एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग ७

Yash And Anagha's Second Meet

एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग ७


मागील भागाचा सारांश: अनघाने रुपालीला तिचं यशवर प्रेम असल्याचं सांगितलं. रुपालीचं यशवर प्रेम नसल्याचं अनघाला समजलं. अनघाने रुपालीला समजावून सांगितले, पण ती यशला सोडायला तयार झाली नाही. अनघा व रुपाली मध्ये जोराचं भांडण झालं. पुढील काही दिवस अनघाची यश व बंड्यासोबत भेट होऊ शकली नाही. यशने अनघाचा फोन ब्लॉक करुन ठेवला होता. बंड्यासोबत अनघा बोलत असताना यश मध्येच येऊन तिला वाईट साईट बोलला. अनघाचा रागाचा पारा चढला होता.


आता बघूया पुढे….


यशसोबत बोलून झाल्यावर अनघा रागाच्या भरात थेट जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये गेली. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अनघाने यश विरोधात फसवणूकीचा व त्रास दिल्याचा गुन्हा दाखल केला. अनघा पोलिस केस करेल याचा विचार यशने केला सुद्धा नव्हता.


अनघा पोलिसांना यशच्या घरी घेऊन गेली. पोलिसांनी यशला अटक केली. यश अनघापुढे हात जोडून केस मागे घेण्यासाठी विनवणी करत होता, पण अनघाला त्याचा खूप राग आल्याने तिने त्याच्याकडे बघितले सुद्धा नाही. अनघाला डिवचल्याचे फळ यशला भोगावे लागले. यशला एक रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढावी लागली.


यशला पोलिस घेऊन गेल्यावर पुजा अनघाला म्हणाली,

"अनघा तू यश विरोधात पोलिस केस करुन योग्य केले नाहीस. अग त्याचं पूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकेल."


अनघा म्हणाली,

" पुजा यश माझ्या भावनांशी खेळला आहे, तो सतत मला घालून पाडून बोलत होता. जोपर्यंत एखादी व्यक्ती माझ्या मनात आहे, तोपर्यंत मी त्या व्यक्तीला मनापासून सांभाळते, त्याला जपते, पण एकदा का ती व्यक्ती माझ्या डोक्यात गेली, तर मी त्याचा कार्यक्रमचं करते. यशला माझ्या भावनांसोबत खेळल्याची शिक्षा मिळायलाच हवी. मी जे केलं ते काही चुकीचं केलं नाही."


अनघा व पुजा मध्ये थोडे शाब्दिक मतभेद झालेत. अनघा तो फ्लॅट सोडून आपल्या मावशीच्या घरी रहायला गेली. पुजा सुद्धा तिच्या इतर मैत्रिणींसोबत रहायला गेली. पुढील दोन तीन दिवसांनंतर यश अनघाला फोन करत होता. अनघाने आपला फोन नंबरचं बदलून टाकला. अनघाने पुजाला बजावून ठेवले होते की, यशला तिचा नवीन नंबर द्यायचा नाही. यशने आपल्याला शोधत येऊ नये, म्हणून तिने कॉलेज सुद्धा बदलले.


अनघा मावशीकडे राहूनच कॉलेज व एम पी एस सी चे क्लास करत होती. अनघाने यशला आपल्या मनातून काढून टाकले होते, ती पोलिस ऑफिसर होण्याच्या आपल्या स्वप्नाच्या मागे हात धुवून लागली होती. अनघा रात्रंदिवस अभ्यास करत होती. 


दुसरीकडे यश मात्र अनघाला शोधत होता. पुजा पण दुसऱ्या एरियात रहायला गेल्यामुळे यशची व तिची भेट होत नव्हती. एके दिवशी अचानक यश व पुजाची भेट झाली, तेव्हा यश म्हणाला,


"पुजा मला अनघाचा कॉन्टॅक्ट नंबर देना. मला एकदा तिला भेटायचे आहे. ती कुठे राहते?"


