एकमेकांना जपा
©️®️शिल्पा सुतार
नवविवाहित माया, अभय नोकरी निमित्त शहरात रहायला होते. दोघे बिझी असायचे. माया एकदम अप टू डेट होती. तीच काम परफेक्ट, दिसणं परफेक्ट, स्वच्छ कपडे तिच्या कडे बघून वॉव अस वाटायचं. याच्या उलट अभय अतिशय साधा, पण प्रेमळ होता. त्याची कोणतीच वस्तू जागेवर नसायची. कुठेही जातांना धावपळ व्हायची. तो नेहमी मायावर अवलंबून असायचा.
देव बहुतेक अश्याच जोड्या बनवतो.
सध्या तरी घरी ते दोघच होते. अभयची आई भावाकडे रहायला होती. सकाळच सगळं काम घरी होतं. संध्याकाळी दोघांना घरी यायला उशीर होत असे. त्यामुळे स्वयंपाकाला मावशी येत होत्या.
दोघ ऑफिसला जायला तयार होते. नेहमीप्रमाणे अभयला एक ही वस्तू सापडत नव्हती. माया दोघांचा डबा भरत होती.
"माया... माया... माझा मोबाईल कुठे आहे?"
"चार्जिंगला लावला आहे." तिने ओरडून सांगितलं.
"माझी कारची चावी?"
" ड्रॉवर मधे आहे. तिथे रुमाल ही आहे."
काय कराव याच असं आहे. माया बाहेर आली. कॉटनचा ड्रेस, केस नीट बांधलेले ती अतिशय सुंदर दिसत होती.
"हे घे अभय, तू अस का करतोस समजत नाही. मी सकाळी सगळं काम करते. तुझ ही आवरते. तू निदान तुझ्या वस्तू तरी नीट ठेवत जा म्हणजे त्या तुला लगेच सापडतील. " ती नेहमीप्रमाणे त्याला ओरडली.
त्याने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला.
"अभय नको ना. हा घे डबा मला बस स्टॉप वर सोड." ती केस नीट करत म्हणाली.
" मग एवढी सुंदर का तयार होतेस? " अभय म्हणाला. तिची थोडी कळी खुलली. दोघ सोबत निघाले.
दोघांच ऑफिस दोन टोकाला होत. ती ऑफिस मधे पोहोचली. काम सुरू झालं. लंच ब्रेक मधे सगळया मैत्रिणी जेवत होत्या. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. मॅच, घरकाम, नवरा, सासुबाई तेच विषय होते. सगळीकडे बर्यापैकी सारखीच परिस्थिती होती. माया छान हसली. तिला अभय आठवला.
आज थोड काम लांबल. माया ऑफिस हून थोडी उशिरा घरी आली. नेहमीप्रमाणे दरवाजा लोटलेला होता. काय कराव या माणसाच? काही समजत नाही. दरवाजा तर लावायचा ना. चोर आत शिरून चोरी करून जाईल तरी याला पत्ता लागणार नाही.
ती आत आली पुढच्या खोलीत कोणी नव्हतं. नेहमी प्रमाणे अभयने शूज, सॉक्स तिथे फेकले होते. बॅग समोर पडली होती. सोफ्यावर मोबाईल पडलेला होता.
आतुन गाणं गुणगुणल्याचा आवाज येत होता. अभय आरश्या समोर उभ राहून केस विंचरत होता. तो ऑफिसहून आल्यावर फ्रेश झाला होता. ओला टॉवेल कॉटवर पडला होता. बाथरूम मधे आनंदी आनंद होता. साबण खालीच पडला होता. त्याच्या बाजूला सोप केस होती. नळ नीट बंद नव्हता. त्यातून थेंब थेंब पाणी येत होत.
त्याने तिच्याकडे हसुन बघितल. केसाच थोड पाणी तिच्यावर उडवलं. "आज उशीर झाला?" त्याने प्रेमाने विचारलं.
"अभय प्लीज काय आहे हे? आधी हा पसारा आवर." माया चिडली.
"मी आता मस्त पैकी मॅच बघणार आहे. मला त्रास देवू नको माया आणि पसारा कुठे आहे?"
"ओह माय गॉड हेच ना अभय तुझ्या सोबत कोणी राहू शकत नाही. दरवाजा उघडाच होता. तिकडे तुझे शूज ,सॉक्स तसेच पडलेले. बॅग नीट ठेवली नाही. इथे बघ ओला टॉवेल तसाच कॉटवर पडलेला आहे. बाथरूम बघ. पाणी टाक ना सगळीकडे. " माया चिडली होती.
" चिल माया जा तू फ्रेश हो मी चहा करतो."
" नको... अजिबात नाही तू किचन कडे जावू नकोस. नंतरचा पसारा कोण आवरणार? त्यापेक्षा मावशी येतील त्या करतील. "
" मी तुझ्यासाठी काय आणल आहे ओळख? " तो निरागसपणे विचारत होता.
