शांता आणि सखाराम गावातून शहरात तपासणीला आले होते. शांता बाळंत होती. त्यांना आधीच एक मुलगी होती, पण पुढचा \"वंशाचा दिवा\"च हवा अशी सखारामच्या आईची इच्छा होती. शहरामध्ये पोटात मुलगा आहे की मुलगी हे जन्मायच्या आधीच कळते हे साखरामच्या आईला कोणीतरी सांगितले होते. आणि त्यामुळे तिने या दोघांना शहरामध्ये धाडून दिले होते.
खरं म्हणजे शांताला तिला इकडे का आणलं आहे, त्याची काहीही कल्पना नव्हती. तिला असच वाटत होतं, की ती पुन्हा आई बनणार आहे, म्हणून हवा बदलासाठी तिला शहरात घेउन आले आहेत.
ज्याने सखारामच्या आईला या टेस्ट बद्दल सांगितलं, त्यानेच सखारामला शहरात त्या डॉक्टरचा पत्ता दिला होता. आणि त्या डॉक्टरने त्यांना ही टेस्ट करणाऱ्या लॅबोरेटरीचा पत्ता दिला होता.
जेंव्हा तिची NIPT (NonInvasive Parental Test) केली, तेंव्हाही तिला सांगितलं गेलं, की पोटातील बाळ सुरक्षित आहे का नाही हे बघण्यासाठी टेस्ट करणार आहेत म्हणून. पण हे फक्त अर्धसत्य होतं, कारण या टेस्ट मुळे पोटात मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा समजायचं.
टेस्ट करून झाली, आणि त्याचे रिपोर्ट्स सुद्धा मिळाले. डॉक्टरने पोटात मुलगी असल्याचे रिपोर्ट्स मध्ये बघून सांगितले. ते ऐकून सखाराम गडबडला. त्याला खर म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी, काहीही फरक पडत नव्हता. पण आईच्या दबावाखाली त्याला काहीही सुचत नव्हत. डॉक्टरांनी अबोर्शन बद्दल विचारलं, पण तो थोडा वेळ मागून दवाखान्याच्या बाहेर आला.
खर म्हणजे अबोर्शन म्हणजे काय हे त्या दोघांनाही माहीत नव्हतं. सखारामच्या आईला ज्याने या टेस्ट बद्दल सांगितलं, त्याने असही सांगितलं की पोटात मुलगी असेल, आणि अबोर्शन केलं, की त्याचे लिंगपरिवर्तन होते. म्हणजे मुलगी असेल तर त्याचा मुलगा होतो. गावाकडील असल्याने आणि मुख्यतः शिक्षणाशी काडीचाही संबंध नसल्यानं, सखारामच्या आईला हो गोष्ट खरी वाटली होती.
शांताला अबोर्शन म्हणजे काय वैगरे काहीही माहीत नव्हतं. तिला फक्त एवढंच समजलं होत, की रिपोर्ट्स बघून आपला नवरा अस्वस्थ झालाय. आणि म्हणून ती त्याच्यासोबत डॉक्टरांना शोधत होती. आणि थोड्या वेळाने त्यांना डॉक्टर देसाई गाडीतुन उतरुन दवाखान्यात जाताना दिसले.
डॉक्टर दवाखान्यात जायची त्यांनी वाट बघितली, आणि थोड्या वेळाने ते सुद्धा दवाखान्यात गेले. दवाखान्यात बऱ्यापैकी गर्दी होती. गर्दी बघून हे डॉक्टर आपल्याला योग्य सल्ला देऊ शकतील, असा विश्वास सखारामला वाटला. शांता मात्र दवाखान्यात लावलेल्या छोट्या बाळांच्या चित्रांकडे बघून हरकून गेली होती.
दोघांचा नंबर आला, दोघे आत गेले. प्रसन्न चेहऱ्याचे डॉक्टर देसाईंनी दोघांकडे बघून स्मितहास्य केले.
" बोला, काय अडचन आहे? कोण आजारी आहे? ", त्यांनी विचारले.
" कोणीबी आजारी नाय हाय डाकदर सायेब. ही माझी बायको शांता. ही पोटूशी हाय. "
" अच्छा, म्हणजे तुम्ही रुटीन चेकअप करायला आला आहात का? "
" रुतीन चेकप? त्ये काय असतंय? ", साखरामने गोंधळून विचारलं.
" अहो, रुटीन चेकअप म्हणजे दर थोड्या दिवसांनी करतात, ती तपासणी करायला आला आहात का? ", देसाईंनी सोप्प करून विचारलं.
