एक संघर्ष : आईविरुद्धचा ! (भाग - १)

Ek sangharsh nakki wacha

         एक संघर्ष : आईविरुद्धचा (भाग-)
         
         कथेचं शीर्षक वाचून अंगावर काटा आला ना! पण काय करणार, हेच सत्य आहे! काही प्रसंग वगळता, ही एक सत्यकथा आहे. कथेतील पात्रांची नावे, गावे आणि ठिकाणे बदललेली आहेत. मी हि कथा ईरावर सुरू असलेल्या "कौटुंबिक कथा लेखन स्पर्धा" या स्पर्धेसाठी लिहीत आहे. आपण नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...
         
          अथांग पसरलेला सागर..... सूर्य अस्ताला झुकलेला... जणू थोड्या वेळात तो समुद्रात बुडून त्याचं अस्तित्व संपवणार.... आकाश समुद्राला टेकलेलं.... एक हुरहूर मनाला जाणवणारी..... चंद्र नुकतेच आपले अस्तित्व दाखवतोय.... अशा एका रम्य सायंकाळी समुद्रकिनारी असलेल्या वाळूवर तो आणि ती दोघं शेजारी शेजारी बसलेले..... अचानक त्याने विश्वासाने तिचा हात आपल्या हातात घेतला.... त्याला खूप काही बोलायचे होते... स्वतःबद्दल खूप काही सांगायचे होते... खूप काही बोलण्याची तळमळ तिलाही जाणवली...

तोः मृदुला...

तीः अं... बोल ना वीर!
 
वीरः मृदुला, तू मला खूप आवडतेस.... 

          मृदुला त्याच्याकडे आश्चर्याने बघते. ती थोडी अवघडते. तिच्या नजरेत त्याला गोंधळ स्पष्ट दिसतो. त्याला थोडं हसु येतं. तसं तो परत बोलु लागतो.

वीरः अगं, अशी घाबरतेस काय? एक मैत्रीण म्हणून तु मला खुप आवडतेस, असं म्हणायचं होतं मला... तसं पाहिलं तर आपली मैत्री अवघी सात ते आठ महिन्यांची.... पण असं वाटतंय,  की आपण खूप पुर्वीपासून एकमेकांना ओळखतो.... तुझ्याशी बोलायला लागलो नं, की मला बोलतच राहावेसं वाटतं... तुझ्याकडे मला मन मोकळं करायला आवडतं... असं वाटतं, माझं सगळं आयुष्य तुझ्यापुढे उलगडून सांगावं... तू मला समजून घेतेस. मला तुझा खूप आधार वाटतो ग!

          आता तिचा गोंधळ बराच कमी झालेला असतो...

मृदुलाः अरे, बोल ना मग! मी तुझं सगळं ऐकेल. माझ्यामुळे तुझं मन मोकळं होणार असेल, तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसणार असेल, तर नक्की बोल.... मी ऐकतेय...आजचा पूर्ण वेळ फक्त तुझ्यासाठी... 

वीरः तसं पाहिलं तर मी सांगली जिल्ह्यातल्या कामठी या छोट्याशा गावातला...  माझे वडील सरकारी नोकर होते. आई, वडील, आम्ही तीन भाऊ आणि तीन बहिणी असा आमचा आठ जणांचा परिवार! आमची परिस्थिती तशी बेताचीच! आण्णांच्या नोकरीवरच आमचं सगळं अवलंबून होतं. तसं आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं.... दोन वेळचं जेवण मिळत होतं म्हणजे व्यवस्थितच म्हणावे लागेल...

          त्याला तेव्हाची परिस्थिती आठवुन आजही जरा हसु आलं. तेव्हाही आपल्या गरजा, अपेक्षा किती कमी होत्या आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही, याचे समाधान होते,  त्याच्या चेहऱ्यावर! तो पुढे बोलु लागला....