पुजा म्हणाली,

"यश माझ्याकडे तिचा फोन नंबर नाहीये. अनघाने कॉलेज सुद्धा बदलले आहे. ती तिच्या मावशीकडे राहते, एवढंच मला माहीत आहे. अनघाच्या मावशीचा पत्ता मला माहीत नाही."


यश म्हणाला,

"असं होऊच शकत नाही. तुम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या ना. अनघाचा ठावठिकाणा तुला माहीत नाही, असे होणारच नाही."


पुजा म्हणाली,

"अरे बाबा, तुझ्यावर पोलिस केस केल्यामुळे माझ्यात व तिच्यात थोडे वाद झालेत, तेव्हापासून ती माझ्यापासून दूर राहते."


यश म्हणाला,

"बरं तिच्या एखाद्या मैत्रिणीचा तुझ्याकडे नंबर असेल तर प्लिज दे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे."


पुजा म्हणाली,

"अनघाच्या क्लासमधील एका मुलाचा नंबर माझ्याकडे आहे, तो मी तुला देते."


पुजाने अनघाच्या क्लासमधील एका मुलाचा नंबर यशला दिला. यशने त्या मुलाला फोन केल्यावर त्याने अनघाचा फोन नंबर यशला दिला. अनघाने आपल्या मोबाईल मध्ये यशचा फोन नंबर सेव्ह न केल्याने यशने फोन केल्यावर तिने उचलला, पण यशचा आवाज ऐकून तिने फोन कट केला. अनघाने तिचा मोबाईल स्विच ऑफ करुन ठेवला.


चार पाच दिवसांनी अनघाची एमपीएससी पूर्व परीक्षा असल्याने तिला अभ्यासात व्यत्यय नको होता. यशने अनघाच्या क्लासमधील मुलाकडे तिच्यासाठी निरोप दिला. अनघाच्या क्लासमधील मुलगा तिच्याकडे यशचा निरोप द्यायला गेला, तेव्हा तिने त्याला ठणकावून सांगितले की, 


"पुढच्या वेळी जर तू यशचा निरोप घेऊन माझ्या पर्यंत आला तर मी तुझा मोबाईल फोडून टाकेल."


अनघापर्यंत पोहोचणारे यशचे सर्व मार्ग बंद झाले होते. अनघाने पूर्व परीक्षेसाठी जोरदार अभ्यास केला होता. अनघा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली होती. अनघाने तिचा मोबाईल बंदच करुन ठेवला होता. पुढील तीन महिने अनघाने मोबाईल स्विच ऑन केला नव्हता.


मावशीच्या घरी राहून कंटाळा आल्याने अनघा परत पुजा सोबत एका फ्लॅटमध्ये राहू लागली होती. एके दिवशी रात्री दीड वाजता अनघाने तिचा मोबाईल स्विच ऑन केला, तर पावणे दोन वाजता यशचा फोन अनघाच्या मोबाईल वर आला. एवढ्या रात्री याने फोन का केला असेल? या विचाराने अनघाने फोन उचलला,


"हॅलो अनघा, प्लिज फोन कट करु नकोस. मी कधीपासून तुझ्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहे, पण तुझा फोनच लागत नव्हता."


अनघा म्हणाली,

"हं बोल पटकन."


यश म्हणाला,

"अनघा प्लिज उद्या मला थोड्या वेळासाठी येऊन भेटशील का? मला तुझ्या सोबत खूप महत्त्वाचे बोलायचे आहे."


अनघा म्हणाली,

"मी विचार करुन सांगते."


अनघाने एवढं बोलून फोन कट केला. अनघाने पुजाला त्यांच्या दोघांमध्ये झालेला संवाद सांगितला. पुजा यावर म्हणाली,


"अनघा एकदा तू यशची भेट घेऊन त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. एवढ्या रात्री फोन केलाय म्हटल्यावर नक्कीच त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल."


