थोरली वहिनी
सुमीचं लग्न झालं नि सुमी शांताराम चाळीतल्या दहा बाय बाराच्या खोलीत रहायला आली. नवरा वसंता टायपिस्ट होता बीएमसीत. दिवसभर मशीनीसोबत खाडखड,खाडखूड. सुमीचे सासूसासरे गावी रहायचे. दिर तेवढा यांच्यासोबत रहायचा. तो कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होता. हेमंत नाव होतं त्याचं. दोन्ही भाऊ दिसायला अगदी दक्षिण उत्तर असे. वसंता दिसायला काळसावळा..क्रुश शरीरयष्टीचा..सुका बांगडा जसा व सतत चारेक वर्ष टायपिंगच्या मशिनीसोबत राहिल्याने काहीसा अबोल असा.
याउलट हेमंता होता..गोरापान, दाट मिशी,वळणदार केस,नित्य व्यायामशाळेत जाऊन कमावलेलं बांधेसूद शरीर,फराटेदार इंग्रजी बोलणारा,सुमीशी अगदी अदबीने वागणारा.
सुमी येण्यापूर्वी या घरात स्त्रीचा वावर नसल्याने घरभर तसा पसाराच होता. सुमीने खोली झाडून लख्ख केली. साठलेली रद्दी विकून टाकली. घर अगदी चकचकीत केले. ओटा स्वच्छ केला. चार हंडे,दोन कळशा व काही मोजकी भांडी होती तीही घासून लख्ख केली. वाणसामान भरलं. मांडलीवर रांगेत डबे लावले. डालड्याच्या डब्यात तुळस लावली,एक गुलाबाचं झाडही लावलं. रोज सकळी उठली की न्हाणं झाल्यावर तुळसीला हळदकुंकू वाहून पाणी घालू लागली.
काही छानसं बनवलं तर शेजाऱ्यांना शेजारपाळं देऊ लागली. शेजारीही तिचं कौतुक करु लागले. हेमंता सकाळी कॉलेज व त्यानंतर प्रायव्हेट ट्युशन घ्यायचा. रात्रीच घरी येत होता पण एप्रिल महिन्यात कॉलेजला,ट्युशनला सुट्टी पडली व तो माळ्यावर लोळत कादंबऱ्या वाचू लागला. लाकडी माळ्याच्या फटींतून त्याला काम करणारी वहिनी दिसे. हातात एखादी प्रेमकथा त्यातल्या नायिकेच्या भरीव अवयवांच केलेलं रसभरीत वर्णन व फटीतून वहिनीची दिसणारी गोरीपान कंबर,मान..कधी वहिनी कपाटाआड साडी बदले..तिच्या साडीचं खाली सांडणं मग तिने हाताच्या नाजूक बोटांनी घातलेल्या निरा,तिचं ते निऱ्या खोचून घेणं,पदर काढणं,कधी वसंता जवळ असला तर त्याला पिनअप करण्यासाठी बोलावणं..हेमंताला कळत होतं असं बघू नये पण तरुण मन मानतच नव्हतं.
रात्रीच्या वसंताच्या व सुमीच्या गप्पा ,सुमीचं लाडीक खिदळणं तो कान देऊन ऐकायचा. अंधार असल्याने दिसायचं काहीच नाही पण तो त्यांच मिलन त्याच्या नेत्रचक्षुंनी रंगवायचा. हळूहळू त्याला वसंताजागी तोच दिसू लागला. तो व त्याची सुमी. तो झोपेत तिला जवळ घेई. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवी. तिच्या केसांत स्वतःला गुरफटून घेई.. एक मन सांगत होतं हेमंता तू जे करतोयस ते स्वप्नरंजन का असेना तो प्रमाद आहे..थोरली वहिनी ही आईसमान असते पण लगेच दुसरं मन म्हणायचं आई कशी..माज्याहून दोन वर्षांनी लहानच आहे ती. त्याच्याच दोन मनांच्या कल्लोळात तो भांबावून जायचा,वेडापिसा व्हायचा.
