Repost. गुंतागुंत

दोन प्राणज्योत अदला बदल झाल्यावर उडालेल्या गोंधळाची कथा
नारायण रघुनाथ मोकाशी. पुण्यातल्या एका सहकारी बँकेत ऑफिसर. नेहमी प्रमाणे सकाळची धावपल सुरू होती. बँकेत वेळेवर जायची जायची घाई होती. अशातच डबा भरता भरता करुणाला, म्हणजे नारायणच्या बायकोला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. छातीची धडधड खूप वाढून गेली. शरीराला घाम सुटला होता. तशातच तीने कसाबसा डबा भरून नारायणला दिला. नारायणने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला धक्काच बसला.
अग काय होतय तुला ? चेहरा कसा विचित्र झालाय. घाम पण खूप आलाय. तू ताबडतोब आडवी पड. तिला झोपवल्यावर त्यांनी बँकेत फोन केला, वरिष्ठांना परिस्थिति सांगून आज येत नाही अस म्हणाला. मग त्यांच्या नेहमीच्या रिक्षावाल्याला फोन करून बोलावून घेतलं आणि दवाखान्यात पोचले. तिथे BP चेक केल्यावर ECG काढला. पल्स रेट खूप वाढून गेला होता. तिला डॉक्टरांनी लगेच ICU मध्ये शिफ्ट केलं.
मोकाशी, ECG बघितल्यावर अस दिसतंय की तुमच्या बायकोला हार्ट अटॅक येऊन गेला आहे. पण आता काळजी करू नका. तुम्ही अगदी वेळेवर इथे आणलत. थोडा उशीर केला असता तर मात्र कठीण होत. त्या आता ICU मध्ये आहेत. आम्ही सर्व काळजी घेऊ. She will be fine. डॉक्टर म्हणाले.
ऑफिस मधून फोन आला. साहेबच बोलत होते.
मोकाशी, आता कशी आहे तब्येत ? डॉक्टर काय म्हणालेत ?
मोकाशींनी सर्व सांगितलं आणि म्हणाला
साहेब, किमान आठ दिवस तरी रजा लागेल. आत्ता तर व्यवस्था आहे पण कदाचित नंतर पैसे लागू शकतील. तेंव्हा थोडं लोन मिळेल का ?
मोकाशी तुम्ही काळजी करू नका . सर्व व्यवस्था होऊन जाईल.
नारायणला बरं वाटलं. तो पुन्हा ICU मध्ये जायला निघाला पण नर्स नि त्याला अडवलं. म्हणाली ICU मध्ये इतरांनी जायची परवानगी नाही. पेशंटला जरूर पडली तर आम्ही तुम्हाला बोलावू. तुम्ही आता इथेच बाहेर बसा.
नारायणनी घरी फोन केला घरी मुलं आणि आई होती. आईला परिस्थितीची कल्पना दिली आणि बहिणीला म्हणजे सुलभाला बोलाऊन घे. मी इथेच थांबणार आहे. अस सांगितलं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करूणांची तब्येत खूपच बिघडली. ऑक्सिजन लाऊनही श्वास घ्यायला प्रचंड कष्ट पडत होते. नाडी मंदावत चालली होती. ऑक्सिजन लेवल झपाट्याने खाली येत होती. आणि शेवटी मॉनिटर वर कुठलीही हालचाल दिसेना. डॉक्टरांनी तपासलं आणि मान हलवली. त्यांनी ताबडतोब हार्ट मध्ये इंजेक्शन दिलं पण काही उपयोग झाला नाही. नारायणला बोलावण्यात आलं. सर्व संपलं होतं.
**
संजय विश्वासराव मोकाशी. अमरावती मध्ये M.R. होता. त्या दिवशी संध्याकाळी त्यांची बायको करुणा स्वयंपाक घरात ब्लेंडर लाऊन ताक करत असतांना काहीतरी गडबड झाली आणि तिला जबरदस्त शॉक बसला. ब्लेंडर हातातच असल्याने तिला काहीच करता आलं नाही. तोंडाने चित्र विचित्र आवाज करत ती धाडकन जमिनीवर पडली. आणि बेशुद्ध झाली. तिचा विचित्र आवाज ऐकून तिचा नवरा संजय धावतच किचन मध्ये आला पण तो पर्यन्त करुणा खाली पडली होती आणि हात पाय झाडत होती. ब्लेंडर बाजूला पडलं होतं आणि कारूणांचा हात त्यांच्या होता. अजून करंट चालूच होता. संजयने ब्लेंडर उचलण्यासाठी हात लावला आणि त्याला पण शॉक बसला. त्यांच्या लक्षात सर्व आलं . त्यांनी बटन बंद केलं आणि कारूणाला उचलून बाहेर सोफ्यावर झोपवलं. बाहेर आला शेजाऱ्यांकडे कार होती, त्यांना सांगितल आणि करूणाला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच ICU मध्ये अॅडमिट करून घेतलं. उपचार सुरू केले. पण उपयोग झाला नाही थोड्याच वेळात तिची प्राणज्योत मालवली.
