एक स्त्री

Never ignore a woman..

विषय : स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

शीर्षक : एक स्त्री

ऊऽऽहूऽऽगुर्टऽऽगूऽऽऽऽगुर्टऽऽगूऽऽऽऽआवाज काही केल्या थांबेना. बहूदा बेल अडकली वाटतं. विशाल चकीत झाला. दोन तीनदा त्याने डोअर बेलच्या बटणावर थाप मारली. काय झालं ह्या डोअर बेलला...ही अशी का आवाज करतेय? थोड्या वेळाने आवाज थांबला पण दार कुणी उघडले नाही. अरे बाबा हे काय चालवले आहे. इर्मजन्सीच्या वेळेसच सगळे प्राॅब्लेम होतात. त्याने पोटाला हात लावत पुन्हा एकदा डोअरबेल करकचून दाबली. ऊऽऽहूऽऽगुर्टऽऽगूऽऽऽऽगुर्टऽऽगूऽऽऽऽ

आता मात्र विशालचा "पोटा"वरचा ताबा सुटू लागला. तो पायांची चुळबुळ करत कधी मागे कधी पुढे हात लावत हलू लागला. आणि त्याने जोरजोरात दारावर थापा मारल्या. सोबतच, "वैशु दार उघड पटकन...इर्मजन्सी आहे गं...!" मोठ्याने दोन तीनदा म्हणाला. त्याच्या आवाजाने पटा पट पहिल्या मजल्यावरच्या तीनही फ्लॅटची दारं उघडलीत. एक क्षण विशालला लोखंडी जाळीच्या दारातून बघणारे मनुष्य, पिंजर्‍यातील पाळीव प्राणी भासले.

"काय झाले..? का उघडत नाहीये वैशु दार..?" 

राधा काकूंनी विचारले. 

"अहो, त्याला माहिती असते तर तो दाराबाहेर उभा असता का..? तुमचं आपलं काही पण विचारणे...!" काका अगदी तिच्या मागे उभे राहून तिच्या कानात मोठ्यांदा म्हणाले. 

डोळे वटारुन काकूंनी त्यांच्याकडे बघितले,

"अन् चला आत...स्वतः बहिरे, दहादा आवाज दिल्या वर 'ओ' देणारे, हे बरं पटकन ऐकले...आणि आता माझे कान पण उद्धवस्त करायला निघाले." 

कुतूहल जागीच राहिल त्यांचं आणि दारा आडून घरात, काका काकूंच्या शाब्दिक तांडव नृत्याची विशालला जाणीव झाली.

दुसर्‍या फ्लॅटवाल्यांनी निमूटपणे हे सगळं बघितले. आणि धाडकन दार, जणू विशालच्या तोंडावर बंद केले. 

तिसर्‍या फ्लॅटवाला भलताच कुतूहल घेऊन जन्मास आलेला. इत्यमभूत माहिती जवळपासच्या सगळ्यांची त्याच्याजवळ असायची. बिल्डींग मधला खबर्‍या तो...! 

"थांबा थांबा मी येतो मदतीला..." त्याने जणू विशालला "स्टॅच्यू" करुन ठेवले होते. दोन बोटाने इशारा करुन.

लगेच त्याने बाजूच्या कि हँगरवरचा मास्क कानाला अडकवून तो बाहेर आला. "हां आता बोला...काय झाले...?" त्याचा चेहरा गंभीर झाला होता. चेहर्‍यावर प्रश्न चिन्हं स्पष्ट दिसत होते.

"अरे भावा, मला सगळं, म्हणजे ह्या दारापलिकडचं माहित असतं तर मी कशाला इथे उभा असतो? इर्मजन्सी आहे रे...वैशुला काय झाले माहित नाही. बराच वेळ झाला दारच उघडत नाहीये." तो बेचैन झाला होता. 

आता इर्मजन्सी विसरु पाहत होती त्याची आणि काळजी वाटू लागली त्याला वैशुची. "अरे मित्रा, बेल तर वाजवायची ना....!" म्हणत प्रसादने डोअरबेल दाबली. आणि, हॅऽहॅऽहॅऽ ह्याऽऽऽहॅऽहॅऽहॅऽह्याऽऽऽ "अरे बाबोऽऽऽ.." म्हणत प्रसाद मागे त्याच्या दाराकडे पळाला. 

