एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग २

Yash Proposes To Anagha

एका प्रेमाची दुसरी गोष्ट भाग २

मागील भागाचा सारांश: अनघा तिची मैत्रीण पुजासोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती, तिच्या समोरच्या फ्लॅटमध्ये यश त्याच्या मित्रांसोबत राहत होता. अनघा व यशचा स्वभाव परस्परविरोधी होता. अनघा ही अनाथ होती, ती अभ्यासात हुशार होती. प्रत्येक स्पर्धेत अनघा भाग घ्यायची. अनघा पुजाला यशवरुन चिडवायची, कारण यश यांच्या गॅलरीकडे टक लावून बघत बसलेला असायचा.

आता बघूया पुढे……

अनघा व पुजा कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या की, यशही त्यांच्या पाठोपाठ घरातून निघायचा. आता तर पुजाला खात्री पटली होती की, यश आपल्याकडेच बघतो आहे म्हणून. अनघा वक्तृत्व स्पर्धेच्या तयारीत असल्यामुळे तिचे पुजा व यशकडे अजिबात लक्ष नव्हते. 

अनघाने लिहिलेले भाषण तिच्या सरांना आवडले होते. अनघाने भाषणाची चांगली तयारी केली होती. स्पर्धेच्या दिवशी अनघा आपल्या कॉलेजमधील दोन मुलांसोबत बारामतीला गेली. सरांनी पैसे त्या मुलांच्या ताब्यात दिले होते. बारामतीला गेल्यावर त्या मुलांनी अनघाला एक वडापाव घेऊन दिला. सकाळपासून अनघाने काहीच खाल्लेले नव्हते. रिकाम्या पोटी भाषण कसे करता येईल? म्हणून तिने वडापाव पटकन खाऊन टाकला. 

अनघाचे भाषण खूप छान झाले होते. उपस्थित असलेल्या सर्वांनी अनघाचे भाषण झाल्यावर टाळ्या वाजवल्या. अनघासोबत आलेल्या दोन्ही मुलांचे भाषण मात्र चांगले झाले नाही. दोघेही त्यामुळे खूप नाराज झाले होते. अनघाचा स्पर्धेत पहिला क्रमांक आला होता. दुसऱ्या दिवशी बक्षिस समारंभ होता. अनघासोबत आलेल्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला,

"अनघा हे पैसे घे. आमचा नंबर आला नाहीये, तर आम्ही आता जातो. उद्या सर येतील, त्यांच्यासोबत तु परत येऊ शकते."

यावर अनघा म्हणाली,

"अरे दादा, पण मी एकटी कुठे राहू?"

तो मुलगा म्हणाला,

"मग आमच्यासोबत परत चल आणि उद्या सरांसोबत परत ये."

अनघा व दोन मुले बसस्टँडवर गेली, तर शेवटची बस निघून गेली होती. रात्रीचे ११ वाजले होते, पुढची बस आता पहाटेच होती. मुले कंटाळली होती, त्यांनी तिथेच राहणाऱ्या मित्रांच्या रुमवर जायचे ठरवले. मुलांच्या रुमवर मुलगी कशी नेणार? आणि तसंही आज अनघाबद्दल त्यांना असूया वाटत होती. दोघेजण अनघाकडे पैसे देऊन त्यांच्या मित्राच्या रुमवर निघून गेले. अनघा बसस्टँडवर एकटीच बसून होती. सकाळपासून एका वडापाव असणाऱ्या अनघाला प्रचंड भूक लागली होती. अनघाकडे मोजकेच पैसे होते. अनघाने विचार केला की, हे पैसे खाण्यासाठी खर्च केले तर उद्या परत जाताना पैसे उरणार नाही. सरांनी दोन्हीकडच्या भाड्याचे पैसे आधीच दिले होते. सरांकडे पुन्हा पैसे मागणे अनघाला पटत नव्हते. 

अनघाचे लक्ष पाण्याच्या नळाकडे गेले. लाईटच्या प्रकाशात एक प्रवाशी हातपाय धुताना तिला दिसला, तेच पाणी अनघा घटघट प्यायली. पोटभरुन अनघाने पाणी प्यायले. पाणी प्यायल्यावर अनघाच्या पोटात दुखू लागले होते. जेवणाची भूक पाण्यावर कशी भागणार होती? 

