Login

एक झाड पैश्याचे

It's About The People Who Thinks The Once The Money Ia Taken No Need To Give It Back.
©पूजा आडेप

"अरे, तुला काय कमी आहे?"
हे वाक्य ऐकून आता माणसाला हसू की रडू हेच कळेनासे झालेय! तुम्ही लाखात कमवायला लागला की काही लोकांना वाटते की आता तुमच्याकडे पैशांचे झाडच उगवलेय. रोज सकाळी उठून एक हलकासा झटका दिला की हजार-दोन हजार गळून पडतील आणि दिवसभर उधळायला मिळेल!
"उधार घेतले? परत करायचा आहे का?"
हा प्रश्न काही लोकांसाठी अगदी हास्यास्पद आहे. कारण त्यांच्यासाठी उधारी म्हणजे दान आणि तुम्ही म्हणजे चालतं-बोलतं चॅरिटी फंड! ते तुमच्याकडून पैसे घेतील, मजेत फिरतील, घरात आलिशान वस्तू आणतील, पण पैसे परत द्यायचे नावही काढणार नाहीत. आणि वरून तुम्ही विचारले की,
"अरे हो हो, देतो की! आता काय एवढं?"
असं बोलून त्याच क्षणी विसरूनही जातील.
पण तुम्ही मात्र… रात्रभर विचार करत पडून राहणार.

'त्यांनी पैसे परत केले तर मी हे घेईन, ते करू शकतो!'
'त्यानं महागडा फोन घेतला, पण माझे पैसे परत नाही?'
'मी विचारावं का? परत मागायचं का?' जाऊ दे, नातेवाईक आहेत…
मग काही दिवस जातील. पुन्हा त्यांना महागड्या हॉटेलमध्ये जेवतांना पाहाल. नवीन फोन घेताना पाहाल. अजूनही पैसे परत नाही. आता काय बोलायचं?


"तुला काय कमी आहे? तू परदेशात असतोस!"
हा अजून एक प्रहार. कोणीतरी तुम्हाला पैसे मागायला आले आणि तुम्ही "नाही", म्हटलं तर लगेच वाक्य तयार –
"तुला काय कमी आहे? तू परदेशात असतोस! तिथे पगार मोठा असतो!"
हो, पगार मोठा असतो, पण खर्चही मोठा असतो हे त्यांच्या डोक्यात शिरत नाही. घर भाडं, बिलं, इन्शुरन्स, टॅक्सेस, आणखी शेकडो गोष्टी असतात. "लाखात पगार" म्हणजे लाख मोकळे पडलेले नाहीत हो!

"आई-बाबांना देत असशीलच ना?"
हाच अजून एक नमुना. काही लोक तर तुमच्या आई-वडिलांनाही गिल्टी फिलिंग देतात.
"तुमच्या मुलाला खूप पैसे मिळतात, ना? तुम्ही ऐष करायला पाहिजे!"
"तो तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतो ना?"
आणि मग आई-वडीलही विचार करतात,
"खरंच का तो कमी देतोय? आम्ही काही मागत नाही, पण आमच्या नातवंडांसाठी तरी…"
मग त्यांचा भोळेपणा त्यांना दुसऱ्यांना पैसे देण्यास भाग पाडतो. दुसऱ्याला मदत करण्यासाठी स्वतःच्या मुलाचीच गळचेपी करतात! पण जेव्हा त्याच मुलाला गरज भासते, तेव्हा ते लोक गायबच असतात!


"एकदा मदत केली की, ती तुमची जबाबदारी ठरते!"
खरंच! काही लोकांना एकदा मदत केली की, ते पुढचं आयुष्य याच फायद्यावर जगायचं ठरवतात.
"त्या वेळी मला मदत केली होती, आता अजून एकदा कर… आणि अजून एकदा… आणि अजून…"
हे एक "कधीही न संपणारं विनाकारण लादलेलं ओझं" आहे.

कुठे चूक होते?
आई-वडिलांची अपेक्षा – किती योग्य किती अयोग्य?
आई-वडील मुलांवर प्रेम करतात, त्यांच्यासाठी त्याग करतात हे नक्कीच खरं! पण कधी कधी त्यांच्या अतिरेकी अपेक्षा त्या मुलाचं ओझं बनतात.

मोठ्या मुलाने घरासाठी जबाबदाऱ्या घ्याव्यात – अगदी बरोबर!
पण बाकीची भावंडं मात्र जबाबदारी न घेता फक्त मजा करतात – हे चुकीचं!

घरासाठी मोठ्या मुलाने/मुलीने योगदान दिलं पाहिजे, पण तोच एकटाच सर्व जबाबदाऱ्या वाहतोय, आणि बाकीच्यांनी सुट्टी घ्यायची?

मोठ्या मुलाच्या नावाने कर्ज घेतलं जातं, बाकीचे मात्र हात झटकतात!

तो पैसा कमवतोय, पण घरातल्या सगळ्या गरजा त्यानेच भागवायच्या?

भाऊ/बहीण ऐष करणार, आणि मोठ्याने मात्र वडिलधार्‍यांसारखं वागायचं?

"जरा विचार करा – तुमच्या जबाबदाऱ्या त्या मुलानेच उचलायच्या असतील, तर त्याला स्वतःचं आयुष्य आहे की नाही?"
मग उपाय काय?
- उधार दिलेले पैसे परत मागा.
- "नाही" म्हणायला शिका. नाही म्हणजे नाही! तुमच्या मेहनतीचे पैसे फुकट वाटायला तुम्ही ATM नाही!
- आई-वडिलांना समजवा.
- पैसे उधळण्यापेक्षा भविष्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
- मोठ्या मुलालाच ओझं का वाहायचं? प्रत्येकाने योगदान द्यायला हवं!
- आणि सर्वात महत्त्वाचं – भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका!
- सगळ्यात सोप्पे...
कमावणाऱ्या मुलाने/मुलीने सरळ सांगावे की, "पैसे आई-वडिलांकडे असतात. दोघेही खूप स्ट्रिक्ट आहेत!"
आईवडिलांनी सांगावे – "आमच्याकडे नाहीत बाबा. त्याच्याकडेच सगळा व्यवहार आहे."

शेवटी…
"लाख कमवतोय म्हणजे त्याचं कसंही चालेल!"
"मोठा आहे ना? जबाबदारी त्यानेच घ्यायची!"
"आई-बाबांनी सांगितलं म्हणजे ऐकायलाच लागेल!"

"मी स्वतःसाठीही काहीतरी कमावलं पाहिजे."
"सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी!"
"कुणाच्याही अपेक्षांच्या ओझ्याखाली माझं आयुष्य वाया घालवणार नाही!"

पैसे कमावणं सोपं नसतं. नाती जपणंही सोपं नसतं. पण तुम्ही तुमचं आयुष्य आणि स्वप्नं "लोक काय म्हणतील?" या विचाराने चालवणार असाल, तर त्यांचं ऐकत ऐकतच दिवस निघून जातील… आणि तुम्ही विचार करत राहाल… "अजून किती?"

© पूजा आडेप.

कथा नावासह शेअर केल्यास पुण्य लागेल की नाही माहिती नाही पण आयुष्याचे कल्याण नक्कीच होईल.