचा हात हवा होता. मिळणं खुप मुश्किल पण अशक्य नव्हतं. माझे प्रयत्न चालूच होते. अश्यातच आमच्या इथे आरोग्यसंबंधी माहिती देणाऱ्या संस्थेतल्या रूपाली मॅडम यांच्याशी ओळख झाली. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ह्याबद्दल एक एक गोष्ट त्यांनी प्रत्येकीला समजावून सांगितली. पहिल्यांदा कोणीतरी माझी काळजी करत होत जाणवलं. त्या त्यांच्या कामाबद्दल इतक्या एकनिष्ठ होत्या की त्यांना जगाची तमा नव्हती. खऱ्या गरज असणाऱ्या लोकांना त्या सतर्क करण्याचे काम त्या अगदी चोख पार पाडत होत्या. त्यांना असं पाहून माझ्यात दहा हत्तींच बळ आलं. गमविण्यासारख आता काहीच राहिलं नव्हत. मोबदला नाही मिळाला तरी चालेल पण मला देखील ह्या संस्थेत सामील करून घेण्याची विनंती त्यांना केली. मिळेल ते काम करून मी संस्थेसोबत जोडून होते. आज पंधरा वर्षे झाली. नावारूपास आलेली ही संस्था आज मलाही महत्वाचा भाग मानते ह्याचा मला अभिमान आहे. सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे, आयुष्या च्या वाटेवर चालताना मिळालेल्या चटक्यांमुळे आज इथवर पोहचले आणि स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. माझ्या घरच्या लोकांसाठी माझ अस्तित्व कधीच संपल होत. मला आजही शाळेतल्या पुस्तकात असलेलं संत तुकारामांनी लिहलेल्या अभंगाची पाहिली ओळ आठवते. खरतर ती कोरली गेली आहे माझ्या मनावर,

*नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥॥*

*तैसें चित्त शुद्ध नाहीं । तेथें बोध करील काई ॥॥*

आयुष्यात हरले होते पण थकले नव्हते फक्त सकारात्मक विचारांमुळे. नैराश्य हाच तो थकवा ज्याला कधीच आपल्या जवळ यायला देऊ नका. 

(सदर कथा काल्पनिक असून काही चुकलं असेल तर वाचकांनी सांभाळून घ्याल अशी खात्री करते.)

- अक्षता कुरडे.