Login

एक संसार असाही... भाग 9

संसार म्हणजे खेळ नव्हे..
एक संसार असाही…भाग 9


“खरचं .. प्रणव खूप हट्टी निघाला. आम्ही किती तऱ्हेने त्याला समजावत होतो.पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी शेवटी गेलाच..” दयमंती ताई हताश होत बोलल्या.


“ अग, मुलगा दूर रहावा असं मलाही आधीपासून वाटत होतं. जेंव्हा तुझ्या मम्मीचे लाड अती प्रमाणात वाढत होते. कारण अती लाड केंव्हाही घातकच…तुझी मम्मी गेल्यापासून तो कोणाचे ऐकतही नव्हता. जे हवं ते हवच…तरी वेदांत त्याचे सगळे हट्ट पूर्ण करायचा. पण शेवटी मोठा झाल्यावर, पंख फुटल्यावर आपल्या विश्वात भरारी घेत असताना ज्याने आपले हट्ट पुरवले त्या मामालाही हा मुलगा विसरून गेला. मामा हॉस्पिटल मधे ऍडमिट असताना याला दूर देशी जायची घाई झाली होती. ” वसंतरावांच्या चेहरा रागाने लाल झाला होता. जेंव्हा त्यांचा पोटचा मुलगा कोणाचे न ऐकता हट्टाला पेटला होता.

“वेदांतने त्याचे सगळे हट्ट पुरवले.. त्याला दूर जाऊ नको असं समजावूनही सांगितलं. पण त्याचा एकही शब्द या पोराने मानला नाही याचं दुःख अहो मलाही होत आहे.. पण अजून किती दिवस तेच तेच दिवस आठवून रागराग करायचा? पोटच्या लेकराला कधी तरी माफ करावेच लागणार ना? मला खूप वाटतं माझे डोळे
मिटण्याआधी एकदा माझ्या लेकराची अन् माझी भेट होऊ दे..” दयमंतीताईंना आता लेकाचा विरह सहन होत नव्हता.

“अग्ग …असं अभद्र काहीही काय बोलतेस दयमंती. मला नसेल का वाटत. आपल्या मुलासोबतचे सर्व वाद विसरून भेट घ्यावी. पण त्याचा संयम कुठवर चालणार हेच पाहतोय मी. मुलं शक्यतो आपल्या आई वडिलापासून दूर राहू शकत नाहीत. पण आपल्या लेकाने इतकी वर्ष म्हणजेच बघ ना गेली अकरा वर्ष परदेशात घालवली तेही आपल्या आईवडिलांची एकदाही आठवण न काढता…सुखात आहे तो आपल्या संसारात.आपली त्याच्या लेखी किंमत असती तर सगळे विसरून तो धावत पळत आला असता आपल्याला भेटायला.. पण नाही आपल्या परदेशी बायकोसोबत खुश आहेत साहेब नको ग त्याच्या संसाराला आपली दृष्ट लागायला.” बोलता बोलता वसंतराव रडु लागले.
बरोबरच होते त्यांचे…प्रणव आज गेली अकरा वर्ष परदेशात होता. कधी त्याने फोन करून आई बाबांची खुशाली देखील विचारली नव्हती. आपल्या लहान बहिणीच्या लग्नात त्याला सर्व नातेवाईकांनी बोलावलं पण नाही आला तो.. ही गोष्ट त्या बापाच्या जीवाला लागणारच ना? एकटाच रोज त्याच्या आठवणीत धायमोकलून रडणाऱ्या बापाला आज आपल्या बायकोसमोर दुःख नाही आवरता आले. तीळ तीळ तुटणाऱ्या जीवाला किती सावरणार होते ते एकटेच!

“तुम्ही नका हो, इतकं मनाला लाऊन घेऊ. त्याला जर आपल्या आई बाबांची काळजी असेल तर तो नक्की येईल. पण तो स्वतः आला तर मागचे वाद उकरून काढत बसण्यापेक्षा त्याला माफ करावं असं मला वाटतं. ”

“ठीक आहे. मी तो आल्यावर अजिबात कोणते वाद पुन्हा उकरून काढणार नाही.” वसंतरावांना दयमंती ताईंचे बोलणे पटत होते.

“ एवढ्याशा काडीने लावलेल्या आगीचा मोठा भडका उडायला वेळ लागत नाही.. कदाचित तुमच्या बहिणीने आपल्या लेकीसाठी प्रणवच्या मागे लागायला नको होतं.त्याला आरती आवडत नाही हे त्याने आपल्या आत्याच्या पुढ्यात आपल्या सगळ्यांनाच सांगितलं होतं. तरीही तुम्ही त्याला विचार करायला सांगत होता. कदाचित हेच त्याला आवडलं नसावं.” दामिनीच्या आत्याची मुलगी आरती हिला दामिनीचा मोठा भाऊ लहानपणापासून आवडायचा. पण प्रणव वसंतरावा सारखाच शिक्षणावर निष्ठा ठेवणारा, हुशार,तल्लख, आणि विचारप्रवर्तक होता. त्याला आपल्या आयुष्यात कुणी ढवळाढवळ केलेली अजिबात आवडायची नाही. प्रणव जसा नोकरीला लागला तसा वसंतरावांच्या बहिणीने आपल्या लेकीच प्रणव सोबत लग्न लाऊन द्यायचा चंग बांधला होता. ही गोष्ट प्रणवला कळत होती. वसंत रावांनी आपल्या मुलाच्या आयुष्याचा निर्णय तो स्वतः घेईल असं सांगून टाकलं होतं. तरीही त्यांची बहीण गप्प बसत नव्हती. त्यात कहर म्हणजेच कोणतीही सोयरिक साधली नसताना ती डायरेक्ट घरी प्रणवशी बोलायला आली होती. अर्थातच लग्नाचा प्रस्ताव घेऊन.. आणि ही गोष्ट प्रणवला अजिबात आवडलेली नव्हती. ज्या दिवशी प्रणवची आत्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन घरी आली होती त्यादिवशीच वसंत राव महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. दयमंती ताईंनी आपल्या नंदेचा आदर ठेवत त्यांचा पाहुणचार केला. जेवणे झाल्यानंतर जेंव्हा लग्नाबद्दल आत्या डायरेक्ट प्रणवशी बोलू लागली तेंव्हा प्रणवचा राग सातव्या आसमानावर जाऊन पोहचला होता. कारण आत्या एकदा दोनदा सांगूनही ऐकत नव्हती.आणि प्रणवचा नकार असूनही ती लग्नाच्या तयारीला लागायला आपल्या आईला दयमंती ताईंना सांगत होती. त्यामुळे त्याच्या रागाचा भडका उडाला होता.

दयमंती ताई त्याला शांत राहायला सांगत होत्या म्हणून तो शांत राहायचा प्रयत्न करत होता. पण आत्याच्या बेजबाबदार वर्तनाने त्या रागाचा भडका उडायला वेळ लागला नाही. आणि त्याच रागात त्याने अत्याशी बोलताना अपशब्द वापरले होते. त्यांना दयमंती ताईंनी ताबडतोब घरी येण्याचा निरोप दिला होता. म्हणून ते ताबडतोब घरी आले होते. आपला संस्कारी मुलगा आपल्या बहिणीला वाट्टेल तसे बोलतोय यामुळे तेही प्रणव वर चिडले होते.