एक प्रेम असेही (भाग ४)

प्रेम हे जरी प्रेम असलं तरी प्रत्येकाचं मात्र वेगळं असतं.


समिधा आणि स्वप्निल दोघेही आपापल्या संसारात व्यस्त होते. आणि विशेष म्हणजे दोघेही आनंदी आणि सुखी लाईफ जगत होते.

पण आता अधूनमधून हसण्यासाठी, स्वतःचे टेन्शन दूर करण्यासाठी एक हक्काचा धागा तयार झाला होता दोघांमध्ये. अगदी कुठल्याही विषयावर आणि कधीही बोलू शकत होते दोघेही. मजेत लाईफ जगण्याचा जणू नवा मंत्रच मिळाला होता दोघांनाही. जगण्यासाठी अशा टॉनिकची अधूनमधून गरज पडतच असते.

खूप साऱ्या गप्पा, त्यातच खूप सारी भांडणं आणि त्यातच अबोला, हक्क आणि प्रेम सारं काही सामावलं होतं.

न राहवून स्वप्निलने एका व्हॅलेंटाईनला समिधाला तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली. तिला मात्र फारसे रुचले नाही हे.

"काय गरज होती हे सगळं बोलायची. मैत्रीचे घट्ट नाते होते ना आपल्यात, पण आता तेही राहते की नाही काय माहिती?"

"अगं माझ्या भावना आहेत त्या. फक्त व्यक्त केल्या मी आणि त्यात गैर काय आहे?"

"तुला नसेल वाटत काहीच गैर पण मला काहीच योग्य वाटत नाही. किती छान मैत्री होती आपल्यात पण तू सगळ्यांवर पाणी फिरवलेस ढोल्या."

"होती म्हणजे??"

"म्हणजे मी आता या क्षणाला आपल्यातील सर्व गोष्टी इथेच संपवत आहे. यापुढे मला कधीच मॅसेज, कॉल करु नकोस. तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती मला. अरे एकदा तर विचार करायचा होतास, तुझीही छान फॅमिली आहे आणि माझीही. काही वेळा भावनांना आवर घालावा लागतो; एवढी साधी गोष्ट कळत नाही का रे तुला?"

"हे बघ समे, जे वाटलं ते बोललो मी. आणि मी अजूनही तुला प्रत्यक्ष पाहिलेदेखील नाही. त्यामुळे तुझ्या दिसण्यावर मी फिदा झालो किंवा मला माझा संसार मोडून तुझ्यासोबत नवा संसार थाटायचा आहे असेही नाही. फक्त भावना आहेत यार, ज्या की मी बोलून दाखवल्या. माझे चुकले असेलही पण त्याची जर एवढी मोठी शिक्षा मला मिळणार असेल तर, तेही आनंदाने स्विकारायला तयार आहे मी. बाकी तुझी मर्जी. नाही आता तुला त्रास देणार कधीच. तुझी इच्छा नसेलच बोलायची तर आता
मी तरी काय करणार ना? बरं चल जास्त इमोशनल झालो तर चुकून रडायचो मी. बाय काळजी घे. आणि जास्त विचार करु नकोस आता. विसरुन जा सगळं."

आज पहिल्यांदा असे झाले की स्वप्नील एकटाच बोलत होता. समिधा फक्त ऐकत होती.

तिच्यासाठीही सोप्पं नव्हतं हे सगळं इतक्या सहजासहजी विसरणे.

"पण आपण जर असेच अविचाराने वागत राहिलो तर समीरला फसवत आहोत, याची सल मनात कायम राहील. आधी ठिक होते, फक्त मैत्रीचे नाते होते. पण आता त्याच्याकडून तरी नातं बदललंच ना. जे की मला योग्य नाही वाटत. उगीच लहान  मुलांसारखा निरर्थक टाईमपास करण्यात काहीच अर्थ नाही. दोघांचाही छान संसार आहे. असं असताना अविचाराने वागण्यात काहीच अर्थ नाही."

खूप विचार केल्यानंतर समिधाने स्वतःवर कंट्रोल ठेवण्यासाठी आणि समीरला फसवत असल्याचे गिल्ट नको म्हणून स्वप्निलचा नंबर ब्लॉक केला. सुरुवातीला तिलाही खूप जड गेले त्याला विसरणे. पण रोजच तिच्या मनात "आपण काहीतरी मिस करत आहोत असे यायचे."

मधल्या काळात स्वप्निल कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल असे वाटले होते तिला पण वर्ष होत आलं तरी तसे काहीच झाले नव्हते.

"स्वप्निल ठिक तर असेल ना? काही प्रॉब्लेम तर नसेल झाला ना त्याचा? काहीच खबरबात नाही. करु का त्याला मॅसेज? पण नको, आता मी स्वतःहून जर सुरुवात केली तर पुन्हा तो भांडेल माझ्याशी. तुलाही माझ्याबद्दल फीलिंग्ज आहेत असे बोलेल. जे की नको आहे व्हायला. पण जर असे नाहीये तर मग मी त्याच्या आठवणीत का स्वतः ला त्रास करुन घेत आहे?"

"नातं काही का असेना पण दुःखातही आनंद देणारा, रडतानाही हसायला लावणारा, कितीही त्रास असला तरी सारं काही विसरायला लावणारा असा वेगळाच जादूगार आहे तो."

न राहवून समिधाने सारं काही मान्य केलं होतं.

आज का कोण जाणे पण समिधा ला स्वप्निलची खूप आठवण येत होती. भलेही मग ते प्रेम असो की दुसरे काही. पण मी खूप छान व्यक्ती माझ्या आयुष्यातून गमावली आहे. याची जाणीव समिधाला झाली.

"तसे पाहिले तर त्यात त्याची काहीच चूक नव्हती. त्याला जे वाटले ते तो बोलून गेला. भलेही माझ्या मनात त्याच्याबद्दल काही असो अगर नसो पण त्याने तरी कुठे कोणती जबरदस्ती केली होती माझ्यावर? मी खूपच चुकीचे वागले यार त्याच्यासोबत."

आज पहिल्यांदा समिधाला स्वप्निलबद्दल आदर वाटत होता.

"रेल्वेत इतक्या मोठ्या पोस्टवर तो कामाला आहे. पण मी नेहमीच त्याचा कचरा केला. त्याने भलेही त्याची मर्यादा ओलांडली असेल. पण खरंच जर तसे असते तर गेल्या एक वर्षात त्याने ते सिद्ध केले असते. मग खरंच त्याने त्याची मर्यादा ओलांडली असे कसे म्हणू शकते मी?"

क्रमशः

काय करेल आता समिधा? स्वतःला घातलेली मर्यादांची बंधने तोडून टाकील की पुन्हा एकदा स्वतःला त्यात गुरफटून घेईल? वाचा पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all