एकी मैत्रिणींची खेळ भोंडल्याचा

अवघड आहे आता परतुनी येणे दिवस आनंदले जे बालपणीचे ..

......  म्हणून तर माझं मन अजूनही तळमळत ..   गावात राहून मी जे सणवार , नाती , गोती ,लोकांतील  आपलेपणा , एकमेकांना मदत करण्याची जाणीव ..
शहरात राहून शिकू शकतील का माझ्या मुली ? केव्हा त्यांना आपले सणवार ,आपल्या माय मराठी चालीरीती समजणार ?
की त्यांचं आयुष्य असंच जाणार शहराच्या चकमकीत विरून ...

आजकाल ओढ सर्वांना शहराची ..  शहरात खेडेगावापेक्षा प्रगत सुविधा ..  हाताखाली हव्या त्या गोष्टी    ... म्हणून सगळ्यांचा ओढा शहराकडे ... गावात लहानाचे मोठे होऊन शहरी गेलेल्याना असते ओढ गावची ... पण त्यांचीच मुलं बाळं जी शहरात जन्मली ,वाढली ...  शिक्षण , कला ... या स्पर्धेच्या युगाच्या चढाओढीत बोटावर मोजावा एवढाच संपर्क त्यांचा गावच्या मातीशी ... कशी समजणार मग ह्या नव्या पिढीला गावची माती ...

माझंही काही असंच ... हे भोंडला वगैरे काही असतं ,माझ्या नावी गावी पण नव्हतं , काही कारणामुळे माझं ही शिक्षण शहरात काकांकडे ...  मोजून चार दिवसांत दिवाळी , चार दिवस गणपती , पंधरा एक दिवस उन्हाळा सुट्टी ... एवढंच काय ते आई कडे रहायला मिळायचं ...
पण काकांच्या काही अडचणी मुळे , माझा दाखला शहरातल्या शाळेतून काढून , माझ्या गावी करण्यात आला .. लहानपणापासून तिथे न राहण्यामुळे त्या गावची जरी मी असले तरी मला फारसं कोणी ओळखत नव्हतं ... म्
हणजे शेजारची मुलं ,मुली ..
इयत्ता सहावीत माझा प्रवेश घेतला गेला ... नवी शाळा , नवी मुलं , नवे शिक्षक ... सगळं काही नवं ...


आणि अजून एक गोष्ट सांगू ...  गंमत आहे मोठी ...
कदाचित अजूनही शाळांमधून ही गोष्ट  चालत असेल , शाळेत नवा दाखला घेऊन प्रवेश केला , की त्या नव्या आलेल्या विद्यार्थ्यांला अगदी स्पेशल असल्याची फिलिंग दिली जायची ...  शिक्षकांचा मार , ओरड ही नसायचा ...
वर्गात नवीन असल्यामुळे सगळ्यांच लक्ष आपल्याकडेच ... मला तर ही स्पेशल वाली फ़िल्लिंग तीन वेळा अनुभवायला मिळाली , तीन वेळा माझी शाळा बदलण्यात आली त्यामुळे ...चला मुद्यावर येऊ ...


सहावीत आईकडे माझ्या गावी रहायला आले मी ...माझ्या आईला ही हे सणवार , गाणी , गौरी गणपती .. खूप हौस ... ते म्हणतात ना ..लहानांना  बाळकडू मोठ्यांकडूनच दिलं जातं  ... माझंही तसंच काही ... अगदी वाचनाचं वेड ही देणगी देखील मला आई कडूनचं मिळालेली आहे ..  तिला ही सवय अगदी भाकरीच्या बुटीतील , ओला झालेला पेपरही वाचण्याची ..  तिची हीच सवय माझ्यात आपसूकच आली , माझ्या कथा कादंबऱ्या वाचण्याचं श्रेय ही तिलाचं जातं .???? ( हो पण त्यासाठी मुलंही शिकणारी हवीतं बरं का ????????  )

भोंडला , आमच्या गावात हादगा या नावाने ओळखला जातो ... एकेदिवशी कॅलेंडर बघत असताना ( माझ्या आईला कॅलेंडर वाचायचं ही वेड , मग मलाही ???? )  तिकडे हादगा हा शब्द लिहिला होता .  आईला मी विचारलं , म्हणलं आई हादगा म्हणजे काय ?

