Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

एकतरी मैत्रीण असावी

Read Later
एकतरी मैत्रीण असावी

एकतरी मैत्रीण असावी


गौरीचे पप्पा संध्याकाळी अचानक गेल्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. गौरीचे पप्पा कोरोना काळात गेल्याने त्यांचे शेजारी पाजारी, नातेवाईक कोणीचं गौरीच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यास आले नव्हते. गौरीची आई खूप रडत होती. गौरीला समजत नव्हते की, आता स्वतःला सावरावे की आपल्या आईला सावरावे. गौरीला त्यावेळी कोणाच्यातरी भक्कम आधाराची गरज होती. गौरीला कोणाच्यातरी मिठीत शिरुन रडण्याची इच्छा होत होती. 


वेळच अशी होती की, तेव्हा गौरीच्या सोबत असे कोणीच नव्हते. गौरीने स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि आईला सावरायचे ठरवले. पप्पांचा अंत्यविधी होईपर्यंत गौरीने डोळ्यातून पाणी सुद्धा येऊ दिले नाही. गौरीला रात्रभर झोप लागली नव्हती. 


दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीच्या आईला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने गौरी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. खरंतर गौरीला जे चालू होतं, ते काहीच सहन होत नव्हते, तिला आपलं मन कोणाकडे तरी रडून मोकळं करायचं होतं. डॉक्टरांनी गौरीच्या आईला छातीचा स्कॅन करायला सांगितला. गौरी आईला स्कॅन करण्यासाठी सेंटरला घेऊन गेली, तेव्हा तेथील टेक्निशियनने सांगितले की, आत्ता स्कॅन केल्यावर रिपोर्ट मिळायला तीन दिवस लागतील. जोपर्यंत स्कॅनचे रिपोर्ट येणार नाही, तोपर्यंत आईवर उपचार चालू होऊ शकणार नव्हते.


गौरीला जाम टेन्शन आले होते, तेव्हा तिला आठवलं की, आपली मैत्रीण ईशाचा नवरा स्कॅनवरुन रिपोर्ट देऊ शकेल. पण तिच्यापुढे असा प्रश्न होता की, कोविड ड्युटीमुळे इशाचा नवरा खूपच बिजी असेल, शिवाय ईशाची एका महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली होती आणि ईशाला कोरोनाही झालेला होता. अशावेळी त्यांना त्रास देणं योग्य वाटेल का?


गौरी या विचारात असतानाच ईशाचा तिला फोन आला.


"हॅलो गौरी, कशी आहेस?"


ईशाचा आवाज ऐकून रात्रीपासून मनात लपवून ठेवलेल्या भावना अश्रूंच्या रुपात बाहेर पडल्या. ईशाने गौरीला पूर्णपणे मोकळं होऊ दिलं.


"गौरी शांत झाली असशील तर, काय झालंय,हे सांगशील का?"


गौरीने ईशाला इतमभूत कथा सांगितली. गौरीचं बोलणं ऐकल्यावर ईशा म्हणाली,

"तू स्कॅनची सॉफ्ट कॉपी मला पाठव. मी ह्यांना पाठवते. तुझ्या आईला काहीही होणार नाही. ही वेळ अशी आहे की, तुला सावरावेच लागेल. कधीही बोलावं वाटलं, तर मी आहेच. तू स्वतःची आणि आईची काळजी घे."


गौरीला या शब्दांची त्यावेळी खरी गरज होती. गौरीने तिच्या आईच्या स्कॅनची सॉफ्ट कॉपी पाठवल्यावर पुढील पाच मिनिटांत ईशाच्या नवऱ्याने रिपोर्ट पाठवला. गौरीच्या आईला कोरोना झाला होता, तसेच इन्फेक्शन छातीपर्यंत पोहोचले होते. डॉक्टरांनी थोडेफार औषधं देऊन गौरीच्या आईला घरी पाठवून दिले.


घरी गेल्यावर रात्री अचानक गौरीच्या आईला श्वास घ्यायला खूपचं त्रास होऊ लागला. गौरी फुल्ल टेन्शनमध्ये आली होती. आपले पप्पा तर गेलेच आहेत, आता आपल्या आईला तर काही होणार नाही ना, या टेन्शनमध्ये तिला झोप पण लागत नव्हती. गौरीला त्यावेळी आपली मैत्रीण प्रितीची आठवण झाली. प्रितीचा नवरा चेस्ट फिजिशियन होता, तसेच तो कोविड हॉस्पिटल पण चालवत होता. रात्री अडीच वाजता गौरीने प्रितीला आईला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा मॅसेज केला, तसेच तिच्या नवऱ्याचा फोन नंबर मागितला.


प्रितीने रात्री तीन वाजता लगेच गौरीला फोन करुन आईच्या तब्येतीची चौकशी केली, तसेच आईला काहीही होणार नाही, असे बोलून आधार दिला. गौरीला त्याक्षणी खरंतर मानसिक आधाराची गरज होती आणि ते काम प्रितीने केलं होतं.


दुसऱ्या दिवशी प्रितीच्या नवऱ्याच्या सल्ल्यानुसार गौरीने आपल्या आईला त्यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. ज्या दिवसांत कितीही पैसे देऊन पेशंटला ऑक्सिजन बेड मिळत नव्हता, त्या काळात गौरीच्या आईला ऑक्सिजन बेड मिळाला होता. पुढील आठ दिवसांत गौरीची आई हॉस्पिटल मधून बरी होऊन घरी आली.


गौरीसाठी हे आठ दिवस खरंतर खूप खडतर होते, पण या काळात ईशा व प्रितीने गौरीला सतत फोन, मॅसेज करुन तिची विचारपूस करुन तिला मानसिक आधार दिला. ईशा व प्रितीने गौरीचे मानसिक बळ वाढवण्यास मदत केली.


ईशा व प्रितीसारख्या मैत्रिणी जर गौरीच्या आयुष्यात नसत्या, तर तो काळ किती कठीण गेला असता, याची कल्पना सुद्धा गौरी करु शकत नव्हती. 


ईशा व प्रितीसारख्या वेळेला धावून जाणाऱ्या मैत्रिणी प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे. ज्यावेळी रक्ताची नाती कामाला येत नाहीत, त्यावेळी रक्ताच्या नात्यांच्या पलीकडील ही मैत्रीची नाती कामास येतात.


आपल्या आयुष्यात एक मैत्रीण जरुर असावी,

न बोलता आपल्या मनातील ओळखणारी,

तू हे करायचं आहे हे सांगणारी,

तुला हे जमणार आहे हे पटवून देणारी,

तुझा काही दोष नाही हे सांगणारी,

बोलण्याची इच्छा नसताना बोलायला लावणारी.


©®Dr Supriya Dighe




ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//