एवढे पुरेसे ना...

defination of happiness



कवितेचे शीर्षक :- एवढे पुरेसे ना.....
कवितेचा विषय :- सुखाची परिभाषा
उपविषय :- राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी 2
टीम :-अमरावती


पहाटेचा गार वारा
गेला अंग शहारूनं
बागेतल्या हिरवळीने
पाय गेले मोहरूनं
सूर्य किरणांनी जाई
क्षण निवांत उजळूनं
एवढे पुरेसे ना हे,
सुखाचे पांघरूनं.....

अचानक ती दिसली
तिच्या बटांना सावरूनं
तारूण्याचा कोवळा निर्झर
लाजे पापणी आडूनं
जवळ सहज येतांना
पदर बोटात गुंफूनं
एवढे पुरेसे ना हे ,
सुखाचे पांघरूनं....

मायेचा ओलावा माहेरचे घर
सासरी कौतुक आभाळ भरूनं
दोन चार सख्या असो घडीभर
सुखदुख कळावया चेह-यावरूनं
ज्ञान,कौशल्य मिळाया
मिळे साथही घरूनं
एवढे पुरेसे ना हे,
सुखाचे पांघरूनं...

दीनदुबळ्यांची सेवा
घडो माझिया हातूनं
मातीसाठी कणकणं
जावो मातीत मिसळूनं
असो भ्रतार सांगाती
जन्मोजन्मीचा होऊनं
एवढे पुरेसे ना हे ,
सुखाचे पांघरूनं....


©® रोशनी निलेश कडू
टीम अमरावती.