अस्तित्व - एक चंदेरी स्वप्न!

एका यशस्वी माणसाने अनुभवलेलं अयशस्वी वास्तव!
अस्तित्व - एक चंदेरी स्वप्न!


" आयुष्याने आपल्याला काय दिलं, यापेक्षा आपण आयुष्याला काय दिलं याचा जर हिशोब केला तर आयुष्य नावाचं किचकट उदाहरणही सहज सुटतं. " नेहमीप्रमाणे आजही त्याने त्याच्या डायरीत या ओळी खरडल्या. आणि तो तसाच डोळे मिटून आरामखुर्चीवर मागे रेलून बसला. शेजारी डावीकडे लांब चंदेरी रंगाची इमारत चकाकत होती. खिडकीतून मात्र ती लहान होत गेलेली दिसायची. आणि त्याच्या एका बाजूचा नजारा झगमगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र काळ्याकुट्ट अंधाराने मिठीत घेतल्यासारखं भासायचं. डोळे मिटलेले असूनही इतक्या वर्षात मुंबईत राहुन तिथल्या वाऱ्याच्या झुळूकेच्या आभासानेही तिथे आजूबाजूला काय घडतंय हे त्याला अंदाजातून समजायचं. किंबहुना हे सगळं आता त्याच्या सवयीचंच झालेलं. आणि तो डोळे मिटलेल्या अवस्थेतच गुढपणे हसला.

आज फिर जीने की तमन्ना है,
आज फिर मरने का इरादा है...

त्याच्या मनात ते गाणं कुठूनतरी वाजत होतं. कदाचित त्याच्या मनाने भावनेची साद ऐकली असावी. आणि त्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं मंद हसू अजूनच फुललं. तो आता उठून खिडकीजवळ येऊन उभारला. मघाशी त्याने कल्पलेलं ते दृश्य अगदी तसंच होतं. त्याने सहज खाली बघितलं. तर खालून काहीतरी चमकत असल्याचं दिसलं. नीट बघितलं असता कळलं की तो एका दुचाकीच्या आरशाचा भाग होता. तो हातभर आरसाही त्याला इतक्या दूरून नखाएवढा दिसत होता. त्यावरून त्याने कल्पना केली की या तर फक्त वस्तू आहेत. तर माणसांबद्दल काय सांगायचं. न जाणो या मायानगरीने असे किती जीव पदराखाली घेतलेत. ही मुंबईच आहे जिच्यात प्रत्येकाला सामावून घेण्याची ताकद आहे. याच मुंबईने असे कितीतरी भयानक सत्य पोटात लपवून ठेवलेत. किती काही सोसलंय या मायानगरीने पण तरीही ती उभीच आहे अजूनही प्रत्येक घाव सोसत..

या आठवणींनी तो भावूक झाला. नकळत सुरूवातीपासूनच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या. दादरच्या रस्त्यावर खेळलेलं क्रिकेट, तो टेनिस बॉलचा वेग, जगण्यासाठी धडपडण्याची अनेकांची कसरत. अगदी कुलाबा ते बांद्रा. तेव्हा ते किती छोटं वाटायचं. तेव्हाचा माणसाचा आवाकाही तेवढाच होता. पण आता मात्र सगळं किती अवाढव्य बनलंय. असं वाटतं आपण जे बघितलं ते खरं होतं की आता जे पाहतोय ते खरं... हा प्रश्न त्याला पडलेला. ती छोटी गल्ली खरंच अस्तित्वात होती का, जिथे रोज लहान मुलं डबा-ऐसपैस, बर्फ पाणी यासारखे खेळ खेळायचे. का ते फक्त आपण एखाद्या कृष्ण धवल फिल्ममध्ये पाहिलेलं. तो तिथून जरासा मागे गेला आणि त्याने व्हिस्कीचा ग्लास भरला. नशा म्हणून नाही पण कधीतरी मनाला दिलासा देण्यासाठी तो स्वत:ला या गोष्टीची परवानगी द्यायचा.