" नाय नाय डॉक्टर सायेब, आमी तर अबरशन का काय ते म्हणत्यात, त्ये विचाराला आलो होत. "
देसाईंनी चष्म्यातून त्यांच्या कडे दोन सेकेंद निरखून बघितलं. चेहऱ्यावरून तरी दोघांना अबोर्शन म्हणजे काय, माहीत असल्याच दिसत नव्हतं. काही क्षणांच्या शांतते नंतर देसाईंनी बोलायला सुरुवात केली.
" तुम्हाला माहीत आहे का अबोर्शन म्हणजे काय? "
" नाय डाकदर सायेब "
" तुम्हाला अबोर्शन कस करतात, ते माहीत आहे का? "
" नाय डागदर सायेब "
" तुम्ही कधी कोणाकडून अबोर्शन बद्दल ऐकल आहे का? "
" नाय डागदर सायेब "
" मग तुम्हाला अबोर्शन का करायच आहे? "
" डागदर सायेब, माह्या माय ला कुनीतरी सांगितलं व्हत, की जर पोटात पोरगी असल, आणि ये अबरशन क्येल, की त्याचा पोरगा व्हतो. " सखारामने जे त्याला माहित होतं, ते सांगून टाकलं.
त्याच बोलणं ऐकून डॉक्टरांना हसावं का रडावं तेच कळेना. जिकडे \"मुलगी वाचवा, मुलगी शिकवा\" सारख्या मोठ्या मोठ्या योजना सुरू होत्या, तिथे एका गावाकडील अशिक्षित माणसांना फक्त पैसे कमवण्यासाठी खोटी स्वप्ने दाखवून लुबाडले जात होते.
डॉक्टर देसाईंनी आता हे या दोघांच्या कलाने घायचे ठरवले.
" अच्छा, अजून काय सांगितलं आहे त्या माणसाने आपल्या मातोश्रींना? "
" अजून काय नाय, बास येवडच, की यासाठी पैसे बक्कळ लागतात बगा! पैसे द्येऊन आपण ह्ये अस करू शकत्यो. "
सखाराम अशिक्षित असला, तरी एक कसलेला शेतकरी होता. त्याला शेतीबद्दल खुप ज्ञान होत. त्यामुळे उत्तम शेतमालामुळे घरात पैसे खेळत असायचे.
" अच्छा, असं होय! तुम्ही अगोदर कोणत्या डॉक्टर कडे दाखवलं होत यांना? "
" त्ये .... ", सखारामने नाव सांगितलं.
" अच्छा, बर. याआधी तुम्हाला काही अपत्य, म्हणजे याआधी कोणी मुलगी किंवा मुलगा? "
" हाय ना, येक मुलगी हाय. लय गुनाची हाय. तिज्या आजीची तर लय लाडकी हाय. ", शांता कौतुकाने म्हणाली.
देसाईंनी मनाशी काहीतरी निर्धार केला.
" तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या या. तोपर्यंत मी तुमचे रिपोर्ट्स बघून ठेवतो. आणि हो, तुमच्या आईला सुद्धा घेऊन या. "
" माय, मायने कशापायी यायला हवं डागदर सायेब? "
" अहो, त्या वयाने मोठ्या आहेत. त्यांना विचारून केलेलं बर असतं. आणि अशा कार्याला वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभला तर अजूनच चांगलं. ", देसाईंनी काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं.
" अस म्हणता, बर बर, ठीक हाय. आनतो उद्या मायला पन. चल ग शांते, बिगी बिगी घरला जाऊ आणि मायला सांगू... "
शांता आणि सखाराम त्या दिवशी आनंदाने घरी गेले. त्या बिचार्यांना काहीच माहीत नव्हतं, की त्यांच्या बरोबर नक्की काय आक्रीत घडत होतं. जर त्यांनी second opinion न घेता पुढचं पाऊल उचलले असते, तर काय झालं असतं, त्याची कल्पना करणे अवघड नाही. समाजात अशीही काही माणसे आहेत, जी थोड्या पैशांसाठी कोणाच्याही जीवाशी खेळू शकतात. आणि त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. बरोबरच आहे म्हणा, ज्यांची मनंच मेलेली आहेत, त्यांना दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी काय घेणं-देणं.
डॉक्टर देसाईंचं आज दवाखान्यात विशेष लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळ झाली, आणि ते घरी जायला निघाले. गाडी चालवताना सुद्धा ते या दोघांचाच विचार करत होते.
घरी पोहोचल्याबरोबर घरामध्येही ते शांत शांतच होते. एरवी घरी आल्यावर ते अगदी घराला हसून खेळून खुलवून ठेवत. नातवाबरोबर खेळत. पण आज त्यांनी त्यातही जास्त रस दाखवला नाही.
