एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट येट!

तिच्या जीवनाला कलाटणी देणारा काही वर्षांपूर्वीचा हाच तर तो दिवस होता. आयुष्यातले अनेक सोनेरी ?

एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट येट!

नाजूक चणीची, सुंदर आणि गौरवर्णी अशी ती. मोतिया रंगाचा पायघोळ, सुंदर विणकाम असलेला गाऊन घातलेला, छानशी हेअरकट केलेले सोनेरी केस एका केशरचनेमध्ये व्यवस्थित बांधलेले, गळ्यालगत रुळणारी मोत्यांची माळ, बाकी फारशी काही सौंदर्यप्रसाधने न वापरता फक्त फिकट गुलाबी नैसर्गिक रंगाचे लिपस्टिक ओठांवरती लावलेले. अशी अगदी त्याच्या आवडीच्या पेहरावात सजलेली सोफिया . खूप मोहक दिसत होती ती. चेहऱ्यावर सात्त्विक सौंदर्याचे तेज होते. तिच्या हातातला फुलांचा गुच्छही त्याला आवडणाऱ्या गुलाब आणि लॅव्हेंडरच्या फुलांचाच. त्याच्या भेटीच्या अनावर ओढीने ती चालत होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

पण हे काय? तिच्या चेहऱ्यावर तो आनंद न दिसता काहीतरी वेगळेच दिसत होते. चेहऱ्यावरचे भाव पावलागणिक अधिकाधिक गंभीर होत होते. खोल डोहासारख्या असलेल्या तिच्या नयनातून अश्रूरूपी मोत्यांचे शिंपण त्या हातातल्या फुलांवर होत होते. नजरेत कारुण्य दाटले होते. अगतिक झालेली ती गालावरून ओघळणारे अश्रूंचे उष्ण कढ थोपवू शकत नव्हती. तिच्या सात्त्विक सौंदर्याला वेदनेची किनार होती , मनातल्या यातनांचे कोंदण होते. तिचे डोळे भरून आल्यामुळे समोरचे धूसर दिसत होते. मंद चालीने चालतानाही तिची पावले अडखळत होती.

तिच्या जीवनाला कलाटणी देणारा काही वर्षांपूर्वीचा हाच तर तो दिवस होता. आयुष्यातले अनेक सोनेरी क्षण तिने त्याच्या साथीने अनुभवले होते. त्याचे जीवापाड प्रेम तिने आपल्या हृदयात कैद करून अलवार जपले होते आणि शेवटी आता तेच तिच्या जगण्याचा आधार बनले होते. जगातली कितीही भौतिक सुखे असली तरी माणसाचे मन तर शेवटी प्रेमाचेच भुकेले असते ना? प्रेम, जिव्हाळा, ममता या गोष्टीच तर माणसाला वेगवेगळ्या परिस्थितीमधून तारून नेतात. असेच त्याचे तिच्यावर असलेले जीवापाड प्रेम तिच्या हृदयात खोलवर वसलेले होते. तिनेही त्याच्या प्रेमाला योग्य न्याय देत तेवढ्याच भरभरून प्रेमाची उधळण त्याच्यावर केली होती.

पण नियतीला कदाचित हे मंजूर नसावे. विधिलिखित काही वेगळेच होते. असे काय घडले असावे? सोफिया आणि रॉजर काही वर्षांपूर्वी याच दिवशी विवाहबंधनात बांधले गेले होते. त्यानंतर उण्यापुऱ्या दोन वर्षांचा दोघांचा सहवास! त्यात संसारवेलीवर सॅमी नावाचे एकुलते एक फूल फुलले होते. रॉजर हा एक ज्यू सैनिक होता. दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि तो ड्युटीवर असताना त्यात जखमी झाला. त्यानंतर त्याला आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांना विरोधी सैन्याने पकडून बंदी बनवले आणि त्यांना डाखाऊच्या छळछावणीमध्ये डांबून ठेवण्यात आले .