विशालही दचकला...हे काय झाले. आज ही डोअरबेल अशी का वाजतेय...? 

प्रसाद घाबरला पण त्याचे कुतूहल त्याला थांबवत होते. "मित्रा काही तरी गडबड आहे तुझ्या घरात...." तो विशाल कडे बघत म्हणाला. विशालनेही प्रसाद कडे बघितले, तोही नेमका हाच विचार करत होता. असं का होतय...? 

विशालची इर्मजन्सी पार दूर पळाली आणि त्याची जागा काळजीने घेतली. माझी वैशु ठिक तर असेल नां...? "वैशु वैशु दार उघड....अगं झोपलीस का ? काही झालय का तुला? अजून कुणी आहे का सोबत तुझ्या....वैशु, यार उघड नां दार...!" तो काळजीने बोलला. 

"अहो वैशु वहिनी उघडा हो दार...असं नका करु, कशाचा राग आला तुम्हाला? विशालने रागावले होते का तुम्हाला?" प्रसाद दार वाजवत म्हणाला. 

"अरे प्रसाद, रागवायला मी का घरी होतो..? काल मला इर्मजन्सी मध्ये दुसर्‍या गावी जावे लागले. तसे काही झाले नाही..!" विशाल म्हणाला. 

"अस्स होय, तुमची ही इर्मजन्सी कालही होतीच का...? आणि काय रे इर्मजन्सी मध्ये माणूस पटकन विसर्जन स्थळ शोधतो. तू तर दुसर्‍या गावी जातोस...वाह रे व्वा...मित्राऽऽऽ" 

"चल जोक्स नको मारु..." तेव्हढ्यात खाडकन दार उघडले.

दारातून वैशु स्थिर नजरेने त्यांच्याकडे बघत होती. "अगं, तू तर ठिक आहेस. झोपलेली पण वाटत नाहीयेस. मग काय करत होतीस एवढा वेळ..." विशालच्या काळजीची जागा रागाने घेतली. "उघड पटकन दार, येऊ दे आत..."पुन्हा त्याची इर्मजन्सी उसळली होती. 

पण वैशूने त्याच शांतचित्ताने कडी काढली. एक नजर तिच्याकडे बघत तो तिला बाजूला सारुन धावतच टाॅयलेट कडे गेला. "या ना आत या..! तुमचीच वाट बघत होते मी...!" वैशूने प्रसादला हाताच्या इशार्‍याने आत बोलावले. खुर्चीकडे बोट दाखवले. तसा प्रसाद हळूच आत येऊन खुर्चीवर विराजमान झाला. एवढ्या अदबीने त्याला आज वैशु सारख्या सुंदर मुलीने आपल्या घरात बोलावले. तो हा सन्मान आज घेणारच होता.

"वहिनी..." प्रसादचे शब्द तोंडातच राहिले. हळूवार मदमस्त चालत, मोहक हसत, वैशू आत किचन मध्ये गेली. 'व्वा वहिनी तर कमाल आहे. मला तर माहितच नव्हते वहिनींना मी आवडतो...!' तो मनातल्या मनात पुढे काय होणार...मांडे बनवत होता. 

इतक्यात रिकाम्या झालेल्या पोटावरुन हात फिरवत विशाल हाॅल मध्ये आला, आणि त्याला म्हणाला. "काय प्रसाद आजकाल तू बातम्यांची खिरापत वाटत, फिरताना दिसत नाहीयेस. काय सुरु आहे? आणि हो तो मास्क काढं आता, नाही घातलास तरी चालेल." डोकं हलवतं प्रसादने मास्क काढला. आज मला इथेच बातम्यांच घबाड मिळणार आहे बहूदा. भाभीऽऽओऽऽभाभीऽऽ...प्रसादचे विशालच्या बोलण्याकडे लक्षचं नव्हतं. 