हातात व्हिस्कीने अर्धवट भरलेला ग्लास घेऊन तो पून्हा खिडकीजवळ येऊन उभारला. आता सगळं आधीपेक्षा भुरळ पाडणारं भासत होतं. पण त्यात आता आधीसारखा ओलावा दिसत नव्हता. जग बदलतंय मग काळाप्रमाणे आपणही हा बदल स्वीकारायला काय हरकत आहे. अशी त्याने मनाची समजूत काढली. पण त्या सुवर्णकाळाचे आपण साक्षीदार ठरलो याचं समाधान वाटलं त्याला.. या अंधारलेल्या काळोखात स्वत: ला अलगद झोकावून द्यावं असं त्याला वाटत होतं. या हवेच्या झोतात लहरत, फडफडत अखेर खाली कोसळून क्षणभराच्याच यातनेने आपण मुक्त होऊ सगळ्यातूनच... आता त्याच्या विचारांचे घोडे चहुबाजूंनी उधळत जात होते.

मघाशी डायरीत लिहिलेल्या त्या दोन ओळी आता त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह बनून नाचत होत्या. काय दिलं आपण आपल्या आयुष्याला, हा प्रश्न तो स्वत: ला विचारत होता. कोण होता तो, नक्की त्याची ओळख काय होती हे मागच्या काही दिवसात तो विसरून गेलेला. पण आज त्याला सगळं आठवत होतं. तो एक नावाजलेला लेखक दिग्दर्शक होता. ८०-९० चा काळ त्याच्या संवाद लेखनाने आणि उत्तम दिग्दर्शनाने त्याने गाजवलेला. याच जोरावर अनेक नवखे कलाकार सुपरस्टार झालेले... पण मागील काही वर्षांपासून मात्र तो या झगमगाटी दुनियेतून अलिप्त होत एकांतात राहत होता. त्याचं पूर्ण आयुष्य म्हणजे एखाद्या संघर्षमय कथेसारखं संघर्षाने भरलेलं आणि रहस्यमय होतं.

खरं तर त्याचा जन्म पेशावरचा. पण देशाची फाळणी झाली आणि तो त्याच्या कुटूंबापासून दुरावला. तेव्हा तो फक्त चौदा वर्षांचा होता. त्यानंतर तोही असाच फिरत भटकत मुंबईत येऊन पोहोचला. फुटपाथवर झोपून, दोन दोन दिवस उपाशी राहून त्याने दिवस काढले. काहीतरी काम करावं ज्याने निदान पोटाचा तरी प्रश्न सुटेल. यासाठी त्याने आधी स्टेशनवर हमालाचं तर कधी बूट पॉलिशिंगचं काम केलं. कामामुळे मिळणारे ते तुटपुंजे पैसे बघून पण तो खुश व्हायचा. कारण त्या चिल्लर पैशांनाही त्याच्या मेहनतीचा दर्प होता. त्यानंतर त्याला आता राहण्याचा प्रश्न सतावत होता. अजून किती दिवस फुटपाथवर झोपणार हा विचार करता करता त्याला आता काहीतरी मोठं करायचे वेध लागलेले. त्याला लहानपणापासून असलेल्या वाचनाच्या आवडीत भर पडावी म्हणून तो आता एका पेपर छापणाऱ्या कारखान्यात काम करू लागला. फावल्या वेळात तो तिथले पेपर वाचायचा. आणि अशातच एक दिवस त्याला कळालं एका मोठ्या दिग्दर्शकाने स्टुडिओची संकल्पना मांडून ती अमलात आणायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तिथे भरपूर श्रमशक्ती लागणार होती. आणि तो तिथे गेला ते कायमस्वरूपी त्या स्टुडिओचा भाग बननण्यासाठीच.