डाखाऊची छळछावणी, 'डाखाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प' म्हणजे हिटलरने निष्पाप, निर्दोष ज्यू, रोमानी आणि काही इतर, जे जर्मन समाजात राहण्यास त्याच्या दृष्टीने योग्य नव्हते अशा लोकांना कैद करून त्यांचा छळ, हाल हाल करून मारण्यासाठी सुरु केलेली पहिली छळछावणी. जर्मनीतल्या म्युनिक शहराजवळच्या डाखाऊ या छोट्या, निसर्गरम्य गावामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही छावणी उभारली होती. पुढे याच धर्तीवर इतर अनेक ठिकाणी अशा छळछावण्या तयार झाल्या होत्या.

तेथील कैद्यांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने रोज छळ होत असे. कधी टांगून ठेवले जाई, कधी फटके मारले जात. इमारतीसमोरच्या मैदानात पहाटे रोज कैद्यांना हजेरीसाठी उभे केले जाई. त्यातले काही वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगासाठी निवडले जात, तर काही शिक्षेसाठी. काळ्या गणवेशातले हेल्मेटधारी जर्मन सैनिक कैद्यांचा गणवेश घातलेल्या, डोक्यावर हात धरलेल्या कैद्यांना ढकलून ढकलून शिक्षेसाठी घेऊन जात. कैद्यांच्या आरोळ्या, किंकाळ्या यांनी जीवाचा थरकाप होई. तिथे असलेले कैदी अशा वातावरणात शेवटी एकतर झुरून झुरून मृत्यूमुखी पडत किंवा गॅस चेम्बरमध्ये डांबून , फटके देऊन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना यमसदनाला पाठवले जाई. ही छावणी म्हणजे क्रौर्याचा कळसच! १९३३ साली ही छावणी सुरु झाल्यापासून ते १९४५ या बारा वर्षात इथे एकूण दोन लाख लोकांना कैद केलं गेलं आणि त्यात चाळीस हजार पेक्षा जास्त लोकांनी जीव गमाविला.

रॉजरला छावणीत आणल्यानंतर छावणीतले वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक मन विदीर्ण करणारे, हृदय पिळवटून टाकणारे होत चालले होते. नवीन कैद्यांची भर पडत होती. फटके, चटके सहन करताना होणारा इतर कैद्यांचा आक्रोशही रॉजरला ऐकवेनासा होई . हात बांधून उंच खांबाला लटकावून ठेवलेल्या अवस्थेत हाताला, पाठीला रग लागे. पाठीवर आधीच उमटलेले वळ बरे होण्यापूर्वीच त्यात आणखी वळांची भर पडे. छळ करण्यासाठी अधिकारी नवनवीन मार्ग शोधत.

'सोफिया, कशी असशील ग तू? तुझा रॉजर आता थकलाय ग. किती वेदना साहू? सगळं सहन करतोय ते फक्त तुमच्याजवळ परत येण्यासाठी. कधीतरी या नरकयातना संपतील आणि मला घरी येता येईल, या आशेवर युगाप्रमाणे भासणारा हा एक एक दिवस जगतोय. आपली सॅमी आता मोठी झाली असेल ना? इकडे तिकडे पळत असेल, छान एखाद्या परीसारखी दिसत असेल. तुझीच छबी उतरलीय का ग तिच्यात? कधी बघायला मिळेल मला? तिला आठवतही नसेल ना ग तिचा बाबा? काय करू? माझ्या ललाटी दुर्भाग्यच तसे लिहिले आहे! ' रॉजरचे मन आक्रंदन करत असे.