वीरः मी तेव्हा बारावीत होतो. खुप हुशार मुलांमध्ये मी गणला जात नव्हतो, पण एवढा 'ढ'  पण नव्हतो. तेव्हा माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. माझा मोठा भाऊ तसा गुंड प्रवृत्तीचा! लग्न झाल्याबरोबर त्याने दुसरं घर बघितलं आणि वहिनीला घेऊन तो भाड्याच्या घरात राहू लागला. आण्णांनी त्याचं वेगळं राहणं जरा जास्तच मनावर घेतलं. त्यातच त्यावरुन दादाचं आणि आण्णांचं काहीतरी जोरात वाजलं. आण्णांचं म्हणणं होतं कि दादाने एकतर आपल्या घरातच रहावं, नाहीतर त्याचं नाव रेशन कार्डवरुन काढुन टाकावं. दादाला आमच्या घरात आमच्या बरोबर रहायचं नव्हतं. त्यामुळे आण्णांना आमचं रहातं घर माझ्या नावावर करायचं होतं. पण त्या प्रकरणामुळे आण्णांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.... माझे आण्णा आम्हाला सोडून गेले...

तेवीस वर्षापूर्वीचं हे सगळं सांगताना आज सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं... असं वाटंत होतंं की, एखादी अनमोल गोष्ट त्याच्या हातून सुटली होती... त्याला हुंदका आवरत नव्हता... तसा तिने त्याच्या हातावर थोपटून त्याला शांत केलं... 

मृदुलाः ज्या गोष्टी घडून गेल्यात, त्याला आपण काहीच करू शकत नाही.... जे झालं ते वाईटच झालं... वडील असे अवेळी आणि अनपेक्षीतपणे गेले, त्यामुळे तुला चांगलाच धक्का बसला असेल... सहाजिकच आहे ....

वीरः हो ग! मी तर खूप कोलमडुन गेलो होतो... आम्हा सगळ्या भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान! त्यामुळे आण्णांचा माझ्यावर खूप जीव होता. आण्णांचा कोणताच शब्द मी खाली पडू दिला नाही... मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायचो, पण दोघं मोठे दादा कधीच त्यांचं ऐकायचे नाही...  त्यांना उलटुन बोलायला पण कमी करायचे नाहीत... मी कधी दारू सिगारेटला हातसुद्धा लावलेला नाही. त्यामुळे वडीलांनी माझ्या आणि त्यांच्या नावाने बँकेत खातं उघडलं होतं. वडिलांना माझं भविष्य काय असेल, याची कल्पना आली असेल, म्हणून की काय त्यांनी माझ्या नावावर काही रक्कम करून ठेवली होती. आणि अशातच अचानक त्यांचं असं जाणं..... मी स्वतःला सावरू शकत नव्हतो गं.... मी खुप एकटा पडलो होतो...

मृदुलाः आण्णांच्या नोकरीवर तुमंच सगळं अवलंबून होतं नं. आण्णा गेले मग तुमचा खर्च कसा भागायचा?

वीरः बारावीची परीक्षा झाल्यानंतर, मी एके ठिकाणी कामावर जात होतो. परंतु आण्णांच्या गडबडीत माझ्या खुप सुट्ट्या झाल्या. मी बरेच दिवस कामावर न गेल्यामुळे माझी नोकरी गेली. अशा परिस्थितीत आमच्याकडे उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं. आमचं दोन मजली घर होतं. वडील असतांना आम्ही खाली राहायचो आणि वरचं घर भाड्याने दिलं होतं. त्या भाड्याचे काही पैसे यायचे. परंतु वडील गेल्यानंतर, मोठ्या भावाने त्या भाडेकरूंना खोल्यांमधून बाहेर काढलं आणि तो स्वतः वहिनीसोबत त्या खोल्यांमध्ये राहायला आला. भाडेकरुंना न काढण्याबाबत, आम्ही त्याला खूप विनवणी केली. आता वडील नसल्यामुळे आम्हाला उत्पन्नाचं काहीच साधन नाही, त्यामुळे तू त्या  भाडेकरूंना राहू दे, म्हणजे आमचा खर्च  तरी भागेल, असं त्याला वारंवार सांगीतलं. परंतु त्याने ऐकलं नाही. तो म्हंटला की, मी तुम्हाला सांभाळेल,  मी तुमचा सगळा खर्च करेल. परंतु तिथे आल्यानंतर त्याने त्याला जे करायचं तेच केलं. तो आमच्याकडे बघतही नव्हता. आम्हाला भाडं मिळत नसल्यामुळे आमचा खर्चही भागत नव्हता आणि मोठा दादा पण काहीच मदत करत नव्हता.