अनघाने या सगळ्याचा थोड्यावेळ विचार केल्यावर तिला पुजाचे म्हणणे पटले. अनघा यशला भेटायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा यशला भेटायला गेली. यशने अनघाकडे बघून हलकेच स्मितहास्य केले. अनघा मात्र त्याच्याकडे गंभीर चेहऱ्याने बघत होती. यश अनघाला घेऊन एका कॉफी शॉपमध्ये गेला. यशने कॉफीची ऑर्डर दिली.


"बोल काय काम होते?" अनघाने रागाच्या सुरात विचारले.


यश म्हणाला,

"तू अजून माझ्यावर रागावली आहेस का?"


अनघा म्हणाली,

"तू हे विचारण्यासाठी मला इथं बोलावलं आहे का?"


यश म्हणाला,

"नाही. अनघा प्लिज माझ्यासोबत इतक्या रागात बोलू नकोस. अनघा ज्या गव्हर्नमेंट नोकरीची मी आतुरतेने वाट बघत होतो, ती नोकरी मला मिळाली."


अनघा म्हणाली,

"मग मी काय करु?"

यश म्हणाला,

"अनघा प्रत्तेक वाक्यावर असं वाकड्यात जाऊन बोललंच पाहिजे का?"


अनघा म्हणाली,

"यश मला तुझ्यासोबत नॉर्मल बोलता येणारच नाही. तुझं माझ्याकडे जे काम असेल, ते पटकन सांग."


यश म्हणाला,

"मला नोकरी मिळाली, पण कॅरॅक्टर सर्टिफिकेट असल्याशिवाय मला नोकरी जॉईन करता येणार नाही."


अनघा म्हणाली,

"मी तुला कॅरॅक्टर सर्टिफिकेट मिळवून द्यावं, अशी तुझी इच्छा आहे का?"


यश थोडा वैतागून म्हणाला,

"अनघा तु माझ्यावर जी पोलिस केस केली होती, त्यामुळे मला कॅरॅक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही. तू जर माझ्यावरील केस मागे घेतली तरच मला ही नोकरी जॉईन करता येईल."


अनघा म्हणाली,

"मी तुझ्यावरची केस मागे का घेऊ? तुला नोकरी मिळो अथवा न मिळो, माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये."


यश म्हणाला,

"अनघा प्लिज असं बोलू नकोस. ती नोकरी म्हणजे माझं स्वप्न आहे. मी तुझ्यासोबत जे काही चुकीचं वागलो होतो, त्याची शिक्षा मला आधीच मिळाली आहे. माझे आईवडील सुद्धा माझ्या नोकरीकडे आशेने बघत आहेत. माझी आई तर म्हणाली होती की, केस मागे घेण्यासाठी त्या मुलीला काही पैसे देऊन टाक. अनघा माझं आयुष्य उध्वस्त होईल. प्लिज तू केस मागे घे, त्याबदल्यात तुला जे पाहिजे, ते मी देतो. हवंतर मी तुझे पाय धरुन तुझी माफी मागतो."


अनघा मिश्किल हसून म्हणाली,

"यश तुला आठवतंय, मी तुला म्हणाले होते की, तू माझ्या पायावर डोकं ठेऊन माझी माफी मागशील. तू मला खूपच हलक्यात घेतलंस. एनिवेज मी एवढी नीच नाहीये. तुझं आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही. कितीही नाही म्हटलं तरी, एकेकाळी मीही तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं आणि माझ्या प्रेमाला मी असं हरलेलं बघू शकत नाही. माझा एक दूरचा मामा वकील आहे. आपण त्याच्याकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊयात."


यश आनंदी होऊन म्हणाला,

"चालेल, त्यांची जी काही फी होईल, ती मी देऊन टाकेल."


यश व अनघाचं पुन्हा सूत जुळेल का? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all