बाहेर निघण्याची आशा जवळपास मावळलेली असताना अशा वातावरणात स्वतःला होणारा त्रास, यातना, वेदना कुठवर सहन करणार? सोफियाच्या त्याच्यावर असलेल्या प्रेमाच्या आठवणीने तो आपल्या दुःखावर फुंकर घालू पाही. तो घरून निघताना वर्षभराचीच असलेली सॅमी त्याच्या डोळ्यासमोर येई. कधीतरी इथून सुटका होऊन त्यांच्याजवळ जाता येईल, या आशेवर रॉजरने नऊ वर्षे अशा हालअपेष्टा सहन केल्या. सरतेशेवटी,

"सोफिया ऽऽऽ , माफ कर मला. तुला दिलेली वचने मला निभावता नाही आली. तुला सुखात नाही ठेवू शकलो. मी परत नाही येऊ शकलो. खरंच माफ कर मला. सॅमी, पिल्लू, माफ कर मला." अशी शेवटची साद घालत एक दिवस त्याने अंतिम श्वास घेतला. तोही दिवस होता नेमका त्यांच्या लग्नाचा वाढदिवसच!


त्यामुळे दरवर्षी हा दिवस जवळ आला की सोफियाचे हृदय पिळवटून निघे. त्याने इतके हाल कसे सहन केले असतील असे वाटून त्याचा तो चेहरा तिच्या डोळ्यासमोर येई. अखेर रॉजरचा तिच्यासोबतच्या एकूण संसारापेक्षा जास्त काळ तर या छावणीतच व्यतीत झाला होता ना !

'डाखाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मेमोरियल' मधल्या त्या मोठमोठ्या दालनातल्या भिंतींवर त्या वेळेचे कैद्यांचा छळ करतानाचे बरेच फोटो, चित्र लावलेले होते. काही फोटोमध्ये रॉजरही हात वर बांधलेल्या अवस्थेत, तर कुठे फटके खाताना दिसत होता. त्याच्या त्या हृदय भेदून जाणाऱ्या आरोळ्या, किंकाळ्या जणू तिला इथल्या आसमंतात आजही ऐकू येत. एक एक फोटो पाहताना तिचे पाय लटलट कापू लागत. डोळे भरून येत. हुंदके गळ्याशी येत. कधी कधी एखाद्या फोटोसमोर भोवळ येऊन ती मटकन बसून जाई. शिक्षा सहन करून करून चेहऱ्यावरची रया पार गेलेला, केविलवाणा झालेला रॉजर फोटोत दिसत होता. अतिशय उत्साही, उमदा आणि शूर असलेल्या रॉजरचा असा करुण अंत व्हावा! त्याच्या हयातीतल्या, त्याच्या अस्तित्वाच्या शेवटच्या क्षणांना मुठीत गोळा करून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ती तिथे भेट देऊन करत असे. रॉजरच्या असंख्य स्मृती तिच्या मन:पटलावर गर्दी करीत.


१९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी इथल्या उरलेल्या बंदिवान लोकांना मुक्त केलं. कैद्यांच्या वस्तू, कपडे इत्यादीचे जतन करून त्या पारदर्शक पेट्यांमध्ये संग्रहित करून ठेवण्यात आल्या. युद्ध संपले, पण कित्येकांनी घरातले, परिवारातले सदस्य एकतर या युद्धात किंवा कोणत्यातरी अशा छळछावणीत गमावले होते. त्यांची जगण्याची लढाई अधिकच बिकट झाली होती. युद्धात बेचिराख झालेले देश हळूहळू आपापल्या परीने झगडत परिस्थिती सावरायला लागले. पण होरपळून निघालेल्या मनांचे काय? कित्येक लहान मुलांच्या , तरुणांच्या मनांवर झालेल्या आघातांचे वळ तर आयुष्यभर तसेच राहिले होते.


त्या गोष्टीला आज इतकी वर्षे लोटली, तेव्हा तरुण असलेली सोफिया आता वयस्कर झाली होती. तरीदेखील मनाचा घायाळ झालेला हळवा कोपरा तसाच राहिला होता. तिचे मन त्या दुःखातून अजून सावरू शकले नव्हते. आयुष्याचा साथीदार तिने या युद्धात गमावला होता, तोही ज्या दिवशी त्यांनी आजीवन एकमेकांसोबत राहण्याची वचने घेतली, त्या दिवसाच्या वर्षगाठीलाच! सोफियाच्या दुःखाला सीमा नव्हती.

