एकच क्षण अधःपतनाचा.. भाग २

कथा एका चुकीची


एकच क्षण अधःपाताचा.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की अवनी आणि सुजय हे जोडपे मूल होत नाही म्हणून डॉक्टरकडे गेले आहेत. आता बघू पुढे काय होते ते.


" डॉक्टर, काय आहेत आमचे रिपोर्ट? मी होऊ शकते ना आई?" अधीरपणे अवनीने विचारले. डॉक्टरांचा चेहरा थोडा गंभीर होता. ते बघून सुजयने विचारले,

" सगळे व्यवस्थित आहे का?"

" थोडा प्रॉब्लेम आहे.." डॉक्टर म्हणाले.

" काहिही काळजी करू नकोस.. मी आहे तुझ्यासोबत. " अवनीचा हात थोपटत सुजय बोलला.

" प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये नाही. तुमच्यामध्ये आहे. तुमचा स्पर्म काउंट कमी आहे. त्यामुळेच.." बोलता बोलता डॉक्टर थांबले. हे ऐकून अवनीने सुस्कारा सोडला. पण सुजयचे हात थरथरू लागले.

" यावर काही उपाय? म्हणजे औषधे वगैरे काही?" त्याने थरथरत्या आवाजात विचारले.

" औषधांनी काही फरक पडेल असे मला तरी वाटत नाही. तुमच्या केसमध्ये आयव्हीएफ हाच एक उपाय मला सुचतो आहे." डॉक्टर सांगत होते.

" साधारण किती खर्च येईल?" अवनीने विचारले.

" ते साधारणतः किती सायकल होतील यावर अवलंबून आहे.. पण साधारणतः चार ते पाच लाख खर्च यायला हरकत नाही."

" आम्ही विचार करून सांगतो.." पडलेल्या चेहर्‍याने अवनी आणि सुजय तिथून निघाले. दोघांच्याही डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते. सुजयच्या घरी गावाला त्याच्या भावाचे शिक्षण सुरू होते. त्याच्या आईवडिलांनी सुजयच्या शिक्षणासाठी कर्ज काढले होते. ते आत्ताशी फिटत आले होते. त्यामुळे भावाच्या शिक्षणाची नैतिक जबाबदारी त्याच्यावर होती. घर घेण्यासाठी होती नव्हती ती बचत वापरली होती. घराचा हप्ता सुरू होता. त्यात हा खर्च परवडणार होता का?

अवनी विचार करत होती.. ती ही कामाला जात होती. पण दोघेही मध्यमवर्गीय घरातून असल्यामुळे पगारातील थोडी रक्कम ती आईवडिलांना पाठवत होती. तिच्या घरी सुद्धा फार काही चांगली परिस्थिती होती अशातला भाग नव्हता. वडिल एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यात तोंडावर आलेले निधीचे लग्न. नाही म्हटलं तरी तिथेही अवनीला खर्च करायचा होता. अशावेळेस पटकन हा नवीन खर्च पेलेल?

दोघे घरी आले. रोज दोघांना नजरेआड न करणारे ते आज एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. सुजयला खूपच अपराधी वाटत होते. कितीतरी वेळाने हिंमत करून तो स्वयंपाकघरात गेला. अवनी विझलेल्या डोळ्यांनी समोरच्या बाळाच्या चित्राकडे बघत होती. खूप उत्साहाने बाळाचे फोटो आणून तिने घरभर लावले होते. सुजयने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला.

" मला थोडा वेळ दे.. आपण करू काहीतरी." काहीच न बोलता अवनी फक्त विषण्ण हसली. ते हसू बघून ती भरभरून भांडली असती तर बरे झाले असते असे सुजयला वाटले.


अवनी आणि सुजय करू शकतील जुळवाजुळव पैशांची? होऊ शकतील ते आईबाबा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all