एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग ९

Anagha Decided To Marry With Yash

एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग ९


मागील भागाचा सारांश: केसच्या निमित्ताने यश व अनघाची भेट होऊ लागली होती. अनघा यशपासून चार हात अंतर राखून होती. अनघाच्या मामाकडून अनघाची सत्य परिस्थिती यशला समजल्यावर त्याच्या मनात अनघाबद्दल प्रेम निर्माण झाले होते. अनघा मात्र यशकडे एक मित्र म्हणून बघत होती, कारण ती पुन्हा यशवर विश्वास ठेवायला पटकन तयार नव्हती. एके दिवशी यश अनघाच्या मानसन्मानासाठी लढला होता, हे बघून अनघा त्याच्या प्रेमात पडली.


आता बघूया पुढे....

अनघाला अकॅडमी सुरु करायची होती, पण त्यासाठी भरपूर पैश्यांची आवश्यकता होती, म्हणून अनघाने एका कंपनीत नोकरी जॉईन केली. यश मुंबईला नोकरी करत होता तर अनघा पुण्यात नोकरी करत होती. यश व अनघाचे long distance रिलेशनशिप चालू होते.अनघा व यशमधील प्रेम आता खऱ्या अर्थाने फुलू लागले होते.


यश पंधरा दिवसांतून एकदा अनघाला भेटण्यासाठी पुण्याला येत असे. अनघा यशची वाट बघत बसायची. यश व अनघा एकमेकांसोबत संसाराची स्वप्नं बघू लागली होती. अनघा जेव्हा आपल्या भविष्याचा विचार करायची,त्यात ती यशला आपल्या सोबत बघू लागली. अनघाचा यशवर पुरेपूर विश्वास बसला होता. 


यशला पगार कमी असल्याने तो मुलांसोबत एका फ्लॅटवर राहत होता. अनघासोबत लग्न करायचे म्हटल्यावर त्याला आधी एक घर घ्यावे लागणार होते. यश त्या दिशेने वाटचाल करत होता. यशचे सहकारी त्याला वेळोवेळी मदत करत होते.


अनघाच्या मावशीने अनघाची पत्रिका एका ब्राम्हणाला दाखवली, तर त्या ब्राम्हणाने सांगितले की, अनघाच्या नशिबात प्रेमविवाह लिहिलेला आहे. अनघाची मावशी हे ऐकून अनघाच्या बाबतीत जरा जास्तच जागरुक झाली होती. यशबद्दल तोपर्यंत अनघाच्या मावशीला काहीच कल्पना नव्हती. 


अनघा पुजासोबत राहत असल्याने तिच्या मावशीला अनघाचं नेमकं काय चालू आहे? याची कल्पना नव्हती. एके दिवशी मावशी अनघाला न सांगता तिच्या फ्लॅटवर गेली. मावशीला असं अचानक आलेलं बघून अनघा म्हणाली,


"अरे मावशी, तू आज इकडे कशी काय आलीस?"


मावशी म्हणाली,

"दोन तीन दिवसांपासून तुझी खूप आठवण येत होती, म्हणून म्हटलं चला अनघाला भेटून तरी येऊयात. मी इथे आलेलं तुला आवडलेलं दिसत नाहीये."


अनघा म्हणाली,

"अग मावशी असं काही नाहीये. तू कधी अशी न सांगता येत नाहीस ना, म्हणून विचारलं."


मावशी म्हणाली,

"दोन दिवसांपूर्वी तुझी आई माझ्या स्वप्नात आली होती. ती मला म्हणाली की, "तुम्ही कोणीच माझ्या लेकीकडे लक्ष देत नाहीयेत, ती बिचारी एकटी तिकडे रुमवर राहते. तुमच्यापैकी कोणीच माझ्या पोरीची चौकशी करत नाहीत. तिच्या भविष्याची सुद्धा तुम्हाला चिंता नाहीये. मला त्या दिवसापासून खूप वाईट वाटत होतं. अनघा तू माझ्यासोबत घरी चल. पुढील काही दिवस माझ्याकडेच रहा. एकदा लग्न होऊन गेली की मग तू माझ्याकडे कशी येऊन राहशील?"


अनघा म्हणाली,

"अग मावशी आता हा लग्नाचा विषय कुठून आला? आणि मावशी मी इथेच ठीक आहे. इथून माझी कंपनी जवळ पडते, तुझ्या घरुन येजा करणं लांब पडेल."


यावर मावशी म्हणाली,

"माझ्यासाठी नाहीतर तुझ्या आईसाठी चल, तिच्या आत्म्याला शांती लाभेल."


मावशीने आईचं नाव घेतल्यावर अनघाला मावशीसोबत रहायला जावे लागले. मावशीने अनघाला इमोशनल ब्लॅकमेल करुन तिला आपल्यासोबत घरी घेऊन जाण्यात ती यशस्वी झाली. मावशीला अनघावर लक्ष ठेवता येणार होते.


अनघाला मावशी घरी असताना यशसोबत फोनवर बोलणं कठीण होऊन बसलं होतं. कंपनीत येजा करतानाच्या वेळेत अनघा यशसोबत फोनवर बोलायची. यश भेटायला आल्यावर अनघाला काहीतरी खोटं कारण सांगून घराबाहेर पडावे लागायचे.


एके दिवशी अनघाच्या मावशीने अनघाच्या मामाला आपल्या घरी बोलावून घेतले. मावशी व मामाचे बोलणे अनघाच्या कानावर पडले.

"अनघाच्या लग्नाचं बघावं लागेल, तिचं नक्कीच कोणाबरोबर तरी लफडं चालू आहे. लपून छपून फोनवर बोलत असते, तिच्या पत्रिकेत प्रेमविवाह लिहिलेला आहे. अनघाने प्रेमविवाह केला तर आपल्या घराण्याला काळीमा लागेल, ती काही करण्याआधी आपण तिचं लग्न लावून देऊयात." अनघाच्या मावशीने तिच्या मामाला सांगितले.


