Jan 26, 2022
नारीवादी

एक वाण सुखावणारे

Read Later
एक वाण सुखावणारे

सोसायटीच्या आवारात नम्रता आजी  नातवाला घेऊन बसल्या होत्या... नातू फूटबॉल खेळण्यात मग्न होता आणि नम्रता आजी जुन्या आठवणीत रमल्या होत्या आज..आज प्रकर्षाने त्यांना त्यांच्या नवऱ्याची कमी जाणवत होती..रघु  आजोबा  जे हयात न्हवते..ऍकसिडेंट झाला होता त्यांचा गेल्यावर्षी  आणि त्यात ते दगावले होते...


वय वर्ष साठ असले तरी उत्साह दांडगा होता त्यांचा..सोसायटीचा हळदी कुंकू असला की मंगळा गौर काही चुकवायच्या नाही.ओठावर येईल अशी भली मोठी नथ.. किणकिण वाजणाऱ्या त्या हिरव्यागार बुट्टीची डिजाईन असलेल्या बांगड्या..काय त्यांचं रूप ..
आज सोसायटीच्या बायकांनी हळदी कुंकू ठेवले होते.एक एक करून बायका नटून थटून येत होत्या..आजी सर्वांचं रूप न्याहळत होत्या..त्याच सोसायटीत नवीन बिऱ्हाड राहायला आले होते..मधू नाव होते त्या बाईचे.. नवरा ,दोन मुलं आणि ती असा तिचा संसार  होता..मधू कामाला जायची पण येता जाता नम्रता आजीशी थोडं फार का होईना गप्पा मारायची..


आजही मधू लगबगीने आली आणि नम्रता आजींना तिने सात वाजता घरी या म्हणून सांगितले. नम्रता आजींनी कारण विचारले तर म्हणाली "आधी घरी या,काम आहे"..नम्रता आजीने होकार कळवला.

सात वाजले ..नम्रता आजी मधूकडे गेली.पाहते तर काय मधूने घरी  हळदी  कुंकुवाचा कार्यक्रम ठेवला होता..नम्रता आजी म्हणाल्या"काय गं पोरी तुझ्या घरी हळदी कुंकू आणि मला कशाला बोलावलंस...

मधूने स्मित हास्य केले आणि म्हणाली आजी बसा आधी...नम्रता आजी सोफ्यावर बसल्या..मधूने हळदी कुंकुवाचा करंडा घेतला आणि आजीला लावलं..नम्रता आजी म्हणाल्या "अगं पोरी काय करते ,कळते आहे का तुला???

मधू:"हो आजी सगळं कळतंय मला...

आजी:"काय खूळ तुम्हा आज कालच्या  पोरींचे"

मधू:"आजी खूळ तर खूळ "पाहिजे तर वेडी म्हणा...

आजी:"कसं समजउ तुला???

मधू:"आजी माझी आजी पण ना तुमच्यासारखीच दिसायची .पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला पाहिले ना तेव्हा मला माझ्या आजीची आठवण आली..मी माझ्या आजीची लाडकी..शेंडफळ  असल्याने माझे लाड जरा जास्तच होत होते..मी लहानपणापासून पाहते .हा हळदी कुंकुवाचा  कार्यक्रम.. माझ्या आजीला तर फार भारी वेड..महिनाभर आधीच तिची तयारी असायची.. बायकांना कोणतं वाण द्यायचे,कोणती साडी नेसायची..घराची साफसफाई ,तीळ गुळाचे लाडू ..खूप आवडीने करायची अगदी मन लावून.. ती तयार होऊन आली ना अगदी लक्ष्मीचे रूप.चेहऱ्यावर काय चैतन्य असायचे..आम्हा नातवंडांची तर मज्जा असायची..त्या दिवशी आजी पुरणपोळीचा स्वयंपाक करायची. आम्हाला किती प्रेमाने भरवायची..हळदी कुंकूचा दिवस म्हणजे आमच्या घरात मोठा सण असायचा..कधी एकदाचं हळदी कुंकू येते असे व्हायचे..

