एक प्रेम असेही (भाग ५ अंतिम)

प्रेम हे जरी प्रेम असलं तरी प्रत्येकाचं वेगळं असतं.


मागचा पुढचा कोणताही विचार न करता समिधाने स्वप्निलला फोन लावला.

"तो उचलेल का आता फोन आणि उचलला तरी बोलेल का व्यवस्थित?" समिधाचे विचारचक्र सुरु होते. बराच वेळ रिंग जात होती पण काहीच रिप्लाय नाही. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य विरणार त्याचवेळी अगदी शेवटच्या क्षणाला स्वप्निलने फोन उचलला.

"ये हाय समे..कशी आहेस? आज चक्क आमच्या गरीबाची आठवण काढली राव तुम्ही. आमचे भाग्यच म्हणावे लागेल. थांब जरा सूर्य कुठून उगवला आहे पाहू दे जरा..
अरेच्चा!! सूर्य तर बरोबर दिशेला उगवलाय. मग हे असं कसं झालं?  बिझी मॅडमला वेळ मिळाला वाटतं."

"ये गप रे...किती ती बडबड...समोरच्यालाही संधी द्यावी कधीतरी बोलण्यावीची."

"पाहा हे कोण बोलतंय?  तुझ्याकडूनच ट्रेनिंग घेतलंय बरं का. पण आज असा अचानक कसा काय फोन? माझा तर बर्थडे नाहीये आज."

"का फक्त बर्थडेलाच फोन करायला हवा का?"

"मग काय..आजकाल तर लोक दोनदाच फोन करतात, एक म्हणजे बर्थडे असल्यावर किंवा जिवंत आहे का खपला ते पाहण्यासाठी."

"हे अगदी बरोबर. पाहावं लागतं बाबा माणूस हाय का गेला ते."

"तू माझ्या जाण्याचीच वाट बघ. पण तुझ्याआधी नाही जाणार मी, टेंशन नॉट. आणि चुकून झालेच तसे तर कुणा ना कुणाच्या  स्टेटसला नक्कीच दिसेल माझा हार घातलेला फोटो."

"झाली फालतूची बडबड करुन. एवढं पुढे नव्हतं जायला सांगितलं मी तुला. बरं ते जावू दे...आर्ची, सानु सगळे बरे आहेत ना."

"व्हय व्हय. आर्चीच्या नंबरवर फोन करुन तिलाच विचार की मग. रोज माझ्याशी भांडून पाव पाव किलोने वाढत आहेत मॅडम. आणि सानू काय, ती तर एकदम ओके. अगं ढोले मी कसा हाय ते तर विचार की."

"अरे तुला काय धाड भरणार आता. तू ठिकच असणार. माहितीये मला."

"हो, तेही आहेच. मी थोडीच ना माणूस आहे. निदान तुझ्या नजरेत तरी."

"हो का... बरं तुला आज ऑफिस नाही का? चक्क एवढा वेळ बोलत आहेस म्हणून विचारलं."

"अगं कामच करत होतो. पण हाणली कल्टी तिथून. आता  मॅडमने स्वतः फोन केलाय म्हटल्यावर वेळ काढावाच लागणार ना."

"बरं एक बोलू?"

"बोला बोला, नका परमिशन घेवून लाजवू आम्हाला."

"रिअली सॉरी यार. मी खूप तोडून बोलले मागे तुला."

"बापरे!! एक वर्षानंतर साक्षात्कार झाला या गोष्टीचा? नवलच आहे बाबा तुमचे."

"तसं नाही, पण मी थोडं अतीच वागले."

"कसं असतं ना समे, आपल्याला एखादी हिरोईन आवडली म्हणून आपण तिला कितीही वेळा लव यू म्हटलं तर लगेच काही तिला पळवून नेणार, असं नाही ना ग होत. भावना असतात यार. ज्या की प्रत्येकाला असतात. सहजासहजी व्यक्त नाही करत कोणी. पण मला नाही राहावलं आणि बोललो हक्काने भसकन. जे आहे ते आहे. पण मी जसा काय खूप मोठा गुन्हा केलाय असेच रिॲक्ट झालीस तू. पण खरं सांगू, आतापर्यंत कोणी नाही ग एवढी इज्जत काढली माझी जेवढी की तू काढलीस. पण जावू दे, आता बोलून काय फायदा नाही का?"

"आणि मी हो म्हटले असते तर त्यावेळी? आणि म्हटलं असतं की दे तू आर्चीला डिवोर्स, तर तू दिला असतास काय?"

"आधी तू तुझ्या परशाला डिवोर्स दिला असता काय? ते सांग पहिले."

"मी तर स्वप्नातही विचार नाही करू शकत हा."

"मग मी एकट्याने करुन काही उपयोग आहे का.? अगं झालं झालं, आता आपण लहान थोडीच ना आहोत की आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. पण आयुष्य जेवढं आहे तेवढं हसत खेळत जगायचं. उगीच जन्माला येवून मेल्यागत जगण्यात काही अर्थ आहे का? तूच सांग. टेन्शन कोणाला नसतं? आजकाल जो पहावा तो नुसता पळत आहे. कशासाठी?? आज ना उद्या तर जायचेच आहे ना? मग कशासाठी हा अट्टाहास सगळा? म्हणून स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगावं माणसाने. स्वतःचा आनंद स्वतःच शोधावा."

"बापरे!! एक वर्षात इतका मोठा बदल. इतके महान विचार ऐकून आज धन्य धन्य झाले मी."

