एकटा मुलगा हवाय - 3 अंतिम

लग्नासाठी एकटा मुलगा हवाय
"ही नोकरीवर गेली तर घरचं कुणी बघायचं??"

तिने सर्वांना प्रेमाने समजावून परवानगी मिळवली, पण तिला त्रास देण्यासाठी तिची सासू मुद्दाम सकाळी चार गोष्टी जास्त सांगायची..."आज दोन भाज्या जास्त टाक, आज काय पाहुणेच येणार आहेत, आज फ्रीज साफ करून जा, आज रॅक साफ करायची आहे.."

हे सगळं मुद्दाम चाललंय हे तिला कळत होतं, पण तीही हुशार होती, बरोबर वेळेत सगळं नियोजन करून नोकरीला जाई. कधी आमच्याकडे तक्रार केली नाही.

पहिला पगार हातात आला तसं नवऱ्याने बजावून सांगितलं, हजार रुपये तुझ्याकडे ठेव आणि बाकी आईकडे दे, लागले की मागून घेत जा..

"अहो मी घरखर्चाला तुम्ही देतात तेवढे पैसे देईन, बाकी आपण सेविंग साठी ठेऊयात ना.."

नवऱ्याने ऐकलं नाही, तिनेही ऐकलं नाही..

मग त्याने तिला जबरदस्त मारहाण केली,

माघार घेऊन तिने शेवटी सासुकडे दिलं..

आता त्यांची पंचाईत झाली, ही सगळी आपल्याला हवं तसं करतेय..मग हिचा छळ कसा करायचा?? मग सासू सासऱ्यांनी तिच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तिच्या नवऱ्याचे कान भरायला सुरवात केली. ही चालताना पाय घासतच चालते, धुतलेल्या ग्लास चा वास येतो, नीट काम करत नाही, मलाच सगळं करावं लागतं..

मग काय, नवरा घरी आला की आईचं ऐकून बायकोला मारहाण शिवीगाळ करायचा..यातच त्यांचं आयुष्य सुरू होतं... नवरा बायको म्हणून कधी बाहेर फिरणं नाही की काही नाही.. सगळं आयुष्य त्याच्या आई वडिलांभोवती फिरत होतं..

एके दिवशी माझ्या मुलीला त्यांनी इतका त्रास दिला की तिने मला फोन करून सगळं सांगितलं, समाजाच्या भीतीने मी तिलाच समजून घ्यायला लावलं...आणि त्या दिवशी रात्री...सगळं संपलं... तिने असह्य होऊन स्वतःला संपवलं..

एवढी गोड, निरागस माझी पोर..त्या लोकांच्या हलकटपणाला बळी पडली अन आम्हाला सोडून गेली...वडील ढसाढसा रडू लागले..

"आता समजलं की का असं म्हणतोय की एकटा मुलगा पाहिजे म्हणून? नवरा बायको एकटे एकेमकांच्या सर्व दोषांना पोटात घालतात..ऍडजस्ट करून घेतात...त्यांची तशी तयारी असते..पण मुलाचे आई वडील तसे नसतील तर मुलीचे दोष हजारदा पुढे करून ती कशी वाईट याची वेळोवेळी खबर मुलाला देऊन त्याचं माथं भडकवतात... आणि मग तिथून त्यांचा संसार लयाला जातो...

अपवाद असतात, पण विषाची परीक्षा नको. मोठ्या मुलीच्या वेळेस तिच्या सासरच्यांनी खूप मोठ्या बाता केल्या होत्या.. आम्हाला म्हटलं होतं की मुलीला आमच्या मुलींसारखं जपू...

जेव्हा वेगळं राहण्याचा विषय तिने काढला तेव्हा घर फोडणारी, आई वडिलांना मुलापासून तोडणारी म्हणून कलंक तिच्या माथी लागला..

हे सगळं होण्याआधीच जर खबरदारी म्हणून एकटा मुलगा बघण्यात काहीही चुकीचं नाही..मुलगा एकटा राहत असेल तर त्याच्यावर कलंक नाही लागत, पण तेच बायको आली की मुलाला वेगळं केलं म्हणून तिच्यावर दोषारोप होतो. त्यापेक्षा आधीच वेगळा राहिलेला मुलगा बघितला म्हणजे उद्या क्लेश नको, वाद नको आणि मुलाला आई वडिलांसपासून तोडण्याचा कलंक नको..आपली मुलगी चांगली आहे, चांगला मुलगा पाहिला की ते दोघे बघतील आपापलं..त्यांच्या संसारात आम्ही किंवा कुणीही लुडबुड करणार नाही.. कधी कधी भावनिक होऊन विचार न करता वास्तववादी विचार केला तरच सर्वांचं भलं होतं..

हा झाला वडिलांचा दृष्टिकोन,

याबाबत तुमचं मत काय?


🎭 Series Post

View all