***
चित्रगुप्ताच्या कार्यालयात एक आधिकारी कोण आलंय, कोणाला कुठे नेले यांची माहिती घेत होता.
हं तुझं काय ?
महाराज पुण्याच्या करुणा मोकाशीला आणलंय. चेतना ज्योत तात्पुरत्या कुंभ पेटीका मध्ये ठेवली आहे.
करुणा मोकाशी पुणे, तो आधिकारी कारूणांची माहिती बघत होता.
मूर्खा हे काय केलस ? या स्त्री च आयुष्य ८० वर्षांचं आहे तू तिला आत्ता का आणलस ? बापरे यमराज महाराजांना कळलं तर ते माझ्या डोक्यात गदाच हाणतील.
दूसरा यमदूत उभाच होता त्यांच्याकडे पाहून अधिकारी म्हणाला तू कोणाला आणलस बाबा ?
आमरावतीच्या करुणा मोकाशीला आणलंय.
त्यांनी माहिती बघितली आणि तो कोसळलाच.
गाढवा हीच आयुष्य ७५ वर्षांचं आहे आणि आत्ता ती केवळ २५ वर्षांची
आहे. तुम्ही दोघांनी काय घोळ घातला आहे ? बरं मला सांगा प्राणज्योत आणून किती वेळ झाला आहे ?
आताच येतो आहे महाराज.
म्हणजे अर्धा तास तरी झाला असेल.
दोघांनी मन डोलावल्या.
प्राणज्योती कुठे ठेवल्या आहेत ?
तात्पुरत्या कुंभ पेटीका मध्ये.
ताबडतोब त्यांच्यावर अग्नि संस्कार व्हायच्या आत त्यांच्यात प्राणज्योती घाला आणि जीवंत करा. पळा. आणि हो, येतांना इंदूर च्या करुणा मोकाशीची प्राणज्योत घेऊन या. ती ९० वर्षांची बाई आहे आणि मरणासन्न स्थितीत घटका मोजत आहे. तिला आता जास्ती त्रास देऊ नका. लगेच आणा.
***
पुण्याच्या डॉक्टरांनी नारायण ला बोलावून विचारलं की आम्ही शेवटचा उपाय म्हणू शॉक ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे. तुमची काही हरकत आहे का ? नारायण नी होकार दिला आणि डॉक्टरांनी पहिला शॉक दिला. छातीवर प्रेस आणि रीलीज करत तोंडाने एक दो तीन अस म्हणत होते.
करूणांवर काही परिणाम झाला नाही तेंव्हा थोडा जास्ती पॉवर चा शॉक देऊन झाल्यावर डॉक्टर प्रेस आणि रीलीज करत असतांना तिथेच उभ्या असलेल्या यामदूताने तिच्या शरीरात प्राण फुंकला. करुणा थोडी खोकली आणि तिचा श्वास सुरू झाला. मॉनिटर पुन्हा जीवंत झाला. VITAL SIGNS मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला. डॉक्टरांनी नि:श्वास
टाकला. नारायणचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेवढ्यात सुलभा आणि आई आणि पोरं पण करूणाचं अन्त्य दर्शन करायला आली होती. त्यांना पण एक अतिशय सुखद धक्का बसला. सगळा आनंदी आनंद झाला.