त्याची ही अवस्था त्याच्या मित्राला कळली. त्याने त्याला त्याच्या गुरुंकडे न्हेले. गुरुंना हेमंताने सारं काही सांगितलं. गुरु म्हणाले,"अरे बाळा,मानवी मन असच गुंतागुंतीचं आहे. तुला तसं वाटणं साहजिक आहे पण त्यातून मनाला बाहेर काढण्यासाठी एकतर तुला दुसरी खोली घ्यावी लागेल किंवा तिथेच राहूनही तू या वासनेपासून स्वत:ला रोखू शकतोस. त्यासाठी तुला जो देव आवडतो त्याच्या नामाचा जप करत जा. जपात खंड पडू देऊ नकोस. हेमंताने त्यांना फी विचारली. गुरुजी म्हणाले," या वासनेपासून दूर गेलास नि वहिनीच्या जागी तुला तुझी माऊली दिसू लागली की मला चार चाफ्याची फुलं आण."
हेमंताला काही हे खरं वाटत नव्हतं पण मित्र तर त्याचा अगदी खास होता व ते गुरुही त्याच्या मित्राच्या आजोबांच्या काळापासूनचे होते म्हणून मग हेमंताने हो नाही करत नामजप सुरु केला.
सुरुवातीला माळ्यावरुन असा जप येऊ लागल्यावर सुमी हेमंताची चेष्टा करु लागली की भावोजी लवकर लग्न जुळण्यासाठी नामजप करत आहेत पण मग हेमंताचा मनापासून नामजप पाहून तिलाही त्याच्याबद्दल विशेष आदर वाटू लागला. घरात एक प्रकारची सकारात्मक उर्जा जाणवू लागली. दोन महिन्यात हेमंतात स्वतः मधेच भरपूर बदल जाणवला. तो त्याचे राग,लोभ,द्वेष,मत्सर,कामवासना काबूत ठेवू शकतो हा विश्वास त्याला प्राप्त झाला.
तो मित्रासोबत गुरुसदनी गेला. गुरु प्रसन्नमुद्रेने हसत होते. हेमंता काही न बोलता चाफ्याची फुलं त्यांच्या चरणी वाहू लागला. गुरुंनी त्याला थांबविले व ती फुले दत्तगुरुचरणी वहावयास सांगितले. हेमंताने दत्तगुरुंच्या मुर्तीचरणी फुले वाहिली व त्यांना साष्टांग नमस्कार केला नंतर गुरुजींना साष्टांग नमस्कार केला. गुरु म्हणाले,"हेमंता, अरे मी फक्त निमित्तमात्र. तुझी व दत्तगुरुंमधली भेट घडवून आणणारा बंध. मनात श्रद्धा ठेव व नित्य नामस्मरण करत जा. आजकाल आपण गणरायाला सोंडच का, दत्तगुरुंभोवती कुत्री,गायी का..अशी अनेक विधानं ऐकतो पण ती सारी प्रतिके आहेत हेच मुळी जाणत नाही. सगळं कसं भौतिक पातळीवर शोधू पहातो. एक उर्जा या चराचरात व्यापली आहे तिचा आदर करायला हवा."
हेमंता गुरुजींचा निरोप घेऊन घरी आला. आज त्याचा वाढदिवस होता. त्याने देव्हाऱ्यातल्या मुर्तींना चाफ्याची फुलं वाहिली व चार चाफ्याची फुलं वहिनीला देऊन दादावहिनींच्या पाया पडला. वहिनी म्हणाली ,"भावोजी,मी लहान आहे तुमच्यापेक्षा. माझ्या कशाला पाया पडता!"
हेमंता म्हणाला,"वयाने लहान आहेस गं वहिनी पण मानाने मोठी आहेस बरं." वहिनीनेही आज त्याचं औक्षण केलं. त्याला मुगाचा लाडू भरवला. रात्री बासुंदीपुरीचं जेवण तिघंही गप्पा मारत जेवले.
रात्री हेमंताला फार हलकं हलकं वाटलं. त्याच्या मनात आलेलं वादळ गुरुजींच्या मदतीने त्याने दूर सारलं होतं.
--------सौ.गीता गजानन गरुड.
**********
जीवनात श्रद्धा फार महत्त्वाची असते मग ती एखाद्या माणसावर असो,एखाद्या देवावर वा व्रुक्षावर. कोणतरी हवं की ज्याच्यासमोर आपण नतमस्तक व्हावं. आपल्या मनातले संदेह व्यक्त करु.
देव मग तो ईश्वर,अल्लाह,येशू असो किंवा एखादा पवित्र ग्रंथ..त्यावर श्रद्धा ठेवता आली पाहिजे. बरोबर नं मंडळी????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा