Login

एका लग्नाची गोष्ट

Journey Of Love


 
  कोजागिरी पुनवेची रात्र, निरव शांतता, गंधित वारे, आकाशात पिठूर चांदणं पडलेलं,अथांग असा समुद्र ,त्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या फेसाळलेल्या लाटा सोबत तिचा शीतल सहवास आणि तीच चंदेरी हसू, त्या समुद्र किनारी एकमेकांच्या हातात हात गुंफून, तो हवा हवासा वाटणारा रेशमी स्पर्श ...
     ईशान आणि वैदेही  समुद्रकिनारी  शांत, निवांतपणे,मोकळेपणाने , एका कातळावर गप्पा मारत बसले होते. एकमेकाला वेळ देता यावा म्हणून, फिरायला आलेले ते . त्यांचं  नुकतंच लग्न झालेलं, तसं त्यांचं ठरवून केलेलं लग्न पण त्यांच्याकडे पाहता क्षणी वाटेल की त्यांचा प्रेमविवाह आहे. आपल्या भावी आयुष्याची घडी बसवण्याविषयी बोलता बोलता दोघेही भूतकाळात गेले.
           भारतात बहुतेक जणांची जशी लग्न ठरतात त्याप्रमाणेच या दोघांच लग्न ठरलं, त्यांचा साखरपुडा झाला. दोघांचीही अशी ईच्छा होती की लग्न काही दिवसानंतर व्हावं, तसे दोघांच्या घरचेही शिकलेले त्यामुळे त्यांनीही ते लगेच मान्य केलं. ईशान एका नामांकित कंपनीत सिनिअर इंजिनिअर म्हणून काम करत होता तर वैदेही पण एका कंपनीत एच आर मॅनेजर म्हणून काम करत होती. साखरपुड्यानंतर  सुरुवातीला  त्यांच्यात फोनवर औपचारिक बोलणं चालू होतं,जस जसे दिवस पुढे जात होते तसे तसं दोघेजण एकमेकांना खूप छान पद्धतीने समजू लागले. वैदेही फार गोड, सालस, लाघवी, प्रेमळ आणि तितकीच आकर्षक,मनमोहक  होती तिला संगीताबद्दल वेगळंच आकर्षण होत, तिला सुगम संगीत  फार आवडायचं जणू संगीत म्हणजे  तिचा श्वास. हेच ईशान च्या बाबतीत होत ईशान ला पण शास्त्रीय संगीत फार आवडायचं, गाण्यात तो हरवून जायचा, त्याला साहित्य वाचनाची आवड, नाटकाची आवड त्यामुळे वैदेही फार खुश होती कारण तिला तिच्या मनातला राजकुमार मिळाला होता. तिच्या ज्या काही म्हणून  मुलाबद्दलच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या होत्या. तिला आपला होणारा नवरा हा रसिक, संवेदनशील आहे याचं फार अप्रुप वाटत असे, तसही जगात फार कमी लोक रसिक आहेत, बाकीचे आपले नेहमीच निरस आयुष्य जगत आहेत. ईशानदेखील आनंदी होता कारण "सम्पूर्ण स्त्री" फार कमी लोकांना मिळते आणि त्यासाठी फार मोठं भाग्य असावं लागतं त्यातला एक भाग्यवान म्हणजे ईशान....
           अश्याच एका संध्याकाळी ईशानने वैदेहिला फोन करून भेटण्यासाठी विचारलं, तिनेही आढेवेढे न घेता हो म्हणून टाकलं. आणि बागेत भेटायचं ठरलं, आज पहिल्यांदा दोघे जण भेटणार होते, दोघेही अवघडल्यासारखे सारखे जाणवतं होते, समोरासमोर आल्यानन्तर गप्पा सुरू झाल्या, ईशान तसा रोमँटिक ही होता, वैदेही साठी आणलेला त्यानं गुलाबगुच्छ तिच्यासमोर धरला आणि म्हणाला, हा फुलांचा नजराणा , फुलासारख्या सुंदर आणि नाजूक अश्या माझ्या वैदेहीसाठी, तो नजराणा स्वीकारत ती फार गोड लाजली, ती काहीच बोलत नाहीये म्हणल्यावर तो मिश्कीलपणे म्हणाला या गुलाबाचा गुलकंद नाही झाला म्हणजे मिळवलं त्यावर
ती -  म्हणजे ???
ईशान- अत्रेंची एक कविता आठवली "प्रेमाचा गुलकंद" त्यातल्या काही ओळी आणि सारांश सांगतो,
बागेतुनी व बाजारातुनी
कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत
‘तिज’ला नियमाने.
या कवितेतला मुलगा, या कवितेतल्या मुलीसाठी रोज एक टपोरे गुलाबाचं फुल आणायचा,आणि तिला द्यायचा, त्याला असं वाटत होतं की तिला नुसतं फुल दिलं तर त्याच्या भावना तिला कळतील,म्हणजे मुद्दाम असं भावना सांगण्याची गरज नाही
वैदेही - मग ???
ईशान - मग काय,
कधी न त्याचा ती अवमानी
फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला
कधीही मुग्धपणा.
तो तिला रोज फुल द्यायचा, ती रोज फुल घ्यायची, पण त्यांच्या दिनचर्येत काही फरक पडत न्हवता , शेवटी त्याचा संयम तुटला आणि त्यानं विचारलं.
बांधीत आलो पुजा तुज मी
आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू
भक्ताचे काज.
त्यानं तिला विचारलं की मी  तुला रोज एक  गुलाबाचं फुल देतो, तरीही तुला माझ्या मनातल्या भावना कशा नाही कळल्या ??
वैदेही  - मग काय म्हणाली ती??? तिने स्वीकार केला का त्याच्या प्रेमाचा??
ईशान -   ती म्हणाली,
का डोळे असे फ़िरवता का आली
भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड
करा तोंड ”
असं म्हणून गुलाबाचा गुलकंद करून आणलेली बरणी तिने त्याच्या समोर धरली ...
वैदेही - बिच्चारा, काव्यात्मक प्रेमभंग झाला त्याचा
ईशान - हम्म्म , बिच्चारा त्यानंतर ही प्रेमाचा गुलकंद खात बसलाय..  आता आमच्या नशिबात काय येतंय काय माहीत.. असं म्हणल्यावर दोघेही एकमेकांकडे पाहतात, तिच्या नजरेच्या स्पर्शासाठी तो आतुर असतो,
वैदेही  - (लाजत) - या इतक्या सुंदर गुलाबांचा, गुलकंद बनविण्या इतकी पाषाण हृदयी नाहीये मी , कारण ही गुलाबाची फुलं ही मला खूप आवडलीयेत आणि अssss गुलाब देणाराही... 
      बघ हा अजूनही तू नाकारू शकतेस गुलाब ,असं म्हणतं मिश्किलपणे हसला.वैदेही आपल्या बॅगेतून डबा बाहेर काढते आणि त्याच्यासमोर धरते आणि सांगते,तुझ्यासाठी गाजराचा हलवा तुला आवडतो ना म्हणून आणलाय, तो हलवा खातचं त्या भेटीचा शेवट गोड  झाला....

क्रमशः ... 

© सुहास  निळकंठ (गुरव)

🎭 Series Post

View all