दरवर्षीप्रमाणे आजही तिने त्या 'डाखाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मेमोरियल' ला भेट दिली होती. तिथे काचेच्या पेटीत ठेवलेल्या रॉजरच्या सैनिकी वर्दी, त्याचे पाकीट, त्यात असलेले सोफिया आणि एक वर्षाच्या सॅमीचा फोटो, घड्याळ कमरेचा पट्टा इत्यादी गोष्टी बघून तिला भडभडून आले होते. तिथूनच ती आता त्याच्या समाधीकडे जात होती. त्याच्या आठवणीत तिच्या सैरभैर झालेल्या मनाची साक्ष तिच्या डोळ्यातील अश्रू देत होते.

त्याच्या समाधीजवळ पोहोचल्यावर तिने हातातला पुष्पगुच्छ ठेवला आणि रॉजरच्या असंख्य स्मृतींना अश्रूंचे अर्घ्य वाहत कितीतरी वेळ तिथेच बसून राहिली. तिच्या मनातला त्याच्या स्मरणांचा घन लोचनांतून मुक्तपणे बरसल्यानंतर काहीशी रिती होऊन ती घरी आली.


ती घरी येईपर्यंत सॅमी म्युनिकहून येऊन सोफियाच्या घरी पोचलेली होती. सॅमी म्युनिकमध्ये कॉलेजमध्ये शिकता शिकता अर्धवेळ नोकरीही करत होती. तिला आईच्या भावनांची जाणीव असल्यामुळे या दिवशी तीही आईबरोबर राहण्यासाठी येत असे. दोघी एकमेकींना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत. सोफिया घरी आली, तर तिला घरी हॉलमध्ये सॅमीबरोबर एक अनोळखी कुटुंब बसलेले दिसले, त्यातले नवरा बायको अंदाजे पस्तीशीतले असावे आणि बरोबर नऊ-दहा वर्षांचा मुलगा . ते तिघेही उठून उभे राहिले. सोफियाने त्यांना बसायला सांगितले. सॅमी म्हणाली,

"मॉम, बघ, आपल्याला भेटायला कोण आले आहे."

"हॅलो मॅडम. " अभिवादन करत त्या कुटुंबातील स्त्री म्हणाली.

"मी ओळख करून देते. मी अंकिता. हा माझा मुलगा आयुष, आणि हे माझे पती. आम्ही भारतीय आहोत. दोन-तीन दिवसांपूर्वी आम्ही डाखाऊ कॉन्सन्ट्रॅशन कॅम्प मेमोरियलला भेट दिली होती. तिथे काचेच्या पेटीमध्ये मिस्टर रॉजर यांचा गणवेश आणि त्याच्या बाजूला एका छोट्याश्या मुलीचा फोटो होता. तो बघून आयुषचे आणि आमचे मन खूप हेलावले. त्या छोट्याश्या मुलीला भेटण्याची आयुषला तीव्र इच्छा झाली. तिच्या वडिलांविना ती आता कशी असेल, कुटुंब कसे राहत असेल ते बघण्याची, त्यांना श्रद्धांजली देण्याची त्याला खूप इच्छा होती. म्हणून आम्ही तिथल्या कार्यालयात जाऊन त्यांची मदत घेतली. त्यांनी त्यांच्या यंत्रणेची मदत घेऊन आम्हाला तुमचा पत्ता शोधून दिला."

"ओह! कम माय चाईल्ड, कम हिअर. " सोफियाने आयुषला जवळ बोलावले. मग सॅमीकडे हात दाखवून म्हणाली, "शी इज द लिट्ल गर्ल यू आर लुकिंग फॉर, हर नेम इज सॅमी ."

मग आयुषने पुढे होऊन सोफियाला एक फुलांचा गुच्छ दिला आणि म्हणाला, "दिस इज फॉर हर फादर्स मेमरीज ."

सोफियाने त्याच्या डोक्यावरून आपला हात प्रेमाने फिरवला. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. सॅमीही गहिवरली. तिला या छोट्याश्या मुलाचे कौतुक वाटले. तिने त्या दोघींसाठी आजच्या दिवसाची असलेली विशेषता आणि जुळून आलेला यांच्या भेटीचा योग याबद्दल त्यांना सांगितले तसे सर्वच जण भावुक झाले.