          आणि अशातच अण्णांचे खूप जवळचे मित्र आमच्या घरी आले. त्यांनी सांगितले की, अण्णांच्या जागेवर अनुकंपा मध्ये तुमच्या घरातील कोणा एकाला सेवेत सामावून घेतील. तोपर्यंत माझं बारावी झालेलं होतं. आई शिकलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी माझं नाव सुचवलं आणि वडील गेल्यानंतर वर्षभरातच मी त्यांच्या जागेवर रुजू झालो. 

          तशातच मधल्या भावाचं लग्न झालं होतं आणि आता आईने तिच्या पसंतीच्या एका मुलीशी माझं लग्न ठरवलं होतं. माझं रूपावर खुप प्रेम होतं, मला तिच्याशीच लग्न करायचं होतं. पण फक्त आईच्या शब्दाखातर मी आईने सांगीतलेल्या मुलीबरोबर म्हणजे सविताबरोबर लग्न करायला तयार झालो. आमचं लग्न पार पडलं आणि सविता आमच्या घरात आली. ती आईच्या पसंतीची असल्यामुळे तिचं आणि आईचं खूप चांगला पटायचं. परंतु, माझ्या वहिनीने आईला तिच्याबद्दल नको त्या गोष्टी सांगून आईचे कान भरले. आणि आईला तिच्यावर हात उचलायला तसेच तिला घालून पाडून बोलायला भाग पाडले. दादांच्या सांगण्यात येऊन आई सविताला घालून पाडून बोलू लागली. तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढू लागली. एक दोनदा आईने सविताला खुप मारलं. मला खूप वाईट वाटत होतं. तिची चूक नसतांना, केवळ माझ्या भावांच्या आणि वहिनींच्या  सांगण्यावरून आई तिला त्रास देत होती.

          आई तिला सारखं, तुम्हाला कधीच मूल होणार नाही, तुमचं कधीच चांगलं होणार नाही, असं बोलत राहायची ...  एक बाई एका बाईला असं कसं बोलू शकते ग? मला तर खूप वाईट वाटलं. पण तरी आम्ही तिथेच राहत होतो. तिने आम्हा दोघांची नातेवाईकांमध्ये बदनामी करायला सुरुवात केली होती. शेवटी नातेवाईकच ते! आईचं म्हणणंच खरं मानणार! परंतु माझ्या सगळ्या मित्रांना खरी परिस्थिती काय आहे, हे माहीत होतं.  माझे नातेवाईक मला सारखं बोलायचे की, आईशी असं वागतात का? आईला असं बोलतात का? 
 
           आणि अशातच ऐन दिवाळीच्या रात्री आईने आणि बहिणींनी फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी आम्हा दोघांना घरातून बाहेर काढलं ग...

मृदुलाः बापरे! हे तर खूपच भयंकर आहे. सविताने एवढं कसं काय सहन केलं आणि तुला सुद्धा जो त्रास झाला तो वेगळाच!
 
वीरः हो गं! आम्हाला खरंच खूप त्रास होत होता. तरी आई आहे, म्हणून आम्ही सहन करत होतो. पण तिनेच असं अचानक घरातून बाहेर काढलं मग काय करणार? कोणाकडे दाद मागणार? शेवटी आपलंच नाणं खोटं ठरलं!

मृदुलाः मग काय केलंस रे? कुठे गेलात तुम्ही?

वीरः या प्रकरणाचा मला एवढा धक्का बसला, की कितीतरी वेळ आम्ही बाहेरच बसून होतो. काय करावं काहीच सुचत नव्हतं. आमचं गाव सोडून मी कधीच कुठे गेलो नव्हतो. आमचं गाव हेच माझं जग होतं. आता तर माझं लग्न पण झालेलं होतं. मी आता एकटा नव्हतो, तर माझ्या बरोबर आता सविताची पण जबाबदारी माझ्यावर होती. मी कधीच बाहेरच जग न पाहिल्यामुळे, मला बाहेर पडायची खूप भीती वाटत होती.  आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा माझ्या मनात आला होता. 