पुढे त्याला अनुभव येत गेला तसं तो कॅमेरामन म्हणून काम करू लागला. आणि शूट करताना कलाकारांचा अभिनय संवादफेक बघून त्याच्यातला लेखक जागा झाला. आता तो प्रत्येक सिनेदिग्दर्शकाला संवादाच्या आयडिया देऊ लागला. म्हणून एके दिवशी एका दिग्दर्शकाने त्याला थेट त्यांच्या चित्रपटातील काही डायलॉग लिहायला दिले. आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. अनेक जाणकारांच्या मते उत्कृष्ट डायलॉग हा त्या सिनेमाच्या सुपरहिट होण्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. आणि त्याच्या आयुष्यातलादेखील. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही.

तो व्यावसायिक जीवनात बेशक यशस्वी ठरलेला. मात्र स्वत:ची हक्काची माणसं त्याला कधी कमावता आली नाहीत. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. पण त्याचं हद्य मात्र एकाच व्यक्तीवर फिदा होतं. ती एक  गायिका होती. पण त्याने तिच्यासमोर त्याचं प्रेम व्यक्त करण्याआधीच तिने या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मात्र त्याचा प्रेमावरचा आणि जगण्यावरचा विश्र्वास उडालेला. पण तेव्हा मित्रांनी आणि काही सहकाऱ्या त्याला सावरलेलं. आणि आयुष्याकडे अतिशय निर्मळपणे पाहणारा तो त्यातून सावरलाही. त्याने एक अनाथ रस्त्यावर राहणारी मुलगी दत्तक घेतली. आणि तिचा योग्य सांभाळ करून तिला घडवलं. जसजसं वय वाढत गेलं तसतसं तो अधिक यशस्वी होत गेला. पण मनोमन मात्र नेहमी त्या देवाला मृत्यूची मागणी करायचा. त्याने अनेक बेघर निर्धरांना आधार देत त्याचा सगळा पैसा यासाठीच वापरला. मात्र आता त्याला या झगमगाटी दुनियेपासून दूर जायचं होतं. त्यामुळे तो देवभूमी असलेल्या केरळमध्ये गेला. पण तिथेही त्याचं मन रमलं नाही. आणि काही दिवसांनी मुंबईत परतला.

मुंबई म्हणजे त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली. मी जरी जन्मतः मुंबईचा सुपुत्र नसलो तरी मी मरणार मात्र मुंबईचा मानसपुत्र म्हणूनच. कारण या मुंबईने मला जन्म दिला नसला तरी माझं आयुष्य घडवलं ते मुंबईनेच... पण तरीही एकदा मरण्याआधी पाकिस्तान स्थित पेशावरला जायची इच्छा आहे. ही खंत त्याला असली तरी त्याची तीव्रता मुंबईने भरून काढली. असं तो मानत होता.

आतापर्यंत हे सगळं झरझर त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेलेलं. त्याला मघाशी सतावणारा तो प्रश्न आता मिटला होता. कारण आपण आयुष्याला काय दिलं याचा हिशोब त्याला उलगडला होता. त्याने ग्लासातली व्हिस्की संपवली अगदी शेवटच्या थेंबापर्यंत... आणि त्याने समोर बघितलं. ती मुंबई अजूनही तिथे झगमगत होती. अजूनही ती अनेकांच्या मनातलं चंदेरी स्वप्न म्हणून कायम होती. ती काळानुरूप बदलेल, पालटेल पण ती कधीच संपणार नव्हती. त्याने पून्हा एकदा वरून खाली बघितलं. मघाशी इथूनच खाली झेपावण्याची त्याने कल्पना केलेली. पण आता ती कल्पना निरर्थक होती हे आता स्पष्ट झालेलं. तो हसला. आणि पून्हा आत जाऊन बेडवर झोपला. त्याच्या मनातलं धुमसणारं ते वलय आता संपुष्टात आलेलं.

समाप्त.

लेखिका - अबोली डोंगरे