एक प्रेम असेही (भाग ३)

प्रेम हे प्रेम असलं तरी प्रत्येकाचं मात्र वेगळं असतं.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर समिधाने स्वप्निलचे मॅसेज पाहिले.

"अय समे जेवलीस का?"

आता हा जागतिक पातळीवरचा प्रश्न वाचून समिधाला हसू आवरले तर शपथ. त्यात "समे.." हे काय नवीनच?? पण तिलाही त्याचे असे हक्काचे समे म्हणणे मनातून कुठेतरी आवडले होते.

थोड्या गॅपनंतर पुढचा प्रश्न.

"पसरली वाटतंय?"

समिधाला हसूच आवरेना. "बाई हे कॅरॅक्टर अजूनही आहे तसंच आहे. काडीचाही बदल नाही."

मॅसेज तर तिने वाचले पण मुद्दाम रिप्लाय नाही केला.

दुपारी पुन्हा त्याचा मॅसेज, "तुझा व्हॉट्स ॲप नंबर दे ग समे."

तिनेही मग राग आल्यासारखे भासवतच  रिप्लाय केला...

"अय तुझी सिनियर आहे, ताई म्हण आधी."

काही सेकंदात लगेच रिप्लाय, "तेवढं सोडून बाकी काहीही सांग."

"एका अटीवर मी नंबर देईल, मला सारखा सारखा मॅसेज करायचा नाही. कॉल करुन त्रास द्यायचा नाही. कारण मी नको त्या गोष्टीत वेळ घालवत नाही. मलाही खूप कामं असतात."

"नाहीतर काय आम्ही तर रिकामेच आहोत ना? तू एकटीच काय ते कामाची बाई."

"बघ पटत असेल तरच देते नंबर. सांगितलेल्या गोष्टी पाळल्या तर ठीक नाहीतर त्यालाही पर्याय आहेत माझ्याकडे."

"आधी नंबर तर द्या मॅडम, मग पाहू पुढचं पुढे."

खूप आढेवेढे घेत समिधाने नंबर तर दिला पण पुढे काय होणार? हे तिलाही माहित नव्हते.

व्हॉट्स ॲप वर बोलणं झालं. एकमेकांबद्दल सारं काही जाणून घेतलं. मजा-मस्करी, गमती-जमती सारं काही सुरुच होतं. पण समिधा काही एक वाक्य सरळ बोलत नव्हती स्वप्निलसोबत. आणि कदाचित हीच गोष्ट त्याला जास्त आवडत गेली.

बऱ्याचदा ती त्याच्या मॅसेजकडे दुर्लक्ष करायची, पण तो मात्र मुद्दाम तिला त्रास द्यायचा.

दोनच दिवसांत त्याने तिला फोन केला. सुरुवातीला उचलला तिने. गप्पाही झाल्या. पण समिधाला मात्र मनातून आपण काहीतरी चूक करत आहोत, याची जाणीव होत होती. काही गोष्टींना वेळीच आवर घालायला हवा असेही वाटले तिला.

नंतर पुढचे दोन दिवस तिनेही त्याला काहीच रिस्पॉन्स नाही दिला. तोही सारखा तिला मॅसेज, कॉल करतच होता. समिधा प्रचंड स्पष्टवक्ती होती. जे पोटात तेच ओठांवर अशी काहीशी. तिच्या मनात काहीही लपून राहत नव्हते.

"हे बघ एवढं करण्यापेक्षा माझा नंबर ब्लॉक कर, उगीच कशाला तुला त्रास."

मॅसेज वाचताच तिने काहीही रिप्लाय न करता लगेच नंबर ब्लॉक केला देखील त्याचा. त्याच्यासाठी मात्र हे सर्व अनपेक्षित होते. कारण तिला बोलतं करण्यासाठी त्याने तसे म्हटले होते. तिलाही ते समजले नाही असे नाही, पण नकोच त्या भानगडीत पडायला म्हणून तिनेही लगेच त्याचा नंबर ब्लॉक केला.

"बापरे!! कशी आहे ही मुलगी? वादळ आहे नुसतं. पण युनिक पिस आहे. मी तरी पाहिला नाही याआधी कधी. जनरली सर्व मुली एका बाजूला आणि ही एका बाजूला. पण तिला काय माहिती तिचं हेच वागणं मला तिच्या आणखी जवळ जायला भाग पाडत आहे."

त्याने लगेच दुसऱ्या नंबरवरून मॅसेज केला.

"सॉरी अगं समे, मला माहितीये तुला मी खूप त्रास देतोय. पण काय करु? मी आहे असा आहे. मी पण माणूसच आहे. मग चुका तर होणारच ना."

"न राहवून तिनेही रिप्लाय केला. हे बघ, तुझ्याकडे फालतूचा वेळ असेल भरपूर पण माझ्याकडे नाही. आणि का रे असा त्रास देतोस? एकदा रिप्लाय नाही केला तर समजून जायचं कामात असेल किंवा नाहीच हे पटलं तर मलाच तुझ्याशी बोलायचं नसेल असाही विचार करु शकतोस तू."

"ये बाई, नको ग लेक्चर झाडू आता. घरी ती आर्ची आणि इकडे तू. तुम्ही बायका दुसरी कामं करत नाहीत का ग? नुसतं समोरच्याला उपदेशाचे डोस पाजत असता."

समिधाला आता हसूच आवरेना.

"तू नाही सुधरणार. आणि काय रे, मला जेवढे मॅसेजेस, कॉल करतोस तेवढे नाही, निदान एखादा मॅसेज, कॉल कधीतरी आर्चीला पण करत जा. म्हणजे तिलाही बरं वाटेल."

"मला येड लागलंय होय, तुला माहित नाही तो नमुना काय चीज आहे ते. ती सकाळ संध्याकाळ भेटते तेवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. दिवसरात्र समोर असती ना तर केव्हाच डिवोर्स झाला असता आमचा."

"बापरे!! थांब आता मीच फोन करते आर्चीला. सांगतेच तिला तिचा नवरा ऑफिसमधे बसून काय काम करतो ते."

"बरं तू म्हणत असशील तर तिला कॉन्फरन्सवर घेवू का? म्हणजे लगेच सांग तिला तिचा नवरा काय करतो ते. आणि समे तू माझी डेरींग काढू नकोस आ. खरंच घेईल तिला कॉन्फरन्सवर."

"नको बाबा मलाच वेळ नाही तेवढा. मी झोपते आता थोडा वेळ. तू कर तुझं काम."

खरंच कसा आहे हा? आता समजतंय कॉलेजमध्ये पोरी का मागे होत्या याच्या.

समिधा आणि स्वप्निलचे रोज नाही बोलणे व्हायचे पण जेव्हा जेव्हा दोघे बोलायचे तेव्हा मात्र मनसोक्त जगायचे.

दोघांमध्ये आपसूकच नातं फुलत गेलं.

क्रमशः

आता पुढे नेमकं काय होणार? नक्की वाचा पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all