एका मुलीच्या मनाची व्यथा भाग ३(अंतिम)

Pain Of Girl's Mind

एका मुलीच्या मनाची व्यथा भाग ३ (अंतिम) 


एका छोट्याशा खेडेगावात राहूनही आई बाबांनी आम्हा तिघा बहीण भावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. मी लहानपणापासूनच आई बाबांचे कष्ट बघत आले, ते कमी शिकलेले असतानाही आम्हाला उच्च शिक्षण कसे घेता येईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले. मी लहान असल्यापासून आईचे माझ्या बाबतीत एक ठरलेलं वाक्य ऐकत आलीय,

"माझी श्रेया खूप जास्त समजदार आहे, ती कधीच कसलाही हट्ट करत नाही, तक्रार करत नाही,उलट बोलत नाही." 


आई मी प्रत्येकवेळी समजूतदारपणा दाखवला असेल पण याचा अर्थ असा होत नाही की मला मन नाही, इच्छा नाही. मी कधी तुम्हाला काय कुणालाच उलट बोलले नाही म्हणजे मला समोरच्याच प्रत्येक वेळी पटायचच अस नाही. आई माझ्या मनात काय चालू आहे हे तुम्ही कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का? यात मी तुम्हाला दोषी मानतच नाही उलट या सर्वात माझीच चुक आहे की मी अति समजूतदारपणा दाखवला, मी वेळीच बोलले नाही. आई बाबा मी विनिता ताईला मोठी बहीण म्हणून जो मान, आदर दिला तो मान आदर मला लहान भाऊ म्हणून सागरने कधी दिलाय का? तो कधी मला ताई म्हणाला नाही की माझं कधी काही ऐकलं नाही, ते सोडा पण कधी नावाने व्यवस्थित हाक मारली नाही. सागर नेहमी मला जाडी, ढोली, काळी अस म्हणून चिडवायचा, कधीतरी चिडवणे हे ठीक असायचे पण नेहमी तो तसच बोलायचा, याबद्दल मी अनेकदा तुमच्याकडे तक्रार केली पण तुमचे पालुपद ठरलेले असायचे, 

"तो लहान आहे, तू मोठी आहेस तू त्याला समजून घे." नेहमी मीच का त्याला समजून घ्यायचे? तुम्ही कधी त्याला का नाही सांगितलं की तिला आवडतं नसेल तर तिला चिडवू नकोस. माझा रंग सावळा होता त्यात माझा काय दोष? 


ताई तुला आठवतंय एकदा जत्रेत तुला बांगड्या घ्यायच्या होत्या, मला भांड्याचा सेट घ्यायचा होता तर सागरला गाडी घ्यायची होती, तुला बांगड्या घेतल्या गेल्या, सागरला गाडीही घेण्यात आली पण पैसे कमी असल्याने मला भांड्याचा सेट घेतला गेला नाही. का? तर श्रेया समजदार आहे, ती रडणार नाही.


शाळेला सुट्टी असताना मी आईला घरकामात मदत करायचे, बाबांना दुकानात मदत करायचे पण सागर गावभर मित्रांसोबत उंडारायचा, त्याला कधीच जबाबदारीची जाणीव करून दिली नाही. मला नसेल वाटत का? मैत्रिणींसोबत जाऊन खेळावे, सुट्टीची मजा घ्यावी.


ताईची बारावी झाल्यावर तिला शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यात आले, ताई तिथे होस्टेलला रहायची. सुट्टीत घरी आल्यावर तिकडची मौज मस्ती सांगायची, ताईचे बघून मलाही शहरातील कॉलेजला जायचा मोह झाला म्हणून मी बारावीत खूप अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळवले पण नेमकं त्याच वर्षी बाबांची तब्येत बिघडली. बाबांनी मला सांगितलं की "श्रेया माझी तब्येत बिघडली आहे, मी पूर्वीप्रमाणे काम करू शकणार नाही, तुझ्या शिक्षणावर जास्त खर्च केला तर सागरला हवे ते शिक्षण देता येणार नाही तर तू आपल्या गावातील कॉलेजमध्ये बी एस्सी कर." 


