एक सीता , एक द्रौपदी

.
स्पर्धा : राज्यस्तरीय कविता करंडक
टिम : छत्रपती संभाजीनगर
विषय : दोन ध्रुवावर दोघे आपण
नाव : एक सीता , एक द्रौपदी


एक सीता , एक द्रौपदी
दोघी स्त्रिया नायिकेपदी
आदर्शाच्या दोन ध्रुवावर
स्त्रीधर्माच्या मानबिंदूवर

एक सापडली राजास भूमीतूनि
एक प्रकटली जळत्या यज्ञातूनि
एक शांत भूमिसम पुनवेचा चंद्र
दुसरी अग्निसम भासते रौद्रभद्र

राजऋषी जनक होते पिता एकीचे
दुसरीला राजा द्रुपद पिता लाभिले
एकीने घेतला नीतीमूल्यांचा वारसा
दुसरीकडे आला प्रतिशोधाचा वसा

मुलेमुली भासली कुरुविरुद्ध शस्त्रे
त्याच भावनेने वाढवली सर्व मुले
स्वाभिमान जपण्याचे ते संस्कार
जनक देई व्यक्तीमत्वास आकार

एक मिथेलेची राजकन्या मैथिली
दुसरी पांचालची युवराज्ञी पांचाली
एकीचे पती श्रीराम एकपत्नीव्रतधारी
तर दुसरीचे पाच पांडव बनले वाटेकरी

एकीच्या स्वयंवरात शिवधनुष्य गेले तुटुनी
दुसरीचे स्वयंवर जिंकले मत्स्यनयन भेदूनी
एकीचे पती साक्षात नारायणावतार श्रीराम
दुसरीचा सखा बंधू असे कंससंहारक श्याम

एकीला झाला वनात मोह सुवर्णमृगाचा
दुसरीचे म्हणे हास्य सबब तो अपमानाचा
भावना फक्त पुरुषांसाठी , स्त्री असावी पाषाण
तिचे हास्य-मोह मात्र महायुध्दाचे कसेहो कारण ?

जाहिले दोघींच्याही जीवनी मोठे अपमान
केला दोघींनीही प्रतिकार राखुनि सन्मान
एकीचे हरण परपुरुषाने केले छलकपटाने
दुर्दैवी दुसरीला तर स्वकीयांनीच छळीले

एकीच्या पतीला मुद्दाम दूर सारले
दुसरीस पतींनीच जुगारात हारले
एकीचा लढा होता समाजाविरोधात
दुसरीचे सासरच ते पापाच्या पक्षात

जानकीला मनोमन सर्वकाही ठाऊक ते होते
राजाराम आदर्शाच्या पिंजऱ्यात अडकले होते
जाणुनी पतीची अवस्था मौन सदैव तिने पाळले
दोष कधी दिला नाही दोषी कधी पतीस न मानले

पांचालीने मात्र पतीचे सदगुणविकृती जाणिले
कर्तव्यांची जाणीव वारंवार करुनी तिने दिधले
केश मोकळे ठेवुनी विस्मरण कधी होऊ न दिले
द्रौपदीने कास न्यायाची सदैव हृदयात ते धरिले

एकीचे पुत्र बनले अवधेचे राज्यकर्ते
दुसरीचे पुत्र मात्र कपटात निर्वतीले
दशमुख मर्दुनी विष्णूने एकीस रक्षिले
वस्त्रे देऊनी सभेत मान एकीचा राखिले

सर्वासमक्ष भूमीत शिरून स्वाभिमान एकीने राखीला
दुसरीने केसांवरी रक्ताभिषेक करून न्याय मिळविला
अधर्म सारे पुरूषांनी केले स्त्रियांवर दोष का लाविला
सत्याचा पक्ष घेऊनि या नायिकांनी इतिहास घडविला

एकीने जपला स्वाभिमान
दुसरीने मिळवला सन्मान
पूज्य या दोघीही देवीसमान
दोघी दोन ध्रुवावर विराजमान !

©® पार्थ धवन