सॅमीने सर्वांना कॉफी दिली. कॉफी घेता घेता सोफियाने सांगितले की तिने कशा भयाण परिस्थितीत लहानग्या सॅमीला एकटीने सांभाळत नोकरीसाठी वणवण केली, कसे परिस्थितीशी झगडत एकटीने सॅमीला लहानाचे मोठे केले, शिकवले. प्राथमिक शाळेत नोकरी करून तुटपुंज्या कमाईत ती कुटुंब चालवत होती. आता सॅमीही अर्धवेळ नोकरी करून कॉलेजची भरपूर असलेली फी भरण्यासाठी हातभार लावत होती . जीवनातल्या प्रत्येक लहानमोठ्या वळणावर सॅमी वडिलांच्या भरभक्कम आधारास मुकली होती.

हे सगळे सांगताना सोफिया भावुक झाली. एक दोन मिनिटांनी जरा सावरल्यावर ती अंकिताला म्हणाली,

"आय एम डीपली टच्ड! यू ऑल टुक सो मच एफर्ट्स टू मीट अस. युअर सन इज क्वाईट सेन्सिटिव्ह. ही अंडरस्टॅण्ड्स अदर्स पेन. नॉवअडेज इट इज व्हेरी रेअर. पीपल डु नॉट केअर फॉर अदर्स. "

"गॉड ब्लेस यू माय चाईल्ड! आय विश यू अ ग्रेट फ्युचर." ती आयुषला म्हणाली.

"तुम्ही भाग्यवान आहात अंकिता. तुमचा मुलगा संवेदनशील आहे. इतक्या लहान वयातही त्याला इतरांच्या दुःखाची कल्पना येते. त्याला त्याची जाण आहे , कणव आहे . या युद्धात माझं सर्वस्व असलेला माझा नवरा, माझं विश्व हरवलंय, अगदी अमानुषपणे त्याचा छळ झाला. त्यामुळे जगात भावना, प्रेम शिल्लकच नाही असं मला वाटायचं. आजकाल इतरांबद्दलच्या जाणिवा , संवेदनशीलता कमी झालेल्या दिसतात. पण या विश्वात कुठेतरी नव्या पिढीतही इतरांबद्दलच्या संवेदना, जाणिवा अजून शिल्लक आहेत, पूर्णपणे हरविल्या नाहीत, हे बघून मला खरंच समाधान वाटतंय. "

आयुष , अंकिता निरोप घेऊन निघताना सोफिया आयुषच्या डोक्यावर हात ठेवून अंकिताला म्हणाली,

"आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग ... बट एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट फ्रॉम द वर्ल्ड येट!"


© स्वाती अमोल मुधोळकर
* कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. *

युद्धस्य कथा: रम्या: म्हणत युद्धाच्या कथा दुरून, उत्सुकतेने ऐकल्या, पाहिल्या जात असतील तरी ज्यांच्यावर असे प्रसंग बेततात त्यांची अवस्था किती कठीण होत असेल? युद्ध कोणतेही असले , कधीचेही असले तरी कोणाच्या तरी हट्टापायी, हव्यासापायी कितीतरी निर्दोष, निष्पाप लोकांना सजा भोगावी लागते. दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मनात असंतोषाचे, द्वेषाचे बीज रोवले जाते. कितीतरी कुटुंब उध्वस्त होतात. मागे राहिलेल्यांच्या जगण्याचा संघर्ष अधिक बिकट होतो. अशाच एका कुटुंबाची ही काल्पनिक कथा.

कथेचा कालखंड दुसऱ्या महायुद्धानंतर वीस- पंचवीस वर्षांनंतरचा. काल्पनिक पात्र, घटना असलेली, परंतु पार्श्वभूमी बरीचशी खरी असलेली कथा. कथेत पात्रांमध्ये संवाद इंग्रजीत किंवा जर्मन मध्ये होतात पण इथे मराठीत लिहिले आहेत.