" काय? "
"वडापाव आणि जिलेबी."
"कशाला आणलं? तुला माहिती आहे ना वडापाव तेलकट असतो आणि जिलेबीत किती साखर असते. " मायाची चिडचिड वाढत होती.
" तु लगेच जाढ होणार नाही. स्वतःवर किती नियम लावून घेणार आहे माया? जिवनाचा थोडा तरी आनंद घेत जा. उद्या वाटलं तर ग्राउंडचे दोन फेरे जास्त मार . " अभय म्हणाला.
" हे असंच वाढत जातं अभय. तू ही तुझ्या तब्येतीकडे बघ ना. आता मी काही नियम पाळते आहे ना. मग का तेलकट पदार्थ आणतो? "
" मला भूक लागली होती तिकडे खाण्यापेक्षा तुझ्यासाठी ही आणलं तर तू अस बोलतेस. किती चिडतेस? तू किती स्ट्रेसफुल आहेस. प्रत्येक गोष्टीचा ताण घेतेस आणि मला ही देतेस. जेवणाचे, राहण्याचे, वागण्याचे सगळे बंधन. हे अस नको तस नको. " अभय चिडला.
" अरे मग जगायला शिस्त नको का? आपण मनुष्य आहोत, प्राणी नाही कसं ही जगायला. " माया म्हणाली.
" पण हे घर आपल्यासाठी आहे ना आपण हवं तसं राहू शकतो ना? "
" हो पण दिवसातून एकदा आवरायला काही हरकत नाही. "
" ते मी करतो आहे. "
रोज प्रमाणे त्यांच्यात वाद झाला.
" तू कधीच नीट होवू शकत नाही अभय. " माया म्हणाली.
" मला नीट व्हायचं ही नाही माया. तुला आवडत तस तू रहा. मला फोर्स करू नकोस. माझ्या बाबतीत मधे मधे करायच नाही."
माया सोफ्यावर जाऊन बसली. अभयने छान चहा केला. तिच्यापुढे ठेवला. दोघांनी वडा पाव खाल्ला.
" हे बघ खाल्लं तर खरी उगीच भांडण करतेस. आधीच शांत राहिली असती तर मला बर वाटल असत. उगाच रुसून बसतेस. "
माया रागाने चहा खाली ठेवून बाल्कनीत जावून बसली.
अभय मॅच बघत बसला. एका बाजूला लॅपटॉप वर काम ही सुरू होत.
मावशी आल्या.
"फक्त खिचडी टाका भूक नाहिये." ती परत बाल्कनीत जावून बसली.
आईचा फोन आला. आईने आवाज ओळखला. "काय झालं ग?"
"काही नाही आई छोट्या छोट्या गोष्टी उगीच मोठ्या होतात. मला ना हे घर सोडून तिकडे निघून यावसं वाटत आहे." माया म्हणाली.
"आता काय झालं?"
"अभय ग वेगळाच आहे. अजिबात ऐकत नाही. काही सांगितल की चिडतो. म्हणतो माझ्या मधे मधे करू नको. चांगल्या सवयी नको का?"
"अभय राव तर किती चांगला माणूस आहे. "
" हो आई तो चांगला आहे पण परफेक्ट नाही. माझ काही ऐकत नाही. मला राग येतो. "
" कोण परफेक्ट असत बेटा सांग ना? तू आहे? मी आहे?"
" बेसिक सवयी तर हव्या ना आई. मला असा वैताग येतो. याच्या मागे मागे मी किती आवरणार? तो काही लहान आहे का? आपले बाबा किती नीट वागतात. तुला मदत करतात. तुम्ही नाही का परफेक्ट कपल. "
"तुझे बाबा पूर्वी असे नव्हते. इतक्या वर्षांनी असे झाले आहेत. तरी ते माझं काहीच करत नाही. मला अजूनही त्यांना चहाचा कप, पाणी हातात द्यावं लागत. हा पण ते तुम्हा मुलांच खूप करतात. अभय राव ही करतील. होईल बरोबर. तुमच नवीन लग्न झालं आहे. सहवासाने समजत. जरा धीर धर. एवढं टेंशन घेण्यासारख काही नाही. " आई समजावत होती.
"माझी ना नुसती चिडचिड होते."
"अस करु नकोस. समजून घे तुला काय हव परफेक्ट घर की प्रेमळ नवरा? काही काही ठिकाणी किती नियम असतात. असंच झालं पाहिजे. तसंच झालं पाहिजे. तुझ्याकडे सगळं तुझ्या मनाप्रमाणे आहे. घर नीट हव पण अति करू नको ना."