तेव्हढ्यात वैशु नजाकतीने चालत, हातात ट्रे घेऊन बाहेर आली. त्यात दोन ग्लास पाणी एक कप चहा आणि एक कप काॅफी होती. ट्रे टिपाॅय वर ठेवला आणि त्यातला पाण्याचा ग्लास हातात घेऊन प्रसाद समोर आली. 

"पाणी..." त्याच्यापुढे तिने ग्लास धरला. खरे तर विशालने तिच्याकडे बघत ग्लास घ्यायला हात पुढे केला होता. पण तिचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. त्यानेही ओशाळून दुसरा ग्लास उचलून ओठांना लावला. आणि ग्लास हातात पकडून प्रसाद समोर उभ्या असलेल्या वैशुच्या चेहर्‍याकडे त्याचे लक्ष गेले आणि कुठेतरी त्याच्या काळजात "खट्ट" झाले. 

वैशु मोहक गालातल्या गालात हसतं प्रसाद कडे बघत होती. तिला आपल्याकडे तसे बघताना बघून, प्रसाद आतून मोहरला पण लगेच त्याच्या लक्षात आले, विशाल आपल्याकडे बघतोय...प्रसाद सावरला. पटकन तिच्या हातून ग्लास घेऊन घटाघटा पाणी प्यायला. परत तिने हात पुढे केला आणि प्रसादच्या हातून ग्लास घेतला. मग चहाचा कप उचलून तिने पुन्हा गूढ हसत प्रसादच्या हातात कप दिला. "तुला चहा आवडतो नां प्रसाद...?" तिच्या शब्दांमध्ये मार्दव होतं. आता मात्र प्रसाद मनातून चरकला. समोर तिचा नवरा विशाल बसला आहे. आणि ही नवर्‍या समोर माझ्याशी लगट का करतेय...?

अच्छा, ह्या प्रसादच्या आवडीचा इतका विचार करतेय वैशु...? का....? माझ्या माहिती प्रमाणे, प्रसादला ती अजिबात लाईक करत नाही. मग...? विशालला बोधच होत नव्हता, ही अशी का वागतेय...? 

खाली बघत प्रसाद चहा पीत होता. मनात आनंद उकळ्या घेत होते. पण विशालला काय वाटेल म्हणून तो जरा वरवरुन शांत आहो, असे भासवीत होता. वैशु त्या दोघांच्या समोर खुर्चीत बसली. तिचे पुर्ण लक्ष प्रसाद कडे होते. खुप प्रेमाने ती त्याच्या कडे बघत होती. मनाला बजावले तरीही प्रसादचे मन काही ऐकेना....त्याने नजर उचलून वैशु कडे बघितलेच. "चहा कसा झाला, नाही सांगितले प्रसाद? साखर हवी का अजून? तुला गोड लागतो नां चहा..?" नजरेला नजर भिडताच वैशुने मोहक हसत विचारले. "हो...ठिक आहे....म्हणजे गोड...छान... झालाय चहा...!" प्रसाद चाचरत बोलला. मधूनच त्याने विशाल कडे बघितले. विशालच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले होते आता. गंभीर चेहर्‍याने तो वैशुला तर कधी प्रसादला बघत होता. 

"तुझी तब्येत बरी आहे का..?"

"प्रसाद तुला अळूची वडी आवडते नां? आज मी बनवते, माझ्या हाताने खाऊ घालते तुला...!"वैशु प्रसादकडे बघत बोलली. आता मात्र विशालला फारच राग आला तिचा. मी तब्येत विचारतोय आणि ही माझ्याशी नं बोलता, त्या फालतू प्रसाद सोबत काय बोलत आहे मघा पासून. "वैशु मी घरात तुझ्या समोर आहे म्हंटलं. दिसतय ना तुला? काहीतरी विचारतोय तुला...? वैशुऽऽ" 

"काय...काय झाले तुला ओरडायला विशाल...? अरे, प्रसाद भाऊजी तुम्ही कधी आलात...?" चमकून वैशु म्हणाली.

ती दोघांकडे बघतेय....प्रसादचा चहाचा कप हातातून निसटून खाली पडून फुटला.....विशालने कसा बसा काॅफीचा कप टिपाॅय वर टेकवला. दोघेही डोळे विस्फारुन तिच्याकडे बघू लागले.....ती जणू झोपेतून दचकून उठलेली भासत होती.

