एकच क्षण अधःपतनाचा..

कथा एका चुकीची


एकच क्षण अधःपाताचा..



" झाले का तुझे आवरून?" सुजयने अवनीला विचारले.

" सुजय, मला खूप भिती वाटते आहे." अवनी ड्रेस नीट करत म्हणाली.

" घाबरतेस कशाला? ही फक्त एक साधी टेस्ट आहे." सुजय समजूत काढत म्हणाला.

" पण ती टेस्ट निगेटिव्ह आली तर? " अवनी शहारली.

" काय करू शकतो आपण? शेवटी तुला मी आणि मला तू.. चल निघूया."


धडधडत्या ह्रदयाने अवनी सुजयसोबत डॉक्टरांकडे पोहोचली. लग्नाला पाच वर्ष झाली तरी संसारात नवा पाहुणा आला नव्हता. दोघेही आतुरतेने त्याची वाट बघत होते. दोघांच्याही धरून इतके दिवस आडून आडून विचारणा होतच होती. पण नुकत्याच झालेल्या लग्नाच्या वाढदिवशी दोघांच्याही घरातून तंबी मिळाली होती.


" असे कसे रे तुम्ही दोघे?" सुजयच्या आईने , शोभाताईंनी बोलायला सुरुवात केली.

" काही चुकले का आमचे?" अवनीने घाबरून विचारले.

" चुकले म्हणजे काय? तुम्हा शिकलेल्यापेक्षा मी बरी.."

" आई, काय झाले?" सुजयने मध्ये पडत विचारले.

" सुजय, लग्नाला पाच वर्ष झाली तुमच्या. अवनीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग केलेले नाही. तरिही जर काही नाही तर डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला काय हरकत आहे?" अवनीची आई , लताताई म्हणाल्या. अचानक हा डॉक्टरचा विषय निघाल्याने अवनी आणि सुजय दोघेही थोडे बावरले. दोघांचाही आपापसात हा विषय झाला होता पण अचानक सगळ्यांसमोर निघेल असे वाटले नव्हते. बहुतेक शोभाताई आणि लताताई दोघींनी आधीच आपापसात हे बोलायचे असे ठरवले होते. त्याचसाठी दोघीही खास गावावरून आल्या होत्या.

" हो आई, जायचे आहेच." सुजय कसाबसा बोलला.

" जायचे आहे नाही.. जाऊन याच. अवनी लवकरच निधीच्याही लग्नाचे बघायचे आहे. त्याच्या आत सगळे झालेले बरे." लताताई बोलल्या.

" हो आई.. लवकरात लवकर आम्ही येतो जाऊन डॉक्टरकडे." अवनी म्हणाली.

" बघा हं.. नाहीतर मला इथे राहून कान पकडून तुम्हाला घेऊन जावे लागेल." शोभाताई हसत म्हणाल्या.

" नाही ग आई.. या आठवड्यात खूप काम आहे. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेतो आणि नक्की जातो." सुजयने आईची समजूत काढली. दोघींची समजूत पटून, या दोघांकडून वचन घेऊन मगच त्या परत गावी गेल्या होत्या. ठरवल्याप्रमाणे अवनी आणि सुजय दोघे आज डॉक्टरकडे आले होते. दोघांच्याही बेसिक चाचण्या झाल्या होत्या. त्याचाच आज रिपोर्ट येणार होता. अवनी म्हणूनच धास्तावली होती.


काय असेल अवनी आणि सुजयचा रिपोर्ट? होऊ शकतील का दोघेही आईबाबा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all