स. स तु. ग.एका टपालाची गंमत गोष्ट अंतिम भाग

स. स. तु. ग.पैकी कोण असेल बशीत चहा पिणारा?

स. स. तु. ग.एका टपालाची गंमत गोष्ट (अंतिम भाग)


जी अवस्था पारूची होती तीच बाकीच्या मैत्रिणींची झाली. त्यात नवरे सजून धजून बाजाराला जाताना पाहून राग उफाळून येत होता.


गणपा आवरत असताना सुमन रागाने धुमसत होती.


शेवटी न राहवून म्हणालीच,"वस्तरा मारून घासला तरी काळा दगड ढवळा होत नसतो."


गणपा हसला,"कोणाला तरी उगा आपल चिडायला व्हत."


पायात चपला सरकवून गणपा बाहेर पडला.


शिरपा फटका बांधत असताना चार वेळा सोड बांध झाली.

ते पाहून शोभा म्हणाली,"बया आता काय नवरदेव व्हणार हाय का?"

शिरपा हसत म्हणाला,"आजूनबी पोरी आपल्याकड बगत असत्यात."

शोभा फिस्स हसून आत गेली.


तुका आवरून निघताना डोळ्यांवर हात फिरवताना पाहून रखमा म्हणाली,"आता काजळ घालायचं बाकी हाय. काय ते कवतिक डोळ्यांच. "


तुकाराम बाहेर पडला. सगळे फाट्यावर जमले. बाजाराच्या दिवशी जीप असत. त्यातील एक जीप पकडुन चारही दोस्त बाजाराला गेले.



इकडे पारू,शोभा,रखमा,सुमन आणि संगीता पाचही जणी आल्या. त्यांनी नीट नियोजन केले होते..सगळ्याजणी बाजाराला निघाल्या. पारूने सोबत ती चिठ्ठी घेतली होती.


दिवाळीच्या आधीचा बाजार असल्याने कपडे,किराणा,पणत्या,रांगोळ्या सगळीकडे नुसता उत्साह होता. तरीही ह्या पाचहीजणी बाजारात भिरभिरत ती प्रीत पाखरू आहे कोण? ह्याचा शोध घेत फिरत होत्या.


आज सोक्षमोक्ष लावूनच जायचा त्यांचा निर्धार होता. तीनचार तास फिरून पायाचे तुकडे पडायची वेळ झाली.


संगीता म्हणाली,"बायांनो जरा बसू.तिकडे मोकळी जागा दिसते."


सगळ्याजणी तिथे बसल्या. तेवढ्यात दोन मुली तिथे आल्या. त्यातली एक म्हणाली,"आग न्हाय यायचा तो. पोर आशीच आसतात."


दुसरी म्हणाली,"न्हाय,यील तो म्या टपाल लिवल हाय त्याला."


त्यावर पहिली पोरगी ओरडली,"आग येडे आस कस केलं. कुणाला घावल म्हंजी."


त्यावर पहिली हसत म्हणाली,"त्यावर नाव नाय लिवल,त्याच्या दोस्ताकड दिलं."


ते ऐकल्यावर पारूचे डोके सटकले. तिने पिशवीतून ते पत्र बाहेर काढले आणि त्या पोरीसमोर नाचवत म्हणाली,"तू हाय व्हय ते प्रीत पाखरू. आग टवळे मोठ्या बाप्या बरोबर चाळ करती काय?"


तशी ती पोरगी म्हणाली,"ओ बाई म्या तुमासनी ओळखत न्हाय कोण तूमी?"


तेवढ्यात शोभा पदर खोचून पुढे आली,"भवाने,बऱ्या बोलान सांग कुणाचा नवरा तुला भेटत व्हता?"


ते ऐकल्यावर पहिली पोरगी ओरडली,"पर तो तर एवढा मोठा न्हाय?"


सगळा आरडाओरडा सुरू असताना पारुला सर्जा दिसला आणि तिने जोरात हाक मारली,"आवो हिकड या."


सर्जा हातातल्या पिशव्या पकडत तिथे गेला. पारू म्हणाली,"ही सटवी कोण हाय?"

सर्जा म्हणाला,"मला काय ठाऊक?"

ती पोरगी पण म्हणाली,"ह्यांना नाय ओळखत म्या."


तेवढ्यात बाकीचे तिघे येऊन धडकले.


शोभाने चौघांना समोर उभे केले,"ये भवाने नीट सांग. ह्यातला कोण हाय तुझ्यासंग बशीत चहा पिलेला."


ती पोरगी चिडून म्हणाली,"ओ तुमचे नवरे कुठ शेण खातात मला काय माहीत. मला जाऊ द्या."


ती असे म्हणाल्यावर रखमाने तिचा हात पिरगळला.

ती पोरगी मोठ्याने ओरडू लागली,"वाचवा,वाचवा."


तेवढ्यात सर्जाचा लहान भाऊ रमेश आणि त्याचा मित्र बबन पळत येताना दिसले.


रमेश ओरडला,"ओ रखमा वहिनी सोडा तिला. हात मोडल तिचा."

पारू चिडली,"भावजी तुमाला तिच्या हाताच पडल आन आमचा संसार मोडल ते चालल व्हय."


रमेश संगीताकडे वळून म्हणाला,"सरपंच अहो काय चाललय हे?"


संगीताने ती चिठ्ठी घेतली आणि रमेशकडे दिली.


रमेश खो खो हसत सुटला शांत झाल्यावर तो म्हणाला,"पारू वहिनी कुठे सापडली चिठ्ठी?"


पारू म्हणाली,"ह्यांच्या टपालाच्या पिशवीत."


रमेश म्हणाला,"चिंगीने सांगितले तसा धावत पळत आलो."


संगीता म्हणाली,"रमेश नक्की काय प्रकार आहे? कोणाची आहे ती चिठ्ठी?"

बबन पुढे होऊन म्हणाला,"माझी हाय. रम्या रोज इकड कालेजात येतो तवा हिन त्याचाकड दिली."


रमेश पुढे म्हणाला,"मी घरात चिठ्ठी ठेऊन गेलो आणि चिंगीने ती उचलून दादाच्या पिशवीत ठेवली."

तशी संगीता म्हणाली,"अरे पण त्यात प्रिय स.स. तु. ग.लिहिले आहे. त्याने सगळा घोळ झाला. काय अर्थ आहे त्याचा?"

तशी ती पोरगी लाजत म्हणाली,"सख्या सजणा तुझीच गंगू."


हे ऐकल्यावर सगळ्याजणी गप्प झाल्या. रमेशने सर्वांची समजूत घातली आणि सगळ्या जोड्याना बाजारात सोडून दिले. एकाच बशीत चहा प्यायला.

🎭 Series Post

View all