एकत्र कुटुंब पद्धती गरजेची - २

Importance of joint family..

ईरा राज्यस्तरीय करंडक वादविवाद स्पर्धा

एकत्र कुटुंब पद्धती गरजेची - 2

एकत्र की विभक्त..? मी म्हणेन,

एकत्र कुटुंबात राहिल्याने ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळतं. एकत्र कुटुंबात राहिल्याने मुलांवर योग्य संस्कार होतात. मुलांची काळजी घेण्यासाठी घरातील व्यक्ती सदैव उपलब्ध असतात. मुलांचा सामाजिक, मानसिक व भावनिक विकास होतो. कुटुंबातील व्यक्ती वेळप्रसंगी सतत मदतीला असतात. कुटुंबामध्ये आलेलं, कुठलंही संकट...एकत्र येऊन पेलण्याचे कार्य घडत असतं. एकमेकांच्या मदतीने कुठल्याही प्रसंगाला हिंमतीने तोंड देऊन, एकमेकांच्या सहकार्याने कुठलाही गड सर केला जाऊ शकतो.

आभा आणि आशय दांपत्य आयटी सेक्टर वाले. भरगच्च पगाराची दोघांनापण नोकरी. माॅडर्न जगात वावरणारे. घरातील वडीलधार्‍यांचे विचार त्यांना न पटणारे. साधे प्रश्न कधी कधी आईवडीलांचे असायचे,'कुठे चालले? काय करता? कधी घरी येणार? का उशीर झाला? घरचेच अन्न खायचे...खुप उशीरा पर्यंत बाहेर फिरु नका...!'

हे सगळे प्रश्न मुलांच्या काळजी पोटीच...!

पण हेच प्रश्न मुलांना बेड्या वाटायला लागले. मग काय वडीलधारे घरी नकोच. वडील धारे आपल्या जुन्या घरी रवाना. कालांतराने त्यांना बाळ झाल्यावर मग घरात दादी, नानी च्या ऐवजी, 'नॅनी' म्हणजेच 'आयाची' एन्र्टी झाली. आया, 'आज्जी' थोडे ना होती. ह्यांच्या मुलांवर आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करणारी...? ते आॅफीसमध्ये गेल्यावर ती त्या अजाण बाळाचे गालगुच्चे घेणे. रडत असल्यास तोंड दाबून मारणे. उचलून सोफ्यावर, काॅटवर दूरुन फेकणे इत्यादी बाळासोबत घडू लागले. ती असे मारायची की त्याचे वळ उमटू नये...

पण ती, त्या बाळाला मारायची इच्छा पुर्ण करुन घ्यायची. आता तिची अशी इच्छा का व्हायची...? तर उत्तर असे की, कुणीही दुसर्‍यांचे घरकाम, आवड आहे म्हणून करत नाही. त्यामागे त्या 'नॅनीची' आर्थीक बाजू कमकुमवत असणे हे कारण..! आपले घर सोडून, आपले मुलं, नातू सोडून दुसर्‍यांचे सांभाळणे...तिला नाही आवडायचे...तिची मजबूरी...मग विकृतीत बदलली...आणि तिच्या कडून हे कृत्य करुन घेत होती...! ही सत्य घटना आहे आणि टिव्हीवर सतत दाखवल्या गेले होते.

मग मुद्दा हाच की, तुमचे वडीलधारे जिवंत असताना तुम्ही त्यांना आपल्या पासून दूर ठेवून...भरमसाठ पैसे देवून आणलेल्या 'नॅनीला' घरात ठेवता. जिला तुमच्या बद्दल साधी आपुलकीही नाही. ती तुमच्या पश्चात, तुमच्या काळजाच्या तुकड्याला 'जीव' लावेल का..? जपेल का...? विचार करण्या सारखे आहे. आपल्या बाळासोबत जेव्हा, काहीतरी वेगळे होतेय, हे आईवडीलांच्या लक्षात आले...त्यावेळेस त्यांनी cctv लावलेत. आणि हा प्रकार त्यांना दिसला. तुमच्या पश्चात एक दिवस सुद्धा तुमच्या बाळाला कुण्या तिर्‍हाईताने का 'टाॅर्चर' करावे....? कसे ही असतील वडीलधारे...पण ते तुमचे आहेत आणि प्रसंगी तुमच्या पेक्षाही जास्त प्रेमाने तुमच्या 'पिल्यांची' काळजी घेतील...! म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती ही सर्वांत चांगली आणि आजच्या जमान्यात फायदेशीर पद्धत आहे. कमी लागत आणि लाभ भरमसाठ....!

