एक सोन्याचा पिंजरा भाग 2

सुधांशू सापडेल का?त्यानंतर तरी राजेंद्रकुमार भेटेल का अक्षयला?

एक पिंजरा सोन्याचा 2


मागील भागात आपण पाहिले बॉलीवूड सुपरस्टार पवनकुमारने आत्महत्या केली.सगळीकडे ह्या बातमीने खळबळ उडाली.ह्या सगळ्यात इन्स्पेक्टर शरदला मात्र ही हत्या आहे असे वाटत होते.त्यामुळेच ह्या प्रकरणाची पाळेमुळे खोदायला त्याने आपल्या पत्रकार मित्राची मदत घेतली.आता पाहूया पुढे.


ए.जे.स्टुडिओ,ह्या नावाभोवती येऊन सगळे थांबत होते.शिवाय माझ्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असे मला वाटत होते.राजेंद्रकुमार बद्दल माहिती मिळण्याचा स्त्रोत होता पिंटो फर्नांडिस.


सिने पत्रकारितेतील मेगास्टार.सद्या पिंटो काही जुन्या रिटायर कलाकारांची आत्मचरित्रे लिहीत होता. पिंटोला गाठण्यासाठी मी त्याच्या सेक्रेटरीला फोन लावला,"हॅलो,मी अक्षय पाटील."

लगेच पलीकडून मधाळ बोलणे सुरू झाले,"हाय अक्की,कसा आहेस?परवाच्या पार्टीत दिसला नाहीस?"

मी त्याला थांबवत मला पिंटोला भेटायचे आहे.कधी येऊ?असे विचारले.

त्यावर पलीकडून उत्तर आले.आज रात्री खन्नाच्या पार्टीत.मी काही बोलेपर्यंत फोन कट झाला होता.एक इरसाल शिवी हासडली आणि मी पुढे निघालो.


मला सिम्मी नावाच्या अभिनेत्रीची मुलाखत घ्यायची होती. सिम्मी पवनची चांगली मैत्रीण होती.त्यामुळे तिच्याकडून अंदाज घेता येईल.त्यामुळे मी दुपारच्या रणरणत्या उन्हात फिल्मिस्तान स्टुडिओकडे निघालो.


कोणत्यातरी मोठ्या चित्रपटाचे शूटिंग चालू होते.मी आणि कॅमेरामन आतून बोलावण्याची वाट पहात होतो.तब्बल एक तासाने आम्हाला आत बोलावले.प्रशस्त अशा त्या मेकअप रूममध्ये आम्ही पोहोचली.

सिम्मि तिचे मधाळ हसे फेकत म्हणाली,"हाय अक्की, हाऊ आर यू बेबी?"

मनात म्हंटले बाबा व्हायचे वय झाले माझे.पण प्रत्यक्षात तसेच उत्तर देऊन खुर्चीवर बसलो.

सुरुवातीला नेहमीचेच प्रश्न विचारून झाल्यावर मी तिला विचारले,"पवन असे काही करेल? असे वाटलेले का?"


हा प्रश्न येताच तिच्या कपाळावर सूक्ष्म अठि उमटली.तरीही स्वतःचे अभिनय कौशल्य पणाला लावून तिने गोड उत्तर दिले.

माझ्यातला गुन्हे पत्रकार मात्र सांगत होता,"दाल में कूछ काला है|"


मुलाखत आवरून मी बाहेर निघालो.तेवढ्यात मला सुधांशू दिसला.मी त्याला आवाज दिला,"अंकल,हॅलो!"

माझ्याकडे पाहून तो वेगाने बाहेर चालू लागला.मी त्याच्यावर नजर ठेवून चालू लागलो.स्टुडिओबाहेर जाईपर्यंत तो नजरेच्या टप्प्यात होता.बाहेर आल्यावर मात्र तिथल्या गर्दीत तो विरघळून गेला.

मी वॉचमन जवळ गेलो.जरा हवापाण्याच्या गप्पा केल्यावर तो मराठी आहे हे लक्षात आले.

मग मी विचारले,"आता एक म्हातारा बाहेर गेला.कुठे राहतो तो?"

तसे तोंडातील तंबाखू एका बाजूला सारत तो म्हणाला,"ते फाटक व्हय?आव कुणास ठाऊक? हफिसात पत्ता गावल."

मला मार्ग मिळाला होता.ज्युनियर आर्टिस्ट नोंदणीकृत असतात.तिथे याचा पत्ता मिळणार.


इन्स्पेक्टर शरद पोलीस स्टेशनवर पोहोचला,"शेफाली, पवनचा लॅपटॉप आणि दोन्ही मोबाईल सायबर सेल कडे दे.कदम पी.एम रिपोर्ट आला का ते पहा."

शेफाली थोड थांबून म्हणाली,"सर,तुम्हाला वाटत काही निष्पन्न होईल?"

शरद हसला,"लेट्स सी."


इतक्यात त्याला खबरीचा फोन आला.सुधांशू मुखर्जी सापडला होता.

शरदने मला फोन केला,"अक्षय,तुला हवा असलेला माणूस सापडला आहे.पत्ता पाठवतो.मी येतोय साध्या वेशात."

