एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग ६

Yash Misbehaves With Anagha
एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग ६

मागील भागाचा सारांश: अनघाने यशवर मनापासून प्रेम केलं होतं, पण यशने तिला फसवलं होतं. यशचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होते, हे जेव्हा अनघाला समजले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. अनघाला खूप मोठा धक्का बसला होता. अनघाच्या अनुपस्थितीत यशने त्याची गर्लफ्रेंड रुपाली हिला अनघाच्या रुमवर आणून सोडले. पुजाला काही कल्पना नसल्याने तिने तिला आपल्या रुमवर रहाण्यास अनुमती दिली. अनघाने पुजाला रुपालीबद्दल खरं सांगितल्यावर ती तिला रुममधून हकलायला निघाली होती.

आता बघूया पुढे….

अनघा व पुजा आपलं बोलणं संपवून गॅलरीतून फ्लॅटमध्ये आल्या, तोपर्यंत यश निघून गेला होता.
"यश गेला का?" पुजाने रुपालीला विचारले

"हो,त्याला काहीतरी काम होतं." रुपालीने उत्तर दिले.

तेवढ्यात रुपालीला कोणाचा तरी फोन आला. रुपाली फोनवर बोलत असताना अनघाचे तिच्यावर बारीक लक्ष होते, कारण ती बोलताना असं बोलली की, "तो मला त्याच्या फ्लॅटसमोर असलेल्या फ्लॅटमध्ये ठेऊन गेला आहे. मी त्याला खूप समजावून सांगितलं, पण तो काही माझं ऐकत नाही. तु पुण्यात येईपर्यंत मला त्याला झेलावंच लागेल. तु काही काळजी करु नकोस. मी फक्त तुझीच आहे."

रुपाली जवळपास पंधरा मिनिटे फोनवर बोलत होती. रुपालीचं फोनवर बोलून झाल्यावर अनघा तिला म्हणाली,

"तू आत्ता कोणासोबत फोनवर बोलत होती?"

"माझ्या मित्राचा फोन होता" रुपालीने अनघा कडे न बघताच उत्तर दिले.

यावर अनघा म्हणाली,
"मित्राचा की बॉयफ्रेंडचा?"

रुपाली रागाने अनघाकडे बघत म्हणाली,
"अनघा मी आल्यापासून बघतेय की, मी इथे आलेलं तुला फारसं पटलेलं नाहीये. आपल्या दोघींची अजून फारशी ओळख पण झाली नाहीये. मग मी फोनवर कोणासोबत बोलत होते? ही माहिती तुला का देऊ? तुझा या सगळ्याशी काय संबंध?"

अनघा म्हणाली,
"या सगळ्याशी माझा संबंध आहे, म्हणूनच मी तुला विचारत आहे. बरं तुला ते सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण मला अगदी खरं खरं सांग की, तुझं यशवर प्रेम आहे का?"

रुपाली म्हणाली,
"यशवर माझं प्रेम आहे की नाही, हे मला विचारण्याचा तुला काय हक्क आहे?"

"गेल्या काही महिन्यांपासून यश माझ्यावर प्रेम करण्याचं खोटं नाटक करत आहे. तू त्याची गर्लफ्रेंड असल्याचं मला काल कळलं. मी मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम केलं. तुझं जर त्याच्यावर प्रेम नसेल तर तसं त्याला सांगून टाक, म्हणजे मला माझा यश परत मिळेल" अनघाने आवंढा गिळत सांगितले.

रुपाली म्हणाली,
"माझं यशवर कधीच प्रेम नव्हतं आणि नाहीये, पण तो सतत माझ्या मागेपुढे करत असतो. माझा जो बॉयफ्रेंड आहे, तो काही महिन्यांसाठी पुण्यात नाहीये, तोपर्यंत माझ्या मागेपुढे करणारा कोणीतरी हवा आहे."

अनघा चिडून म्हणाली,
"अग तू किती निर्लज्ज आहेस. यशसोबत टाईमपास का करत आहेस? तुझ्या मागेपुढे करणारा कोणीतरी तुला पाहिजे, म्हणून तु यशसोबत प्रेमाचं नाटक करत आहेस. मी हे सगळं जाऊन यशला सांगते, म्हणजे तो तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून निसटेल."