माझ्या आईं ने तिच्या लहानपणी ही खुप सणवार अनुभवलेले ... तिने लगेचं मला हादगा ( भोंडला ) ची माहिती सांगितली ... कसा करतात ?  काय असतो ?

दोन दिवसांनी भोंडला होता . आईला मी विचारलं म्हणलं मी बसवू का भोंडला ...  तिला ही भारी हौस याची ... ती मला नाही थोडीच म्हणणार होती ...
दुसऱ्याचं दिवशी , तिकडे लांब गुरवाच्या दुकानात जाऊन भोंडल्यात ज्याची पूजा करतात ते चित्र घेऊन आले .  आठ आन्याला होतं फक्त ते ...
आता ते चिकटवायचं कुठे , हा मोठा प्रश्न ... आजी जरा तुसडीचं माझी ... तिला कुठे पटतं तेव्हा असलं काही ... पप्पाही तसेच ...
घरात टेबल होता ... पापांचाचं होता तो टेबल ..  ज्याच्या ड्रॉवर मध्ये त्यांची कागदपत्रे वगैरे असायची ...मग मी एक युक्ती लढवली , अशा ठिकाणी ते भोंडला चित्र पुजायचं जिकडून पप्पाही काढू शकणार नाहीत ....
पपांच्या टेबलवर चढून भिंतीला लाकडी खांड असतो , (  गावची माडीची घर अजूनही अशीच बनतात ) तिकडे दोन छोटे खिळे ठोकून ते चित्र ऍडजस्ट केलं . आता पप्पा थोडीच चढणार आहेत टेबलवर , ????
घराजवळील मैत्रिणींना सांगितलं , एक दोन अजून गोळा केल्या ज्यांनी हादगा घरी बसवला होता ...  रोज एका वेगळ्या फुलाची माळ ...त्या हादग्याला घालायची , कधी कारेळी ची पिवळीशार फुलं ...कधी सीताफळ , कधी तोंडल्यांची माळ , कधी झेंडूची ...
            संध्याकाळ झाली , की पोरी आमच्या घराबाहेर जमायला सुरू व्हायच्या ...  मला ते आठवलं की अजूनही आश्चर्य वाटतं , एवढ्या मुली माझ्यासाठी गोळा व्हायच्या ... माझ्याबरोबर भोंडल्याची गाणी म्हणता यावी ... कारण मी नवीन होते न गावात ...  ते अट्रैक्टिव म्हणतात न तसं काहीसं ... मला गर्व , हेवा वाटायचा मला स्वतःचा ..  कारण एवढ्या मुलींना एकत्रित करणं , ठेवणं ... हे ही कोणालाही थोडंच जमू शकतं ..
       गाणी म्हणताना एवढा मोठा फेर व्हायचा आम्हा मुलींचा ..  पुरा रस्ता भरून जायचा ... येणारे जाणारे बघत बसायचे , आमचा खेळ , एवढ्या मुली ..
     नि गाणी सांगणारी माझी आई , चुलीवर स्वयंपाक बनवत बनवत मला गाणी शिकवायची ..  मी लिहून घ्यायचे वहिवर ...
        खेळता खेळता अडलंच एखादं कडवं तर आत घरात पळत येऊन आईला विचारायचं ... खेळ संपत आला की खिरापतिची बारी ...  खुपजणी प्रसाद घेऊन यायच्या .. मग एक एक करून प्रत्येकीचा प्रसाद ओळखला जायचा ... कधी कधी समजायचंच नाही की काय प्रसाद असेल कोणाचा ...
         आमची गाणी सुरू झाली की आई तिकडे प्रसाद बनवून ठेवायची ... तेव्हा ना एक पदार्थ खुप प्रसिद्ध झाला होता , एकदा एका मैत्रिणीने बनवून आणला , मग पुन्हा सगळ्याजणी तेच बनवू लागल्या ... मी ही हट्ट केला आईकडे मलाही तोच प्रसाद हवा ...हट्ट यासाठी की जेव्हा ती मैत्रीण बनवून घेऊन आली , तीस जणींचा ग्रुप आमचा ओळखू शकला नाही ...
       शेवटी सगळ्या जणी हरलो म्हणल्यावर मग तिने सांगितलं, ती बोलली सुशीला नावाचा प्रसाद बनवला आहे , आम्हां सगळ्यांसाठी हे नवीन होतं .. म्हणलं काय आहे ते, खाऊन बघितल्यावर एवढं भारी चव लागली ...
      काही नव्हतं , गव्हाचं पीठ ,सोनेरी होईपर्यंत तव्यावर खरपूस भाजयचं आणि  त्यात साखर टाकायची ..  आता त्याला नक्की काय नाव आहे महाराष्ट्र मध्ये माहीत नाही .. ( हरयाणा मध्ये थँडीत नि बाळंतिणीला देण्यात येणारा खास नि सर्वात महागडा पदार्थ , " पंजीरी " म्हणतात इकडचे लोक ...आणी महाग यासाठी  की किलो किलो च्या वजनाने तुपात भाजतात  , काजू ,बदाम ,पिस्ता ,भरभरून टाकतात ) म्हणून महाग ... मला नाही आवडत आता , पण माझी मुलगी चवीने खाते ..". पंजीरी " हरयाणा मध्ये वामन भगवान जयंती खुप मोठा उत्सव , पुडया पुडया भरून वाटतात पंजीरी चा प्रसाद ..