           हा हा म्हणता सगळ्या गावात हि बातमी पसरली होती. आई, भाऊ-बहीण यांनी सगळ्या नातेवाईकांमध्ये आमची बदनामी करून ठेवली होती. त्यामुळे नातेवाईकांनी आमची  मदत करणे दूरंच होते. माझा एक जीवाभावाचा मित्र होता. त्याला सगळं माहीत होतं. त्याने आम्हाला त्याच्या घरी नेलं. त्याच्या घरी गेल्यावर पण मरुन जावसं वाटत होतं. या विचारातच कशीबशी आम्ही ती रात्र काढली. झोप येण्याचा तर प्रश्नच नव्हता! सकाळी सकाळी केव्हा तरी डोळा लागला आणि तेवढ्यात माझा मोठा दादा मित्राच्या घरी आला. अंगणात उभा राहुनच तो आम्हाला, माझ्या मित्राला जोरजोरात ओरडुन शिव्या देवु लागला. त्याला समजलं होतं कि आम्हाला मित्राने त्याच्या घरी नेलं म्हणून.. सकाळी सकाळी येऊन त्याने माझ्या मित्राला धमकावयाला सुरू केलं. कोणीच माघार घेत नव्हतं.. मग मीच मध्यस्थी केली आणि दादाला म्हणालो की, तुला मी इथे नको आहे नं... तर ठीक आहे.. आम्ही आत्ताच इथून निघून जातो. यापुढे आम्ही कधीच तुमच्यासमोर येणार नाही. तेव्हा कुठे तो शांत झाला आणि निघुन गेला.

          एवढं होऊनही आम्ही अजुन जीवंत आहोत, म्हणजे देवाचे काहीतरी प्रयोजन असेल, असा मी विचार केला आणि  तसंच आम्ही जीव मुठीत धरुन मुंबईला पळून आलो. मी कधीच मुंबईला आलो नव्हतो... मला मुंबईतलं काहीच माहित नव्हतं.

मृदुलाः बरं झालं, तुम्ही पळून आलात ते! तुमचा सगळा त्रास मिटला.

वीरः नाही गं! असं काहीच झालं नाही. आम्ही मुंबईला आलो खरं! पण आमच्या मागचा हा त्रास काही कमी झाला नाही. दिवाळीच्या आदल्या दिवशी माझा पगार झाला होता. त्यातले अर्धे पैसे मी आईला दिले होते आणि अर्धे पैसे भाऊबीजेला बहिणींना दिले होते. त्यामुळे खिशात काहीच पैसे नव्हते आणि पगार रोखीने होत असल्यामुळे बँकेत पण काहीही असणे शक्य नव्हते. मित्राकडून काही पैसे उसनवार घेतले आणि मी मोठ्या साहेबांना भेटून मुंबईला बदली करून घेतली. अजून एक मित्र होता मुंबईत.. त्याच्याकडे काही दिवस राहिलो आणि एक खोली भाड्याने मिळविली. ऑफिसमध्ये खोली मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याला अजुन अवकाश होता. म्हणून आम्ही भाड्याच्या खोलीत रहायला आलो. पण आमच्याकडे काहीच सामान नव्हते. आम्ही गॅस, भांडी, ग्लास, वाटी, पेला आणि एक सतरंजी असं जे आवश्यक सामान होतं ते खरेदी केलं आणि आमचा संसार थाटला....

          माझ्या सासऱ्यांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी सरळ सांगितले, की हे तुमचे कौटुंबिक वाद आहेत, ते तुम्हीच बघा... आम्ही यात काहीच करू शकत नाही... असं जरी ते बोलले तरी, त्या परिस्थितीत त्यांनी आमची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही तेव्हा त्यांना नकार दिला आणि मला खरंच गरज वाटली तर मी तुमची नक्की मदत घेईल, असं सांगितलं.

          या खोलीत येऊन एक आठवडा होत नाही तर, एके दिवशी दुपारी आई आमच्या खोलीत आली....

मृदुलाः अं... (आश्चर्याने) तुझ्या आईला कसं कळलं, तुम्ही कुठे राहता ते?

क्रमशः...

🎭 Series Post

View all