त्याच्या मुलाला, उदयला समजलं, की आज बाबांचं काहीतरी बिघडलं आहे. एरवी ते अस कधी वागत नसत. ते कामाचं टेन्शन कामाच्या ठिकाणीच ठेवून येत. याआधी त्यांनी अशी केस बघितली नव्हती असही नव्हतं. याआधीही त्यांनी अशी माणसं बघितली होती, पण ती सगळी निगरगट्ट होती. पण... काय माहीत, त्यांना सखाराम आणि शांता निरागस वाटत होते. केवळ काही पैशांसाठी एका जन्माला सुद्धा न आलेल्या निर्दोशाचा जीव टांगणीवर लागला होता.
" बाबा, काय झालं? काही टेन्शन आहे का? ", उदयने विचारलं.
" ....... "
" बाबा, कुठे हरवलात? बाबा.. ", उदयने डॉक्टर देसाईंना हलवून विचारलं.
" अं.. काही म्हणालास का? "
" मी विचारलं, काही टेन्शन आहे का? आज तुम्ही एरवी सारखे एनर्जेटिक वाटत नाही आहात? काय झालं? "
" काही नाही रे.. आज एक जोडी NIPT test चा रिपोर्ट घेऊन आली होती. अबोर्शन करायचं होतं म्हणे त्यांना... "
" मग? तुम्ही अशा नमुन्यांना पहिल्यांदाच थोडी भेटताय? हकलून लावायचं ना सरळ! नाहीतर फारच झट खात असतील तर पोलिसांना बोलवायचं. ", उदय चिडून म्हणाला.
" नाही रे! ही लोकं जरा वेगळीच होती. मी आतापर्यंत जी माणसं पहिली, ती कळून सवरून अबोर्शन साठी येत होती. या वेळी तस नव्हतं. "
" ..?.. "
" नाही समजलं? सांगतो. झालं असं की... ", आणि देसाईंनी त्याला सगळं सांगितलं.
" ही तर शुद्ध फसवणूक आहे! गोड गोड बोलून पैसे उकळण्याचा प्रकार झाला हा! कोण आहेत कोण हे जहागीरदार? "
" आहे एक. पण आता प्रश्न तो कोण आहे हा नाही. त्याला कस पकडायचं, हा आहे. "
" मग, त्यात काय अवघड आहे. माझा तो मित्र आहे ना वसंत सुर्वे, तुम्ही ओळखता की त्याला चांगलं. त्याला फोन करा की. तो एका पायावर तयार होईल तुमची मदत करायला. ", उदय म्हणाला.
" तो, तो मला डॉक्टरकाका डॉक्टरकाका म्हणून भंडावून सोडायचा तो? काय करतो काय तो सध्या? "
" Senior inspector आहे. तुमचं काम होऊन जाईल. "
" अरे वा! एकदम मस्त. Thank you उदय, तुझ्यामुळे माझं अर्ध काम सोप्प झालं. "
" काय वडील, पोराला thank you म्हणताय? हीच का आपली दोस्ती? "
" काय? "
" सॉरी, तो मित्रांमध्ये मारायचा डायलॉग अर्धा ऍड झाला. तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. मी नंबर पाठवतो तुम्हाला. "
" पाठव पाठव. "
डॉक्टर देसाई खुश झाले. ओळखीचा पोलीस कर्मचारी म्हणजे काम लवकर होण्याची खात्री. शिवाय हा तर अगदीच ओळखीचा. उदयचा मेसेज आला. त्याने नंबर पाठवला होता. आणि अजून एक मेसेज होता.
\" मी आपली मदत केल्यामुळे मी आपल्यावर चार्ज आकारला आहे. त्यानुसार आपण आपल्या एकुलत्या एक बायकोसाठी, एकुलत्या एक पोरासाठी एकुलत्या एक सुनेसाठी आणि एकुलत्या एक नातवासाठी आपले उद्याचे काम फत्ते झाल्यानंतर घरी येताना न विसरता Ice-Cream आणायचे आहे. न आणल्यास चार्ज आणि पेनल्टी दोन्ही वसूल केले जाईल. आपला ए.आ. (एकुलता एक आज्ञाधारक) मुलगा उदय. \"
\" मोठा झाला, तरी बलिशपणा गेला नाही अजून \"
गालातल्या गालात हसत डॉक्टर देसाईंनी ok done वाली ईमोजी पाठवली आणि वसंत सुर्वेला फोन लावायला घेतला.
