इंग्रजी माध्यम जरुरी भाग ३

Nako Dwesh Karu Bhalya Mansa Bhasha Karnanne


राज्यस्तरीय साहित्य करंडक
फेरी - ४ वादविवाद स्पर्धा
विषय - इंग्रजी माध्यम जरुरी -३
टिम -भंडारा


नको द्वेष करू भल्या माणसा भाषा कारणाने
मराठी तुझी नि माझी हि रे सांगते अभिमानाने
पृथ्वी माझी पृथ्वी तुझीही जगाशी आपुले नाते
मराठीसारखी म्हणूनच इंग्रजी ही जवळची वाटे
सांगुनी गेले थोर महात्मे हे विश्वची माझे घर
भाग्य लाभले इंग्रजीलाच बघ सांधण्या हे चराचर 

माझी लेखिका मैत्रीण श्रुती बावनकर, तिने लिहिलेल्या
लेखावर, तुमच्या प्रतिवृत्तराला अनुसरुन, तिच्या ह्या ओळी मला समर्पक वाटल्यात म्हणून, मी माझ्या लेखात समाविष्ट केल्यात.

मराठी भाषेबद्दल अंधार कमीतकमी आम्हा लेखिकांच्या मनात तरी नक्कीच नाही. तुमच्या लेखणीतून स्पष्टच जाणवतंय की तुम्हाला मुळात मुद्दाच कळलेला नाही. मुळ मुद्द्यापासून तुम्ही खूप लांब भरकटत गेल्याच तुमच्या प्रतिउत्तरात दिसतंय.

इंग्रजी माध्यम असणारे विद्यार्थी चोवीस तास इंग्रजीची पिपाणी वाजवतात, बघितलयं का तुम्ही? उच्चशिक्षित असलेले असे किती लोक जळीस्थळी इंग्रजी बोलतात. आपल्या कामकाजाचे, शाळेचे दोनचार तास पुरेसे आहेत इंग्रजी वातावरणाला, बाकी मग घरात, बाजारात, मित्रमंडळीत, कार्यक्रमात, मनाने जोडलेली, भावनेत गुंतलेली मायमराठी जिंदाबादचं नाही का!

अभ्यासाचं माध्यम इंग्रजी देतोय म्हणजे मायमराठीची जागाच आम्ही इंग्रजीला देतोय, तुम्ही उगाच दूराग्रह करवून घेतलाय असं दिसतयं. तुमच्या मनातला (काळोख) नाही नाही गैरसमज दूर करायला म्हणून सांगते बरं, एखादी नवीन भाषा शिकणं म्हणजे मातृभाषेला दूर लोटण नसतं.


नव्या भाषेच्या साथीने मातृभाषा अधिकच समृद्ध होत जाते आणि इंग्रजी भाषा ही काही आता अनाहूत राहिली नाही तर रुजलीय चांगली म्हणूनच कायदे किंवा इतर सरकारी कार्यालयांतील व्यवहार इंग्रजीतून चालतात, तिथे काम करणारे लोक घरीही इंग्रजीतूनच बोलत असतील का? असे वाटते का तुम्हाला.

इंग्रजीला नाकारणा-यांनो तुम्हीच सांगा आता, डॉक्टरांना औषधाची चिठ्ठी मराठीतून लिहायला सांगायची का? मराठी आपली, मातृभाषा, जन्मापासुन साथ देत आलीय, मराठी मुळात शिकावी लागतचं नाही. आपण मराठीतून घडत जातो. इतर भाषा शिकण्यासाठी परिश्रमासोबत प्रयत्नांची पराकाष्ठा लागतेचं.

इंग्रजी माध्यमातून शिकलेला,विद्यार्थी तुमच्या संपर्कात आलाच नाही, कसं शक्य आहे. अशा एखाद्या विद्यार्थ्याला एकदा जाऊन भेटाच, तो तुमच्याशी अस्खलित मराठीतूनच बोलेल बघा.

ज्या मराठी व्यक्तींची नावं तुम्ही नमूद केलेले जसे, बाबासाहेब आंबेडकर, सचिन तेंडुलकर इत्यादी त्यांनीही इंग्रजीला आपलंसं केलंचं. प्रसारमाध्यमांशी सचिन तेंडूलकरला फाडफाड इंग्रजी बोलताना तुम्ही बघितलेलं दिसत नाही. रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन, गीतांजली. श्री अरुंधती रॉय यांनी लिखाण इंग्रजीत भाषांतर करुनच, जागतिक स्तरावर पुरस्कार मिळविलेत.

