एक सोन्याचा पिंजरा 5

अक्षय पुढे आलेली चंदेरी जगताची काळी बाजू.अजून पुढे काय उलगडत जाईल.



एक सोन्याचा पिंजरा
भाग 5

मागील भागात आपण पाहिले की अक्षय राजेंद्रकुमारला भेटला. एक हुशार मुलगा आता अभिनेता व्हायच्या स्वप्नाकडे धावत होता. इकडे पवनबाबत चौकशी करण्यासाठी अक्षयला बरोबर घेऊन जायचे शरदने ठरवले. आता पाहूया पुढे.


शरदने पाठवलेला पत्ता पाहून मी त्याला फोन केला,"हा कोणता पत्ता आहे? पवन इथे जात होता?"

शरद म्हणाला,"तेच आपल्याला शोधायचे आहे. आज रात्री तू, समीर आणि मी आपण इथे जायचे आहे."

मी म्हणालो,ठीक आहे,दुपारी एक पत्रकार परिषद आहे. ती संपली की येईल."

पिंटो फर्नांडिस स्वतः च्या आयुष्यावर मुलाखत सिरीज करणार ही बातमी वाऱ्यासाखी पसरली. इतकी भन्नाट स्टोरी कव्हर करायला कोणाला मिळणार?

माध्यम जगत जाणून घ्यायला उत्सुक होते. हॉटेल ताज मधील आलिशान हॉल मध्ये सिने पत्रकारांची गर्दी झाली होती. सगळ्यांना उत्सुकता होती. अर्ध्या तासाने पिंटो आणि त्याच्याबरोबर मी स्टेजवर आलो. मला पाहिल्यावर प्रचंड कुजबुज सुरू झाली.

एकतर माझा अवतार आजही क्राईम स्टोरी कव्हर करायला चाललो असाच होता. त्यात ह्या पेज थ्री पार्टी संस्कृतीत मी एकदम अनफिट होतो. पिंटोने अगदी दहा मिनिटात घोषणा केली. माझ्या जीवनातील सगळे काही मी सांगणार आहे.

आधी व्हिडिओ आणि नंतर मुद्रित स्वरूपात आत्मचरित्र येईल. एवढी घोषणा करून त्याने पत्रकार परिषद संपवली आणि मग सुरू झाली तीच नेहमीची पार्टी.


मला त्यात काहीही इंटरेस्ट नव्हता.

इतक्यात पिंटो जवळ आला,"अक्षय ह्यात अनेक रहस्य उघड होतील. त्यातील अनेक दाखवू नकोस,छापू नकोस असा तुझ्यावर दबाव येईल."


मी हसत म्हणालो,"गेली दोन वर्षे क्राईम स्टोरी कव्हर करतोय. ह्या सगळ्याची सवय आहे."


पिंटो म्हणाला,"तुला कल्पना नाही,काय काय बाहेर येईल?कोण कोण उघडे पडेल."


मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो,"पाहू,कोणाचे प्राण कंठाशी येतायेत."


पार्टी संपवून मी बाहेर पडलो.

शरदला फोन लावला,"शरद कुठे भेटूया?"

पलीकडून पत्ता सांगितला. कॅब बुक केली. बरोबर अर्ध्या तासात मी शहरातील प्रसिद्ध मेन्स ग्रूमिंग स्टुडिओबाहेर उभा होतो. मला कळेना इथे का बोलावले.


तेवढयात शरद आणि समीर आले.


माझ्या चेहऱ्यावर असलेले प्रश्नचिन्ह वाचून समीर म्हणाला,"अक्षय,आपण जिथे जातोय,तिकडे विसंगत वाटायला नको. आपण अशा ठिकाणी अनेकदा जातो असेच आपले वागणे,बोलणे आणि दिसणे असायला हवे."


हा मुद्दा मला पटला. स्वतः ला तिथल्या माणसाच्या ताब्यात सोपवले. माफक मेकअप,कोरलेली दाढी,स्टायलिश कपडे,अक्सेसरिज आमचा सगळा लूक बदलून गेला. तेवढ्यात एक पॉश कार येऊन थांबली. आम्ही त्यात बसलो. कार हेवन मेन्स क्लबकडे धावू लागली.



पनवेल पासून दूर एका मोठ्या फार्म हाऊसवर बांधलेला तो भव्य क्लब. तिथल्या पंचतारांकित सुविधा पाहूनच इथे येणारे किती पैसेवाले असतील याची कल्पना देत होते. आम्ही आत आलो. सगळीकडे पार्टीचे वातावरण होते.


एक वेटर आमच्या जवळ आला,"एनी स्पेशल डिमांड सर?"


शरद त्याच्या जवळ गेला. कानात काहीतरी सांगितले. तसे वेटर गालात हसला. आम्ही त्याच्या मागून निघालो. फार्म हाऊसच्या मागे दाट झाडीत आणखी एक छोटा बंगला होता. आम्ही आत प्रवेश केला. सगळीकडे बसायला टेबल. समोर डान्सिंग पोल लावलेले.


थोड्याच वेळात सगळे टेबल भरले. आता इथे नृत्य सुरू होणार होते. थोड्याच वेळात विलक्षण देखणे,अत्यंत घट्ट कपडे घातलेले अठरा ते चाळीस दरम्यान वयाचे पुरुष एकेका डान्सिंग पोलवर उभे राहिले.


