प्रवास एकटीचा भाग - 28

प्रेम आंधळं असतं पण ते शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असत
विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 28


          दिवस भराभर जात होते . लग्नाची तारीख जसजशी जवळ येत होती , तसे प्रियाच्या घरी लगबग वाढली . सगळे पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती .

तिकडे किरण गावी जाण्यासाठी निघाला होता . संपूर्ण प्रवासात त्याने फक्त प्रियाचा विचार केला . त्यांच भावी आयुष्य खूप सुंदर असेल आणि तो प्रियाला खूप खुश ठेवीन . लग्नानंतर हनिमूनला कुठे जायचे ह्याचे प्लानिंग तर केलेच नव्हते त्यांनी . प्रियाला विचारून ते ही करायला हवं , नाहीतर वेळेवर तिकिटं मिळणार नाहीत लवकर .

         इकडे शॉपिंग तर झाली होती प्रियाची , पण किरणची अजून बाकी होती . प्रियाने चार चार वेळा बजावून किरणला समजावून सांगितले होते , की त्याचा ड्रेस अगदी तिच्या साडीला आणि घागऱ्याला परफेक्ट मॅच झाला पाहिजे असाच हवा .

किरण पहाटेच गावी पोहोचला , आईला तर इतका आनंद झाला त्याला पाहून . तिने लगेच भाकर तुकडा ओवाळून टाकला त्याच्यावरून आणि आल्याबरोबर त्याच्या जवळ सगळे एक एक सांगू लागली .

" अरे अरे , पोराला आधी फ्रेश तर होऊ द्या . लगेच त्याला घेऊन बसल्या तुम्ही गप्पा मारत ".

तात्या बोलले तेव्हा कुठे आईने त्याला सोडले . नाहीतर सगळं सांगूनच उठली असती ती . उत्साहच तेव्हढा होता तिचा .

    " आई , ए आई .... मी तयार झालो की आपण जाऊया ग बाजारात . काय काय राहिलंय वहिनी तेव्हढं बघून सांगा आणि यादी बनवा एक . आपण जाऊ सगळे मग थोड्याच वेळात आणि सगळं घेऊनच येऊ ".

" हो भाऊजी , बऱ्यापैकी आमचं सगळं खरेदी करून झालंय . तरी सुद्धा बघते मी काही राहिलंय का ते ".

" आई , मला नाश्ता दे ग . खूप भूक लागलीये , कालपासुन काही खाल्लं नाहीये ".

" हो रे बाळा , तू लवकर आंघोळ करून ये मग देते तुला चहा नाश्ता ".

" वेदू , आवर तू पण पटकन . त्याच आवरून झालं की निघुया मग आपण ".

" अहो , तुम्ही पण यायचं आहे आता आमच्या सोबत . आज काही कारणं चालणार नाही तुमचे आमच्यापुढे ".

आई तात्यांना दम देत बोलल्या , तसे तात्यांनी होकार दिला . पर्यायच नव्हता आता त्यांच्याकडे . कारण बहुतेक सगळी खरेदी झाली होती फक्त पुरुष मंडळी बाकी होती .

" वसुधा , आग तुम्हीच घेऊन या माझे कपडे सुद्धा . आपल्या ओळखीच्या टेलर कडे देऊन द्या . त्याला मापं माहिती आहेत माझी , मी फोन करून सांगतो त्याला तसे ".

" हे बघा , घरातलं शेवटचं लग्न आहे आपल्या . नवऱ्या मुलाचे वडील शोभून दिसले पाहिजे की नाही ".

" तात्या , चला की तुम्ही पण आमच्यासोबत . दादयाचे कपडे पण मलाच घ्यायचे आहे . त्याला परवा पासून सुट्ट्या मिळणार आहेत . त्यामुळे इतका उशीर नको म्हणून तो बोलला की तूच कपडे घेऊन टाक माझेही . आता त्याचे आणि माझे माप सारखेच आहे त्यामुळे मी घेऊ शकतो त्याचे कपडे . पण तुमचे कपडे कसे घेणार मी ".

" बरं बाबा , येतो येतो . तू आणि तुझी आई , दोघेही ऐकणार नाहीत आज माझं ".

     सगळ्या जणांना नाश्ता देऊन वेदिका तयार झाली . किरणने गाडी काढली आणि निघाले सगळे खरेदीला .

" आई , वहिनी ... आधी तुमच्या साड्या बघूया आपण . मग आम्ही आमचे कपडे बघतो . कारण तुम्हांला बायकांना वेळ लागतो साड्या चॉईस करायला ".

" भाऊजी , आमची खरेदी तर तुमच्या आधीच झालीये ".

" काय ...! "
" माझ्या आधी तुमची खरेदी झाली पण ".

