Jan 23, 2022
प्रेम

एक प्यार ऐसा भी

Read Later
एक प्यार ऐसा भी

"अरे अनीश, काय गरज आहे तिच्या मागे लागायची? असल्या छप्पण मुली मिळतील ना रे तुला." उर्मी 

"छप्पन मुली नकोत ग, मला हीच हवी आहे." अनीश शांतपणे म्हणाला. 

"हिला काय सोनं लागलं आहे का? तिच्यामध्ये असे आहे तरी काय? जे इतर मुलींमध्ये नाही. या मुलीसाठी तू पूर्ण वेडा झाला आहेस." उर्मी 

"होय, झालोय मी वेडा आणि लग्न करेन तर फक्त आणि फक्त अनुशीच. बाकी कुणाचा मी विचारही केला नाही आणि करणारही नाही." अनीश 

"पण तिने तुला नकार दिला आहे आणि आता तर ती तुला भावही देत नाही. तूच फक्त तिच्या मागे लागला आहेस. तिला त्याचे काहीच नाही." उर्मी

"एक दिवस नक्की ती मला होकार देईल. तोपर्यंत मी तिची वाट पहायला तयार आहे." अनीश.

"तोपर्यंत खूप उशीर झाला तर." उर्मी 

"होऊ दे. मी तिच्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहे." अनीश. 

"अरे, आठव जरा एकेकाळी मुली तुझ्याशी बोलायला तरसायच्या, तू दिसलास की तुझ्याकडे पाहत बसायच्या, अजूनही तुझ्याकडे पाहतात आणि तू त्यांना सोडून हिच्या मागे लागला आहेस. हिच्यापेक्षा मी सुंदर आहे माझा तरी विचार कर." उर्मी नकळत बोलून गेली. अनीशने फक्त तिच्याकडे पाहीले आणि तो भूतकाळात गेला.

कॉलेजचा पहिला दिवस. अनीश कॉलेजला गेला तेच दोन तीन मुली त्याच्याशी बोलायला आल्या. अनीश त्यांना भाव न देताच निघून गेला. आत गेल्यावर त्याला त्याची बालमैत्रीण उर्मी भेटली. तो तिच्याशी बोलताना इतर मैत्रिणी त्यांच्याकडे फक्त पाहत होत्या. कारण अनीश होताच तसा. गोरा गोरा, भुरभुरे केस, अगदी हँडसम हिरो, कोणीही पाहत रहावा असा. त्यामुळे कॉलेजमध्ये कोणी समोर तर कोणी चोरून त्याच्याकडे पाहत होते. तो अख्या काॅलेजचा चाॅकलेट बाॅय होता. कॉलेज संपेपर्यंत भरपूर जणींनी स्वतःहून त्याला प्रपोज केले होते. त्यात ऊर्मी कशी राहील बरं? 

ती तर त्याची बालमैत्रीण. लहानपणापासूनच तो तिला आवडायचा. तिने तसे बोलून देखील दाखवले. पण अनीश फक्त एक मैत्रीण म्हणून तिच्याकडे पाहत होता. आपण एक मित्र म्हणून कायम सोबत असू असे त्याने उर्मीला सांगितले होते. म्हणूनच तर दोघेही अजूनही खूप चांगले मित्र होते. कोणत्याही कठीण काळात एकमेकां सोबत होते. पण तरिही उर्मी ला कुठेतरी आशा लागून राहिली होती की, अनीश एक ना एक दिवस तिला मिळेलच. म्हणूनच तर तिने अजूनही लग्नाचा विषय काढला नव्हता. जेव्हा अनीश लग्न करेल त्यानंतरच ती लग्न करणार होती. पण अनीशने तिचा विचार कधीच केला नाही आणि कदाचित करणार देखील नाही.

कॉलेज संपल्यावर अनीश एका मोठ्या कंपनीत मोहिते कंपनीज् मध्ये जॉब करू लागला. तिथे थोड्याच दिवसात त्याने सगळ्यांची मने जिंकली. सगळी जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडू लागला. त्यामुळे तो सर्वांचा आवडता बनला. ऑफिसमध्येही बऱ्याच मुली त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अनीशला मात्र त्यांच्या मध्ये इंटरेस्ट नव्हता. आपले काम भले आणि आपण भले हा त्याचा फाॅर्मुला झाला होता. 