**
आमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये पण यामदूतानी शॉक ट्रीटमेंटच्या वेळेसच प्राणज्योती करुणेच्या शरीरात घातली. करुणा थोडी खोकली आणि श्वास सुरू झाला. मॉनिटर पुन्हा जीवंत झाला. VITAL SIGNS मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला. डॉक्टरांनी नि:श्वास टाकला. संजय आणि त्यांच्या शेजाऱ्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांनी संजय ला मिठी मारली आणि त्यांनी संजयचे अभिनंदन केले. करुणा अजून किमान एक दिवस ICU मध्येच राहणार होती. एक दिवस ICU मध्ये ट्रीटमेंट झाल्यावर आणि डॉक्टरांना विश्वास आल्यावर तिला रूम मध्ये शिफ्ट केलं. त्याच दिवशी दुपारी तिला शुद्ध आली. सिस्टर त्या वेळी तिचं सलाईन लावत होती. संजय तिथेच होता. तिने डोळे उघडले अस पाहून सिस्टर तिच्याकडे पाहून हसली. आणि म्हणाली
आता कसं वाटतंय तुम्हाला. ?
करुणा क्षीण हसली आणि म्हणाली बरं वाटतंय.
छान. आता आराम करा म्हणजे शक्ति भरून येईल. मी डॉक्टरांना सांगते म्हणजे ते येऊन तपासतील आणि खाण्या पिण्याच्या सूचना देतील.
करूणाने मान हलवली आणि परत डोळे मिटले.
डॉक्टरांचा राऊंड झाला तेंव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. डॉक्टरांनी तपासलं.
करुणानि डोळे उघडले आणि डॉक्टरांच्याकडे बघून हसली.
मला काय झालंय डॉक्टर ?
काही नाही थोडी चक्कर येऊन पडल्या होत्या तुम्ही. आता सगळं ठीक आहे.
डॉक्टर मला अस्वस्थ वाटत होतं आणि छातीतली धडधड खूप वाढून गेली होती म्हणून माझ्या नवऱ्याने मला इथे अॅडमिट केलं. पुढचं काही आठवत नाहीये. पण तुम्ही चक्कर आली असं का म्हणता ? आणि संजय कडे बोट दाखऊन म्हणाली, हे कोण आहेत ? तुमचे सहकारी डॉक्टर आहेत का ?
संजयला धक्काच बसला. करुणा त्याला ओळखतच नव्हती. तो म्हणाला
डॉक्टर..
डॉक्टरांनी त्याला हातांनीच गप्प बसायला सांगितलं आणि इंजेक्शन तयार केलं. इंजेक्शन देता देताच कारूणाने विचारले की माझा नवरा आणि दोन्ही मुलं का नाही आली ? पण इंजेक्शन चा परिणाम झाला आणि तिने डोळे मिटले.
संजय च्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं. ते पाहून डॉक्टर म्हणाले-
चिंता करू नका मोकाशी, गुंगीच्या औषधांमुळे अस होतं कधी कधी. एक दोन दिवसांत सर्व ठीक होईल. आणि ते चालले गेले.
डॉक्टर तर गेले पण संजय च्या मनात करुणानी विचारलेला प्रश्न घर करून होता. माझा नवरा आणि दोन्ही मुलं का नाही आली ? संजयचं डोक विचार करकरून फुटायला आलं होतं. काय झालंय करुनेला ? तो खूपच घाबरला होता. आता रात्री शुद्धीवर आल्यावर हाच प्रश्न विचारला
तर काय उत्तर देऊ ? त्याला काहीच सुचेना.
***
कारूणाला आता रूम मध्ये शिफ्ट केलं होतं. नारायण, आई, सुलभा आणि दोन्ही मुलं पण होती. विजिटिंग अवर्स संपत आले होते आणि सिस्टर ने येऊन सांगितलं की फक्त एक जण थांबा बाकी सगळी घरी जा. आता पेशंट ओके आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. रात्रभर छान झोप झाली की सकाळी पेशंट एकदम नॉर्मल असेल. मग नारायण तिथे थांबला आणि बाकी घरी गेलेत. नारायण खाली जाऊन जेवून आला, आणि खुर्चीवर बसला. साधारण रात्री अकरा वाजता कारूणाला जाग आली. तिला पाणी हवं होतं. नारायण ने तिला पाणी दिलं. ती थकलेल्या नजरेने नारायणकडे पहाट होती. नजरेत अनोळखी भाव होता. नारायणला जरा विचित्रच वाटलं पण तरी त्यानी विचारलं की आता कसं वाटतंय ?
बरं वाटतंय. किती वाजले ?
रात्रीचे अकरा वाजलेत. काही हवय का ?