" हो मग , नवरदेवाची आई आणि वहिनी शोभून दिसल्या पाहिजे की नाही ".

" हो मग , दिसायलाच हव्यात . पण हे मात्र बरं केलंत , तुम्ही निदान तुमची दोघींची खरेदी तर करून घेतली . नाहीतर तुम्ही खूप वेळ घेतला असता ". असे म्हणून किरण हसू लागला .

" काय ओ भाऊजी , इतकाही वेळ नसता लावला आम्ही ".

" कशाला , त्यादिवशी ह्या दोघी सकाळच्या गेल्या तर संध्याकाळीच आल्या घरी . दिवसभर खरेदी चालली होती दोघींची " ,तात्या ही बोलले .

" अहो आम्ही बाकीची खरेदी पण केली त्याच दिवशी म्हणून इतका वेळ झाला आम्हांला . आज जर राहील असत ते तर किती वेळ गेला असता आज तुमचा ".

" हो , हे मात्र खरंय . आम्हांला वेळ महत्वाची आहे ".

शहरातील मोठ्या मोठ्या शोरूममध्ये कपडे बघितले , पण प्रियाच्या साडीला मॅचिंग होईल असा ड्रेस लवकर मिळत नव्हता . शेवटी एका दुकानात मिळाला , तेव्हा कुठे किरण शांत बसला . कारण जर ड्रेस तसाच मिळाला नसता तर प्रियाने जीवच घेतला असता त्याचा . किती घाबरत होता किरण आत्तापासूनच प्रियाला . प्रिया होतीच तशी म्हणा . तिच्या मनासारखं नाही झालं तर सगळं घर डोक्यावर घ्यायची ती . आणि तीच कशी बरोबर आहे हे पटवून द्यायची सगळ्यांना . त्यामुळे तिच्याशी अजूनतरी कोणी जास्त डोकं लावत नव्हते .


    किरणने सगळे रेडिमेड कपडे , त्यामुळे शिलाईचा ताण वाचला होता . हळदीसाठी , लग्नासाठी , साखरपुडा .... असे सगळे कपडे घेऊन झाले होते . आता तो तात्या आणि सुधाकर साठी बघत होता .

" भाऊजी , ह्यांना कपडे घेताना माझ्या साडीला मॅचिंग घ्यायचे आहेत ".

" अरे वाह वहिनी , तुम्ही पण मॅचिंग का ". असे म्हणून दोघेही हसू लागले .

वेदीकाने तिच्या साडीचा फोटो दाखवला , त्याला शोभून दिसेल असाच ड्रेस तिने सुधाकर साठी निवडला . त्यालाही दोन जोडी कपडे घेतले .

तात्यांनी मात्र एकच ड्रेस घेतला . तो ही किरणने बळजबरीने घ्यायला लावला . कारण तात्यांनी अजूनपर्यंत कुर्ता पायजमा कधी घातलाच नव्हता . त्यांनी नेहमी सफारी सूट घातले होते . पण मुलांचं लग्न म्हणून त्यांनी सुद्धा त्याच्या मनासारखी खरेदी केली .

" आई ग , तुझ्या साडीचा रंग कुठला ग ".

" हिरव्या रंगाची आहे माझी साडी . पण का रे , कशाला पाहिजे तुला हे ".

" आग आम्ही दोघे जोड्या सेम दिसू , मग तुम्ही पण सारखेच घाला की कपडे आमच्या सारखे ".

" चल काहीतरीच काय , आता काय वय आहे का आमचं ते . तुम्ही पोरं पोरं घाला मॅचिंग करून , आम्हां म्हातार्यांना कोण बघतंय ".

" अस कस आई , नवरदेवाचे आई वडील आहात तुम्ही . मग सगळ्यांमध्ये उठून तर दिसायला हवेत ना दोघेही ".

" बरं बाबा , तुला आवडेल ते घे ". असे म्हटल्यावर तर किरणने तात्यांसाठी दोन ड्रेस घेतले .

" अरे मी शिवून घेतले असते ड्रेस , हे रेडिमेड कपडे काही मापात बसत नाही आपल्या व्यवस्थित ".

" तात्या , आता शिवून घ्यायला वेळ आहे का आपल्याकडे तेव्हढा . वेळ असता तर शिवूनच घेतले असते आपण सगळ्यांनी ".

असे म्हणून तात्यांसाठी सगळ्यात मस्त सिल्कचा कुर्ता पायजमा घेतला , जो त्यांनी कधीच घेतला नव्हता आणि घातलाही नव्हता . सगळ्यांची कपड्यांची खरेदी झाली होती , अगदी मनसोक्तपणे खरेदी झाली होती .



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all