" हॅलो कोण? "
" अरे मी बोलतोय... "
" मी कोण, नाव नाही का तुम्हाला? "
" अरे मी डॉक्टर देसाई, ओळखलस का मला? "
" तुम्हाला ओळखायला तुम्ही अमिताभ बच्चन आहात का? "
" खरच नाही ओळखलस? "
" नाही, कोण डॉक्टर देसाई? मी कोणत्याही डॉक्टर देसाईंना ओळखत नाही. "
" अच्छा, बर. ओळख सांगतो. तू ज्या उदय देसाईंचा बालमित्र आहेस ना, मी त्याचा बाप. " देसाई वैतागून म्हणाले.
" कोण, डॉक्टरकाका? "
" ओळखलंस? मला वाटलं आता आधारकार्ड दाखवावं लागतंय की काय! "
" काय हो तुम्ही पण डॉक्टरकाका... "
" आणि ए शहाण्या, पोलीस आहेस ना? मग आवाजात जरा मार्दवता ठेव की. Public servant असा उद्धट पणे बोलला, तर लोक त्याला स्वतःची अडचण सांगतील कशी? काय माणूस आहेस तू? "
" अहो तस नाही हो.. काही लोकं उगाचच timepass करत असतात पोलिसांबरोबर. म्हणून आवाजात जरा जरब ठेवावी लागते. तुम्ही बोला, कसा काय फोन केला? कशी काय आठवण आली या पामराची? "
" उगाचच डायलॉग मारू नकोस. आता ऐक मी काय सांगतोय ते... "
आणि डॉक्टर देसाईंनी त्याला सगळी परिस्थिती सांगितली.
" बर, तुम्ही मला त्याची तुम्हाला माहीत आहेत तेवढी डिटेल्स पाठवा. मी बघतो काय करायचं ते. "
" ठीक आहे. आणि आवाजात जरा मार्दवता ठेवा पुढच्या वेळी. किमान माझ्याशी बोलताना तरी… "
" काय हो डॉक्टर काका, काय टोमणे मारताय? "
देसाईंनी हसत हसत फोन ठेवला. उद्या काय करायचं याचा विचार करायला लागले. सखाराम आणि शांताला तर त्यांनी सांगितलं, की उद्या आईला घेउन या, आणि मग आपण बोलू. पण त्याच्या आईचा स्वभाव कसा असेल, त्या आपण सांगितलेलं कितपत ऐकतील, याची त्यांना जास्त खात्री वाटत नव्हती. शिवाय त्या माणसाने त्यांना अजून काय काय पढवून ठेवलं होतं देवच जाणे.
उद्या दुपार पर्यंत वसंतने त्या माणसाला पकडलं, तर अति उत्तम. मग त्याच्या आईला समजवायला काहीच अडचण येणार नाही. पण तस व्हायला हवं एवढंच. देसाईंनी उद्याची चिंता उद्यावर ढकलून पलंगावर पाठ टेकवली.
सकाळपासून काही वसंतचा फोन आला नव्हता. डॉक्टर देसाईंनीही तो बिझी असेल असं समजून फोन केला नाही. दुपार झाली होती. ते क्लिनिक मध्ये एका एका पेशन्टला तपासून पाठवत होते. शेवटी सखाराम शांता आणि एक वयस्कर बाई आत आल्या.
" राम राम डागदर सायेब. ही माझी माय हाय. "
" राम राम डागदर सायेब. ", ती वयस्कर बाई म्हणाली.
" राम राम. बसा बसा. बोला. काय म्हणताय? "
" मला काय धाड भरलिया? त्ये हीच अबरसन करायचं हाय ना.. त्येचं बोलायचं व्हत.. "
" अच्छा. तुम्हाला काय माहीत आहे अबोर्शन बद्दल? "
" त्ये मला येकानं सांगितलं हाय, की ते अबरसन क्येल की पोरीचा पोरगा व्हतो. त्ये करायचं हाय आम्हांस्नी. "
" हे बघा मावशी, तुम्हाला जे समजलं आहे ते खोटं आहे. अबोर्शन मधून कोणत्याही प्रकारचे लिंगपरिवर्तन होत नाही. "
" म्हंजी? "
" अहो म्हणजे अबोर्शन केल्याने कोणतीही मुलगी मुलामध्ये बदलत नाही. तुम्हाला त्याने खोट सांगितलं आहे. "
" अस कस व्हील? आव त्यो मानूस लय वळखीचा हाय माजा. ल्हानपनापासून बगीतला हाय मी त्येला. त्यो का खोट बोलल माज्याशी. "
" अहो, तुम्ही समजून घ्या जरा.. "
" काय समजून गह्यू? आव तुमाला कायतरी चुकीच समजलं हाय बगा. त्यो माज्याशी खोटं बोलणं शक्यच नाय! "
" तुम्हाला अबोर्शन बद्दल जे समजलं आहे ते चुकीच आहे. जरा ऐकून घ्या माझं. मी काय बोलतोय ते नीट ऐका. ", डॉक्टर देसाई थोडा आवाज चढवून म्हणाले. त्याच्यामुळे सखारामची आई थोडी वरमली.