आणि हो, विनाखर्चाचे cctv तुमच्या घरातच उपलब्ध असताना विकतचा बेभरवश्याचा ताप का घ्यायचा...!

सांदीपनी, सम्राज्ञी नवरा बायको. घरात सासूसासरे आजोबा आज्जी एक मोठेकाका काकी आणि त्यांचा मुलगा. सम्राज्ञी नावा प्रमानेच. मी म्हणेल तेच घरात व्हावे अशी अपेक्षा. वाडवडीलांची मालमत्ता बघूनच तिच लग्न ह्या घरात झालेलं. पण काही दिवसातच तिला घरातील वडीलधार्‍यांची अडचण वाटू लागली. पैसा तर हवा पण सतत हवं नको विचारणारे. एकटी बसली असल्यास मायेने विचारपूस करणारे. येणार्‍या जाणार्‍या पाहुण्यांचा राबता. जरा काही दुखलं खुपलं की, नातेवाईंकांची भेटायला येणारी गर्दी. आजी आजोबांना सासूसासर्‍यांना सुखावून जायची. मग मोठ्या काकांचा मुलगा पण खुश असायचा पाहुण्यांमध्ये, जवळच्या नातेवाईकांमध्ये. एका आज्जीने रागावले तर दुसरी आज्जी लाड करणार. बाबा अभ्यास नाही घेऊ शकले तर आजोबा अभ्यास घेणार. आईबाबा मुलांना शाळेत नाही सोडू शकले तर काका ही जबाबदारी पार पाडणार. सणवार कसे करायचे किंवा प्रत्येक सणाचे महत्व आजी आजोबा नातवांना पटवून सांगणार, गरज पडल्यास नातवांना त्यात सहभागी करुन घेऊन आपल्या परंपरेची त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करणार. स्वयंपाक घरातही मोठ्याकाकी, आज्जी असायच्याच. मग एखादा पदार्थ सम्राज्ञीला नाही आला, तर आज्जी मोठीकाकी तिला मदत करणार. समजावून सांगणार. तब्येत बिघडल्यास तिची काळजी घेणार. 

उच्चशिक्षित आधुनिक जगात वावरलेल्या सम्राज्ञीला हे सगळं नकोसं होत होतं. ती हाॅटेलींग, मित्रमैत्रिणी, पार्ट्या 'मिस' करु लागली. सतत कुणी तरी बोलायला येऊन तिचं एकटं राहण्याचा प्रयत्न मोडीत काढू लागला. मग तिने मनोमन ठरवले आणि सांदीपनीला आपला निर्णय सांगितला.

कुठे तरी त्यालाही हेच वाटायचे. म्हणून त्यानेही तिला समर्थन दर्शवून आपला निर्णय घरातील मोठ्यांच्या समोर मांडला...!

सगळ्यांना धक्काच बसला. पण मोठ्या काकाने सावरुन घेतले. त्यांनी वडीलधार्‍यांना समजावले आणि ह्या दोघांना वेगळे राहायला परवानगी दिली.

सम्राज्ञी आणि सांदीपनी आनंदाने घराबाहेर पडले. पाॅश एका इमारतीत त्यांनी भला मोठ्ठा तीन बेडरुमचा फ्लॅट घेतला. आता ना कुणी टोकणारा, नाही कुणी बोलणारे...दोघेच राजाराणी...!

काही दिवसाने सम्राज्ञीने नोकरी सुरु केली. मग काही दिवसाने घरात बाळ आलं. मग तेच, सोबत घरकाम करणार्‍या बायांची वर्दळ वाढली. पैसा फेको तमाशा देखो....किंवा तुमच्या मता प्रमाणे करणार्‍या कठपुतळ्या घरात वावरु लागल्या. बाळ घरात आईवडीलांच्या, कामवाल्यांच्या लाडात वाढू लागले. नोकरी करुन जो थोडा वेळ मिळायचा त्यात त्या दोघांना 'प्रायवसी' मिळायची नाही. कारण उरलेला वेळ त्यांच्या बाळाला द्यावा लागायचा. मग कधी कधी त्यालाही बायांसोबत खेळायला बाहेर पाठवणे. 

