एक सोन्याचा पिंजरा भाग 10

रहस्य उलगडण्याची एक कडी सापडली.



एक सोन्याचा पिंजरा भाग 10

खरे तर चांगली चालू असलेली कथा मध्येच थांबणे म्हणजे वाचकांचा विरस. तरीही अनेकदा कथानक सुचायचेच बंद होते. तसेच काहीसे झाले आणि लिखाण थांबले. परंतु परवा परत एक कमेंट दिसली आणि जाणीव झाली की वाचक कथेत किती गुंतलेले असतात. मग सगळी कथा परत पुन्हा वाचली आणि लिहायला घेतोय. वाचकांची क्षमा मागून.


थोडक्यात सारांश असा,पवनकुमार नावाच्या सुपरस्टार नायकाची आत्महत्या होते. त्यामागची सत्यता तपासणारा अक्षय नावाचा पत्रकार आणि इन्स्पेक्टर शरद. त्याबरोबर ह्याच धाग्यात निखळलेला दुवा असणारा सुपरस्टार राजेंद्रकुमार आणि पत्रकार पिंटो यांचा समांतर चाललेला हा प्रवास आता उत्कंठावर्धक वळणावर आला आहे.


हिराचंद दमानिया आणि पवनकुमार,ताराचंद आणि राजेंद्र असा चौकोन. या मागे काय रहस्य असेल? ताराचंदने राजेंद्रला काय ऑफर केले? हिराचंदला हॉटेलात भेटलेला मुलगा कोण? चला परत शिरुया सोन्याच्या पिंजऱ्यात.


शरद आणि अक्षय दोघेही त्या हॉटेलातून परत आले. हिराचंद दमानियाला भेटायला आलेल्या मुलाचे फोटो अक्षयने घेतले होते. त्याने शरदला फोटो पाठवले.

"समीर तुला एका मुलाचे फोटो पाठवले आहेत. त्याचा तातडीने शोध घे." इन्स्पेक्टर शरदने समीरला सूचना केली.

"अक्षय,तू आता पिंटोची मुलाखत घ्यायला जाऊ शकतोस."शरद हसत बोलला.

इकडे पवनकुमार प्रकरणात सनसनी आणणारी बातमी विरुद्ध चॅनलने छापली होती. प्रसिद्ध लेखिका आणि पवनची मैत्रीण इरावती बोसला अटक झाली होती.

अक्षयने लगेच कॅमेरामन सोबत घेतला आणि सेंट्रल जेल गाठले.

"आजची स्फोटक बातमी. मैत्रीने घेतला पवनचा बळी. इरावती बोस बुद्धिवादी हिडीस चेहरा?" समोरचा पत्रकार शब्दांची फोडणी देत होता.

अक्षय मात्र काहीही करून इरावतीला गाठायला आला होता.

"शरद,काहीतरी चुकत आहे. इरावती बरोबर गेम झाला आहे." अक्षयने शरदला फोनवर मदत मागितली.

कॅमेरा बाहेर ठेवून भेटायची परवानगी मिळाली. इरावती सुन्न होऊन बसली होती. एक प्रतिथयश लेखिका आज तुरुंगात होती.

"इरावती,मी अक्षय पाटील." अक्षयने सुरुवात केली.

" हो,ओळखले तुला.पण मी काहीही केले नाहीय." इरावतीने ठाम स्वरात उत्तर दिले.

"मला माहित आहे. पण सध्या तू फक्त शांत रहा. तुला पवन काही बोलला होता का?" अक्षयने पुढे विचारले.

" बरेच काही. पण..." इरावती गप्प झाली.

"दोन मित्रांच्या गप्पा पुरावा होऊ शकत नाहीत. मी तुला सोडवेल फक्त सध्या शांत रहा." अक्षय तिथून बाहेर पडला आणि त्याने थेट पिंटोचा फ्लॅट गाठला.


"पिंटो,सँडविच आणि कडक कॉफी सांगा." अक्षयने मागणी केली.

"तू शांत खाऊन घे. इरावती अडकली म्हणून अस्वस्थ आहेस ना?" पिंटोने रोखून बघत विचारले.

"इराला अडकवले गेले आहे. तिला वाचवले पाहिजे." अक्षय उदास स्वरात म्हणाला.

" अक्षय,मागच्या कपाटात सगळ्यात वरच्या कप्प्यात एक डायरी आहे. तेवढी काढून आण." पिंटोने खुणेने दर्शविले.

मी डायरी काढून आणली." आज आणखी एका नायकाचा बळी गेला. सज्जनकुमार वेगात गाडी चालवताना मेला. ते फक्त छापायला. ज्याला गाडीचे स्टिअरिंग धरता येत नव्हते तो अपघातात मेला." पिंटो डायरीची पाने बंद करून हसला.


"असे अनेक बळी यापूर्वी गेले आहेत. फक्त तेव्हा त्यांचा पाठलाग करणारे आम्ही कमी पडलो. इरावतीला वाचव.


"पिंटो हात जोडत होता. तेवढ्यात सुधांशू कडून निरोप आला,"राजेंद्रकुमार तुला भेटायचे म्हणत आहेत. त्यांना काहीतरी सांगायचे आहे."