अनघाच्या मामाला तिच्या मावशीचं म्हणणं पटलं. अनघाने सर्व बोलणं ऐकल्यामुळे तिला मावशीचा हेतू लक्षात आला होता. अनघाने या सर्वांची कल्पना यशला दिली, तेव्हा यश म्हणाला,

"अनघा तुझी मावशी तुझ्या मर्जी विरोधात लग्न लावून देऊ शकणार नाही. आपल्याला कोणीच वेगळं करु शकणार नाही. मला थोड्या दिवसांचा अवधी दे. मी दोन आठवडयाने गावी जाणार आहे, त्यावेळी आपल्याबद्दल मी माझ्या आईवडिलांसोबत चर्चा करणार आहे. एकदा त्यांना आधी आपल्या लग्नासाठी तयार करतो, मग तुझ्या मावशीच्या घरी येऊन तुझा हात मागतो."


यशचं आश्वासक बोलणं ऐकून अनघा सुखावते. अनघा एकदम निश्चिन्त होऊन जाते. पुढील दोन तीन दिवसांनी अनघा कंपनीत गेलेली असताना तिच्या मावशीने फोन केला,

"हॅलो अनघा, तुला बघायला आज पाहुणे येणार आहेत. आज कंपनीतून लवकर निघून घरी ये."


अनघाला मावशीचं बोलणं ऐकून जाम टेन्शन आलं होतं, तिने यशला फोन लावला, पण त्याने उचलला नाही. मग अनघाने पुजाला फोन करुन या सर्वांची कल्पना दिली. पुजाने तिला यशच्या फोनची वाट बघायला सांगितले.

अनघा कंपनीतून लवकर निघाली व ती मावशीच्या घरी न जाता बस स्टँडवर गेली आणि मुंबईला जाणाऱ्या बसची वाट बघू लागली. तेवढ्यात यशने तिला फोन केला,

"हॅलो अनघा, कामात बिजी असल्याने मला तुझा फोन घेता आला नाही. एवढे फोन का केले होते?"


अनघा म्हणाली,

"यश मी आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे मुंबईला येत आहे. आज मला बघायला मुलाकडचे येणार आहेत. मी मावशीकडे गेले तर मला पुन्हा घराबाहेर पडता येईल की नाही? हा मोठा प्रश्न आहे. आपण लगेच लग्न करुयात. मला आता नशिबाची परीक्षा घ्यायची नाहीये."


यश म्हणाला,

"अग अनघा, एवढी घाई करु नकोस. मी दुसऱ्या चार मुलांसोबत इथे राहतो. तुला कुठे ठेऊन घेऊ? मी उद्या पुण्याला येतो, मग पुढे काय करायचं? हे आपण ठरवूयात. लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ आहे का? आणि तुला मुलाकडचे बघायला आले म्हणजे लगेच लग्न लावून नेतील, असं तर होणार नाही."


अनघा चिडून म्हणाली,

"यश मला ते काही माहीत नाही. मी मुंबईच्या बसमध्ये बसले आहे. तुला मला कुठे ठेवायचं? किंवा माझं काय करायचं? हा तुझा प्रश्न आहे."

एवढं बोलून अनघाने फोन कट केला. यशच्या चेहऱ्यावरील टेन्शन बघून त्याचा सहकारी म्हणाला,


"यश काय झालं?"


तेव्हा यशने त्या दोघांमधील संवाद त्याच्या सहकाऱ्याला सांगितला. यशचं बोलणं ऐकल्यावर तो सहकारी म्हणाला,


"यश आता ती इकडे येत आहेच, तर येऊदेत. तिला व्यवस्थित सगळं समजावून सांग, ती नक्कीच ऐकेल."


यश म्हणाला,

"सर अनघा एवढी साधी सरळ मुलगी नाहीये. तिच्या मनासारखं झालं नाही तर, ती आत्महत्या सुद्धा करु शकते, तिचं काही सांगता येत नाही."


यावर त्याचा सहकारी म्हणाला,

"मग तिच्यासोबत लग्न कर. पुढचा मार्ग आपोआप सापडेल."


यश अनघाला घेण्यासाठी बस स्टँडवर गेला. यशला स्टँडवर बघून अनघाला हायसं वाटलं. यश अनघाला आपल्या रुमवर घेऊन गेला. यशने आपल्या रुममेट्सला सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि अनघाला एक रात्र रुमवर राहू देण्याची विनंती केली. अनघाला असं परक्या मुलांसोबत राहणं awkward वाटतं होतं, पण तिचा यशवर विश्वास होता.


यशला त्या रात्री झोप लागली नव्हती. अनघाकडे बघून यशच्या मनात काही प्रश्न उभे राहिले होते, "आपल्याला फारसा पगार नाही. अनघासोबत लग्न करायचे म्हटल्यावर एखादी रुम भाड्याने घ्यावी लागेल, त्यासाठी डिपॉझिट भरावे लागेल. आपल्याकडे तर एवढे पैसे पण नाहीयेत. मला अनघाची मनस्थिती समजते आहे. आई बाबांना न सांगता अनघासोबत लग्न केले तर ते दुखावले जातील. काय करावं? काहीच कळत नाहीये. अनघाला दुखवून चालणार नाही. उद्याची सकाळ कशी उगवेल? हेच कळत नाहीये."


यशच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला होता. यशला काय निर्णय घ्यावा? हेच कळत नव्हते.


यश व अनघाचे लग्न होईल का? बघूया पुढील भागात...


©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all