नको. पण तुम्ही कोण आहात ? आणि एवढ्या रात्री माझ्या रूम मध्ये काय करता आहात ?
नारायणला धक्काच बसला. तो बावचाळून गेला. पण करुणा पेशंट होती. जरा दमानच घ्यायला हवं असा विचार करून तो म्हणाला-
थांबा हं. मी आत्ता येतो. आणि तो डॉक्टरला शोधायला निघाला. डॉक्टरांना त्यानी करुणा काय म्हणते आहे ते सांगितलं आणि आपल्या बरोबर या म्हणून विनंती केली.
डॉक्टर आले म्हणाले
काय म्हणतो आमचा पेशंट ? बरं वाटतंय का आता ?
आता ठीक वाटतंय. पण हे कोण आहेत ? माझे मिस्टर का आले नाहीत? त्यांना माहीत नाही का ?
आता रेसिडेंट डॉक्टर पण चक्रावून गेले. ते नवीनच होते आणि त्यांना फारसा अनुभव पण नव्हता. पण त्यांना हे कळलं की आत्ता आपण जर काही बोललो तर नाटकाचा हा अंक रात्रभर सुद्धा चालेल. मग त्यांनी कारूणाला झोपेच इंजेक्शन दिलं आणि म्हणाले की हे माझे असिस्टेंट आहेत. तुमची काळजी घेण्यासाठी त्यांना नेमलं आहे. हे ऐकून करूणाचं समाधान झालं आणि ती झोपली.
रूम च्या बाहेर आल्यावर नारायणने विचारले की हे काय चालले आहे ? काय प्रकार आहे हा ?
मलाही समाजत नाहीये. पण कधी कधी गुंगीच्या औषधांमुळे अस होतं . उद्या सकाळ पर्यन्त सर्व ठीक होईल, काळजी करू नका. नारायण रात्रभर टेंशन मध्ये. पहाटे केंव्हा तरी त्याचा डोळा लागला. त्या मुळे सकाळी BP घ्यायला नर्स आली तेंव्हाच त्याला जाग आली. तो पर्यन्त करुणा पण जागी झाली होती आणि त्याच्याच कडे त्रासिक नजरेने बघत होती. नारायण बाहेर आला.
हा माणूस रात्रभर माझ्याच रूम मध्ये होता ?
नर्स नी मान डोलावली.
अस कस ? या हॉस्पिटल मध्ये बायकांच्या खोली मध्ये पुरशांना झोपायला देतात ? मला तक्रार करावी लागेल. माझा नवरा आला की
त्याला सांगेन.
अहो पण ते तुमचे मिस्टर आहेत. त्यांना तुम्ही ओळखलं नाही का ?
अहो अस कस माझा नवरा संजय २८ वर्षांचा आहे हे गृहस्थ तर पन्नाशीचे दिसताहेत.
अहो यांचं नाव नारायणराव आहे आणि त्यांनीच तुम्हाला इथे भरती केलं. तुम्हाला हार्ट अटॅक आला होता म्हणून. तुम्ही खूप सिरियस होता.
करुणा विचारात पडली. म्हणाली सिस्टर तुमची काहीतरी चूक होते आहे. तुम्ही म्हणता अस काहीही झालेलं नाहीये. तुम्ही डॉक्टरांना बोलवा.
नर्स पण कन्फ्युज झाली होती. ती बोलावते अस म्हणून निघाली. जातांना नारायण ला सांगून गेली की तुम्ही आत्ता खोलीत जाऊ नका पेशंट चा मूड चांगला नाहीये. मी डॉक्टरांना घेऊन येते आहे.
डॉक्टर हा काय प्रकार आहे ? भलत्याच माणसाला तुम्ही माझा नवरा समजून रात्रभर माझ्याच खोलीत झोपू दिलं. ?
अहो हे तुमचेच मिस्टर आहेत. काल दिवसभर हे आणि तुमची दोन्ही मुलं पण इथे होती.
मुलं ? डॉक्टर माझं लग्न होऊन जेमतेम दीड वर्ष झालं आहे आणि मला अजून मूल झालं नाहीये. तुम्ही हा संसार माझ्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न का करता आहात ? ताबडतोब माझ्या नवऱ्याला बोलवा.
हे बघा करूणांबाई तुमची काही तरी चूक होते आहे. औषधांच्या परिणामामुळे होतं अस कधीकधी. तुम्हाला आत्ता आरामाची जरूर आहे. मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो तुम्ही थोडा आराम करा. रीलॅक्स व्हा.