" हे बघा, अबोर्शनमध्ये, किंवा कोणत्याही प्रकारे मुलीला मुलामध्ये बदलणं शक्य नाही. आणि हेच खरं आहे. त्या माणसाने तुम्हाला काय वाढवून चढवून सांगितलं आहे देव जाणे. अबोर्शन म्हणजे भ्रूणहत्या. म्हणजे पोटातच मुलीला मारून टाकणं. "
सखाराम शांता आणि त्याची आई विलक्षण दचकले. त्यांना जे वाटत होतं, त्यापेक्षा त्यांनी जे ऐकलं, ते अविश्वसनीय होते.
" काय बोलताय काय डागदर सायेब? अस कस व्हॅईल? आवो.. ", सखारामला काय बोलावं तेच सुचेना.
" हो सखाराम, हेच खरं आहे. "
" नाय नाय डागदर सायेब, तुमाला कायतरी गीरसमज झालाय. असा होनारच न्हाय. त्यो मानूस माज्यासंग खोटं बोलूच शकत न्हाई. "
सखारामची आई काही ऐकायलाच तयार नव्हती. मग देसाईंनी त्यांना त्यांच्या कलाने समजवून सांगायचं ठरवलं.
" तुमचा मुलगा सखाराम शेतकरी ना? "
" जी! "
" मग तुम्हालापण शेतीबद्दल माहिती असेल. "
" म्हायती असेल म्हंजी? आवो माय हाय मी त्येची. हातात नांगर धाराय शिकवला हाय त्याला मी. त्यापेक्षा चार गोष्टी जास्तच ठावं हायत मला. ", सखारामची आई तोऱ्यात म्हणाली.
" ठीक आहे. मग मला तुम्ही सांगा, की जर आपण शेतात भात लावला, तर नंतर आपण त्याला ऊस कसा काय बनवणार? "
" मस्करी करताय व्हय डागदर सायेब? अस कस व्हील? आवो भात त्यो भात. त्याचा ऊस कसा काय व्हील? "
" का नाही होणार? नक्की होईल. तुम्ही मला फक्त सांगा, की आपण कसे करायच! "
" कायबी बोलू नका डागदर सायेब. तुमाला काय म्हैत शेतीबद्दल? जन्मापासून शेतकरी हाओत अमी. आमाला म्हाइत हाय, अस काई होन शक्यच न्हाई. "
" मग तेच तर म्हणतोय मी. तुम्हाला काय माहीत वैद्यकीय शास्त्राबद्दल? मी सुद्धा तेच सांगतोय, एकदा पोटामध्ये स्त्रीरुपी बीज अंकुरले गेले, की त्याचा पुरुष होण कस काय शक्य आहे? "
सखारामची आई या उत्तरावर विचारात पडल्यासारखी दिसली. काहीही झालं, तरी जसा भाताचा ऊस होणं शक्य नाही, तस जन्माआधी स्त्री चा पुरुष होणंही शक्य नव्हतंच.
" मग डागदर सायेब, जे व्हील ते व्हील, तूमी करा त्ये अबरसन. नको हाय मला पोरगी. अस नाय तर तस ठीक.. ", सखारामची आई म्हणाली.
" आत्याबाई काय बोलताय ह्ये? आव तुम्ही अस कस बोलू शकता? ", शांता ओरडली.
" तू गबस. तुला कोनि विचारलं न्हाय. डागदर सायेब, तुमि करा काय त्ये. "
" आये, आग काय बोलती हायस तू? ह्ये असलं काई म्या नाय करू देनार! ", सखाराम म्हणाला.
डॉक्टर देसाई अवाक होऊन बघत होते. त्यांना वाटलं होतं, की सखारामच्या आईला खर समजलं, कि ती त्या माणसाच्या नावाने शंख करेल. पण इकडे काहीतरी भलतंच होऊन बसले होते.
