एक सोन्याचा पिंजरा भाग 7

राजेंद्र कुमार काय निर्णय घेईल?



एक सोन्याचा पिंजरा भाग 7

मागील भागात आपण पाहिले महेश स्पर्धा जिंकू शकला नाही. त्यामागचे कारण कळले तेव्हा तो कोसळला. इकडे पिंटोकडे अतिशय स्फोटक फोटो होते. आता ह्या दोघांचा प्रवास कोणत्या दिशेने होईल?


राजेंद्रकुमार थांबलेले पाहून मी प्रश्न विचारला,"पुढे काय झाले? तुम्ही कसे यशस्वी झालात?"

खिन्न हसत ते बोलू लागले,"यशस्वी! किती हवाहवासा वाटणारा शब्द. पण त्यामागे बरेच काही दडलेले असते. मी सुरिंदरसोबत त्याच्या खोलीवर गेलो. सुरू होताच संपणारी त्याची खोली. तरीही तिथे रहावे लागणार होते. एक मन अजूनही म्हणत होते परत जा. परंतु दुखावला गेलेला अहंकार आणि प्रसिद्धीचे आकर्षण भारी ठरले."


मी पुढचा प्रश्न विचारला,"मग तुम्हाला पहिली संधी कोणी दिली?"

राजेंद्र हसले,"संधी! हा शब्द जेवढा सोपा तेवढाच रुपेरी पडद्यावर यायला कठीण. दुसऱ्या दिवशी मी त्या हजारो स्ट्रगलरपैकी एक होतो. स्टुडिओ शोधून ऑडिशन देणे ही त्याहीवेळी पहिली पायरी होती.


सुरिंदर म्हणाला,"आज आराम कर| कलसे शुरू करना|"


मी त्याला म्हणालो,"आज तुझ्याबरोबर येतो. मला पहायला मिळेल कसे काम केले जाते."


आता मला ह्यात रंजकता जाणवू लागली.

मी पुढे विचारले,"कसा होता अनुभव?"


राजेंद्रने एक खोल श्वास घेतला आणि बोलू लागले,"अनुभव,अतिशय उत्कृष्ट पण कठोर शिक्षक. मी सूरींदरबरोबर पोहोचलो. सुरींदर ऑडिशन देत होता. त्या रांगेत उभे असणारे शेकडो तरुण पाहून मला क्षणभर वाटले काय करतोय मी इथे?


इतक्यात मागे भूषणकुमारचे भव्य पोस्टर पाहिले. मला उत्तर मिळाले होते.

जवळपास पाच तास मी तिथे बसून होतो.

तेवढ्यात सुरींदर बाहेर आला,"ओय तुम लकी हो यारा,आज पेहला बडा काम मिला है|"


मी त्याला विचारले,"कौनसा रोल मिला?"


त्यावर तो खिन्न हसत म्हणाला,"छोटासा है,पर चार पाच सीन है|"


आम्ही परत निघालो. पंजाबातील श्रीमंत शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा हजारो मैल दूर येऊन रहात होता. इथे गेले वर्षभर धडपड करत होता.


मी त्याला खुश पाहून म्हणालो,"सुरींदर तुम एक दिन जरूर कूछ बनोगे|"

तो स्वच्छ हसत म्हणाला,"अगर कूछ नही हुआ तो वापस जाऊंगा|"


त्याचे स्वच्छ हसणे मला आवडून गेले."


त्यानंतर माझी दिनचर्या एकच होती सकाळी उठणे स्वतः चे फोटो हातात घेऊन स्टुडिओ आणि दिग्दर्शक,निर्माते यांच्या कार्यालयात खेटे घालणे. एक एम. बी.बी.एस.डॉक्टर असलेला मी गेले सहा महिने हेच करत होतो.


दरम्यान काही फुटकळ कामे मिळत होती. एक्स्ट्रामध्ये उभे राहून काम करताना अनेकदा वाटायचे फिरावे मागे. तरीही मन हार मानायला तयार नव्हते. एके दिवशी एका निर्मात्याच्या ऑफिस बाहेर बसलो होतो.