"बरं बरं... पाया पड आता माझ्या. संपलं माझं किर्तन."

"हो पडते ना ढोल्या. समोर ये जरा."

"बरं तुला नसेल काही काम आज. पण मला खूप कामं आहेत. त्यामुळे आता जर आत नाही ना गेलो मी ढोले तर आमचा हिटलर बॉस बाहेर येईल मला शोधत आणि म्हणेल उद्यापासून नाही आलात ऑफिसला तरी चालेल. घरी राहून आरामात फोनवर बोला. सो मी पळतो आता. अधून मधून काढत जा आठवण आम्हा गरीबाची. तेवढेच तुमच्यासोबत बोलल्याचे समाधान आणि भाग्य लाभेल आम्हाला."

"तू कधीच नाही सुधरणार रे. टोमणे मारल्याशिवाय तुझा दिवसच सरायचा नाही."

"जावू दे ग. आजचा दिवस चाललाय तो खरा. उद्याचे कोणी बघितलंय. जेवढे दिवस मिळालेत तेवढे आनंदाने जगायचे.
बरं चल बाय ठेवतो मी आता."

हे एक प्रेम असेही, स्वप्निल आणि समिधाचे. प्रेमाची खरी व्याख्या ज्याला समजली तोच खरा नशीबवान. प्रेम म्हणजे फक्त शरीराने एक होणं नाही. दूर राहूनही, न भेटताही प्रेमाचा निखळ आनंद ज्याला घेता येतो तोच खरा प्रेमी म्हणावा लागेल. सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण करुन प्रेम देताही यायला हवं आणि घेताही.

आजकालच्या तरुण तरुणींची प्रेमाची व्याख्याच पूर्णपणे  बदलली आहे. त्याला खरे प्रेम म्हणायचे की फक्त आकर्षण हे त्यांचे त्यांनाच ठावूक.

एकतर्फी प्रेमातून प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याच्या बातम्या अनेकदा कानी पडत असतात. अरे! हे कसले प्रेम? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यालाच जीवे मारण्याचा विचार तरी कसा केला जावू शकतो? शेवटी प्रेम तर मिळत नाही त्यांना पण दैव कृपेने मिळालेल्या आयुष्याचे स्वतःच नुकसान मात्र करून घेतात.

क्षणिक सुखासाठी मोठ मोठे गुन्हे घडतात समाजात. मानसिक विकृती वाढत चालली आहे दिवसेंदिवस. आणि त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जात आहे.

प्रेम करण्याला ना नाही. फक्त सारासार विचार करुन प्रत्येक निर्णय घेता यायला हवा. आजकाल लग्नानंतरही सांसारिक आयुष्यात सुख मिळत नसेल तर ह्या अशा गोष्टी घडतात. पण त्यातही फक्त स्वार्थ दडलेला दिसतो.

या कथेत मात्र अगदी सहज निर्माण झालेली प्रेमाची भावना चित्रित केलेली आहे. जी की आपल्या नायक नायिकेने जपली.

रोज बोलणे नाही की रोज भेट नाही की रोज आय लव यू म्हणणं नाही. आणि ते गरजेचंच असतं असंही नाही.

इथे तर नायकाने नायिकेला प्रत्यक्ष पाहिलेही नाही पण तरीही त्याच्या मनात निर्माण झालेली प्रेमाची भावना विचार करायला भाग पाडते. हो ना??

स्वप्निल आणि समिधा दोघेही आपापल्या सांसारिक लाईफमध्ये खूप खुश होते. पण तरीही एकमेकांची नुसती खेचली तरी त्यांना खूप समाधान भेटत होते. अधूनमधून त्यांची अशी नोकझोक ही सुरूच असायची.

लोकांची प्रेमाची गाडी मैत्रीतून पुढे सरकते. पण इथे ह्या दोघांची गाडी उलट पद्धतीने धावली.

स्वप्निलने अगदी सहज मनातील भावना समिधाला बोलून दाखवल्या. त्यानंतर त्यांच्यात वादही झाले. खूप दिवसांच्या अबोल्यानंतर समिधाला आपण अगदी जवळचा मित्र गमावत असल्याची जाणीव झाली. आणि पुन्हा एकदा जुळले मैत्रीचे सुर. जे की दूर राहूनही मनापासून ते जपत आहेत आणि कदाचित पुढेही जपत राहतील.

अशा प्रेमाची जरी आयुष्यात गरज नसली तरी अशा मैत्रीची खरंच खूप गरज असते. ज्यातून फक्त आणि फक्त आनंद मिळेल. आपल्या एका शब्दाने जर समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर मग जगायला दुसरे आणखी काय हवे? नाही का?

शेवटी प्रेम हे प्रेम असलं तरी,
सर्वांचं थोडीच ना सारखं असतं..
भावनांना फक्त अर्थ मिळावा
नि आपसूकच नात्यात सुर गवसावा..
एकमेकांच्या आनंदातच शेवटी आनंद मानावा,
प्रसंगी त्याग देखील हसत हसत करावा..
फक्त मनाच्या आनंदाचा विचार आधी व्हावा,
नि समाधानाच्या शब्दांनी जगण्याला नवा अर्थ मिळावा..
रोज नाही पण वेळ प्रसंगी
काळजीचा सूरही हवाहवासा वाटावा..
दूर राहूनही मैत्रीचा धागा मात्र आपसूकच जपला जावा..

समाप्त

तर कशी वाटली तुम्हाला ही अनोखी प्रेमकहाणी? कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all