"अरे का बरं..प्रसाद भाऊजी काय झाले? बरं ठिक आहे, तुम्ही बाजूच्या सोफ्यावर बसा मी हे सगळं उचलते."तिने पटकन गॅलरीतून डस्टपॅन आणला आणि कपाचे तुकडे उचलले. नंतर ओला कापड घेऊन आली. सांडलेला चहा पुसून घेतला. हात नॅपकीनने पुसत बाहेर आली. स्वतःला तिथल्या आरश्यात बघितले. आणि गूढ हास्य चेहर्‍यावर आणत,"बड़े..दिनों के बाद...प्रसाद बाबू आये है...! और मैं बावरी...घर के कामों मे लगी हूँ....। मेरे ढोलनाऽऽ सुनऽऽमेरे प्यार की धुनऽऽ" गुनगूनली आणि वळून एकटक प्रसाद कडे बघून मोहक, पण मोठ्ठ्याने हसली, हाऽऽहाऽऽहाऽऽहाऽऽ.

आता मात्र प्रसाद आणि विशाल गर्भगळीत झाले. दोघेही घामाघुम झाले. डोळे विस्फारुन वैशु कडे बघू लागले.

वैशु पुन्हा प्रसादकडे बघून म्हणाली. "तुला भूक लागली असेल....नाही?" प्रसादने घाबरुन नाही मध्ये मान डोलावली. 'वैशुताई तुला काय झाले बाई...मी काय समजत होतो...आणि हे तर भलतच काही दिसतयं...मला काही नको ताई....!' मनातल्या मनात प्रसाद बोलला. "थांब हां लवकर काही बनवते. अळूच्या वड्या आणिक काय हवं..? बरं आठवले तू मला त्यादिवशी म्हणाला होतास.'रमा...तुझ्या हातचा केळी घातलेला शिरा खुप आवडतो मला...वरुन बदामाचे काप...आ हा हा...' आत्ता बनवते हां...बस, तुला माझी अनुपस्थिती थोडी झेलावी लागेलं...!" मोहक हसत, गजगामीनी सारखी चालत वैशु उर्फ रमा किचन मध्ये गेली.

दोघेही आता करंट लागल्यागत जागीच खिळले होते. म्याँवऽऽम्याँवऽऽम्याँवऽऽकिचन मधून शातंता भंग करणारा, धडकी भरणारा मांजरीचा आवाज आला. तत्क्षणी दोघांनीही बाहेरच्या दाराकडे धाव घेतली. प्रसाद घाईघाईने दार ऊघडायचा प्रयत्न करु लागला. विशाल इकडे तिकडे बघत होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. आणि दार काही केल्या उघडत नव्हते. कारण ते लाॅक केलेले होते...!

"अरे, हे काय करताय तुम्ही दोघे...?" मागून आवाज आला तसे दोघेही घाबरुन जागीच थांबले. तिच्याकडे वळून बघत विशाल म्हणाला,"अगं...अहो...वैशु...नाही नाही...रमा, ते असचं जरा गरम होत होतं म्हणून दार उघडायचं होतं...!" 

"अस्स होय, मला का नाही बोलले..व्हा बाजूला, बसा तिकडे सोफ्यावर...मी उघडते दार..." दोघेही पटकन सोफ्यावर बसलेत. वैशुने दार उघडत म्हंटले, "काय आहे नां, तुम्हाला कळत नाही. ज्याच घर असतं त्यालाच ते उघडता येतं...बघा, रमाने कसे पटकन दार उघडले...!"

"बसा इथेच मी जेवण बनवते आता..."

कावऽऽकावऽऽकावऽऽ"अरे आज बहूदा भरपुर पाहूणे येणार आहेत वाटतं आपल्या घरी...!" बाहेर कावळ्याकडे एक नजर टाकत बडबडत ती किचन मध्ये गेली.