एक दिवस ऑफिसमध्ये नवीन मुला- मुलींचे इंटरव्ह्यू घेण्यात येणार होते. सगळी मुले-मुली इंटरव्ह्यूसाठी येऊन बसले होते. पण नेमके त्याच दिवशी ऑफिसच्या बॉसना खूप महत्त्वाचे काम आले आणि मॅनेजरही रजेवर असल्यामुळे इंटरव्ह्यूची जबाबदारी बाॅसनी अनीशवर सोपवली. खरंतर अनीशला हे काम नको होते. पण त्याच दिवशी इंटरव्ह्यू घेणे गरजेचे होते. म्हणून शेवटी अनीश कसाबसा इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसला. एकूण पंचवीस सदस्य त्या पोस्टसाठी आले होते. एक एक सदस्य इंटरव्ह्यू देऊन जात होते आणि आता तिची इंट्री झाली. ती म्हणजे अनुश्री देशमुख. दिसायला अत्यंत सुंदर, हुशार, हजरजबाबी, सगळे गुण तिच्यात होते. ती आत आली तशी अनीशची विकेटच उडाली. आजपर्यंत इतक्या मुली मागे लागल्या होत्या, पण ही काहीशी वेगळी वाटली हे त्याला जाणवले. याआधी मला कधी अशी फिलिंग आलेली नव्हती, तर आज हिला बघून असे का होत आहे? हा प्रश्न त्याला सतावत होता. त्या विचारांच्या गराड्यात असतानाच, 

"हॅलो सर, मे आय सीट" अनुश्रीच्या आवाजाने अनीश भानावर आला.

"येस, प्लीज सीट डाऊन." अनीश असे म्हटल्यावर अनुश्री खुर्चीत बसली. 

"मी रिझ्युम पाहिला आहे, त्यामुळे त्यातील मी काहीच विचारत नाही. बरं मला सांगा तुम्हाला समाजसेवेची आवड आहे. तर तुम्ही समाजसेवा म्हणजे नक्की काय करता? की कोणत्या संस्थेत काम करता?" अनीश 

"सर, संस्थेत राहून काम करण्यापेक्षा, बांधील राहण्यापेक्षा मुक्त होऊन समोर एखादा अडचणीत असेल तर त्याला मदत करायला मला आवडते. तसेही संस्थेत काम केल्यावर काम कमी आणि नाव जास्त होतं, असे मला वाटते. मला नाव नको तर लोकांचे सुख हवे आहे आणि मी त्यासाठी काम करते." अनुश्रीच्या या उत्तराने अनीश तिच्या वर इंम्प्रेस झाला. 

ही फक्त दिसायला सुंदर नाही तर विचारानेही सुंदर आहे हे त्याला जाणवले आणि अनीशने अनुश्रीला त्या पोस्टसाठी सिलेक्ट केले. नंतर सर आल्यावर त्यांच्या परवानगीने एक तारखेपासून ऑफिस जॉईन करण्यासाठी अनुश्रीला मेल केला. एक तारखेपासून अनुश्री ऑफिसमध्ये जॉईन झाली. सर्वांनी तिचे स्वागत केले. त्या ऑफिसमध्ये तिची मैत्रीण सावनी सहा महिन्यांपूर्वीच जाॅईन झाली होती. त्यामुळे तिला पार्टनर मिळाला होता. 

अनुश्री तिच्या नवीन डेस्कवर येऊन बसली. पहिला दिवस असल्यामुळे नक्की काय काम करायचे? हे तिला माहीत नव्हते. थोडा वेळ ती तशीच बसून राहिली. इतक्यात तिच्या शेजारच्या डेस्कवर अनीश जाऊन बसला. त्याला आज ऑफिसला यायला थोडा उशीरच झाला होता, म्हणून तो गडबडीत आला आणि त्याने लगेच कामाला सुरुवात केली. अनुश्रीचे त्याच्याकडे लक्ष जातात ती त्याला म्हणाली, "हॅलो सर, तुम्ही इथे. तुम्हाला तर केबिनमध्ये जायला हवं. इथे का बसलात? " अनुश्री 

अनुश्रीला शेजारी बसलेली बघून अनीश थोडा गोंधळलाच आणि तिला शांत करत म्हणाला, "हा माझा डेस्क आहे आणि इथे मीच बसणार ना. केबिनमध्ये बाॅस बसणार." 

"म्हणजे? मग तुम्ही कोण आहात?" अनुश्री 

"मी पण तुमच्यासारखाच एक एम्लाॅइ आहे. तुमच्या सारखाच काम करणारा." अनीश 

"मग इंटरव्यू." अनुश्री 

"अरे हो, ते सरांना काम होतं म्हणून मला इंटरव्यू घ्यायला सांगितले होते इतकेच." अनीश 

"अच्छा, मला वाटलं तुम्हीच बाॅस आहात म्हणून. मी मनात म्हटले, झालं आता जॉबचे वाजले तेरा." अनुश्री नकळत बोलून गेली. 