कशात तरी गुंतवून ठेवणे...जसे गेम खेळायला देऊन...मोबाईल वापरायला देऊन...दोघेही एकांतासाठी पर्याय शोधू लागले....मुलाला, मम्मा डॅडा सोबत खेळायचे असल्यास...थकून आलेले दोघेही मग टालमटोल करुन त्याला वेगवेगळे प्रलोभनं देवून वाढवत होते. हळूहळू त्याला ''नाही'' हा शब्द ऐकायची अजिबात सवय राहिली नाही. मित्र हो, हे असं वाढलेलं लेकरु, एकलकोंड निपजलं, हळूहळू मानसीक रुग्ण बनलं, छोट्या छोट्या गोष्टींवरुन घरात आकांत करु लागलं. मग हे बाळ, सम्राज्ञी आणि सांदिपनीच्या काळजीचा विषय बनला. डाॅक्टरांच्या वार्‍या झाल्या. कुणाला कळू नये म्हणून त्याला घरातच ठेवू लागले. नातेवाईंकांसोबत भेटी, आधीच कमी झाल्या होत्या. आता पुर्ण पणे थांबल्या. बाळाचा एक मित्र सहजच बाळाला भेटायला आला आणि गप्पा करत असताना...सांदिपनीला दिसला. त्यांच बाळ, डॅडा विषयीच काहीतरी मित्राला सांगत होता. ते ऐकून सांदिपनी भडकला आणि मित्रा समोर बाळाला रागावला...!

मित्र उठून बाहेर गेला. पण बाळ रागाने लालबुंद झाले. माझ्या मित्रा समोर माझा अपमान केला...थांबा तुम्हाला दाखवतोच आता...! बेडरुमचे दार त्याने धाडकन बंद केले. सांदिपनी दार वाजवतच राहिला...सम्राज्ञी त्याला आवाज देऊ लागली...पण कशाचे काय...शेवटी पोलीसांनी येऊन दार तोडले......आणि त्यांच्या निष्प्राण बाळाला खाली उतरवले....!

न्यूजपेपरला मी कधीतरी वाचलेली ही वरील बातमी.

विभक्त राहण्याच्या क्षणिक मोहापायी, मुक्तपणे जगण्यासाठी, मम्मा डॅडा तुम्ही आपल्या मुलाचे काय हाल केलेतं. तो एकलकोंडा व्हायला तुम्हाला आवडत असलेला एकलेपणाच कारणीभूत ठरला. आणि आज आपल्या मुलाला गमावून बसले...!

सम्राज्ञी आणि सांदिपनी तुम्हाला हेच स्वातंत्र्य हवं होत नां...?

मग आता बघा नां, तुमच्या बाळाने काय ''मिस'' केले...तुम्ही काय "मिस" केले...!

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वर्चस्व, हेवेदावे, भांडणे विकोपाला जात नाहीत. कारण वडीलधारे वेळीच हस्तक्षेप करुन परिस्थिती सांभाळून घेतात. कुणी ना कुणी काहीतरी संवाद साधत रहातात. जेणे करुन काहीतरी मनात "खलत" असलेले...त्याची तीव्रता कमी होते. आणि आपल मन हलकं होतं...वाईट विचार दूर पळतात...!

भरमसाठ पैसा खर्च करुनही तुम्ही तुमच्या मुलाला 'भावनीक स्थैर्य, आधार, सुरक्षितता, आणि विशेष म्हणजे तुम्ही त्याला,"नाही" हा शब्द ऐकायची सवयच लावली नाही...' 