          सात दिवस मनसोक्त भोंडला खेळून झाला , की तो हादगा पाण्यात विसर्जित करायला जायचं ... मग भोंडल्यासाठी आई धपाटे , उसळ , दही ..  काय काय बनवून द्यायची . ( मला तो माझ्यासाठी आईचा मांडलेला पदार्थांचा घाना , म्हणजे आश्चर्य चं वाटायचं ... का करत असेल माझ्यासाठी आई एवढं ?  नाही करत म्हणू शकली असती की .. नाहीतर बाकी मैत्रिणीच्या आईप्रमाणे साधी चपाती पण देऊ शकली असती ... पण नाही , ती हे सर्व सकाळी उठून माझ्यासाठी करायची .. अजूनही तो क्षण नजरेसमोर येतो ... तेव्हा नाही विचारू शकले ,पण आता जेव्हा आईला भेटेन तेव्हा मात्र नक्की विचारेन ... एवढं सगळं तू माझ्यासाठी बनवायची ???????? )
            भोंडला विसर्जन म्हणजे आम्हां मुलींचं वनभोजनचं समजा ... सकाळी जायचो ... ते संध्याकाळी सूर्य मावळतीलाच परत ... गावचा तलाव तुडुंब भरून वाहत असायचा ...मग त्या तलावाचं खळखळ पाणी खाली ओढ्याला ..  आम्ही मुली त्या भोंडल्याची.. पूजा करून , पार्वती , शंकराची आरती म्हणून घरून दिलेला नैवेद्य दाखवून भोंडला पाण्यात विसर्जित केला , की मग आमचा धुडगुस चालू त्या पाण्यात ... पंधरा वीस जणी वेड्यासारखं त्या पाण्यात खेळायचो ..  भूक लागली की आईने बनवून दिलेलं जेवण  खायचं नि पुन्हा पाण्यात शिरायचं .. 

   " खरंच किती मस्त होते ना ते दिवस ..  वाटतं बरं झालं जगून घेतले ...तसही आताच्या पिढीला काय माहीत हे सुख ,नि आता कोणी म्हणलं की चला पाण्यात डुंबूया , होईल कोणी तयार ...  छे .. ! कधीच नाही .. संसाराच्या गाड्यात अशा व्यस्त सर्वजनी आहे कुठे वेळ कोणाला , कोणासाठी ...
      ना जुन्या मैत्रिणी , ना ते जुने दिवस ...ना त्या आठवणी ...
फिरतायत चक्र आयुष्याची .. गोल गोल फ़क्त ...


धन्यवाद ....

( कसा वाटला लेख नक्की सांगा , तुम्हीही जगला असालचं की हे क्षण  आनंदाचे )


   © vaishu patil ...