"का? इतका वाईट आहे का मी?" अनीश 

"वाईट नाही." अनुश्री 

"मग??" अनीश 

"इतका हॅण्डसम बाॅस असला तर पोरी काम सोडून बॉसकडे बघत बसतील न." अनुश्री 

"आणि कलीग असला तर.." अनिश म्हणाला यावर ती काहीच बोलली नाही. नंतर अनुश्री त्याच्यासोबत बराच वेळ बोलत बसली. तिला सुरुवातीला वाटलं की हा इतका हँडसम आहे तर त्याला अॅटिट्युड असणार, तो भाव खाणार पण बोलताना तसे काही जाणवले नाही म्हणून तिने हात पुढे करुन "फ्रेण्डस्" म्हणाली, तसे लगेच अनीश पण हात मिळवला. त्यालाही हेच हवे होते पण आपण स्वतः कसा पुढाकार घ्यायचा? हिला काय वाटेल? याचा विचार त्याच्या मनात येत होता, म्हणून तो शांत होता.

तेवढ्यात अनुश्री म्हणाली, "माझं नाव तुला माहित आहे. तुझं नाव काय ते सांगितले नाहीस?" अनुश्रीने फ्रेंड्स म्हटल्यावर लगेच ती अरे तुरे करून बोलायला सुरुवात केली. कारण मैत्रीत तसे बोलले की छान वाटतं. तिने असे मला अरे तुरे बोललेलं खूप आवडले. हिचा मनमोकळा, बिनधास्त स्वभाव जास्त आवडला. अनीश मनातच म्हणाला. 

"मी अनीश. मला इथे जॉईन होऊन साधारण तीन चार वर्षे झाली." अनीश 

"मी तुला अनीश म्हटले तर चालेल का?" अनुश्री

"हो चालेल ना." अनीश म्हणाला. त्यांचे बोलणे सुरू असतानाच सावनी तेथे आली. 

"हा चक्क तुझ्याशी बोलत आहे!" सावनी 

"म्हणजे ग?" अनुश्री 

"याला खूप अॅटिट्युड आहे असे मला वाटत होते. हा कुणाशीच बोलत नाही. पण तुझ्याशी बोलतोय म्हणजे.." सावनी

"इतका पण वाईट नाही बर का मी?" अनीश

"ते मला आत्ता समजलं." असे म्हणून सावनी हसू लागली 

"अगं सावनी, यांनी माझी इंटरव्हयू घेतली होती आणि मी सिलेक्ट झाले, म्हणून ओळख आहे ग." अनुश्री 

"हो ग. पण तू का इतका स्पष्टीकरण देत आहेस? आणखी काही असेल तर मला काहीच अडचण नाही." सावनी 

"गप्प बस जरा." अनुश्री

"बाय द वे, मी यांना सिलेक्ट केलं पण त्याबद्दल पार्टीच काही बोलणं झालं नाही." अनीश 

"हो देते ना" अनुश्री

"कधी??" सावनी 

"आज ऑफिस सुटल्यावर देते डन." अनुश्री

"ओके." म्हणून सगळे कामाला लागले. अनुश्रीला आज तसे काही काम नव्हते म्हणून ती तशीच फाईल्स बघत बसली होती, म्हणून अनीशने तिला हाक मारली, "तुला काही काम नसेल तर मला मदत करशील का?" अनीश म्हणाला. 

"नक्कीच करेन, काय काम आहे?" अनुश्री 

"मी तुला एक डॉक्युमेंट देतो ते तू तुझ्या पीसीवर टाईप करून देशील का?" अनीश 

"हो. तसेही मला आता काहीच काम नाही." असे म्हणून अनुश्रीनेही अनीशला मदत केली. आज अनीश खूप खुश होता. कारण अनुश्रीच्या मदतीने त्याची बरीचशी कामे पूर्ण झाली होती.

ऑफिस सुटल्यावर अनुश्री, अनीश आणि सावनीला सोबत घेऊन पार्टी देण्यासाठी कॉफी शॉपमध्ये गेली कारण हॉटेलमध्ये गेले तर ती वेळ जेवणाची नव्हती आणि नाश्ता केला तर जेवण जाणार नाही म्हणून फक्त काॅफीच घ्यायचे ठरले. कॉफी शॉपमध्ये गेल्यावर त्यांनी कोल्ड कॉफी ऑर्डर केली आणि त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. गप्पांमध्ये कसा वेळ गेला? हे कुणाला कळलंच नाही. उशीर झाला म्हणून सगळे घरी गेले.

अनीशचा आजचा दिवस खूप भारी गेला होता. एक तर इतक्या वर्षांनी तो कोणाशी तरी मन- मोकळेपणाने बोलला होता. तसेच उर्मी नंतर त्याला मदत करणारी, त्याच्या आवडीची व्यक्ती त्याला भेटली होती. पण त्याला ह्या फिलिंग्ज पहिल्यांदाच येत होत्या आणि अनीशला हे सुद्धा समजत नव्हते की असे का होत आहे? पण जे काही होत आहे ते खूप छान होत आहे. ते सगळे त्याला हवेहवेसे वाटत होते, त्यामुळे तो खूप आनंदात होता. त्याच्या चेहर्‍यावरील आनंद आणि त्याच्यातील हा बदल पाहून त्याचे आई-वडील खूप खूश झाले. काही का असेना? पण अनीश खूश आहे. तो खूश तर आपण खूश असे त्यांना वाटत होते. 