"मग कस करू? "
"जरा प्रेमाने हळू सांग. नाहीतर तू करून घेत जा बर. अभय रावांना जप. बाजूची मीना बघितल ना. तिला किती जाच आहे. एवढी हुशार तरी काही येत नाही म्हणून सासरच्यांनी घरी पाठवून दिली. तिचा नवरा ही इकडे येवून खूप बोलला. आता कोर्टात केस सुरू आहे. "
" हो ना आई. तीच खरच वाईट झालं. "
"मग तुझ्याकडे किती चांगलं आहे. त्याचा आनंद घे. नीट रहा छोट्या मोठ्या गोष्टी सोड."
"मी प्रयत्न करते."
" अभय रावांना मनाला लागेल अस बोलू नकोस ग. काय होत भांडण मीटत पण बोललेले तिखट शब्द लक्ष्यात राहतात. "
"हो आई. " तिने फोन ठेवला. ती अभय जवळ येवून बसली. मॅच रंगात आली होती. अभय लहान मुलांसारखं ओरडत होता.
"आपण जिंकणार माया. "
हो... तिने त्याच्याकडे हसुन बघितलं.
" मी ताट वाढते."
" थांब पाच मिनीट मी पण मदत करेन. " अभय म्हणाला.
" हो तू बस. " ती आत गेली तिने पापड भाजले. दोघांच जेवण झालं. नेहमी प्रमाणे अभय तिच्या मागे मागे करत होता. तिला समजलं. तिने त्याला वेळ दिला. अभय बाजूला आरामात झोपलेला होता. तिने थोडा वेळ पुस्तक वाचलं. ती आराम करत होती.
खरच जरा शांत राहील तर बर वाटत आहे.
दुसर्या दिवशी सुट्टी होती. अभय झोपलेला होता.
"उठ अभय."
त्याने बघितलं माया रेडी होती. "कुठे जायचं आहे?"
"ग्राउंडच्या दोन फेऱ्या जास्त मारायच्या ना? समोसे, वडे खायचे ना." ती हसत म्हणाली.
"दहा मिनिट झोपू दे माया प्लीज. असा बदला घेवू नकोस."
"सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार नाही अभय. पाच मिनिट. नाहीतर मी गार पाणी टाकेल."
दोघ फिरायला आले.
"अभय किती हळू हळू चालतो आहेस. अस केल तर मी एक फेरी अजून वाढवेल. आटोप मी आज तुझ्या आवडीचा स्वयंपाक करेन. "
" नक्की? "
"हो. "
" तुला नक्की काय झालं आहे माया? काल पासुन तू बरी वागते आहेस." अभय म्हणाला.
ती खूप हसत होती. " बरी म्हणजे? आधी मी कशी होती?"
"हिटलर. म्हणजे सॉरी. " अभय हळूच म्हणाला.
माया हसत होती. हा खरच भोळा आहे. " तू माझ ऐकलं तर मी पण तुझ ऐकेन. आपण असच खुश राहू."
"डील?" त्याने विचारलं. हात पुढे केला.
" हो डील. " तिने हात मिळवला.
"अशीच छान वाग. तू चिडली की मी घाबरतो. " अभय म्हणाला.
ते घरी आले. अभयने शूज काढून फेकले. तो आत गेला. माया ते उचलणार होती. तो पटकन बाहेर आला. त्याने त्याचे शूज नीट ठेवले. मायाच्या चेहर्यावर हसू होत. गुड प्रोग्रेस.
आता अभयने लिस्ट केली होती. ती दारामागे चिकटवली.
कारची चावी, मोबाईल चार्जर कुठे आहे सगळं लिहिलेल होत. त्या सोबत शूज नीट ठेवणे. लाइट, फॅन बंद करणे, असे बरेच काम होते.
माया ते वाचत होती. माझ्यासाठी जे ईजी आहे ते याच्या साठी अवघड आहे. तो प्रयत्न करतो आहे. माझ्यासाठी खूप आहे. अभयचे प्रयत्न तिला दिसत होते. ती पण शांत झाली होती. दिसला तो पसारा आवरत होती.
रविवारी ते आईकडे गेले. "आता जेवून जा. स्वयंपाक झाला आहे. फक्त पोळ्या बाकी आहेत."
अभय पुढे बसलेला होता. बाबा आणि तो गप्पा मारत होते. माया किचन मधे आली.
"सगळं ठीक ना माया." आईने विचारलं.
"हो आई. खरच मला ही बर वाटत. रोज भांडण्यात अर्थ नाही. अभय ही बर्यापैकी आठवणीने वस्तु जागेवर ठेवतो आहे. "
" आयुष्यात टेंशन घ्यायला बरेच मुद्दे असतात. घरातल्या घरात तरी टेंशन नको. "
" हो आई बरोबर. "
" असेच छान रहा."
"आई तू खरच छान समजून सांगितलं." तिने आईला मिठी मारली.