मी पिंटोच्या घरून निघालो. माझा पाठलाग होत नाही ना? याची खात्री करून घेतली. सुधांशू मला आत घेऊन आला.

राजेंद्र आज काहीसा निर्धार केल्यासारखे दिसत होते.

मी त्यांना म्हणालो,"तुम्ही यशस्वी झाल्यावर हे सगळे थांबवू शकत होता."

खिन्न हसत राजेंद्रकुमार म्हणाले,"दलदलीत फक्त आत जायचा मार्ग असतो परतीचा नाही. ह्या सगळ्या प्रकारांचे फोटोग्राफ काढले जात."

"पण मग तुम्हाला बाहेर पडायला संधी कशी मिळाली." मी उत्सुकतेने विचारले.

"त्या देवदूताचे नाव आहे पिंटो फर्नांडिस." राजेंद्रने उत्तर दिले.


"काय? पिंटो?" मी मोठ्याने ओरडलो.

अजूनही कानावर विश्वास बसत नव्हता. स्वतः च्या फायद्यासाठी कोणतीही बातमी पेरणारा अशी पिंटोची ख्याती होती.

"तुला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे." माझ्या चेहऱ्यावरील गोंधळ वाचून राजेंद्रकुमार म्हणाला.

"पण इंडस्ट्रीतील एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात जाऊन त्याने तुमची मदत का केली?" माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.

" त्याला कारण म्हणजे पिंटोचा भाचा जॅकी." राजेंद्र बोलत होता.


इतक्यात मोबाईल वाजला. "पाठवलेल्या पत्त्यावर पोहोच." शरदने फोन ठेवला.


"तुला मी सगळे लिहून पाठवतो. म्हणजे सलग सांगता येईल मला." राजेंद्रकुमारने सुचवले.

मी अक्षरशः पळत बाहेर पडलो. कॅब बुक केली आणि लोकेशनवर पोहोचतो असा शरदला मॅसेज केला.

शरद आणि मी लोकेशनवर पोहोचलो. मुंबई नगरीतील सर्वात पॉश परिसरातील एक पब होता.

"इथे कशाला बोलावले?" शरदला खुणेने विचारले.

शरदने फक्त नजरेने खुणावले. समोर तोच मुलगा होता. जो हिराचंद दमानियाला त्या हॉटेलात भेटायला आला होता. समोर कर्कश आवाजात गाणे वाजत होते. तंग पँट आणि शर्ट घातलेला तो मुलगा पोलवर आला आणि त्याने डान्स सुरू केला.


प्रत्येक स्टेपला एक कपडा उतरवत होता. शरद बरोबर समोर बसला.


" वेटर, टू लार्ज पेग." शरदने ऑर्डर देताना वेटरला हजार रुपये दिले.


दोन मिनिटात ऑर्डर आली. समोर अनेक तरुण देखणी मुले नाचत होती.

"साहेब,आणखी काही सेवा." वेटर शरदकडे पाहून म्हणाला.

शरदने फक्त त्या मुलावर नजर स्थिर ठेवली होती. वेटर सूचक हसला आणि एक कार्ड देऊन गेला.


शरदने पाहिले. साडेबारा आणि तीनशे चार. शरद उठला आणि मी त्याच्या मागे चालू लागलो. एका चिंचोळ्या बोळीतून मागे जाताच भव्य हॉटेल होते.


"दिस वे सर!" कार्ड बघून वॉचमन म्हणाला.


अतिशय सुसज्ज रूम आणि भिंतीवर अनेक उत्तेजक पुरुषांची छायाचित्रे होती. त्यात अनेक नामवंत अभिनेते,मॉडेल होते.

" का करत असतील हे असे?" मी उदास झालो.

"पैसा आणि टिकून राहण्याची स्पर्धा." शरद हसून उत्तर देत होता.

"आधी बाथरूम,आरसे, कोपरे तपास." शरद असे म्हणताच मला समजले. कुठेही कॅमेरा नव्हता.


शरदने पटकन एक भडक ड्रेस घातला. शर्टाची वरची तीन बटणे उघडी ठेवली. मी आत बाथरूममध्ये लपणार असे ठरले. बरोबर साडेबारा वाजता बेल वाजली. मी आत लपलो.


अत्यंत पारदर्शक कपडे घालून तो आला होता.

" हाय." असे म्हणत तो शरदला अगदी खेटून बसला.


शरदचे कमावलेले शरीर त्याला आवडले होते."हाय,तू असशील तर पैसे पण नको जानेमन." त्याने शरदच्या गळ्यात हात घातला.


त्याच क्षणी सनकन कानफटात बसून तो कोलमडला.

"मी सांगतो तसे करायचे." शरदने रिव्हॉल्वर त्याच्या कपाळावर टेकवून सांगितले.

"अक्षय,लवकर बाहेर ये. याचा फोन ताब्यात घे. सगळे गॅझेट बंद कर." मी पटकन सगळे ताब्यात घेतले.


वाऱ्याच्या वेगाने त्याला गाडीत बसवून आम्ही बाहेर पडलो." अक्षय मी सांगतो तसे गाडी चालव."


कोण असेल तो मुलगा? त्याच्याकडून पवन विषयी माहिती मिळेल का? राजेंद्रला पिंटोने कसे सोडवले असेल?
वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all