अनीशला रात्रभर झोप लागेना म्हणून तो गॅलरीत जाऊन बसला. "एका दिवसात ही स्थिती तर पुढे जाऊन काय होईल? अजून काही नाही झाले त्यापेक्षा तिच्यापासून थोडा लांब राहू. उगीच नंतर त्रास कशाला?" असा तो मनातल्या मनात विचार करत होता. तोच,

"कोण आहे ती?" असे एकदम अनीशची आई म्हणाली आणि अनीश "अन्" म्हणणार इतक्यात शांत झाला. "हे नक्की खरच प्रेम आहे की एट्रॅक्शन हे बघू मग नंतर सांगू" असे मनातून अनीश म्हणाला, आणि "कोणी नाही ग, मी एकटाच बसलो आहे. झोप येईना म्हणून." 

"तेच झोप का येईना? तू कोणाचा विचार करत आहेस?" अनीशची आई 

"कोणाचा नाही ग, कामाचा विचार.. कामाबद्दल विचार करत होतो." अनीश 

"बरं ठिक आहे. इतका विचार करू नकोस. तू जे करतोस ते योग्यच करतोस. मला खात्री आहे." अनीशची आई. 

"थॅन्क्यू आई." अनीश 

"बरं, जा झोप जा. जास्त जागरण करू नकोस. गुड नाईट." अनीशची आई. 

"हो. गुड नाईट." अनीश 

"बरं. जी कोणी तुला पसंत असेल ती आम्हाला सुध्दा पसंत असेल बरं. आम्हाला काहीच अडचण नाही. तू खूश तर आम्ही खूश." अनीशची आई म्हणाली. 

"हो आई. तसे काही असेल तर थोडीच तुमच्यापासून मी लपवेन? पहिला येऊनी तुम्हालाच सांगेन." अनीश 

"तेवढा विश्वास आहे रे बाळा." अनीशची आई. 

"लव्ह यू आई." अनीश 

"लव्ह यू टू डियर." अनीशची आई. 
असे म्हणून दोघेही झोपायला गेले.

आता अनीश अनुश्री पासून दूर जाईल की तिच्या अजून जवळ जाईल. जर जवळ जाईल तर कसा? आणि दूर जाईल तर कसा? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः 

ही कथा ईरा प्रो ब्लॉग मध्ये येणार असून आजच ईरा चे सबस्क्रिप्शन घ्या..

ईरा सबस्क्रिप्शन कसे घ्यावे?

1. तुमच्याकडे android फोन असेल तर प्ले स्टोर वर जाऊन ira blogging app इन्स्टॉल करा. 
2. App मध्ये लॉगिन ऑप्शन येईल, तिथे डायरेक्ट google लॉगिन करा. 
3. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ईरा चे सर्व ब्लॉग दिसतील. वरील पट्टीवर वेगवेगळ्या कॅटेगरी दिसतील, latest, trending इत्यादी. त्यात pro blog कॅटेगरी मध्ये जाऊन कुठल्याही एका ब्लॉग वर क्लिक करा, तुम्हाला सबस्क्रिप्शन चा मेसेज येईल. तिथून तुम्ही ऑनलाइन पेमेंट ने 15 रुपये भरू शकता. 
4. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर app बंद करून पुन्हा सुरू करावे, तुम्हाला pro blog वाचता येतील. सबस्क्रिप्शन घेऊनही वाचता न आल्यास 8087201815 या नंबर वर आपला मेल आयडी पाठवावा.

iOs user साठी
1. तुम्ही irablogging.com या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता, त्यानंतर तुम्हाला एक otp येईल (मेल मधील spam फोल्डर मध्ये चेक करा)
2. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा, कुठल्याही एका pro blog वर जा आणि तिथून ऑनलाइन पेमेंट ने 15 रुपये भरा.
3. सबस्क्रिप्शन घेऊनही वाचता न आल्यास 8087201815 या नंबर वर आपला मेल आयडी पाठवावा.

15/- रुपये महिना हे केवळ एका लेखकासाठी नसून pro blog मधील सर्व लेखकांच्या सर्व भागांसाठी आहेत. The boss, स्वीकार, माझिया प्रियाला प्रीत कळेना सारखे ब्लॉग pro blog मध्ये येतात. सबस्क्रिप्शन नंतर या कथांचे तुम्ही रोज एकेक भाग वाचू शकता.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..