सर्व दिवस सारखे नसतात..माझे आजोबा एका आजाराने देवाघरी गेले.. त्या दिवशी आजीचं रूप पाहून मन उदास झालं..राग तर मला खूप आला माझ्या अजिच्या हातातल्या बांगड्या निघत न्हवत्या तरी बाजूच्या बायकांनी फोडून काढल्या... आजीच्या गळ्यातल मंगळसूत्रही लगेच काढले.. मी तर पाहतच बसले आजीचे रूप..आजी जोरजोरात रडत होती तरी कोणालाच दया येत न्हवती..पहिल्यांदा मी रडताना पाहिले माझ्या आजीला.नेहमीच हसरा चेहरा ठेवणारी माझी आजी आजोबांच्या जाण्याने हिरमुसली..त्यांनतर मी कधीच आजीला हसताना पाहिले नाही...


हे सर्व बोलत असताना नम्रता अजीचेही मन भरून आले ..कारण मधूच्या आजीची आणि नम्रता आजीची परिस्तिथी सारखीच होती..

मधू पुढे बोलू लागली..

आजोबा गेल्यावर माझ्या आईने हळदी कुंकू ठेवले होते..तो दिवस आजही लक्षात आहे..माझी आजी रूममध्ये बसली होती..शेजारच्या बायका आल्या,आई कार्यक्रम करत होती.मी आजीपाशी बसली होती ..आजीने आजोबांचा फोटो कवटाळला आणि खूप रडू लागली..आजीची तगमग ,त्रास बघवत न्हवता..मी सुद्धा आजीला बिलगून रडू लागली.पण तेव्हा माझ्या बालमनाला  प्रश्न पडला "आजोबा देवाघरी गेले आहे आजी तर इथेच आहे, आजीला हळदी कुंकू लावू शकतात ह्या बायका मग असे का???

ह्या प्रश्नाचे उत्तर हळुहळु कळले..त्यांनतर जेव्हा पण हा कार्यक्रम असायचा तेव्हा आजी आपली दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसायची आणि आजोबांच्या फोटोकडे पाहून रडायची.. इतके वर्ष सणासारखा वाटणारा हा कार्यक्रम आता मला नको वाटायचा कारण माझी आजी त्या दिवशी जास्तच दुःखी असायची..

मी आईला बोलायचे आई नको करत जाऊ तू हा कार्यक्रम,मला आई बोलायची"असे अभद्र बोलायचे नाही"आपण दरवर्षी करतो त्यात खंड पाडायचा  नाही..आजीही मलाच बोलायची असे बोलू नये.सुवासणींचा मान असतो.मन खिन्न व्हायचे...त्यामुळे आजी मी माझं लग्न झाल्यापासून कधीच हळदी कुंकू ठेवले नाही..अजिसुद्धा काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली पण जेव्हा जेव्हा हळदी कुंकू असते तेव्हा तेव्हा माझ्या आजीचं रडणं कानात घुमतं.. सगळं काही आठवतं. कमजोर होऊन जाते मन ते सारं आठवून..आजी मी माझ्या आजीला हा मान देऊ शकले नाही..पण ती हयात असती तर नक्कीच तिलाही पुन्हा ते क्षण जगण्याची संधी दिली असती.माझ्या नशिबी न्हवते ते..पण तुमच्या रूपाने असे वाटले माझी आजी परत आली ..म्हणून आज मी तुम्हाला आवर्जून बोलावले..

असे बोलून नम्रता रडू लागली.नम्रता आजीने मधूच्या डोक्यावर हात ठेवला.अजीसुद्धा निशब्द झाली होती..आजी आणि मधूने एकमेकींचे दुःख आज हलके केले होते...


मधूने आजीसाठी पुरण पोळी बनवली होती.नम्रता आजीने मधूला स्वतःच्या हाताने घास भरवला ,तशी मधू गहीवरली..किती वर्षांनंतर तिने  हळदी कुंकुवाचा सण उत्साहाने साजरा केला होता..मधूला आजी भेटली होती आणि आजीला एक गोड नात भेटली होती...

©®अश्विनी कुणाल लेख आवडल्यास नावासहीतच share करा..like.comment जरूर करा.मला फॉलो करा..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..