एक संसार असाही…भाग 11
“आजोबा sss” एक गोड आवाज वसंत रावांच्या कानात घुमला. तो आवाज कोणाचा आहे हे ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. नातवाच्या गोड आवाजाने वसंतरावांचे डोळे काठोकाठ भरून आले.
“आहों… काय झालं?” वसंतराव फोन उचलताच रडु लागल्याने त्याही काळजीत सापडल्या होत्या. कोणी गेलं तर नाही ना अशी शंका मनात दाटून आली.
“ बोल बाळा…” जड अंतःकरणाने त्यांनी शब्द उच्चारला.अन् आतापर्यंत नाना शंका मनात घेऊन वावरणाऱ्या दयमंती ताईंच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उभ राहिलं. कोण असेल??
“आजोबा मी तुम्हाला भेटायला येणार इंडियात..” नकुल उत्साहाच्या भरात सांगत होता. आणि आपला नातू आपल्याला भेटायला येणार आहे हे ऐकून तो बाप क्षणभर गोड धक्क्यात गेला होता.
“खरच??” वसंतरावांना विश्वास बसत नव्हता म्हणून तेही सत्य जाणून घेत होते.
“हो आजोबा मला आई बाबा बोलले तसे.” प्रणव आणि गौरीने त्याच्या सततच्या हट्टाने भारतात जायला होकार दिला होता.आणि आज हे लेकरू आपल्या आजोबांना सांगत होतं.
“बाळा खूप खूप मिस करतोय मी तुला.. लवकर ये आपण खूप खूप फिरू…खेळू…” वसंत रावांचे आताशी अश्रूंनी डोळे भरून वाहत होते. आणि आनंदाने त्यांना शब्दही फुटत नव्हते.
“आहों…कोण बोलत आहे..?” दायमंती ताईही आतुर झाल्या होत्या.
“नकुलबाळा तुझी आजी बोलतेय तुझ्याशी.. बोल.”
वसंतरावांनी दयमंती ताईकडे फोन दिला. अन् नजरेने बोलायचा इशारा केला. तशा त्याही फोन कानाला लाऊन बसल्या.”
वसंतरावांनी दयमंती ताईकडे फोन दिला. अन् नजरेने बोलायचा इशारा केला. तशा त्याही फोन कानाला लाऊन बसल्या.”
“ आज्जी sss”एक गोड हाक कानात घुमली आणि इतकी वर्ष आपल्या नातवंडांना मांडीवर बसवून खेळवण्याची स्वप्न बघणाऱ्या दयमंतीताई तोंडावर हात ठेऊन रडु लागल्या. मुलगा दूर गेला…आपल्या मर्जीने लग्न केलं. असं नव्हतं की प्रणवने लग्नाची बातमी आई बाबांना सांगितली नव्हती. परदेशात गेल्यावर त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. आणि जॉब मिळवून सेटल झाला. कंपनीच्या एका मीटिंग दरम्यान गौरी आणि प्रणवची भेट झाली. बिजनेस पार्टनर म्हणून काम करताना दोघेही एकमेकांच्या कधी प्रेमात पडले कळलंच नाही. दोन वर्ष प्रेमात घालवल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. गौरी मूळची भारतीय पण लहानपणापासून लंडनमध्ये लहानाची मोठी झाली. त्यामुळे अगदी बिनधास्त राहणारी मॉडर्न मुलगी. तर प्रणव आपल्या आई वडिलांच्या संस्कारात लहानाचा मोठा झालेला असल्याने दोघांच्या आवडीनिवडी विभिन्न होत्या. पण दोघांची मने मात्र एकमेकांशी जुळली होती. गौरीचे आई वडीलही बिझनेस मधे असल्याने आणि ते सर्वजण फ्रीडली जीवन जगत असल्याने या दोघांच्या नात्याचा त्यांना काहीही प्रॉब्लेम नव्हताच. त्यामुळे दोघांनीही मनापासून आपली सात जन्माची गाठ बांधली.
प्रणवला आपल्या आई वडिलांनी आपल्या लग्नाला यावे असे मनापासून वाटत होते. तसा तो माफी मागून बोललाही पण त्याच्या लग्नाची बातमी समजताच रागाने चवताळलेल्या सुमेधा आत्याने नवे नाटक वटवून बाप लेकात मोठा वाद निर्माण करून दिला. सुमेधा आत्याला प्रणव आपला जावई होणार नाही याचा इतका राग आला होता. की त्या रागाने एका बाप लेकाच नातं क्षणात तुटून गेलं.