रुपाली मिश्किल हसून म्हणाली,
"यश तुझ्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तो माझ्या प्रेमात आंधळा झाला आहे."

अनघा चिडून म्हणाली,
"उद्या सकाळी मी उठण्याच्या आत आमच्या घरातून निघून जायचं. जर तू मला उद्या सकाळी दिसलीस, तर मी तुला खूप मारेल. तू मला अजून पुरतं ओळखलेलं नाहीये. माझ्यात माणुसकी शिल्लक आहे, म्हणून मी आज रात्रीपुरतं तुला इथं राहू देत आहे.

एवढं बोलून अनघा झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाली अनघा उठण्याच्या आधीच त्यांच्या घरातून निघून गेलेली होती. रुपाली कुठे गेली? हे पुजालाही ठाऊक नव्हते. रुपालीच्या बाबतीतील सत्य अनघाला यशला सांगायचे होते, म्हणून अनघाने यशला फोन लावला, तर यशने तिचा फोन कट केला. अनघाने बऱ्याच वेळेस त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण यशने तिचा फोन उचलला नाही. अनघाने पुजाच्या फोनवरुन यशला फोन लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा फोन लागला नाही. मग अनघाच्या लक्षात आले की, याने आपल्या दोघींचा नंबर ब्लॉक केला असेल.

पुढील काही दिवस यश किंवा बंड्या दोघेही नजरेस पडले नाही. अनघाने आपलं कॉलेज, नोकरी, क्लास हे रुटीन सुरु ठेवलं होतं. यशला विसरणे हे अनघासाठी खूप कठीण झाले होते. अनघाला एकदा शेवटचं का होईना? यशला भेटायचे होते. अनघाच्या डोक्यात सतत यशचा विचार चालू होता. 

अनघाचे वर्तन खूपच वेगळे झाले होते. अनघा सतत तिच्या आजूबाजूच्या माणसांवर चिडचिड करायला लागली होती. अनघाचे कंपनीतील सहकाऱ्यांसोबत वादविवाद व्हायला लागले होते. एके दिवशी अनघाने कंपनीत असताना हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनघाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. अनघाची मनस्थिती बघता तिला नोकरीवर ठेवून घेणे, तिच्या कंपनी मालकाला परवडणारे नव्हते.

काही दिवसांनी अनघाला घरी परतताना रस्त्यावर बंड्या दिसला. अनघा घाईघाईने त्याच्या जवळ जाऊन म्हणाली,

"बंड्या अरे इतक्या दिवस तू कुठे होतास?"

"अहो वहिनी मी गावाला गेलो होतो" बंड्याने दात विचकून उत्तर दिले.

अनघा चिडून म्हणाली,
"वहिनी म्हणालास तर तुझे पुढे आलेले सुंदर दात पाडून तुझ्या हातात देईल."

बंड्या तोंडाला हात लावत म्हणाला,
"नको नको. पण तुम्हाला एवढं चिडायला झालं तरी काय?"

अनघाने बंड्याला घडलेल्या घटनेबद्दल सर्व काही सविस्तरपणे सांगितले. अनघाचं बोलणं ऐकल्यावर बंड्या म्हणाला,
"अनघा ताई एक खरं सांगू. यशला विसरुन जा, तो एक नंबरचा मूर्ख मुलगा आहे. यश त्या रुपालीच्या प्रेमात ठार वेडा झालेला आहे. यश रुपालीला विसरणं अशक्य आहे. मला वाटलं होतं की, तू त्याच्या आयुष्यात आल्यावर तो रुपालीला विसरुन जाईल. यशचा विचार करु नकोस, त्याला अक्कलचं नाहीये. यशला तुझ्या खऱ्या प्रेमाची किंमत नाहीये. यशचं नशीब चांगलं म्हणून तुझ्यासारखं पाखरु त्याच्या आयुष्यात आलं, पण तो बदकाच्या मागे जायचं सोडून कावळ्याच्या मागे पळतो आहे. नाहीतर आम्ही, आमच्या आयुष्यात कोणीच पाखरु येत नाही. इतके दिवस गावाला फुकट राहिल्यासारखं झालं आहे."