अनघा पाणी पिऊन झाल्यावर जवळच्या एका खांबाला टेकून उभी राहिली, तेवढ्यात एक बस स्टँडवर येऊन उभी राहिली, त्यातून सर्व प्रवाशी खाली उतरले. एक प्रवाशी अनघाजवळ येऊन त्याच्या हातातील पुडा देऊ लागला. अनघा स्वाभिमानी असल्याने तिने तो पुडा घेण्यास नकार दिला. अनघाला कोणाकडून भीक मागायला किंवा खायला आवडत नसायचे. त्या प्रवाश्याने आपल्या हातातील पुडा कचराकुंडीत टाकून दिला. बसमधून उतरलेले सर्व प्रवाशी आपापल्या मार्गाने निघून गेले अनघाच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता, तिला भूक सहन होत नव्हती. स्वतःचा स्वाभिमान गुंडाळून ठेवत अनघा कचराकुंडीजवळ गेली आणि पुढील दोन तीन मिनिटे विचार करुन प्रवाशाने टाकलेला कागद कचराकुंडीतून बाहेर काढला तर त्या कागदात अर्धवट खाल्लेला वडापाव होता. त्या अर्धवट खाल्लेल्या वडापावकडे बघून अनघाला आठवले की, ती लहान असताना तिच्या मामाने सर्वांसाठी वडापाव आणले होते, तिच्या मामीने आपल्या मुलांना वडापाव खायला दिला,पण अनघाला वडापाव दिला नाही. सगळ्यांचं खाऊन झाल्यावर उरलेले वडापावचे तुकडे एका कागदात गोळा करुन अनघाला खायला दिले होते. आपल्या लहानपणीचा प्रसंग आठवून अनघाच्या डोळयात टचकन पाणी आले. अनघाने डोळे मिटून तो अर्धवट खाल्लेला वडापाव आपल्या तोंडात टाकला, तिला तो वडापाव गिळत नव्हता, कारण ती खूप स्वाभिमानी मुलगी होती, अशी लाचारी पत्करणे तिला आवडत नव्हते. अनघाने पाणी पिऊन तो वडापाव कसातरी घशाखाली ढकलला.

हे सर्व एक कंडक्टर लांबून बघत होता, त्याने अनघा जवळ जाऊन तिची विचारपूस केली. अनघाला कंडक्टरने त्याच्याकडील भाजीपोळी खायला दिली, तसेच झोपण्यासाठी त्यांच्या आराम करण्याच्या रुममध्ये जागा दिली.

दुसऱ्या दिवशी अनघा स्टँडवर फ्रेश होऊन बक्षिस समारंभासाठी गेली. बक्षिस समारंभात अनघाला तिचे सर भेटले. बक्षिस घेतल्यावर अनघाच्या डोळयात पाणी आले होते, कारण बक्षिसाची रक्कम पाच हजार रुपये होती. एक दिवस आधी अनघाकडे जेवण करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आणि त्याच मुलीकडे आज पाच हजार रुपये होते. अनघा सरांसोबत पुण्यात परत आली.

यशचे अनघा व पुजाच्या मागेमागे करणे वाढले होते. चहाच्या टपरीवर बसून यश तासनतास यांच्या गॅलरीकडे बघत बसायचा. यशसोबत त्याचा मित्र बंड्या कायम रहायचा. बंड्याचं कॅरॅक्टर एकदम अतरंगी होतं. बंड्याचे कपडे नेहमी भडक, रंगीबेरंगी असायचे. एकदा अनघा व पुजा रस्त्याने चालत असताना त्यांना यश व बंड्या दिसले. अनघा व पुजा जवळ गेल्यावर बंड्या आपल्या खिशातील मोबाईल काढून बोलू लागला,

"हॅलो वहिनी कशा आहात? तुमची तब्येत बरी आहे का? आपला भाऊ तुमच्याबद्दल एकदम सिरिअस आहे बरं का?"

बंड्याची ही बडबड ऐकूल्यावर पुढे जाऊन पुजा म्हणाली,

"हा बंड्या कोणाला वहिनी म्हणत होता?"

अनघा म्हणाली,

"असेल त्याची एखादी वहिनी, तिच्यासोबत बोलत असेल. आपल्याला काय करायचं आहे?"

एके दिवशी काहीतरी कामानिमित्ताने पुजा बाहेर गेलेली होती. पुजा घरी नसताना सुद्धा यश त्यांच्या गॅलरीकडे बघत होता. यशला चहाच्या टपरीवर बघून अनघा मनातल्या मनात म्हणाली,

"पुजा तर इथे नाहीये. मग हा यश आपल्या गॅलरीकडे बघत का बसला आहे? यशला आमच्या दोघींपैकी कोणामध्ये इंटरेस्ट असेल? यशसारख्या मुलाने माझ्यात इंटरेस्टेड असावं, असं विशेष माझ्यात काहीच नाहीये. यश असाच टाईमपास करण्यासाठी बसला असेल. अनघा उगाच मनात काहीतरी गैरसमज करुन घेऊ नकोस. पुढे जाऊन तुला याचा त्रास होईल, कारण यश तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही."