प्रसाद आणि विशाल आंघोळ करुन आल्या सारखे ओले झाले होते. म्हणजे एका पेक्षा जास्त....पाहूणे...येणारेत घरी.....दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवला होता. थोड्या वेळाने, विशालच्या हे लक्षात आल्यावर त्याने प्रसादचा हात झटकला. त्या सरशी प्रसादने त्याच्यापुढे हात जोडलेत, हळूच कुजबुजत त्याला म्हणाला,"मित्रा वाचवं मला...मला माझ्या आईबाबांजवळ जायचे आहे रे...म्हातारे आहेत ते...माझी बायको सुद्धा वाट बघत आहे रे...मला वाचवं मित्रा...सोडवं मला इथून, मी ह्या नंतर कुणाच्याच फंदात पडणार नाही रे मित्रा...भावा...मला इथून बाहेर काढं...बघ ही तुझी बायको आहे. ती तुला काही करणार नाही. पण माझं काही खरं वाटत नाही. कबूल करतो, मला वहिनी आवडते, पण कानाला खडा आता...कधीच बघणार नाही मी वळून तुझ्या घराकडे...तुझ्या पाया पडतो....वाचवं रे मला...!"

प्रसाद खरेच त्याच्या पाया पडू लागला. 

"अरे असा काय करतो मित्रा...काही नाही होणार तुला...आणि हो, ती माझी बायको आहे. ती ऐकेल माझं...मी बघतो काय करायचे ते, तू जा बाहेर. नाही, असं करुया मी पण तुझ्या सोबत येतो बाहेर..." विशालही मनातून घाबरला होता. 

पण बोलता बोलता त्याचे लक्ष लग्नातल्या फोटो कडे गेले. त्या फोटो भोवती त्यांचे आठवणीतल्या सुरेख दिवसांचे फोटो वेढा घालून होते. बघितल्यावर त्याला वाटले, आपणही प्रसाद सारखे घरातून बाहेर पडायला नको. किती प्रेम करते माझ्यावर ती. हवं नको बघते. घर सांभाळ म्हंटले तर नोकरी सोडून घरी लक्ष देते. निदान आता तिला सोबत करायला हवी. जे काही असेल त्याचा छडा लावायला पाहीजे. तिला ह्यातून बाहेर काढायला हवे. योग्य तो उपचार करायला हवा....नाही, मी माझ्या वैशुला सोडून कुठेच जाणार नाही...!

मग त्याने चुप राहण्याचा इशारा करुन हळूच प्रसादला उठायला सांगितले. दोघेही पायांचा आवाज न करता, दारा पर्यंत पोहोचलेत. हळूच विशालने दार उघडले. प्रसादला बाहेर जायचा इशारा केला. प्रसाद दबक्या पावलांनी दारात पोहोचला. दाराबाहेर पडणार एवढ्यात..."प्रसाद भाऊजी निघालात...?" थरथरत प्रसादने मागे वळून बघितले. कसंनुसं हसत, त्याने मान डोलावली. इतका घाबरला होता की त्याचे पाऊलही पुढे उचलत नव्हते. 

पुन्हा वैशु म्हणाली,"ठिक आहे भाऊजी या....!" "नाही..नाही...जाऊ द्या....आता..."त्याने हात जोडले आणि घाबरुन म्हणाला. तिने हसत त्याच्याकडे बघितले. 

"बरं बरं जा..भाऊजी" तो जणू तिच्या आज्ञेची वाटच बघत होता. आधी हळू मग सूसाट धावत आपल्या फ्लॅटमध्ये घुसला आणि दार बंद केले.

"अरे विशाल काय तू पण, बाहेर गेला की मला विसरुनच जातो. 

कसा झाला तुझा दौरा...?" तिने विशालचा हात पकडत त्याला आत ओढले. दार बंद करुन घेतले. विशालच्या तोंडून आवाज निघत नव्हता. "अरे काय झाले तुला? तब्येत बरी नाही का? असा का घामेजला तू...?बरं अस कर छान आंघोळ करुन फ्रेश हो. मग जेवण करुया मिळून. चल जा पटकन आंघोळीला."

त्याचा घाम पदराने पुसत ती म्हणाली.

"वैशु...वैशु...तू ठिक आहेस नां...काही होतय का तुला...?" कातर होता त्याचा आवाज.

"अरे नाही, काही नाही झाले मला...ठणठणीत आहे मी."