अनघा म्हणाली,
"आमच्या दोघांचा विषय चालू असताना हा पाखरांचा काय संबंध?"

बंड्या म्हणाला,
"अग ताई, मी माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी म्हणून आठ दिवसांची सुट्टी घेऊन गावाला गेलो होतो, त्या लग्नात मला एक चुलत मामाची पोरगी दिसली, दिसायला माझ्यासारखीच सुंदर होती. पहिल्या नजरेतच आपण तिच्या प्रेमात पडलो. माझं रुप, नोकरी बघून मला ती लग्नासाठी हो म्हणलं असं वाटलं होतं. मी तिला प्रपोज केल्यावर ती मला हो सुद्धा म्हणाली. एक चांगलं पाखरु पटल्यावर मी एकदम स्वर्गात पोहोचलो होतो. तिच्याकडे मोबाईल नव्हता, म्हणून मी तिला मोबाईल घेऊन दिला, जेवढे पैसे मागितले, तेवढे पैसे देत गेलो. भावाचं लग्न उरकल्यावर मी माझ्या आईला तिच्याबद्दल सांगितलं, तेव्हा आम्ही रीतसर तिच्या घरी मागणी मागायला गेलो. माझ्यासारखा देखणा जावई मिळणार या आशेने मामा लग्नासाठी तयार झाला. लागलीच साखरपुडा उरकून घेतला. मी इकडं परत येणार होतोच, तेव्हा एक दिवस मला आमच्या पाखराने भेटायला बोलावून घेतले. ब्युटी पार्लरच्या कोर्ससाठी म्हणून तिने माझ्याकडे पाच हजार रुपये मागितले. मी तिची तीही इच्छा पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी इकडे यायची तयारी करत असतानाच तिच्या घरुन निरोप आला की, ती तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

मला तिचा एवढा राग आला होता, म्हणून मी तिला फोन लावला तर ती म्हणाली की, "तू तुझं तोंड एकदा आरशात बघ. माझ्यासारखी मुलगी तुला का म्हणून हो म्हणेल? तुझे ते दोन फारोळे दात बघितले तर, त्याची किळस येते. मला पैश्यांची गरज होती, म्हणून मी तुला लग्नाला होकार दिला. तू माझ्यावर जरा जास्तच फिदा झाला होता, म्हणून मी तुझा वापर करुन घेतला."

अनघा ताई त्या दिवसानंतर मला जेवण गोड लागले नाही. गावात कोणाला तोंड दाखवण्यासारखो राहिलो नव्हतो. काही दिवस घरातच बसून राहिलो आणि शेवटी आज इकडं निघून आलो."

अनघा बंड्याचं सांत्वन करण्यासाठी काही बोलणार इतक्यात यश तिथे येऊन म्हणाला,
"अनघा तु बंड्याला माझ्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहेस का?"

अनघा म्हणाली,
"एकतर मी त्याला तुझ्या विरोधात भडकवत नाहीये. तु माझा फोन नंबर ब्लॉक लिस्टला का टाकलास?"

यश म्हणाला,
"तू माझ्या रुपालीला घराबाहेर हाकलून लावलंस. माझा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. माझ्या आसपास सुद्धा फिरकायची तुझी लायकी नाहीये. माझ्या नजरेसमोर पुन्हा कधी येऊ नकोस."

अनघाला यशच्या बोलण्याचा खूप राग आला होता, तिचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. अनघा मोठ्या आवाजात म्हणाली,
"यश तु मला ओळखलं नाहीयेस. तू माझी लायकी काढतोस ना, आता तुला मी माझी लायकी दाखवतेच. तू माझ्या पाया पडायला आला नाहीस, तर नावाची अनघा नाही."

अनघा एवढं बोलून रागात तेथून निघून गेली. बंड्या यशला म्हणाला,
"अरे दादा, अनघा ताई माझं सांत्वन करणार होती आणि तेवढ्यात तू येऊन धडकलास. मला तेवढंच बरं वाटलं असतं."

यश म्हणाला,
"बंड्या वेळ काय? आणि तू बोलतो काय?"

अनघा काय करेल? हे बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all