आपल्या भाषेचा अभिमान आम्हाला ही आहे, माध्यम मराठी की इंग्रजी, वादविवादाचा मुद्दा बाजूला ठेवून, तुम्ही चक्क मराठीपणावर भरकटल्याचं तुमच्या लेखात स्पष्ट दिसतय.

मराठी शाळेत इंग्रजी दुय्यम असल्याचं वैक्षम्य आम्ही का वाटून घ्यावं बरं. शालेय पातळीवर ही, तीन भाषेचा अवलंब केला जातोय. भारतासारख्या बहूभाषिक देशांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना जोपासली जावी, हा त्यामागचा उद्देश, मग माध्यम इंग्रजी असण्यावर तुमचा आक्षेप का? हे कळलं नाही.

ब्रिटीशांविरुद्ध भारतिय स्वातंत्र्य चळवळ, अनेक विदेशी लोकांचेही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना समर्थन लाभले. स्वातंत्र्य सैनिकांबद्दल सार्थ अभिमान आम्हालाही आहेच, ते एका भारतीयाला वेगळे सांगायची गरज नाहीच. मुद्दे मांडायचे आहेत म्हणून उगाच व्यर्थ दोषारोपण करणे बरोबर नाही.

भंडारा जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत, आमच्या तीन लेखिका मैत्रीणी इंग्रजी वाङमयात पदवीधर अन् पदव्युत्तर असूनही मराठीतून लिखाण करतायत, तुम्ही बघताच आहात. इंग्रजी शिकत अन् शिकवत असलो तरी आमची मराठीशी नाळ मात्र तुटलेली नाही. गरज असताना इंग्रजी बाकी संवादाची भाषा आमची मराठीच आहे. आम्ही इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरत आहोत काळाची गरज म्हणून, इंग्रजी संस्कृतीचा अवलंब करा आम्ही कुठेच सांगितले नाही.

"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे", प्रतिज्ञेत म्हटल्याप्रमाणे, भारतीय ह्या नात्याने, भाषेचा सन्मान हे आपले परम कर्तव्यच. मग ती भाषा कुठली का असेना.

अतिथी देवो भव! ही आपली परंपरा.. आलेला पाहूणा, देशातला किंवा देशाबाहेरचा, संपर्कभाषा म्हणून इंग्रजीला पर्याय आहे का दुसरा? विदेशी पर्यटक जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज तो कशाला मराठी बोलेल, संवादभाषा आपली- तुपली पेक्षा इंग्रजीच नाही का असणार.

कोसाकोसावर भाषा बदलते असं म्हणतात, माझ्या मायमराठीने तिचं समृद्धपण एवढं जपलयं म्हणून सांगू, जवळजवळ 52 प्रकारच्या बोलीभाषा आहेत.आगरी, अहिराणी, व-हाडी, मालवणी, झाडीबोली, गोंडीबोली अशा अनेक.

तुम्ही तुमची मालवणी आणि आम्ही आमच्या झाडीबोली, बोलीभाषेत संवादाचा अट्टाहास केला तर, कुणाला काय कळेल काय माहीती? आताच्या काळात असा बोलीचा वृथा अभिमान बाळगत राहणे म्हणजे स्वत:ला खुरटे बोन्साय करून घेण्यासारखेच आहे.

बरोबर आहे तुमचं, एक तर पूर्ण मराठी बोलावं किंवा इंग्रजीतून तरी बोलावं.. मान्यचं तरी तुम्हाला तत्सम आणि तद्भव शब्द माहिती आहेत का हो? नसेल माहिती तर माहित करुन घ्या.

मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषाकुळातील एक भाषा, ऐंशी टक्के संस्कृत, विस टक्के पर्शियन, उर्दू, पोर्तुगीज आणि इंग्रजी, अशा अनेक भाषांची सरमिसळ होऊन मराठी भाषेचा जन्म झालाय बरं का!!

तुमच्या माझ्यासारख्या शहरी लोकांना मातृभाषेबरोबर सहवासाने इंग्रजी येईल. गावखेड्यातील लोकांच काय? इंग्रजीचे वातावरण त्यांच्या अवतीभोवती कसे तयार होणार. त्यासाठीच हा आमचा अट्टाहास.

आज आपण, आपल्या मुलांना टेक्नॉलॉजीच्या जगातला गुरु मानतो, तुमचं मला माहीती नाही पण मी तरी मानतेच. आपली मुलं आपल्याला कठिण वाटणा-या गोष्टी, चूटकीसरशी सोडवतात, कोरोना काळात, वेळेवर मात करत, ऑनलाईन अभ्यासक्रम त्यांनी विनातक्रार आपलासा केलाच. आजची पिढी घरात मराठी, बाहेर इंग्लिश फ्लुएंट बोलते, ते कशामुळे असेल..आपल्याला न मिळालेल्या गोष्टी मुलांना मिळाव्यात हा अट्टाहास पालक म्हणून आम्ही घेत असू तर त्यात वावगं ते काय?