"वैशु मला माहित आहे तुला एकटीला बोर होत घरी. पण मला प्रमोशन मिळवायचं आहे. आणि तसेही ह्या पेंडामीक मध्ये खुप जणांच्या नोकर्‍या गेल्यात. माझ्यावर ही वेळ येऊ नये असं मला वाटतं. म्हणून आॅफीस वर्कला मी प्रायोरीटी देतो नेहमी....!" तो हळवा होत म्हणाला.

"अरे हो मला माहित आहे. मी पण आता तुझ्या मागे न लागता 'घरातच' लक्ष द्यायचा प्रयत्न करते....जा फ्रेश हो...!"

आंघोळ करता करता विचार करत होता विशाल, कुठे चुकलं माझं? हे काय होऊन बसलं! वैशु ला कुणी तरी झपाटलं...? ही रमा कोण...? आणि ते विद्या बालनचं गाण का म्हणत होती...म्हणजे बालनही....वैशुच्या अंगात...? पण कसं शक्य आहे हे.....नाही, आता छडा लावायलाच हवा. मी आताच मेल करतो आॅफीसमध्ये रजेचा. मला माझी वैशु परत हवी. कुठे बरं नेऊ हिला....हां वैशु म्हणाली होती, दार्जीलिंगला फिरायचे आहे तिला. चल आज रात्री बुकींग करतो. जमल्यास उद्याचेच तिकीट काढतो. आणि मग पुढचं पुढे बघतो. त्याने ठाम निर्धार करुन मग शांतचित्ताने आंघोळ केली. वैशुने दोन ताट वाढले होते. दुसर ताट बाजूला सारत विशाल म्हणाला,

"चल आज एकाच ताटात जेऊ...."

"अरे असं कसं काय आज..."

"बरं वैशु मी आताच तिकीट बुक करतो तुझ्या आवडत्या डेस्टीनेशनची...ओळख पाहू...कोणत ठिकाण ते...?"

"अरे, कशाला उगाच पैसे आणि वेळ वाया घालवायचा. राहू दे, मी उगाच तुला काल बोलले...आता मी माझा आनंद शोधते नां घरातं. माझी काही तक्रार नाहीये...!" वैशु त्याच्या डोळ्यात बघत गूढ हसली.

एक क्षण शहारला विशाल. पण दुसर्‍याच क्षणी तिला म्हणाला."मी तुझ्या सोबत आहे...आपण मिळूनच आनंदी राहू...आपण उद्या जाणार आहोत दार्जीलींगला...!"

"वा वा माझे स्वप्नातले ठिकाण...मला आवडेल तुझ्या सोबत तिथे जायला....चल पटापट जेवण आटप आणि लवकर बुकींग कर...!" दोघांनीही घाईने जेवण केले. वैशु किचन आवरायला गेली आणि विशालने लॅपटाॅप उघडला. बुकींग झाल्याचे त्याने ओरडून वैशुला सांगितले. खुप आनंदली वैशु.

विशालने बुकींग तर केली. पण तो जरा वैशुला मनातून घाबरला होता. त्याची पटकन तिच्या जवळ जायची. तिला स्पर्श करायची इच्छा होत नव्हती. आता थोड्या वेळापुर्वी जो "थरार" वैशुच्या वागण्यामुळे झाला होता. तो सारखा त्याच्या नजरे समोर येत होता. त्याला वाटत होते, वैशु कधीही "रमा"च्या रुपात येऊ शकते. म्हणून तो बेडरुम मध्ये जायला कचरत होता. 

वैशुने इकडच्या तिकडच्या गप्पा करुन त्याला मोकळे करायचा प्रयत्न केला. पण तिला जाणवले, आपल्या प्रेमा पोटी ह्याने लगेच सगळे कार्यक्रम बाजूला सारुन, मला प्राधान्य दिले. म्हणजे मी जो विचार करत होते, 

'माझं विशालच्या जीवनात महत्व नाहीये...ते फोल ठरले...!'