मग आपण बोलू.
नाही मला इंजेक्शन नको. मी विचार करते. राहू द्या यांना इथे.
डॉक्टर गेल्यावर करुणा म्हणाली की माझा फोन जरा देता का ?
कशाला ?
सहज.
त्यांनी फोन दिला. आणि बाहेर गेला.
आणि करूणाने १०० नंबर फिरवला.
***
करूणाला सकाळीच जाग आली. आता तिला फ्रेश वाटत होतं. ती उठून बसली. समोरच्या सोफ्यावर संजय झोपला होता. हा माणूस इथे का झोपला होता ? डॉक्टर म्हणाला होते की हा त्यांचा सहकारी आहे म्हणून. पण हा माझ्या खोलीत का झोपला आहे ? आणि नारायणराव कुठे आहेत ? खरं तर त्यांनीच इथे असायला हवं होतं. ती खोलीच्या बाहेर आली. समोरच सिस्टर लोकांचं डेस्क होतं.
सिस्टर माझ्या खोलीत कोण माणूस झोपला आहे ? असा कसा तो इथे आला ?
सिस्टर चक्रावून गेली. ती खोलीमध्ये धावली.
अहो मॅडम हे तुमचे मिस्टर आहेत. तुम्ही ओळखलं नाही का ?
हा काय प्रकार आहे ? हे माझे मिस्टर नाहीयेत. कोणीतरी दुसराच आहे.
संजयला पण आता जाग आली होती.
अग करुणा अस काय करतेस, मी संजय, मला ओळखलं नाही का ?
नाही. कोण तुम्ही ?
नर्स मागची मागेच डॉक्टरांना बोलवायला धावली. मोठे डॉक्टर राऊंड घेत होते. नर्स नी त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. ते लगेच आले.
***
पोलिसांची एक जीप गस्तीवर होती. त्यांना मेसेज मिळाल्यावर लगेच ते आले.
डेस्क वर जाऊन करुणा मोकाशी कुठे आहेत म्हणून चौकशी केली. मोठे डॉक्टर तिथेच सूचना देत थांबले होते. त्यांनी वाचारलं
काय झालं साहेब, करुणा मोकाशी ४ नंबर मध्ये आहेत. पण झालं तरी काय ?
तिथेच चला सर्व स्पष्ट होईल.
हं करूणांबाई मी PSI वागळे. काय प्रॉब्लेम आहे ?
हे, नारायण कडे बोट दाखवून करुणा म्हणाली, माझे पती आहेत अस सगळे म्हणताहेत. पण साहेब अस नाहीये. माझ्या नावाऱ्याच वय २५ आहे हे तर पन्नाशीचे आहेत. आणि हे, नक्कीच ते नाहीत. मी माझ्या नवऱ्याला ओळखत नाही अस म्हणायचं आहे का तुम्हाला.
आता वागळे कन्फ्युज. त्यांना कळेना की हे काय प्रकरण आहे ते. पण
त्यांचा पोलिसी दिमाग झपाट्याने काम करायला लागला होता.
नारायणराव ही तुमची बायको आहे याचं तुमच्या जवळ काही प्रूफ आहे का ?
हो साहेब लग्नाचा फोटो आहे. आमची दोन मुलं आहेत. हवं तर लग्नाचं सर्टिफिकेट पण आहे. शेजारी पाजारी आहेत पण हे सगळं घरी आहे.
ओके ताबडतोब घेऊन या. आम्ही इथेच थांबतो.
करुणा बाई तुम्ही चिंता करू नका. आता आम्ही आलो आहोत आणि या प्रश्नांची तड लावल्या शिवाय जाणार नाही.
सगळं टेंशन सहन न झाल्यामुळे करूणाचे डोळे मिटले.
तासाभरात नारायण सर्व घेऊन आला. बरोबर मुलं आणि एक शेजारी जोडपं पण आलं होतं.
करूणाने फोटो पाहिला आणि किंचाळली. अहो ही, मी नाहीये. माणूस तोच आहे पण मी नाहीये.
वागळे नर्स ला म्हणाले की आरसा घेऊन या.
आरसा दाखवल्यावर करुणा पुन्हा किंचाळली. अहो काय केलं तुम्ही, दोनच दिवसांत माझं रूप पालटलं ? काय प्रकार आहे हा ?
