Feb 25, 2024
पुरुषवादी

एक पिंजरा सोन्याचा

Read Later
एक पिंजरा सोन्याचा

 


एक पिंजरा सोन्याचा..


मी अक्षय पाटील.पुणे विद्यापीठातील मीडिया जर्नालिझम डिग्रीचा सुवर्णपदक विजेता.दिसायला चिकणा ह्या कॅटेगरीत.घरी आबांचे उसाचे मळे.मोठा भाऊ राजकारणात.धाकटी ताई आमदारांची पत्नी.सगळे कसे वेल सेटल.


माझ्या अंगात मात्र किडा आहे.पत्रकारिता.माझे व्यसन म्हणा किंवा पॅशन म्हणा.


आबांनी मला सांगितले,"तुला तीन वर्ष देतो.तेवढ्यात जमलं त बेस.नायतर मुकाट्यानं गावाला यायचं."

गेली दोन वर्ष एका वृत्त वाहिनीवर उमेदवारी करत आहे.तीन वर्षांचा आकडा माझी झोप उडवतो.

त्यात बॉस सारखे बोंबलत असतो,"आक्की,काहीतरी स्पायसी पायजे."

आता रोज खमंग काय घडणार?  गेले दोन महिन्यापासून मला बॉलीवूड कव्हर करायला दिलेले.त्याच नाटकी पार्ट्या.तेच सगळे रंग थापलेले चेहरे.आयुष्यात काहीच घडणार नाही.लवकरच मी ग्रामपंचायत लढणार.मला माझे भविष्य दिसत होते.पण आयुष्य इतके सरळ असत नाही.लवकरच एक अशी बातमी मला मिळाली ज्यामुळे मी आज पत्रकारितेत उंची गाठली.तर त्या दिवशी रात्री मी वैतागून घरी निघालो होतो.अचानक फोनवर बॉसचे नाव फ्लॅश झाले,"अक्षय,कुठे आहेस?बिग ब्रेकिंग पवनकुमार इज नो मोअर."मी अक्षरशः रस्त्यात किंचाळलो,"काय?"

फोन ठेवताच कॅमेरामन मित्राला फोन लावला आणि बाईक सुसाट लोखंडवाला कॉम्प्लेक्सकडे धावू लागली.


परवाच्या पार्टीत दिसलेला.देखणा,राजबिंडा,बॉलीवूड हार्टथ्रोब,सुपरस्टार पवन.त्याने आत्महत्या केली?

विश्वासाच बसत नव्हता. मी पोहोचेपर्यंत पवनकुमारच्या बंगल्यासमोर चॅनलच्या व्हॅन अक्षरशः गर्दी करून उभ्या होत्या.येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याला टिपत, बाईट मिळवायची धडपड चालू होती.पहाटेपर्यंत कव्हरींग करून मी सकाळी जायला निघालो.


तेवढ्यात एका साठीच्या गृहस्थाने मला हात केला.एवढ्या पहाटे कोण असेल?

थांबल्यावर तो म्हणाला,"स्टेशनपर्यंत सोडा."

मानेनेच खूण करून बसा म्हणालो.स्टेशन आले.ट्रेन यायला वेळ होता.त्यांना म्हणालो,"आजोबा,चहा पिणार?"


ते  हो म्हणाले.आता मी त्या गृहस्थाला निरखून पाहू लागलो.अनेक फिल्मशूट कव्हर करताना यांना पाहिले आहे.

तेवढ्यात ते स्वतः म्हणाले,"बेटा,मेकअप आर्टिस्ट आहे.तुला खूपदा पाहिले आहे."

मी हसलो,"तरीच चेहरा ओळखीचा वाटला. पवन बिचारा ऐन उमेदीच्या काळात गेला.काय झालं असेल काय माहित?"

तो हसला,"ते कोणालाही कधीच कळणार नाही.बाहेरून दिसणारे जग फार सुंदर असते.आत मात्र काही वेगळेच असते."

आता मला त्याच्या बोलण्यात इंटरेस्ट येऊ लागला.


चहा घेत असताना त्याला विचारले,"आता कोणाकडे काम करता?"

तो हसत म्हणाला,"ज्युनियर आर्टिस्टना मेकअप करतो."

मी त्यांना विचारले,"तुम्ही राहता कुठे?तुमचे नाव काय?"

तेवढ्यात ट्रेन आली.जाताना तो म्हणाला,"सुधांशू बॅनर्जी."

ट्रेन निघून गेली.मी माझ्या घरी आलो.अंग आंबले होते.बिछान्यावर स्वतः ला झोकून दिले.घररssss घररsssss करत फोन व्हायब्रेट होत होता.मी वैतागून फोन पाहिला.


इन्स्पेक्टर शरद,फोनवर फ्लॅश झालेले नाव पाहताच मी खाडकन जागा झालो आणि कॉल रिसिव्ह केला,"अक्षय,पवनकुमार केस माझ्याकडे आहे.मला तुझी मदत लागेल."माझी आणि शरदची क्राईम न्यूजवर काम करताना दोस्ती झाली होती.मॅसेज बिंज झाला आणि मी आवरायला घेतलं. शरदने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचायचे होते.कॉफी आणि सँडविच खाऊन अर्ध्या तासात मी निघालो.शरद माझी वाट पहात होता.मी सरळ आत गेलो.शरद बोलू लागला,"पवनचा खून झाला आहे.असा मला संशय आहे."

