एकच क्षण अधःपतनाचा.. अंतिम भाग

कथा एका चुकीची


एकच क्षण अधःपाताचा.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की अवनी आकाशच्या मुलाची आई होते. आता बघू पुढे काय होते ते.


" अवनी.. एकदा भेटायला काय हरकत आहे?" आकाश विचारत होता.

" आकाश, सुजयला समजले तर? नकोच." अवनी विनवत होती.

" आधी समजले का? नाही ना? की तेव्हा गरज होती?" कुत्सितपणे आकाश बोलला.

" असे नाहीये रे.."

" हो ना.. मग मी म्हणतो तसे वाग." आकाशने अवनीला सुनावले.

काही दिवसांनी अवनीला परत गरोदरपणाची लक्षणे जाणवू लागली. तिला आधी खूप टेन्शन आले पण तिला ही गोष्ट सुजयपासून लपवता आलीच नसती. शेवटी तिने त्याच्याशी बोलायचे ठरवले.

" सुजय, आदित्यला बहिण किंवा भाऊ येईल अशी लक्षणे दिसत आहेत." दोन वर्षांच्या आदित्यला खेळवत असलेला सुजय एकदम गप्प झाला.

" काय रे? तुला बातमी आवडली नाही का?" अवनी थोडी धास्तावली होती.

" हे मूल माझे नाही." सुजय शांतपणे बोलला.

" काय बोलतो आहेस तू?" अवनी खूपच घाबरली.

" खरं तेच.. आपण डॉक्टरकडे जाऊन आलो तेव्हाच मी दुसर्‍या डॉक्टरचे मत घेतले होते. त्याच्या मतानुसार मी कधीच बाप होऊ शकणार नव्हतो. म्हणून काळजावर दगड ठेवून मी आदित्यच्या जन्माच्या सगळ्या सोहळ्यात सामील झालो होतो. तुझीही मातृत्वाची इच्छा मला समजत होतीच. माझ्या कमतरतेची शिक्षा तुला कशाला म्हणून मी काही बोललो नाही. पण म्हणून तू बाहेर काहिही करून ते पाप माझ्या माथी मारशील तर मी कसं खपवून घेईन?" सुजय बोलत होता. तसतशी अवनीच्या पायाखालची जमीन सरकत होती.

" पण तू.. तू.." तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. " मग या बाळाचे मी काय करू?"

" तो तुझा प्रश्न आहे. आदित्यला मी माझे नाव दिले म्हणजे प्रत्येकाला देईल असे वाटले तरी कसे तुला? खरंतर हे ऐकून तुझं तोंडही बघायची माझी इच्छा नाही. बाळ सोडून अशी कोणती गोष्ट आहे जी मी तुला दिली नाही? परिस्थिती नसताना सुद्धा तुझ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आणि तू? "

" सुजय, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. यापुढे हे असे होणार नाही. आपण फक्त या बाळाला जन्म देऊ. प्लीज." अवनी विनवत होती.

" मला ते शक्य होणार नाही."

" अरे पण.."

" अवनी तुला इथे रहायचे असेल तर तुला गर्भपात करावा लागेल आणि त्या आकाशशी सगळे संबंध तोडावे लागतील."

" तुला कसे समजले?"

" आपण आपल्या मुलांना सोन्याचे दागिने करताना विचार करतो.. त्याने तर.." सुजयने वाक्य अर्धवट सोडले.

" सुजय, मला तू, आदित्य आणि हे बाळ हवे आहात. सगळं विसरून आपण नवीन आयुष्य सुरू करू ना?" अवनी विनवत होती.

" हे बाळ मला नको.." सुजयने तेच वाक्य परत उच्चारले.

" मी माझ्या बाळाला नाही मारू शकत."

" मग तू या घरातून जाऊ शकतेस."

" आदित्यला घेऊन अशा परिस्थितीत मी कुठे जाऊ?" अवनी रडवेली झाली.

" आदित्यला घेऊन? नाही.. तो माझा मुलगा आहे. तुला जायचे तर एकटी घराबाहेर हो."

" मग तू घरी काय सांगशील? "

" ते माझे मी बघीन. तुला आणि तुझ्या बाळाला या घरात जागा नाही." सुजयचे निर्वाणीचे शब्द ऐकून अवनी घराबाहेर पडली. त्याच भरात ती आकाशकडे गेली.

" आकाश, मी गरोदर आहे."

" अरे व्वा. अभिनंदन.."

" आकाश, सुजयला सगळं समजलं आहे. त्याने मला घराबाहेर काढलं आहे." अवनी रडत होती.

" अवनी, काही दिवस तू इथे राहू शकतेस." आकाश बोलला.

" आणि त्यानंतर? बोल आकाश.. या बाळाला घेऊन कुठे जाऊ? ज्या बाळासाठी हे सगळे केले तो माझा आदित्य मला दुरावला. आता मी काय करू? तू कर माझ्याशी लग्न."

" मी तुला आधीच सांगितलं होतं, हे शक्य नाही.." आकाश तिला झटकत बोलला.

" डरपोक आहेस तू.. तुला फक्त हतबल स्त्रियांचा फायदा घेता येतो.. बस.. तू काय मला आधार देणार?" अवनी उद्वेगाने तिथून निघाली. तशीच रडत ती समुद्र किनार्‍यावर आली. " काय ठरवले होते आणि काय झाले? वाटले होते एका बाळाची आई होऊ आणि सुजयसोबत छान आयुष्य घालवू. पण आकाशसोबतचा एक अधःपाताचा क्षण आणि सगळे आयुष्य विस्कटून गेले. आता हा समुद्रच शेवटी आपली सगळ्यातून सुटका करेल." असा विचार करून ती उडी मारणार तोच तिला सुजयने धरले.

" काय हा वेडेपणा?"

" नको अडवूस मला.. मला मरू दे."

" तू मरशील पण आदित्यचे आणि या बाळाचे काय?"

" तुला कशाला काळजी? तू तर घराबाहेर काढलेस ना मला?"

" ते तुला तो आकाश कसा आहे हे समजावे म्हणून. तू वारंवार चुका करत होतीस.. ज्या माणसासाठी तू हे करत होतीस त्याचे खरे रूप तुला समजावे म्हणून. "

" सुजय.."

" यात माझे मोठेपण वगैरे काही नाही. आपला संसार उद्ध्वस्त झाला तर आपल्या दोघांच्या कुटुंबाला जो त्रास होईल याचा विचार करून उचललेले पाऊल आहे हे. "

" सुजय, मला खरंच माफ कर रे." अवनी सुजयच्या गळ्यात पडून रडू लागली. त्याच्या खांद्यावर असलेल्या आदित्यने तिला आपले अस्तित्व दाखवले. त्याला तिने कडेवर घेतले.

" सुजय.."

" चुप्प.. आता काही बोलायचे नाही. आता फक्त आपण आणि आपली मुले बस्स. यापुढे या विश्वासाला आणि प्रेमाला तडा जाऊ देऊ नकोस म्हणजे झाले." सुजय , अवनी आणि आदित्यला जवळ घेत बोलला.



सदर कथा ही सत्य घटनेवर आधारीत आहे. कथेतल्या अवनीला सुजयने घरी नेले पण खऱ्या आयुष्यातली अवनी अजूनही मुलीला घेऊन एकटे जीवन जगते आहे. ना तिच्या माहेरच्यांचा आधार ना सासरच्यांचा. आयुष्यात एक क्षण येतो जो आपल्याला अधःपाताकडे नेऊ शकतो. निवड आपल्याला करायची असते.

कथा कशी वाटली सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all