पुन्हा काही विचार करुन तिने, लॅपटाॅप उघडला. विशाल तिच्या प्रत्येक कृती कडे बघत होता. तो मनातून धास्तावला आहे...हे तो चेहर्‍यावरुन तिला दाखवत नव्हता. मग तिने विशाल समोर लॅपटाॅप ठेवला. त्याचा गळा सुकला होता आता, कसा बसा आवंढा गिळत तो तिला म्हणाला,"काय दाखवतेस वैशु...?"

ती शांत भासत होती...चेहर्‍यावर तिच्या गूढता डोकावत होती. आणि हलकेच गूढ हसत ती म्हणाली.

"प्रसाद, अरे आधी बघ तर तुला मी काय दाखवते ते...! तुला प्रश्नच भारी पडतात...!"

पुन्हा एकदा चेहर्‍यावर गूढता घेऊन ती गूढ हसली....

गपगार झाला विशाल....आली वाटतं रमा...काय करु मी...? कसे सांभाळू आता....गळा तर आधीच कोरडा झाला होता त्याचा. तो गळ्या वरुन हात फिरवत कधी तिच्याकडे कधी बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासकडे बघत होता. तिच्या ते लक्षात आले. लगेच पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे धरत ती म्हणाली."घ्या नां पाणी...घसा ओला करा जरा..." त्याने गटागट पाणी रिचवले. ग्लास परत घेऊन तिने लॅपटाॅप कडे इशारा केला. तो समजला. ही आपल्याला काहीतरी बघायला सांगते आहे. मग त्याने लॅपटाॅप कडे बघितले. 

Zee 5 चॅनेलवर प्रसिद्ध हाॅरर, थ्रिलर कथा लिहीणारे लेखक नारायण धारप ह्यांच्या "ग्रहण" ह्या कादंबरीवर आधारीत

वेब सीरीज...मुख्यनायिका आहे आपली मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी....रमाच्या भूमिकेत....!

विशालने चमकून वैशु कडे बघितले. ती गालातल्या गालात हसत होती. "अरे यार किती दुर्लक्ष करतो माझ्या कडे तू.....म्हणून जरा गम्मत....जराशीच केली हां...." ती आता खळखळून हसू लागली.....

विशालने आधी तर ह्रदयावर हात ठेऊन जोरात सुस्कारा सोडला.....वाचलो बुवा....एवढेच वाक्य मुखावाटे निघाले. मग त्याने अजूनही त्याची मजा घेत पोट धरुन खळाळून हसणार्‍या वैशु कडे बघितले. थांब तुला सांगतो मजा घेण काय असते, ते....जोरात त्याने सोफ्यावरची उशी तिच्याकडे भिरकावली. ऊशीला चुकवत ती बेडरुम मध्ये पळाली....आणि विशालही दुसर्‍या उश्या तिच्याकडे फेकत तिच्या मागोमाग बेडरुम मध्ये गेला आणि दारबंद केले त्याने.....आता दोघांच्याही हसण्याचा खळखळाट बाहेर पर्यंत ऐकू येऊ लागला....तेव्हढ्यात, गुर्टऽऽगूऽऽगुर्टऽऽगूऽऽगुर्टऽऽगूऽऽ आवाज दोघांच्याही कानी पडला आणि विशाल पुन्हा एकदा भयकंपीत झाला....झटक्यासरशी वैशुला त्याने दूर लोटले....आणि बेडवरुन ऊठून उभा झाला.....त्याला डोळे विस्फारुन आपल्याकडे बघताना बघून, पुन्हा एकदा खळखळून वैशु हसली..हा..हा..हा..हा अरे डोअर बेलचा आवाज मी बदलला आहे....तिने हसतच हातात मोबाईल घेऊन त्याला सगळे रेकाॅर्डेड आवाज ऐकवले.....आणि पुन्हा एकदा दोघेही...हाऽऽहाऽऽहाऽऽहाऽऽ

समाप्त

....वैशु कडे बघितल्यावर, माझ्या मनात प्रश्न निर्माण झालाच....स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो ?

काय म्हणता....?

————

माझं अस्सल लिखाण आहे...माझचं....फक्त नाव वापरले.."रमाचे.." आणि फोटो..!

संगीता अनंत थोरात

05/08/22

टीम अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००