प्रणवच लग्न झालं.. दयमंती ताईंनी इथूनच आपल्या मुलाला आणि सुनेला मनोमन आशिर्वाद दिला. प्रणव अधून मधून आपल्या बहिणी सोबत बोलायचा. इकडची खुशाली विचारायचा. गौरी देखील हिंदू आणि दिसायला सुंदर असल्याने दामिनीला ती खूप आवडली.. सुमेधा आत्याने प्रणवने इंग्लिश बायको केली म्हणून गावभर बोभाटा केला. इतकचं नाही.. आपल्या अपमानाचा बदला तिने बाप लेकाचे संपुर्ण नाते विस्कळीत करण्याबरोबरच प्रणवचे आपल्या घरी परतण्याचे सर्वच रस्ते बंद केले. त्यामुळे प्रणव बिचारा एकटा पडला.
असेच दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस लंडनहुंन वसंतरावांना फोन आला. आणि समजलं की ते आजोबा झालेत, प्रणवला मुलगा झाला आहे. आपण आज्जी झालोय या आनंदात दयमंती ताई हरखून गेल्या. पण वसंतराव? ते तर ही बातमी ऐकून शेतावर जाऊन आजोबा झाल्याचा आनंद मनसोक्त रडून घेऊन करत बसले. कारण घरात तो आनंद ते दाखवू शकत नव्हते. इगो इतका होता की आपल्या नातवाचे तोंड पाहायचे असूनही त्यांनी मन मारून नकार दिला.
गौरी दयमंती ताईंशी खूप बोलायची. व्हिडिओ कॉल वर नाकुलच्या बाललीला दाखवायची. आणि त्याला हातात घेऊन पटापट मुके घ्यायला बिचाऱ्या या आजीचे मन तरसत असायचे. आपल्या नवऱ्याच्या इगो मुळे आपल्या नातवाला जन्मात भेटू की नाही याची चिंता त्यांना स्वतः बसू देत नसे.
वसंत रावांना कधी कधी वाटायचं.. दयमंतीने आपल्याशी भांडून नातवाला भेटण्याचा हट्ट करावा. आणि तिचा हट्ट पुरवण्याचा हेतूने आपल्या नातवाला भेटण्याची आपली ईच्छा पुर्ण व्हावी.पण दयमंती आपल्या नवऱ्याशी कधीच भांडत नसत.. लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत रुसवे फुगवे याव्यतिरिक्त त्यांच्यात कधीच भांडण झालेले नव्हते. याचं कारण म्हणजे दोघात असलेलं निर्व्याज, निस्सीम प्रेम होय.
वसंतरावांच्या साध्या झोपडीत या अरबपती लेकीने कोणताही वाद न करता सुखाचा संसार करत आली होती. कडक सासूचे मन आपल्या प्रेमळ स्वभावाने जिंकले होते. शेताच्या बांधावर न गेलेली ही मुलगी शेतात कामही करायला शिकली होती. आता कुठे सुखाचे दिवस होते…पण नणंद नावाच्या वावटळीने घरात वादाची ठिणगी पाडून हसत खेळत नांदणाऱ्या घरात दुःखाची मोठी पोकळी निर्माण केली होती. जन्मात ती कधी भरणार होती देव जाणे..!
वसंतरावांच्या साध्या झोपडीत या अरबपती लेकीने कोणताही वाद न करता सुखाचा संसार करत आली होती. कडक सासूचे मन आपल्या प्रेमळ स्वभावाने जिंकले होते. शेताच्या बांधावर न गेलेली ही मुलगी शेतात कामही करायला शिकली होती. आता कुठे सुखाचे दिवस होते…पण नणंद नावाच्या वावटळीने घरात वादाची ठिणगी पाडून हसत खेळत नांदणाऱ्या घरात दुःखाची मोठी पोकळी निर्माण केली होती. जन्मात ती कधी भरणार होती देव जाणे..!
“आज्जी कशी आहेस तू..”नकुल
“मी ना एकदम खुश बाळा तू बरा आहेस ना?”
“हो आज्जी”
“तुम्ही नक्की सर्वजण इकडे येणार अहात ना?”
“हो …आज्जी.”
“ बाळा बाबाकडे फोन दे.. मला बोलायचं आहे तुझ्या बाबांशी.” दयमंती ताईं भरल्या कंठाने बोलल्या. आज आपल्या कानावर आपल्या लेकाचा आवाज पडावा अस त्यांना मनोमन वाटत होतं…
“आई…!” प्रणवने हाक मारली अन् दयमंती ताई धन्य धन्य झाल्या. फोन होल्ड वर असल्याने अकरा वर्षांनी वसंतरावांच्या कानावर आपल्या लेकराचा आवाज पडला होता.
क्रमशः…..