मी हसत म्हणालो,"तुम्ही पोलीस काहीही निष्कर्ष काढता.त्याला झेड सिक्युरिटी होती."


शरद शांतपणे म्हणाला,"ऐक, पवनला ए. जे. स्टुडिओने लॉन्च केले."


मी हसत म्हणालो,"मला सांग आता तू.त्याची संपूर्ण स्टोरी मी कव्हर केली. पहिले फिल्मफेअर जिंकले तेव्हा."
शरद म्हणाला,"तुम्हाला मरणाची घाई असते.पूर्ण ऐक आजवर गेल्या वीस वर्षात ए.जे.स्टुडिओ कडून लॉन्च करण्यात आलेले अनेक अभिनेते मारले गेले.काही अयशस्वी झाले.जे जिवंत आहेत ते ए.जे.बरोबरच काम करतात आणि त्यांच्याबद्दल काय बोलले जाते तुला ठाऊक आहेच."
मी बोलू लागलो,"शरद पाच सहा लोकांचा मृत्यू झाला.पोलीस चौकशीत काहीही सापडले नाहीय.ते अभिनेत्यांना देहविक्रय करायला लावतात याचाही पुरावा नाही.आज त्यांच्याकडे काम करत असलेला किंवा पूर्वी काम केलेले कोणीच याला पुष्टी देत नाही."
शरदने एक जुने वर्तमानपत्र काढले.तीस वर्षांपूर्वी एका छोट्या शहरातील लॉजवर एक बॉलीवूड सुपरस्टार सापडला होता.मी भरभर बातमी वाचली.

मग म्हणालो,"अशा गरम बातम्या तेव्हाही लिहिल्या जात.त्यात काय एवढे?"

शरद चिडला,"त्या बातमीत उल्लेख केलेला हिरो राजेंद्रकुमार त्यानंतर रहस्यमय पद्धतीने गायब झाला.त्याला आजवर परत कोणीही पाहिलेले नाही."


एवढ्यात माझे लक्ष त्या फोटोवर गेले.फोटोत राजेंद्रकुमार बरोबर सुधांशू होता.मी चेहऱ्यावर काहीच न दाखवता म्हणालो,"माझ्याकडुन काय अपेक्षित आहे?"


शरद हसला,"आता तू बरोबर प्रश्न विचारला.ह्या राजेंद्रकुमारचा शोध घे."तेवढ्यात बॉस फोनवर कोकलू लागला.मी पवनकुमारच्या अंत्यविधीच्या बातमीचे वार्तांकन करायला निघालो.आता माझा दृष्टीकोन बदलला होता.मला पवन आणि इतर अभिनेते यांच्याबाबत माहिती गोळा करून शोध घ्यायचा होता.मी इंडस्ट्रीतील काही लोकांना राजेंद्रकुमारबद्दल विचारले तेव्हा दारू,सेटवर उशिरा येणे ह्यामुळे त्याचे करिअर संपले.इतकीच त्रोटक माहिती मिळत होती.


मग मी ए.जे.स्टुडिओची पाळेमुळे खोदायचे ठरविले.हा स्टुडिओ पाच लोक मिळून चालवतात.त्यांच्यापैकी कोणीही कधीच मुलाखती देत नाही.त्यांचे कुटुंबीयसुद्धा कोणत्याही पार्टीला जात नाहीत.ते पाचही जण इतर उद्योगात प्रचंड यशस्वी होते.


पवनकुमारचे संपूर्ण व्यवस्थापन तिथून व्हायचे.अगदी मी मुलाखत घेत असतानाही त्यांची माणसे जवळपास होती.आता मला हे सगळे संशयास्पद वाटू लागले.माझ्यातला पत्रकार आता सावध झाला.मागच्या वीस पंचवीस वर्षातील संदर्भ शोधावे लागणार होते.जुन्या पत्रकार लोकांना भेटून मी माहिती घ्यायला सुरुवात केली.


दुसरीकडे पार्टी कव्हर करताना सुधांशू दिसतो का ?याचाही शोध घेत होतो.दोन दिवस संपूर्ण शोध घेतल्यावर मला काही गोष्टी जाणवल्या. आजवर ए.जे.स्टुडिओने फक्त नवोदित अभिनेत्यांना संधी दिली आहे.अभिनेत्रींना कधीच नाही.


प्रस्थापित जुने अभिनेते त्यांच्यासोबत फार काम करत नाहीत.त्यांनी संधी दिलेल्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला.जे अयशस्वी झाले ते परत कुठेही दिसले नाहीत.फक्त एकच नाव असे होते जे मधूनच गायब झाले.राजेंद्रकुमार.


हाच आहे माझ्या पत्रकारितेला नवी उंची देणारा नायक.कुठे गायब झाला असेल?काय घडत असेल नक्की?
वाचत रहा.
एक पिंजरा सोन्याचा.टीप:सदर कथा काल्पनिक आहे.कोणत्याही क्षेत्राबद्दल आदर आहेच.फक्त पैसा,प्रसिध्दी आणि सत्तेसाठी अनेकदा काही निष्पाप जीवांचा बळी जातो.ह्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न आहे.स्त्रियांवर होणारे अन्याय अनेकदा उघड होतात.पुरुष मात्र सहन करत संपून जातात.अशाच एका शापित गंधर्वाची कथा.
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//