अनघा आपल्या विचारात दंग असतानाच दारावरची बेल वाजते आणि तिच्या विचारांची तंद्री तुटते. अनघा कोण आलंय? हे बघण्यासाठी दरवाजा उघडते तर, यश दारात उभा असतो.

अनघा म्हणाली,

"आज तर लाईट आहे. मग आपले पाय आमच्या उंबऱ्याला का लावले?"

यश हसून म्हणाला,

"तु नेहमी असंच बोलते का? तुला सरळ बोलताच येत नाही का?"

अनघा म्हणाली,

"मी अनोळखी लोकांसोबत अशीच बोलते. माझ्याकडे काही काम आहे का?"

यश म्हणाला,

"मी इकडे जवळच्या गार्डनमध्ये व्यायाम करायला चाललो आहे. तुमची मैत्रीण इथे नाहीये बहुतेक, तर मला वाटले तुम्ही घरी एकट्या बोअर होत असणार, तर तुम्हाला invite करायला आलो होतो. मला पण कंपनी भेटेल."

"एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती माझी मैत्रीण इथे नाहीये? तुम्ही काय तिच्या मागावर आहात काय?" अनघाने विचारले

"अहो मॅडम शेजारधर्म असतो तो, लक्ष ठेवायला लागते अचानक काही गरज पडली तर?" तो थोडासा तिरकस हसत म्हणाला. 

"मला नाही यायचं तुमच्या सोबत, तुम्ही जाऊ शकता. आणि हो शेजारधर्म पाळायची काही गरज नाही, कारण आम्हाला काही गरज पडणार नाहीये "..अनघाने नाक मुरडले.

"वेळ कधी सांगून येत नाही मॅडम. आणि पार्क खरंच खूप छान आहे. तुम्हाला खरंच तिथे खूप फ्रेश वाटेल. म्हणजे हे जे तुम्हाला हसण्याची ॲलर्जी आहे ना… बघा ते पार्क, तिथली छोटी मुलं बघून आपोआप हसू उमलेल तुमच्या ओठांवर. बरं मी निघतोय, तुमची इच्छा असेल तर या..नक्की" म्हणत तो निघून गेला. 

अनघाने मान हलवून होकार दिला. यश निघून गेल्यावर अनघा विचारात पडली की, गार्डनमध्ये जायला हवे की नको?

थोड्यावेळ विचार करुन अनघा गार्डनमध्ये जायला निघाली. अनघा गार्डनमध्ये गेली तेव्हा यश व्यायाम करत होता. यश शर्ट काढून व्यायाम करत असल्याने त्याचे सिक्स पॅक्स अनघाला बघायला मिळाले होते. यश चे ते रुप बघूनच तो किती फिटनेस फ्रिक असेल? हे समजून येत होते. अनघा इकडे तिकडे फिरत यशच्या जवळ जात होती, तर तिला परत बंड्या दिसला. त्याने तिला बघून बत्तिशी दाखवत स्माईल केले. ती त्याला कसेनुसे नजरेने बघत होती. तेव्हा नेहमीप्रमाणे बंड्याने हातात फोन घेऊन बोलायला सुरुवात केली,

"हॅलो वहिनी, तुम्ही गार्डनमध्ये आपल्या भावाला भेटायला गेल्या का?"

        बंड्याच्या बोलण्याने अनघा आल्याचे यशला समजले. यशने व्यायाम करताना काढून ठेवलेले कपडे आणि शूज हातात घेतले, ते घेऊन तो अनघाजवळ जाऊन तिच्या हातात कपडे आणि शूज देत म्हणाला,

"मी जरा फ्रेश होऊन येतो."

यश एवढं बोलून फ्रेश व्हायला निघून गेला. यश निघून गेल्यावर अनघा मनातल्या मनात म्हणाली,

"हा मुलगा डोक्यावर पडला आहे का? माझी आणि याची साधी ओळख सुद्धा नाहीये, मग हा माझ्यासोबत असा का वागतो आहे? ह्याने मला याकरता गार्डनमध्ये बोलावलं होतं का?" , वैतागत तिने बाजूला असलेल्या बेंचवर त्याचे कपडे आणि शूज ठेवून दिले.

थोड्या वेळात यश फ्रेश होऊन आला, बघतो तर त्याचे सामान बेंच वर होते आणि अनघा बाजूला उभी होती. 

"मुलगी कडक आहे."..गालात हसत तो बेंचवर येऊन बसला. कपडे व शूज घालता घालता तो मात्र तिच्याकडेच बघत होता. 

अनघा म्हणाली,

"आता ७ वाजले आहेत, मी जाते."