एकत्र कुटुंब पद्धतीत मुलं टक्के टोणपे खातच..म्हणजे समृद्ध जीवन जगत असतात. एवढं तेवढं कुणा समोरही बोललेलं मुलांना ''जिव्हारी'' लागत नाही. असे मुले पुढे खुप प्रगती करुन कुठल्याही प्रसंगांना हिंमतीने तोंड देतात आणि समृद्ध, निकोप जीवन जगतात. सोबतच आपली भारतीय परंपरा म्हणजेच वाडवडीलांचा आदर करणे शिकतात. त्यांना जपतात....!

एक जुन्याकाळी नावाजलेलं व्यक्तीमत्व "परवीनबाॅबी" स्वतःच्या घरात मृतावस्थेत आढळली...!
एवढं लोकप्रिय व्यक्तिमत्व, कशाचीच ददात नाही. परवीनबाॅबी मरुन पडली. सडल्यावर कळली. का असं व्हावं..? जसजसे एकेक सफलतेच्या पायर्‍या चढायला लागले. तसे ही व्यक्ती आधी आपल्या जवळच्यांनपासून मग बाहेरील लोकांपासून दूर राहू लागले. हळू हळू आपोआपच ती आपल्याच कोषात राहीली. बाहेरच्या आणि जवळच्या लोकांपासून तुटली. सफलता होती तो पर्यंत ठीक...कधी ना कधी उतरण ही ठरलेलीच...त्यानुसार मग, तिला व्यक्त व्हायला कुणी उरले नाही....त्याची परिणती, 'ती' मरुन पडली, पण तिची विचारपूस करणारं तिच्याच मुळे कुणी उरले नव्हते...किती मोठी शोकांतिका....! म्हणूनच एकत्र कुटुंब ही, काळाची गरज बनत चालली आहे.

सलिल आज आठ वाजलेत तरी घरी परतला नाही. त्याचे आईवडील काळजीत बसलेले. तेव्हढ्यात सलिलचा दादा घरी आला. आईवडीलांच्या चिंतेचे कारणही कळले त्याला. लगेच त्याने सलिलच्या दोन तीन मित्रांना फोन केलेतं. तो ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यु साठी गेला होता, तिथूनही त्याने माहिती घेतली. जवळच समुद्रचौपाटी होती. आणि दादाला माहीत होते, सलिलला तिथे बसायला आवडायचे. दादा लगेच गाडी घेऊन चौपाटीवर गेला. एका ठिकाणी विस्तीर्ण अश्या समुद्राकडे हरवलेल्या नजरेने सलिल बघत बसला होता. दादाही हळूच त्याच्या बाजुला बसला. त्याच्या हातावर हात टेकला,"काय राजे सलिल...आज भुक लागली नाही वाटतं...आठ वाजलेत, बघ घड्याळ..." दादाने त्याला अंधारात चमकणारे घड्याळीचे काटे दाखवले. हसून त्याच्याकडे बघितले, आणि म्हणाला..."मला पण इथे बसायला आवडतं, मनातली खळबळ सगळी सगळी ह्या समुद्राच्या 'गाज' मध्ये मिसळून जाते...झाले नां समाधान? मग चल आता घरी...सगळे तुझी वाट बघत आहेत. अरे आईबाबांना गोळ्या घ्याव्या लागतात बाबाऽऽ जेवणाआधी आणि नंतर...चल, तुझ्याशिवाय घास पोटात जाणार नाही त्यांच्या....!"

त्याच्या पाठीला थोपटत, दादा उभा राहीला. हात पकडून त्याने सलिलला उठवले. त्याचा हात थोपटला..."मी आहे ना तुझ्या सोबत...मग चिंता कशाची मर्दा...?"

सलिलने दादाचा हात जोरात दाबला आणि दादाला कडकडून मिठी मारली. "अरे दादा, देखना कल का दिन मेरा होगा...फिर से इंटरव्ह्यु दुँगा...!" आणि दोघेही भाऊ खळखळून हसत. डोळ्यातं आलेले पाणी टिपून नव्या उमेदीने...घराकडे परतले. तेव्हढ्यात काकांचा फोन आला...दादा बोलल्यावर त्याने फोन सलिलकडे दिला,"लेका तंगड तोडून हातात देईन, पुन्हा त्या समुद्राच्या पाण्यात पाय टाकून बसलास तर...आपण मिळून काहीतरी करु..नोकरीतच काय पडलं आहे? बिझनेस करु मिळून आपण..चल ये लवकर घरी...!" पुन्हा एकदा डोळ्यात आलेलं पाणी टिपून अधिक उत्साहाने सलिल, दादा समवेत घरी परतला.