तेवढ्यात भूषणकुमार येताना दिसला. आत जाताना मला पाहून तो थांबला. माझ्याकडे निरखून पाहिले.


नंतर तो म्हणाला,"तो तूच आहेस ना? जगप्रसिद्ध व्हायला आलेला."


माझ्याकडे कटाक्ष टाकून तो निघून गेला. मी अत्यंत निराश मनाने परत आलो. सुरींदर काम करत होता. गेले तीन महिने त्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला होता.


मला पाहून तो म्हणाला,"अब भी वक्त है| तुम वापस चले जाओ|"


माझे अहंकारी मन हा सल्ला मानायला तयार नव्हते.



मी म्हणालो,"राजेंद्रजी तुम्हाला घरून पाठींबा किंवा विरोध होता का? कारण घरी जायचे नाही असे तुम्ही ठरवले."


राजेंद्र पुढे बोलू लागले,"माझे वडील एक प्रामाणिक सरकारी कर्मचारी आणि आई साधी गृहिणी. पुरुषाने चेहऱ्याला रंग लावणे ही गोष्टच त्यांच्यासाठी धक्कादायक होती. घर सोडून येताना त्यांनी मला ना पाठींबा दिला ना विरोध केला. त्यामुळे आता मला मागे फिरावे वाटत नव्हते.


ह्या सगळ्या काळात फक्त सूरींदर माझ्यासोबत होता. जवळपास वर्ष होत आले होते. आता निर्माते आणि स्टुडिओ बाहेर जायचे म्हणजे अंगावर काटा यायचा.


तरीही प्रयत्न करणे मी सोडले नव्हते. अशातच एक दिवस एका मोठ्या निर्मात्याने चित्रपटाची घोषणा केली. त्यासाठी गरज असलेल्या भूमिकेस मी अनुरूप असल्याने आता परत नव्या उत्साहाने ऑडिशन द्यायचे ठरवले.



त्या दिवशी उत्साहात मी तयारी केली. दिग्दर्शक अतिशय नावाजलेले होते. मी माझा नंबर आल्यावर आत गेलो अतिशय छान परफॉर्म केले.


त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्यांत माझे नाव होते. तिथेही खूप छान काम केले. आता जवळपास माझी निवड पक्की होती. त्याच वेळी निर्माते आत आले.

त्यांच्या बरोबर तोच मुलगा होता ज्याने ए. जे.ची स्पर्धा जिंकली होती..निर्मात्याने त्याच्या कंबरेत हात घालून त्याला घट्ट जवळ पकडले होते. तोही निर्लज्जसारखा त्याला विळखा घालून उभा होता. त्याच्या सर्वांगावर हात फिरवत.


दिग्दर्शक म्हणाले,"सर,हा मुलगा भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट आहे."


त्यावर निर्माते हसले,"आम्ही निवड केलीय."


असे सांगून त्यांनी त्या मुलाला घेतले आणि आत केबिनमध्ये गेले. मी विमनस्क अवस्थेत उभा होतो आणि दिग्दर्शक माझ्याकडे हताश होऊन पहात होते.


अचानक मला काय झाले माहित नाही. मी धाडकन केबिनचा दरवाजा उघडून आत गेलो. आत ते दोघे नको त्या अवस्थेत होते.

मी त्या निर्मात्यांना म्हणालो,"तुम्ही ह्यासाठी मला नाकारून याची निवड केलीत?"

त्यावर तो हसत म्हणाला,"हो,तू हे सगळे करायला तयार असलास तर हे कार्ड घे आणि संध्याकाळी तिथे पोहोच."

एवढे बोलून त्याने पुन्हा त्यांचा प्रणय सुरू केला. मी तिरीमिरीत ते कार्ड घेऊन बाहेर पडलो. डोके सुन्न झाले होते. दोन रस्ते आणि मधोमध मी उभा होतो.

महेश उर्फ राजेंद्र काय निर्णय घेईल? एक निर्णय त्याचे आयुष्य बदलणार होता? काय घडेल पुढे?

वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा



🎭 Series Post

View all