बाबांच्या अशा बोलण्याने पुढे मला काहीच बोलता आले नाही. माझे इंजिनिअर होण्याचे स्वप्न तिथल्या तिथे मातीमोल झाले. विनिता ताई व सागर इंजिनिअर झालेत आणि मी समजूतदारपणा दाखवल्याने मी बी एस्सी झाले.


ताई शेवटच्या वर्षात असताना तिच्यासाठी रोहित जिजूंचे स्थळ सांगून झाले, ताईचे थाटामाटात लग्न झाले. मी ताईसाठी खूप खुश आहे. ताई घरी आल्यावर जिजूंबद्दल सांगायची तेव्हा मलाही असंच वाटायच की मला जिजूंसारखा नवरा भेटावा की जो मला, माझ्या स्वप्नांना समजून घेईल.

माझं बी एस्सी पूर्ण झाल्यावर माझ्यासाठी बाबांनी मुलगा बघायला सुरुवात केली, माझा रंग सावळा असल्याने मला कोणीच पसंत करत नव्हते, सर्वजण फक्त माझे बाह्यरुप बघायचे, माझे गुण कोणीच पाहिले नाही. लग्न लवकर जमत नसल्याने मी बाबांना म्हणाले की, " बाबा मी शहरात जाऊन एखादी नोकरी करते, घरात रिकामी राहून मला कंटाळा आला आहे, नोकरी करता करता मी पुढील शिक्षणही घेईल." पण बाबांनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली नाही. माझे नोकरी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. काही महिन्यांनी समीरचे स्थळ माझ्यासाठी सांगून आले. 


समीर दिसायला, स्वभावाने चांगले वाटल्याने मला खूप आनंद झाला होता. समीर शहरात नोकरी करत होते, त्यांच्या आई वडिलांनी सांगितले की मुलीला लग्नानंतर नोकरी करू देऊ. मला वाटले आता आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होतील. 


सागरला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असल्याने बाबांनी माझ्या लग्नासाठी जास्त खर्च नाही केला. मी लग्न होण्यापूर्वी खूप स्वप्न पाहिली होती. लग्न झाल्यावर अगदी पहिल्याच रात्री समीरने मला सांगितले की "माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे,तुझ्यासोबत आई बाबांच्या इच्छेखातर लग्न केले, माझे तुझ्यावर प्रेम नाही,आपण फक्त जगासाठी नवरा बायको असू पण आपल्यात नवरा बायको सारखे कुठलेही संबंध रहाणार नाही आणि माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नको." हे सर्व ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच हादरली. डोळ्यासमोर अंधःकार येऊन उभा राहिला. मी माहेरी आल्यावर ताईला सर्व कल्पना दिली व सांगितले "मी समीर सोबत राहू शकणार नाही.". यावर ताईने मला समजावले व सांगितले." थोडे दिवस थांब, समीरचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर, थोड्याच दिवसांत त्या मुलीचे भूत त्यांच्या डोक्यातून उतरेल." 


मी विचार केला की ताई बोलते ते बरोबर आहे, आपण थोडे प्रयत्न करून बघू म्हणून मी समीरला काय हवं काय नको हे सर्व बघायला सुरुवात केली, त्यांचे आवडते पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायला सुरुवात केली, त्यांच्याशी त्यांच्या आवडत्या विषयावर गप्पा मारायला सुरुवात केली, समीरची आवड ती माझी आवड हे स्विकारायला सुरुवात केली, पण सगळं व्यर्थच होतं.


काही दिवसांत समीरची सुट्टी संपली, ते परत कामावर हजर झाले, गावावरून जाताना त्यांच्या आई म्हणाल्या "सोबत श्रेयाला घेऊन जा." यावर त्यांनी सांगितले "आधी घर शोधतो मग तिला घेऊन जाईल." समीर गेल्यावर त्यांनी मला साधा एक फोन तर केलाच नाही पण मी फोन केल्यावर ते पाच मिनिटांच्या पुढे कधी बोललेच नाही. हे सर्व ताईला सांगितलं की ताई म्हणायची थोडा समजूतदारपणा दाखव, हळूहळू सर्व ठीक होईल. 