" आवो डागदर सायेब तुमि समजवा ना माय ला. ह्ये काय बोलती हाय ती? "
" पण मावशी, तुम्हाला काय गरज आहे शांताबाईंचे अबोर्शन करायची? मुलगी होणार असेल तर त्याला काय अडचण आहे? "
" घर मुली न्हाय चालवत डागदर सायेब. त्यासाठी पोर्गच लागतंय. पोरी काय, उद्या जातील दुसरीकडे निगून. त्यानंतर आमी कस जगायचं? त्ये काय नाय, मला पोर्गच हवं हाय.. "
" अहो मावशी, आजकाल मुली कोणत्याच गोष्टीत मुलांपेक्षा मागे नाहीयेत. प्रत्येक बाबतीत मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. मुलीसुद्धा घराचा आधार बनू शकतात. "
" काय गरज न्हाय आमाला पोरीचा आधार ग्यायची. येवडे वाईट दिस नाय आले आमचे आजून, की आमी पोरीच्या सासरी हातापाया पडायला जाऊ, आमचं गर चालवाया. "
" अहो मावशी समजून घ्या तुम्ही, अस करणं माणुसकीच्या दृष्टीने सुद्धा बरोबर नाही. तुमच्या अशा संकुचित मनोवृत्तीचा त्या छोट्या जीवावर का परिणाम घडवताय? तुम्हाला काय गरज आहे असं काही करायची? अहो मुलगा मुलगी एक समान आहेत. मुलींना सुद्धा जन्म घेण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याला अशा प्रकारे का खोडा घालताय? "
" तत्वज्ञान नका शिकवू डागदर सायेब. ह्ये सगळं ऐकायाच छान वाटत. तुम्ही फकस्त त्ये अबरसनच बगा.. "
" हे बघा मावशी, भ्रूणहत्या करणे बेकायदेशीर आहे. कायद्याने त्याला खुप मोठी शिक्षा आहे. "
" कायद्याच्या गोष्टी मला नका शिकउ डागदर. पैसा कसा बोलत्यो, त्ये म्हाइत हाय मला. तुमाला पण थोडे पैसे दिले, की तुमीबी तयार वाल. उगाच डोस्क खाऊ नका. किती रुपये हवेत त्ये बोला.. "
डॉक्टर देसाईंना त्यांना कस समजवायच तेच कळेना. एकतर अजून वसंतचा फोन पण आला नव्हता. तो असता, तर त्याने कायद्याच्या भाषेत तरी चांगलं समजावून सांगितलं असत. खर म्हणजे यांना गोडीगुलाबीने समजवायची गरज होती. तेवढ्यात देसाईंना सखारामने बोललेलं वाक्य आठवलं...
" तुम्हाला अबोर्शन करायचं आहे ना, ठीक आहे... "
" पन डागदर सायेब... "
" थांब सखाराम, ठीक आहे, तुमचं काम मी करून द्यायला मी तयार आहे. पण मला त्या बदल्यात पैसे नकोत. "
" मग काय हवं हाय तुमाला? "
" मला समजलं, की तुम्हाला लहान नात आहे एक! "
" व्हय. हाय ना. सावित्री. लय गुणांची ल्येक हाय. अब्यासात तर लै हुशार हाय. प्रत्येक वेळी पैली येति ती. पण का? "
" तुम्हाला जर अबोर्शन करायचं असेल, तर तुम्हाला त्या मुलीला मला दत्तक द्यावं लागेल... ", देसाईंनी स्फोट केला.
" त्वांड संभाळून बोला डागदर सायेब. माझी नात मी तुमास्नी का द्येउ? माझी लाडाची ल्येक हाय ती. काय कमी हाय माज्यामंदी, की मी तिला तुमाला संबळायला द्येउ? ", सखारामची आई त्वेषाने म्हणाली.
" एक नाही खुप कमी आहे तुमच्यामध्ये. पहिली गोष्ट, जर आधीच एक मुलगी, तुमच्या घरात नाव अभ्यासात पहिली येऊन उज्वल करतेय, तरी तुम्हाला दुसरी मुलगी सांभाळायला कमीपणा वाटतोय. दुसरी गोष्ट, आत्ता एकुलती एक आहे, म्हणून तुम्ही तिचे लाड करत नसाल हे कशावरून? तिसरी गोष्ट, उद्या चुकून तुमची नात तुमच्याशी उलट उत्तर देऊन बोलली, तर कशावरून तुम्ही तिला \"पोरीची जात\" असे म्हणून हिणवणार नाही? चौथी गोष्ट, कशावरून तुम्हाला मुलगा झाल्यावर तुम्ही तुम्ही त्या मुलीला नीट सांभाळाल? तुमचा आत्ताचा आवेश बघून तरी मला वाटत नाही तुम्ही तिला नीट सांभाळाल! पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कशावरून नातू घरात आल्यावर तिला कमीपणाची वागणूक मिळणार नाही? कशावरून तिच्यावर मानसिक अत्याचार होणार नाहीत? या गोष्टीवर तर मी रिस्क घेऊच शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला अबोर्शन करायचेच असेल, तर आधी मला तुमच्या नातीला दत्तक द्यावे लागेल. ", डॉक्टर देसाई दोन सेकेंद थांबले.