फोन ठेवताना विचार आला,"जेम्स बाँड नक्की अशाच एखाद्या इन्स्पेक्टर वरून सुचला असणार."

दिलेला पत्ता गुगल मॅप वर टाकला आणि मी बाईक वळवली.


मी तासाभरात दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो.धारावीतील एका झोपडपट्टीत दिलेला तो पत्ता शोधायचा कसा?

पत्रकार असूनही मला घाम फुटला .

इतक्यात माझ्या पाठीवर हात टाकत शरद म्हणाला,"फिकर नॉट, आपुण है ना|"

मी दचकून मागे पाहिले,"शरद यार,मला अटॅक येईल एक दिवस."

शरद जोरात हसला,"अंत्यविधीच्या कार्यक्रमात टी.आर.पी.शोधणारे तुम्ही.चल आता."

मी खिन्न हसत म्हणालो,"शरद अरे आधीच आबांनी दिलेली मुदत संपेल आता.तुला माहीत आहे सगळे."


शरद गप्प पुढे नागमोड्या गल्ल्या पार करत राहिला.एका गल्लीच्या पार शेवटी एकावर एक दहा बाय दहाच्या दोन खोल्या होत्या.मी दार ठोठावले.कडी काढली आणि सुधांशू बाहेर आला.

मला पाहताच तो नाराज दिसला.तरीही मी त्याला म्हणालो,"मी आवाज दिला तरी तुम्ही थांबला नाहीत."

सुधांशू सावध नजरेने इकडे तिकडे पहात म्हणाला,"आत या.मग बोलू."


मुंबईतील घरे म्हणजे सुरू होताच संपणारा प्रकार.सुधांशू शरदकडे पाहू लागला.

शरद पटकन म्हणाला,"सरांचा असिस्टंट आहे.शरद नाव आहे माझे."

मला काहीच सुचेना.तेवढ्यात सुधांशू म्हणाला,"सकाळी तुम्ही मला हाक मारली तेव्हाच अंदाज आलेला.तुम्ही इथवर पोहोचणार."

त्यावर शरद म्हणाला,"मग तुम्ही पळत का होता"

सुधांशू शांतपणे म्हणाला,"ह्या मायानगरीत आजवर मी जिवंत आहे .कारण मला एक उपजत सिक्स्थ सेन्स आहे.तुम्ही त्याला काहीही म्हणा.अनेकदा मला एखाद्या धोक्याची जाणीव आतून होत असते."

आता मी काहीही आढेवेढे न घेता शरदने मला दिलेला वर्तमानपत्राचा कागद त्याच्या समोर धरला.फोटोकडे पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.


एक असह्य शांतता त्या छोट्याशा खोलीला व्यापून उरली.

मग मी म्हणालो,"एका सुपरस्टार सोबत काम करत होता तुम्ही.मग आज हे असे?"

तसा खिन्न स्वरात तो म्हणाला,"राजेंद्र म्हणजे एक शापित गंधर्व होता.मायानगरी मुंबईने त्याला खूप त्रास दिला."

शरद म्हणाला,"पण एकदम असे चढते करीअर सोडून राजेंद्रकुमार गायब कसा झाला?त्याचे कुटुंबीय कुठे आहेत?"

सुधांशू म्हणाला,"कुटुंब?मित्र? यशाचे भागीदार सगळे असतात.ठेच लागल्यावर कोणीही सोबत असत नाही."


इतक्यात शरदला फोन आला.त्याने मला खुणावले आणि तो बाहेर निघाला.जाताना पवनकुमारचे पी.एम.रिपोर्ट आलेत असा मॅसेज दिला.

शरद गेल्यावर मी एकदम मोकळा झालो.आता मला जाणून घ्यायचे होते.राजेंद्रकुमार आता जिवंत आहे का?असेल तर कुठे आहे?कसा जगतोय?


माझ्या डोळ्यातले प्रश्न जणू वाचून सुधांशू म्हणाला,"राजेंद्र जिवंत आहे.तुला त्याला भेटायचे असेल तर ते मात्र शक्य नाही."

मी म्हणालो,"सुधांशू,पवन गेला.त्यामागे खास कारण आहे. काल राजेंद्र,आज पवन उद्या दुसरा कोणीतरी.अन्याय होऊन गप्प राहणारा सुद्धा गुन्हेगार असतो.माझा निरोप द्या तुमच्या नायकाला.खऱ्या आयुष्यात नायक व्हायची संधी आली आहे.सोडू नकोस.हे माझे कार्ड,मला फोन करून कळवा."

मागेही न बघता मी बाहेर पडलो.

तेवढ्यात पिंटो फर्नांडिसच्या सेक्रेटरीचा मॅसेज आला,"आज खन्नाच्या पार्टीत भेटू शकत नाही.उद्या बंगल्यावर ये."मी आनंदाने उडी मारली आणि घरचा रस्ता धरला.


काय असेल राजेंद्रकुमारचा भूतकाळ? पवनशी त्याचा काही संबंध असेल का?

वाचत रहा
एक सोन्याचा पिंजरा.....

🎭 Series Post

View all