फ्रिज, टीव्ही, रेडिओ, बँट, बॉल, लॅपटॉप, पावडर, आलमारी, सेलोटेप, फोटो, तिकीट, बस, आणि दिवसरात्र हाती असलेला मोबाईल, हे शब्द तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही कसे बोलता. शीतपटल, दूरचित्रवाहिनी, बिनतारी संदेशवहन वगैरे असं काही बोलता का? प्रामाणिकपणे सांगता आलं तर सांगाच, ही अपेक्षा.

मराठीत महान लेखक आहेत असे म्हटल्याने तुम्ही भरून येण्याचा आव आणताय? मराठी आणि इंग्रजी लेखकच काय तर इतर भाषिक लेखकांचा आम्हाला आदर आहेच. पुन्हा एकदा नमूद करावेसे वाटते, की जर तुम्हाला जागतिक दर्जाच्या इंग्रजी लेखकांच्या, मूळ पुस्तकांच्या प्रती वाचायच्या असतील तर इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाहीच.
तुम्ही पु.ल. आणि व. पू बद्दल लिहिलयं. आद्यकवी मुकुंदराज आमच्या भागातल्या आंबोऱ्याचेच,
कालिदासाने मेघदूत इथून जवळ असलेल्या रामटेक येथे लिहिले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहेच.

इंग्रजांनी आपल्या भारतावर जवळजवळ दिडशे वर्ष राज्य केले, इंग्रजांना हाकलूनही लावण्यात यश आलं आणि देश स्वातंत्र्य झाला. काय चांगलं? काय वाईट? काय घ्यायचं काय सोडायचं, हे जानण्याइतके सुज्ञ आपण नक्कीच आहोत. वसाहतवादामुळे इंग्रजी जगभरात निव्वळ लादली गेली असती तर आज सार्वभौमत्व प्राप्त होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या आपल्या देशाने किंवा इतरही राष्ट्रांनी तिचा हात कधीच सोडला असता. पण झालंय का असं?लादलेल्या गोष्टींना झुगारून टाकता येतं पण आत्मसात केलेलं सदैव सोबतच राहातं.

कोणत्याही भाषेच्या मानापमान करण्याचा, आपल्याला हक्क नाहीच. शाळेतील माध्यमाविषयी चर्चांचर्वण  सुरू  आहे त्यामुळे उगाच मुद्द्यांची सरमिसळ करु नका. तुमच्या लिखाणात शाळांमध्ये माध्यमाचा विचार कमी आणि इंग्रजी भाषेचा द्वेषच अधिक दिसतोय.

"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे", आपल्या प्रतीज्ञेत म्हटल्याप्रमाणे, इतरही भाषेचा सन्मान हे एक भारतीय म्हणून आपलं परम कर्तव्यच.. अतिथी देवो भव! म्हटल्याप्रमाणे, आलेला पाहूणा देवासमानच. संपर्कभाषा, संवादभाषा, एक असली की बरचं नाही का? त्यामुळे कदाचित इतरांप्रती मनामनात आदर, सन्मान वाढेल.

मराठी माध्यमातून शिकवा म्हणणारे, अशा किती लोकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलयं. वादविवाद स्पर्धेत आम्ही, इंग्रजी माध्यमाचा अट्टाहास करतोय, आमचं सोडाच, पण बाकी इतरांच काय? असं असतं तर, मराठी माध्यम शाळा अशा ओस पडल्या असत्या का?

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवणारे शिक्षकचं आपल्या मुलांना मराठी माध्यम देत नाही, हे कटू असलं तरी सत्य ते ही नाकारतात का तुम्ही.

सरते शेवटी, एवढचं म्हणेल.. आपल्या मुलांची योग्यता तपासुन, त्यांच्यासाठी माध्यम निवडा. योग्यता असल्यास नक्कीच इंग्रजी माध्यमातून शिकवा, पुढिल आयुष्यात मुलांना त्याचा फायदाच होईल. \"अ\" अननसाचा शिकवताना मुलांनी अननसं म्हणजे काय, विचारल्यावर पायनँपल, सर्वपरिचित इंग्रजी शब्द सांगताना संकोच करु नका..

वाचक मित्र मैत्रिणींनो, आपल्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिकवलतं.. हे ही जाणून घ्यायला नक्की आवडेल बरं का.
-©®शुभांगी मस्के...