शरदकडे पाहून मी काय आहे हे?असे खुणावले. शरदने हसून मला फक्त पहात रहा अशी खूण केली. नृत्य सुरू झाले. जसजसे संगीत जोर धरू लागले नाचणाऱ्या पुरुषांच्या अंगावरून एकेक कपडा कमी होऊ लागला.


थोड्या वेळात सगळे पुरुष विवस्त्र नाचू लागले. पिणारे त्यांच्या अंगचटीला येऊ लागले. एकेक जण वेटरला इशारा करत बाजूला जाऊ लागला.


शरदने वेटरला खुणावले,"कूछ स्पेशल नही है!"


वेटरने त्याला खुणावले. आम्ही तिघे एका चिंचोळ्या बोळातून आत गेलो. तिथे गेल्यावर त्याने आम्हाला एक अल्बम दिला. डोळे विस्फारून मी पहात राहिलो. अनेक प्रसिद्ध किंवा उगवते मॉडेल काही कलाकार त्यात होते.


मी त्या वेटरला म्हणालो,"हे सगळे इथे खरच येतात?"


वेटर हळूच म्हणाला,"हे काहीच नाही,काही मोठे बॉलीवूड स्टार सुद्धा येतात."

तोच धागा पकडून शरद म्हणाला,"पवनकुमार यहा आता था? सच है क्या?"


वेटर गप्प झाला.

तसे समीर म्हणाला,"उसके जैसा कोई है क्या?"

वेटर हळूच जवळ आला. त्याने फोन काढला. फोनवर फोटो दाखवले.


नंतर म्हणाला,"पैसे देऊन बुक करा. कुठे आणि कसे भेटायचे कळवू."


आम्ही पैसे देवून बाहेर आलो.
शरद म्हणाला,"आता हा अभिनेता आपल्याला नक्की पुढचे पुरावे देईल."


बाहेर पडल्यावर एका शांत हॉटेलवर आम्ही थांबलो. मला आज ऐकेलेले प्रत्यक्ष पाहून विलक्षण घृणा वाटत होती सगळ्याची.

मी सुन्न झालेलो पाहून समीर म्हणाला,"अक्षय अनेकदा प्रसिध्दी आणि पैसा तर काही वेळा नाईलाज. काहीजण आवडीने स्वीकारून हे सगळे करत असतात. परंतु पुढे ह्या दलदलीत अनेकांचे आयुष्य उद्वस्त होते."


शरद पुढे म्हणाला,"स्त्रियांवर होणाऱ्या अशा अत्याचारावर किमान बोलले जाते. मुले मात्र असेच सहन करत राहतात. मर्द को दर्द नही होता! ह्या वाक्याची किंमत चुकवत."


मी चिडलो,"अरे,नाही म्हणू शकतो ना. कोणी जबरदस्ती करतेय का?"

त्यावर शरद म्हणाला,"अक्षय राग नको मानू. परत फिरल्यावर प्रत्येकाकडे आबा पाटील नसतात. अनेकजण येतानाच परतीची दारे बंद करून येतात."


अनिच्छेने कसेतरी जेवण उरकून आम्ही निघालो. तेवढ्यात शरदला मॅसेज आला,बुकिंग झाले आहे.उद्या रात्री हॉटेल लोटस. दोन जणांसाठी तो उपलब्ध असेल.


घरी येताना डोक्यात एकच विचार होता, राजेंद्रकुमार बरोबर असे काही झाले असेल? ए.जे स्टुडीओचा ह्यात काय संबंध असेल?

इतक्यात सुधांशू फोनवर होता,"अक्षय परवा दिवसभर वेळ काढ. राजेंद्र पुढे सांगायला तयार आहे."

मी फोन ठेवला. घरी आल्यावर एकदम शांतपणे झोपून गेलो.



पहाटे लवकर उठून व्यायाम केला. आता मला देखणे शरीर शाप वाटत होता. विचारांच्या गर्तेत सगळे आवरले आणि पिंटोकडे निघालो. आज पिंटो तयारच बसला होता. मी गेल्यावर लगेच मुलाखत सुरू केली.


मागील वेळी आपण तुला बॉलीवूड स्टोरी करायला सांगितले इथे थांबलो होतो.

पिंटोने एक दीर्घ श्वास घेतला,"अक्षय,मी नाराजीने इथे सुरुवात केली. मला वाटायचं ह्या श्रीमंती पार्ट्या,महागडे सेट,पैशांचा पाऊस पडणारी माणसे. इथे काय वेगळे अनुभवायला मिळणार? पण जसजसे मी अंतरंगात शिरत गेलो ,ह्या चंदेरी दुनियेचा काळा मुखवटा मला दिसत गेला. त्यातच एके दिवशी तो आला. महेश उर्फ राजेंद्रकुमार एका छोट्या शहरातून इथे जगप्रसिद्ध व्हायला आलेला मुलगा."



राजेंद्रकुमार आणि पिंटो यांची भेट कुठे झाली असेल? शरद आणि अक्षयला भेटणारा अभिनेता कोण असेल? आकर्षण,पैसा,प्रसिध्दी ह्यासाठी काहीही करायची परिणीती कशात होत असेल?

वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा.

🎭 Series Post

View all