जवळजवळ दोन महिन्यांनी समीर घरी आले. मी त्यांना बोलले, " आपल्यात जरी नवरा बायकोचे नाते नसेल ते ठीक आहे, मला तुमच्यासोबत शहरात येऊ द्या, मला नोकरी करायची आहे, मला इथे एकटीला खूप बोअर होतं." यावर त्यांचे उत्तर होते की," तू दिसायला सावळी आहेस, मी तुला माझ्यासोबत शहरात नेले तर माझे सर्व मित्र माझी चेष्टा करतील, माझ्यावर हसतील, मी तुझी बायको म्हणून ओळख करून देऊ शकणार नाही, तुला नोकरी करण्याची गरज नाही, जेवढे पैसे लागतील तेवढे मी तुला देत जाईल." समीर अस बोलल्यावर मी ठरवलं होतं, आई बाबांना जाऊन समीरचे सत्य सांगावे व मला घटस्फोट घ्यायचा आहे याची कल्पना द्यावी. 

समीर शहरात निघून गेल्यावर मी काही दिवसांसाठी माहेरी गेले तेव्हा मला कळले की बाबांना मायनर हार्ट अटॅक येऊन गेला आहे अशा परिस्थितीत माझ्यासारखी समजूतदार मुलगी सत्य परिस्थिती सांगू शकेल का? काही दिवस मी माहेरी राहून सासरी परतले आणि जी परिस्थिती आहे ती स्विकारली. ताईसोबत त्या विषयावर बोलणेही सोडले. मी प्रवाहासोबत पुढे जाऊ लागले, पुढचे स्टेशन न ठरवता प्रवास करू लागले. 

मागच्या महिन्यात मी माहेरी गेले होते त्यावेळी बाबा पूर्णपणे बरे झाले होते म्हणून मी आईला समीर बद्दल सर्व खरे सांगितले व मला घटस्फोट घ्यायचा आहे याची कल्पना दिली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून आईला सर्व सांगण्याचे धाडस केले. यावर आईने मलाच समजावले " श्रेया तू समजदार आहेस, तुला सर्व कळतं, घटस्फोट घेतला तर गावात बदनामी होईल, सागरला बायको भेटणार नाही, तुझ्या ताईला सासरी त्रास होईल, तुझे बाबा जगू शकणार नाही, एकट्या बाईला आयुष्य जगणे एवढे सोपे नसते, आमच्या सर्वांचा विचार कर."

मी आल्या पावली परत फिरले.


 आई तू मला काय वाटतं असेल याचा एकदा तरी विचार केला का? ताई तू नेहमी सांगायची थोडी वाट बघ सर्व व्यवस्थित होईल, ताई लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले मी किती वाट बघायची? समीर मला मान्य आहे तुमचे माझ्यावर प्रेम नाही, तुम्ही मला बायकोचा दर्जा देऊ शकत नाही,तुम्ही माझे मित्र तर होऊ शकला असता ना, तुमच्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे आयुष्य का उध्वस्त केलेत? 


आता सर्वजण असेही म्हणतील की तू आत्महत्या करण्यापेक्षा यातून सुटण्याचे अनेक मार्ग होते ते अवलंबले का नाहीत? ते मार्ग अवलंबणे म्हणजे माझ्याच माणसांविरोधात मला लढावे लागले असते व मी माझ्या माणसांविरोधात लढू शकत नाही, एवढी ताकद माझ्यात नाही.


शेवटचे सांगते सागर, ताई, आई बाबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. फक्त एकच सांगते मी समजूतदार होते पण मला मनही होते व मनाच्या व्यथाही होत्या. त्या वेळीच तुम्ही समजून घ्यायला हव्या होत्या.

--तुमची समजूतदार श्रेया


©® डॉ सुप्रिया दिघे









🎭 Series Post

View all