" आणि हो, पैशांचा माज तुम्ही मला दाखवू नका. मी सुद्धा आत्ता जन्माला आलो नाहीये. माझ्याही खूप ओळखी आहेत. मला सोडून कोणताही डॉक्टर तुमच्या सुनेचे अबोर्शन करू शकणार नाही, याची काळजी मी नक्कीच घेईन. ", देसाई पेपर वेट टेबल वर फिरवत म्हणाले.
सखरामच्या आईला काय बोलावं ते सुचत नव्हतं. अबोर्शन केलं, तर लाडाची नात द्यावी लागणार, याची भीती, आणि नाही केलं, तर दुसरी मुलगी वाढवायची चिंता.
तेवढ्यात डॉक्टर देसाईंच्या केबिनचं दार वाजलं. देसाईंनी आत बोलावलं, तर इन्स्पेक्टर वसंत सुर्वे आत आले.
" नमस्कार डॉक्टर काका, काय म्हणताय? कसे आहात तुम्ही? "
" मस्त. अरे आत्ता जस्ट एक डील फायनल करतोय. मी माझ्या टर्म अँड कंडिशन सांगितल्या आहेत, आता फक्त समोरची पार्टी काय रिप्लाय देते आहे, ते ऐकायचे आहे.. ", देसाई त्या तिघांकडे बघत म्हणाले.
" न्हाय डागदर सायेब, म्या चुकले. म्या नको त्या गोष्टीचा हट धरला व्हता. मला न्हाय ठेवता येणार सावित्रीला माज्यापासून लांब. मला माफ करा. ", सखारामची आई म्हणाली.
" कोणती डील डॉक्टरकाका? "
" अरे होती एक, सांगतो तुला निवांत. ते सोड, मला सांग... "
" मला माहित आहे, तुम्ही काय विचारणार आहेत ते. ए विश्वास, आण रे त्या नालायकांना. "
विश्वास त्यांना घेऊन आला. त्यांच्या तोंडावर काळ फडकं बांधलं होत. ते एकूण चार जण होते.
" डॉक्टरकाका, हा आहे आपल्या फिल्मचा रायटर. हा बऱ्याच गावात आपली ओळख काढत फिरतो. आणि मग कोणी अस दिसलं, की त्यांना आपल्या जाळ्यात ओढतो. हा आहे आपल्या फिल्मचा ऍक्टर. हा तुमच्यासारखा डॉक्टर नाही बर का. याचा फिरता दवाखाना असतो. हा सर्वांसमोर इतकी मस्त acting करतो, की लोकांना हा खरा डॉक्टर वाटतो. खर म्हणजे याला स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके कसे मोजतात, ते सुद्धा माहीत नाहीये. मग येतात आपल्या फिल्म चे कॅमेरामॅन. हे आत्तापर्यंत झालेल्या सीनचे एवढे मस्त फुटेज काढतात की बस. आणि विशेष म्हणजे यांच्याकडे केलेल्या प्रत्येक NIPT टेस्ट च्या रिपोर्ट मध्ये victim ला मुलगीच होणार असते... "
सखारामची आई अवाक होऊन बघत होती.
" म्हंजी आमी जी चाचणी क्येली, त्यात पोरीच्या ऐवजी... "
" हो, मुलगा सुद्धा असू शकतो. पुढे तर ऐका, मग येतात आपले प्रोड्युसर. हे प्रोड्युसर आणि इन्व्हेस्टर दोन्ही आहेत. हे या सगळ्या कामामध्ये फायनान्शिअल सपोर्ट देतात. म्हणजे सिस्टिमला पैसे द्यायचं काम यांचं असत. आणि त्याबदल्यात यांना जबरदस्त प्रॉफिट होतो. आणि मग येतात आपले डायरेक्टर. या पूर्ण गोष्टीला कसं घडवायचं, हे यांच्या हातात असत. घटनेचं लोकेशन काय असेल वैगरे हेच ठरवतात. आणि अशा तर्हेने आपली फिल्ममधील कलाकारांसोबत तोंडओळख समाप्त होते. ", वसंतने जाहीर केलं.
सखारामची आई \" अरे माज्या द्येवा! \" असे ओरडून कपाळाला हात लावून बसली. देसाईंच न ऐकता जर त्यांनी अबोर्शन केलं असत, तर काय परिणाम झाला असता, याची आता त्यांना अंधुकशी कल्पना आली होती.