आता मात्र कुजबूज सुरू झाली. बाईला बाहेरची बाधा झाली आहे असाच सुर होता सर्वांचा. वागळ्यांनी सर्वांना चूप बसवलं.
करूणाबाई या फोटोत जी बाई आहे त्या तुम्ही नाही अस म्हणायचं आहे का तुम्हाला ?
हो.
तुमचं नाव काय आहे. ?
करुणा संजय मोकाशी.
कुठे राहता तुम्ही, पत्ता काय आहे ?
१०२, गुप्ता कॉलनी राजापेठ अमरावती.
आता सगळ्यांनाच वेड लागायची पाळी आली.
विंचुरकर राजापेठ पोलिस स्टेशनला फोन लावा. करुणा मोकाशी तिथे आहेत का ? याची चौकशी करायला सांगा. मॅटर अर्जंट आहे म्हणून सांगा.
***
मोठे डॉक्टर आल्यावर त्यांनी संजयला विचारलं की अजूनही परिस्थिति सुधारली नाही का ?
संजय ने मान हलवली. तेवढ्यात तिथे पोलिस आले.
करुणा मोकाशी कोण आहे ? आम्ही तुमच्या घरी गेलो होतो तर तुम्ही अॅडमिट आहात अस कळलं म्हणून इथे आलो.
तुम्ही कशाला इथे आला आहात ? संजय ने विचारलं.
तुम्ही कोण यांचे ?
मी तिचा नवरा.
काय प्रॉब्लेम झाला आहे ? - पोलिस
अहो प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि डॉक्टर त्याचीच तपासणी करताहेत. पण तुम्ही इथे कसे आलात ? संजय ने विचारलं.
आम्हाला पुण्याच्या हॉस्पिटल मधून पोलिसांचा फोन आला आहे की तिथे अॅडमिट असलेल्या बाई आपलं नाव करुणा संजय मोकाशी रहाणार अमरावती अस सांगत आहेत.
आता काय करायचं ? सगळेच किंकर्तव्ययमूढ अवस्थेत उभे. कोणालाच काही कळत नव्हतं की आता काय करायचं ते.
पोलिसांनी विचारलं –
बाई तुमचं नाव काय ?
करुणा नारायण मोकाशी रहाणार पुणे.
इथे अमरावतीच्या दवाखान्यात तुम्हाला कुणी आणलं ?
मला माहीत नाही पण सगळे सगळे म्हणतात की ह्यांनी अस म्हणून करुणा ने संजय कडे बोट दाखवलं.
आता अदला बदल झाली हे सगळ्यांना कळलं. पण काय करायचं ते कळत नव्हतं.
शेवटी सर्वानुमते अस ठरलं की नारायण आणि संजय एकमेकांशी बोलावं आणि काय ते ठरवावं. यांच्यासाठी त्यांना आजचा दिवस देऊ. नाहीच काही तोडगा निघाला तर उद्या बघू.
***
आमरावतीची सगळी कहाणी ऐकल्यावर पुण्यात सुद्धा तसंच करण्याबद्दल सहमति झाली. आणि गोष्टी दुसऱ्या दिवसांवर ढकलण्यात आल्या .
***
यमदूतांनी आपलं काम बरोबर केलं आहे की नाही हे पहाण्यासाठी अधिकाऱ्याने पुण्याला आणि आमरावतीला फेरफटका मारला, आणि झालेला सगळा गोंधळ त्यांच्या लक्षात आला. त्यांनी दोन्ही दूतांना बोलावून चांगलं फैलावर घेतलं. ताबडतोब सगळं पुन्हा पहिल्या सारखं करा नाहीतर दोघंही नरकात गेलेच म्हणून समजा. असा सज्जड दम भरला. त्याच रात्री सर्व जण गाढ झोपतील अशी व्यवस्था करून दोन्ही दूतांनी प्राणज्योतींची अदला बदल करून टाकली. या कानांचं त्या कानाला देखील कळलं नाही.
***
दुसऱ्या दिवशी सगळं काही नॉर्मल. दोघी करूणांना गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं ते काहीच आठवत नव्हतं. बाकीच्या सर्वांनी पण खोलात न शिरण्याचा शहाणपणा दाखऊन आनंद साजरा केला.


**************

🎭 Series Post

View all