भावनांचा पाऊस

पाऊस भावनांचा ही असतो. कधी कोसळतो, कधी रिपरिप सुरूच राहतो. व्यक्त होण्याचे ढग जमा झाले तर आणि मो??

मुसळधार पावसात तो चिंब भिजला होता. डोळयातून अश्रू अविरतपणे वाहत होते. सहज पावसात मिसळून जात होते. लहानपणापासून ची शिकवण.. मुलांनी रडायचं नसतं रे मुलींच्या सारखं... व्यक्त होणं ही विसरलाय तो कधीच...

त्याचं शिक्षण, करिअर सगळं वडिलांनीच ठरवले. त्याची आवड - निवड कधी विचारात नाही घेतली. खर तर त्याला व्यवसाय करायचा होता. पण
नोकरीसाठी त्यांनीच वशिला लावला.
नंतर आईने लग्नासाठी मुलगी पहिली आणि हीच पसंत कर म्हणून मागे लागली. आईच्या आग्रहखातर तिच्याशी लग्न केले, पण म्हणावे तसे सूर जुळले नाहीत दोघांचे.
आईच आणि तिचं ही कधी पटलं नाही.

मग बायकोच्या हट्टापायी घर सोडले...
सासरे बुवांनी लगेच घर घेऊन दिलं दोघांना.
त्यांची लाडकी लेक कुठे राहील याची फार काळजी होती त्यांना!
थोड्याच दिवसात बायको मनाला येईल तशी वागू लागली. मी तुझ्या घरात नाही रे राहात आता..
तूच माझ्या घरात राहतोस...एकदमच भाषाच बदलली तिची. सासूबाईंनी आमच्या संसारात आधीपासूनच लुडबूड सुरू केली होती. आता तर महिन्यातले वीस - पंचवीस दिवस सहज मानपान व्हायला लागले त्यांचे आमच्या घरी.

किती दिवस चालायचे हे? चिडचिड होत आहे.. सगळच असह्य झालंय...
स्ट्रेस प्रचंड वाढलाय. याचा कामावर व्हायचा तोच परिणाम झाला... न..का..रात्म..क..
मग बॉस ची भिती.
खूप विचार केला. आयुष्यात पहिल्यांदाच निर्णय घेतला. कामावरून काढण्यापेक्षा सरळ नोकरीचा राजीनामा देऊन रिकामा झालो. बंधनातून मुक्त झाल्याचा आनंद साजरा करत घरी आलो, तर बायकोची आगपाखड... काय केलंस तू हे?बापरे..! सासूबाईंची सहन न होणारी बडबड... मनावरचं ओझं फेकून देत बायकोच घर सोडून आई -बाबांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.

आलो.. तर इथे ही तेच.. अपेक्षांचं ओझं.. ना निर्णय घेण्याचं स्वतंत्र, ना व्यक्त होण्याचं.
...अगदी एकटा पडलोय मी..जीव ही नकोसा वाटतोय.

पण ..ठरवलं ..निराश नाही होणार मी.
हे घर ही सोडतोय, अगदी कायमचे...
वाट दिसेल तिथे जाईन.. भरभरून प्रेम आणि व्यक्त होण्याचं मोकळेपण हवं आहे मला.
स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करेन. माझा हरवलेला 'स्व' मिळवेन. आनंदात ,स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करेन.
कुणाच्या आशा, अपेक्षांचे ओझे नकोच...

आई -वडिलांच्या डोळयात पहिल्यांदाच अश्रू पाहतो आहे मी. पण ते माझ्यासाठी नाहीतच मुळी..
जाऊ नकोस..असे म्हणण्याचे धाडस कुणाच्यातच नाही? ना आई वडील ना बायको!

निघतोय मी... भर पावसात.
भरल्या डोळ्यांनी निरोप घेतो.
पण माझ्या डोळ्यातले अश्रू कुणालाच दिसले नाहीत..ते दिसणारं ही नाहीत.
कारण पाऊस जास्तच कोसळायला लागला आहे.. जमिनीवर ही आणि माझ्या मनात ही...