" काय रे ए हरामखोरांनो, काय गरज आहे तुम्हाला पैशांसाठी इतके घाणेरडे काम करायची? ", वसंत ओरडला.
" यात वाईट काय आहे साहेब? आम्ही तर समाजसेवा करतोय, या जगात आधीच माणसं कमी आहेत? आम्ही तर उलट माणसं कमी करून समाजाची सेवाच तर करतोय! ", त्यांच्यातच एक विचित्र हसत म्हणाला.
" मग काय तर, मी देवाकडे प्रार्थना करतो, की अशा महान कार्यासाठी तो आम्हाला लवकरच सोडवेल! ", त्यांच्यामधीलच एक म्हणाला.
वसंत दोन मिनिटं शांतपणे त्याच्याकडे बघत राहिला. आणि मग म्हणाला..
" अब इसे दुआ की नही, दवा की जरूरत है! "
" म्हंजी? ", बऱ्याच वेळाने शांताने काहीतरी शब्द उच्चारला.
" म्हणजे अस, कि याच डोकं ठिकाणावर नाहीये. वसंत, कोर्टात न्यायच्या आधी याला जरा psychiatrist ला दाखव. याची मानसिक स्थिती बरी नाहीये. ", देसाई म्हणाले.
" येस सर. बर आता मी निघतो. इकडे मूह दिखाई करून झाली, आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन यांचा पाहुणचार करतो. चला, येतो मी डॉक्टरकाका. ", वसंत त्यांना घेउन निघून गेला.
" मग मावशी, काय म्हणणं आहे तुमचं? "
" म्या चुकली डागदर सायेब. माज्याकडून चूक जाली. मला माफ करा. "
" माफी माझी मागू नका मावशीबाई तुमच्या मुलाची आणि सुनेची मागा. तुमच्या एका हट्टापायी आत्ता किती मोठा अनर्थ झाला असता माहीत आहे तुम्हाला? नको त्या माणसांवर विश्वास ठेवून किती मोठी चूक करायला जात होतात तुम्ही! "
" तुमचं बराबर हाय डागदर सायेब. सख्या, शांते, मला माफ कर पोरी. म्या चुकले. नको त्या माणसासंगत म्या नादाला लागले. मला मसफ करा. ", सखारामची आई हात जोडून म्हणाली.
" ए माय, तू माफी कसली मागतीया, तू मोठी हाय आमच्याहुन. होत असं. तू डागदर सायेबांना धन्यवाद बोल. त्यामुळे आपलं मूल वाचलंया. "
" व्हय व्हय आत्याबाई. तुम्ही डागदर सायेबांना आभार करा. त्यामुळं आज माझं बाळ वाचलंया.
" व्हय डागदर सायेब. तुमचे लई लई उपकार हायेत आमच्यावर. तुमच्यामुल सगळं सुरळीत पार पडलं बगा. "
" अहो माझे कसले आभार मानताय. मी तर माझं कर्तव्य केलं. पण यापुढे लक्षात ठेवा. कोणाच्याही बोलण्यात अडकू नका. हे जग काही फार साधं नाही. प्रत्येक वेळी कोणी मदत करायला येईलच अशी नाही. त्यामुळे सावधानी बाळगा. "
ते तिघे हात जोडत बाहेर निघून गेले. डॉक्टर देसाईंच्या डोक्यावरचा सगळा भार हलका झाला. सगळं अगदी सुरळीत पार पडलं.
संध्याकाळी डॉक्टर घरी निघाले. पोहोचल्या बरोबर त्यांना उदयने दरवाजमध्येच अडवलं.
" अहो तीर्थरूप, ice-cream आणलं असेल, तरच घरामध्ये प्रवेश आहे म्हणलं. तुमचं मिशन सुरळीत पार पडलं; मला माहित आहे. वसंतचा फोन आला होता मला. चला आधी पावती दाखवा, आणि मग गाडी घेऊन जा! "
" काय ते? "
" आयमिन, आधी ice-cream चा बॉक्स दाखवा, आणि मगच आत या! ", उदय म्हणाला.
" आता तू तुझ्या वडिलांना घरात येण्यापासून अडवणार का? ", देसाई म्हणाले.
" ओ वडील, सेंटी कार्ड खेळू नका. मी तुम्हाला काल रात्रीच सांगितलं होत... "
" अरे मस्करी करतोय रे बाबा, आज ice-cream का, आपण आज जेवायलाच बाहेर जाऊ. जा, घरी सगळ्यांना सांग… "
" येस सर. ", उदय आत पळाला.
आणि काही वेळानंतर एक पंचकोनी परिवार हसत खेळत हॉटेलमध्ये जाताना नागरिकांना निदर्शनास आले.