यश म्हणाला,

"अग बस ना. जरावेळ आपण गप्पा मारुयात."

अनघा त्याच्या शेजारी बसली. यश अनघाचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला,

"अनघा मला तु खूप आवडतेस. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू अनघा."

"काय?" अनघा आपला हात त्याच्या हातातून सोडवत म्हणाली.

यश म्हणाला,

"मी तुला बघता क्षणीच तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुझ्यासोबत पुजा सतत असल्याने मला माझ्या मनातील भावना सांगता आल्या नाही. आज मी तुला म्हणूनच इथे बोलावून घेतले.अनघा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे."

अनघा म्हणाली,

"हे कसं शक्य आहे? तुझ्यासारख्या मुलाला माझ्यासारखी मुलगी आवडूच कशी शकते? तु इतका हॅन्डसम आहेस आणि मी शरीराने स्थूल आहे. तुझ्यासारख्या मुलाला मी शोभणार नाही. तुला तर स्लिम ट्रीम मुली आवडत असतील ना?

यश म्हणाला,

"मी बाह्य सुंदरता बघत नाही. तुझ्यातील attitude मला आवडले आहे. मी तुझ्या हटके स्वभावाच्या प्रेमात पडलो आहे."

अनघा म्हणाली,

"मला विचार करायला थोडा वेळ दे."

यश म्हणाला,

"नाही. मी आधीच तुझ्यासाठी खूप वेळ थांबलो आहे. मला काहीतरी उत्तर हवे आहे. एकतर होकार दे किंवा नकार दे."

मग अनघाने थोडा विचार करुन होकार दिला. अनघाला यशचं बोलणं आवडलं होतं. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मुलाने तिच्या दिसण्यावरुन तिची उडवली नव्हती. आपल्याला जो मुलगा आवडतो, तोच प्रेमात हे ऐकल्यावर कोणत्या मुलीला आनंद होणार नाही. अनघाला हवेत उडल्यासारखं जाणवत होतं, तिच्यासाठी आकाश ठेंगणे झाले होते. अनघाला संपूर्ण जगाला ओरडून सांगायची इच्छा होती की, तिच्या कोणीतरी प्रेमात पडलं आहे. 

यश जेव्हा कधी अनघाला भेटेल, तेव्हा तो तिच्या दिसण्याचं कौतुकचं करायचा. यशने अनघाच्या सर्व आवडीनिवडी जाणून घेतल्या होत्या. अनघाला तिच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी एवढे महत्त्व दिले होते. एके दिवशी अनघा व यश दोघे गार्डनमध्ये एकत्र गप्पा मारत बसलेले असताना यशला त्याच्या आईचा फोन आला होता, त्याची आई काहीतरी त्याला विचारत होती, तर यशने ओरडून तिरसटपणे आईच्या प्रश्नांची उत्तरे देऊन फोन कट केला. फोन बंद झाल्यावर अनघा यशला म्हणाली,

"यश तु आईसोबत अश्या भाषेत का बोललास?"

यश म्हणाला,

"आई दिवसभरात कधीही फोन करुन बोअर करत असते. सारखे तेच तेच प्रश्न विचारते, तु जेवलास का? तुझी तब्येत बरी आहे का? 

आता दररोज जर हेच प्रश्न विचारले तर काय उत्तर द्यावे? हेच कळत नाही."

अनघा म्हणाली,

"यश तु स्वतःला नशीबवान समज. तुझी काळजी करणारं कोणीतरी या जगात आहे. महिना महिना मला कोणी फोन सुद्धा करत नाही. मी कशी आहे? ह्याची कोणालाच काळजी आहे. तुझ्याकडे आई आहे तर तुला तिची किंमत वाटत नाही. आईवडील आयुष्यात नसतील तर काय होऊ शकते? याची कल्पना सुद्धा तु करु शकत नाही."

यश म्हणाला,

"अनघा तुझी काळजी करणार कोणी नाही, असं इथून पुढे तु म्हणणार नाहीस. मी एकटा तुझी काळजी घ्यायला समर्थ आहे. मी तुला कधीच दुखावणार नाही."

अनघाला यशचं हेच बोलणं मनाला स्पर्शून जातं होतं. 

अनघाने पुजाला जेव्हा हे सर्व सांगितलं, तेव्हा ती म्हणाली,

"तुला कल्पना होती की, यश तुझ्याकडेच बघत असतो, तरी तु मला त्याच्यावरुन चिडवायची."

अनघा म्हणाली,

"अग खरंच मला याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं."

पुजा म्हणाली,

"ते काही असलं तरी. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे."

अनघा व यशच्या आयुष्यात अजून काय घडेल? ते बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all