तुम्हाला काय वाटतं हे वाचल्यावर...? मी सांगते नां, जेव्हा सगळीकडून आपण निराश होतो. अर्थात अनोळखी लोकांकडून...तेव्हा, एकत्र कुटुंबातील आपल्या जवळच्या लोकांना आपली काळजी असते. ते आपल्याला जाणतात. ते तुम्हाला ''एकट'' पडू देत नाहीत. कुठल्याही प्रसंगी हातभार लावतात. आर्थिक स्थैर्य निर्माण करायला मदत करतात. आपल्या मनाला जपतात. आणि मला वाटतं आधाराचा हात ''पाठीवर'' असणे, दहा हत्तींच बळ देतं. जगण्याचा आधार बनतं. एकत्र कुटुंबामधील आर्थिक समस्या एकमेकांच्या मदतीने सोडवली जाऊ शकते. आणि आर्थिक अडचणींवर मात केल्या जाते. ह्यापेक्षा मोठी गोष्ट जीवनात दुसरी नाही. मी माझ्या आजोबांना आणि चुलत आजोबांना असे करताना बघितले आहे. त्याच बरोबर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजकाल चलनात असलेले "वृद्धाश्रम" ही संकल्पना मोडीत निघेल. आपल्या वडीलधार्‍यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्यात आणि आपण आपल्या स्वातंत्र्याचा, फक्त स्वतःच्या उन्नतीचा मार्ग निवडणे म्हणजे "मतलबी" वृत्ती जोपासणे. जसे पेराल तसेच उगवत असतं. उद्या तुमच्या मुलांनाही, हीच "लागण" होणार...!

मग....काय मार्गदर्शन करणार आणि कोणता धडा शिकवाल त्यांना...? जसे लहान बालकांचे संगोपन जेष्ठ व्यक्ती आनंदाने करतात. देखादेखी घरातील जेष्ठांचे संगोपन सुद्धा कुटुंबीय आदराने पार पाडतात. इथे मला एक घटना आठवली. जन्मताच पांगळी पैदा झालेली खुशी. दोन पिढ्यानंतर त्यांच्या घरात मुलगी झाली होती. आई, खुशीला बघून दुखी झाली. पण आज्जी आजोबांनी धीर देऊन आनंदाने तिचे संगोपन केले. अजून दोन भाऊ झालेत खुशीला..पण आत्या काका आजी आजोबांनी आईला कधी खुशीचा त्रास होऊ दिला नाही. घरातील कुणी ना कुणी व्यक्ती खुशीची काळजी घेत होते. खुशी पंचवीस वर्षेच जगली. पण खुप लळा लावून गेली. आजही कुटुंबीय तिच्या जन्मदिवसाला विसरत नाहीत. आणि एखाद्या अपंग मुलांच्या आश्रमात दानधर्म करुन तो दिवस साजरा करतात. खुशीमुळे कुटुंबीय भावनीक दृष्ट्या अधिक जवळ आले आणि एकमेकांना जपू लागले. तसेच आईच्या मनावरील दडपण वडीलधार्‍यांमुळे कमी झाले होते...! 

बनतील मुली सुगरण

आत्या, काकीच्या संगतीत राहुन

शिस्तप्रिय आजोबा कर्तव्य, 

जातील शिकवून 

संस्काराचा वसा घेतील, 

आजी कडून

काका शिकवेल बेडर जगणं

जेष्ठांचा आदर करणे शिकतील, 

आईबाबांकडून

मग बघा कसा उच्च दर्जाचा भारतीय सुजाण नागरीक घडवेल...एकत्र कुटुंब पद्धती...!

म्हणून माझा विश्वास आहे. "एकत्र कुटुंब पद्धती" सर्वश्रेष्ठ पद्धत आहे. एकत्र कुटुंबाला पर्याय असूच शकत नाहीये.

आपल्याला काय वाटतं...? नक्की कमेंट करा.

संगीता अनंत थोरात

28/08/22

टीम:- अमरावती