एक पाऊस बलिदानाचा !

.
संध्याकाळ झाली होती. सूर्य पश्चिमेकडे झुकत होता. पक्षीपाखरांनी केव्हाच घरट्यांकडे मार्गक्रमण केले. बायका शिवारात काम करून थकलेल्या मालकांसाठी जेवण बनवण्यात व्यग्र होत्या. गावाच्या मधोमध एक पिंपळाचे मोठे झाड होते. नेबापूर नावाचे हे टुमदार गाव पन्हाळ्याच्या पायथ्याशी होते. गावात अठरा पगड जातीची लोक गुण्यागोविंदाने नांदत होती. आई महालक्ष्मीच्या कृपेने गावात कधी दुष्काळ पडला नव्हता. समृद्धी ओसंडून वाहत होती. समृद्धी होती तरी स्वाभिमान नव्हता. यवनांचा जाच अधूनमधून खूप व्हायचा. स्त्रियांची अब्रू लुटली जायची. मंदिरे भ्रष्ट केली जायची. असो. पिंपळाच्या झाडाखाली काही वृद्ध माणसे आणि लहान मुले जमली होती. शिवा नावाचा तरुण शिवचरित्रातील कोणतातरी प्रसंग सांगत होता. शिवा हा एक न्हावी होता. नाभिक असल्यामुळे जन्मतःच बोलका स्वभाव , शब्दचातुर्य आणि हजरजबाबीपणा हे गुण अंगात होते. दिसायला अतिशय देखणा होता. नजर हटणार नाही असा रेखीव गौरवर्णीय मुखचंद्रमा होता. अंगकाठीही मजबूत होती. सर्व माणसे आणि मुले एकचित्ताने शिवाचे बोलणे ऐकत होती. 

" खान म्हणतो कसा , " तू अपनी हिम्मत बहादुरीकी शेखी बधारता है! बेआदब से बुरी राहपर क्यूं चलता हैं ? दुनिया में राज चलता है आदिलशाही का , मुघलो का , कुतुब का. मेरा मातहत बन जा. आदिलशाही दरबारात नाक घास. अपनी सारी शेखी छोडकर इस अफझलखानको गले लगाओ. " शिवा दाढीवरून हात फिरवत हुबेहूब अभिनय करत होता. 

सर्वजण त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. अचानक त्यांच्यात हश्या पिकला.

" काय झाले ?" शिवाने जरा रागातच विचारले.

" शिवरायांनी जसा अफजलचा कोथळा बाहेर काढला. तसा तुझा निघू नये म्हणजे झाले. " एकजण म्हणाला.

सर्वजण हसले. शिवाने मागे वळून बघितले तर त्याची बायको गोदा कमरेवर हात ठेवून उभी होती.

" गोदा , तू ?" शिवा म्हणाला.

" वाटलंच होत. तुम्ही इथं शिवाजी महाराजांची कथा सांगत उभे असणार. " गोदा रागातच म्हणाली.

" अग आपले महाराज आहेतच तसे. पारायण केली तरी कमीच. " शिवा म्हणाला.

" जेवण बनवले आहे. चला बिगी बिगी. " गोदा म्हणाली.

" हो. आलोच. " शिवा म्हणाला.

" आलो नाही. चला. तुम्हीच सांगा. महाराज म्हणलं की यांना तहानभूक काहीच आठवत नाही. " गोदा वडीलधाऱ्याकडे बघत म्हणाली.

" जा बाबा. उरलेलं उद्या सांग. " एक म्हातारा म्हणाला.

तेवढ्यात गावात एकजण दवंडी वाजवत आला.

" ऐका हो ऐका. आई महालक्ष्मीच्या कृपेने महाराजांनी पन्हाळगड जिंकला आहे. खेळणावरही भगवा फडकला आहे. आता या मुलुखात मराठी सत्तेचा अंमल असेल. आयाबहिणींची अब्रू लुटणाऱ्याचा चौरंगा केला जाईल. ऐका हो ऐका. " तो व्यक्ती दवंडी पिटवत गावभर हिंडू लागला.

" अफजलला मारून एक मासही झाला नाही आणि महाराजांनी पन्हाळा जिंकलाही. " शिवा आश्चर्याने म्हणाला.

" सोमेश्वरच पावला म्हणायचा. " गोदा आनंदाने म्हणाली.

" गोदा , महाराज इथं आलेत. एकदा तरी त्यांचे दर्शन करायची इच्छा आहे. " शिवा म्हणाला.

" अहो पण आपण गरीब माणसे. आपल्याला कोण जवळ येऊ देणार ? असो तुम्ही घरी चला. ज्योतीबा एकटाच आहे. " गोदा म्हणाली.

शिवा आणि गोदा घरी आले. लहानगा ज्योतिबा केव्हाचा झोपी गेला होता. गोदाने गरम गरम पिठलं भाकर खाऊ घातले. जेवण करून शिवा तृप्त झाला. तेवढ्यात दाराशी पाटलाचा चाकर रामजी आला.

" काय रे रामजी ?" शिवाने विचारले.

" अहो , गूळपाणी तर देऊ द्या त्यासनी. " गोदा पाणी देत म्हणाली.

" राहू द्या वहिनी. पाणी पिऊनच निघालो होतो वाड्याहून. अरे शिवा , मालकाने उद्या सकाळी वस्तर फिरवायला आणि दाढी कापायला बोलावले आहे. तो निरोप द्यायला आलो. " रामजी म्हणाला.

" येतो की. " शिवा आनंदाने म्हणाला.

रामजी निघून गेला. अचानक पाऊस पडू लागला. शिवा घराबाहेर गेला. पावसाच्या सरींमुळे तो ओलाचिंब झाला.

" अहो काय करताय ? आजारी पडाल. " गोदा म्हणाली.

" आज माझा आनंद सातव्या आसमंतात पोहोचलाय बघ. महाराज , इथवर आले म्हणजे हे क्षेत्र आता तीर्थक्षेत्र झालंय बघ. आता फक्त एकदा महाराजांचे दर्शन घ्यायचे आहेत. " शिवा म्हणाला.

" अहो , आत या. " गोदा म्हणाली.

शिवाने तिचा नाजूक हात पकडून तिलाच बाहेर खेचले. ती लाजेने इकडेतिकडे बघू लागली.

" अहो कुणीतरी बघेल. काय हे ?" गोदा म्हणाली.

" बघू दे की. लग्न झाल्यावर नाही का तू पाऊस आल्यावर कस त्यात भिजायची आणि तुला मनसोक्त भिजलेले बघून मी पण आनंदाने भिजून जायचो. " शिवा म्हणाला.

" अहो तुमचे काहीतरीच. आत चला. " गोदा म्हणाली.

" नाही. गोदा , तू खरच माझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पाडलास. मी मात्र तुला सोन्याच्या बांगड्या पण देऊ शकलो नाही. " शिवा म्हणाला.

" उद्या पाटीलकडे जाताय तर महाराजांच्या फौजेत सैनिकाची नोकरी भेटतय का बघा. तलवार आणि दांडपट्टा तर तुम्हाला येतोच चालवता. " गोदा म्हणाली.

" खरच की. सुचलंच नाही. आता शोभलीस बघ माझी कारभारीण. " शिवा गोदाला मिठीत घेत म्हणाला.

" सरका तुमच आपलं काहीतरीच. " गोदा झटकत घरी पळाली.

शिवा मनमुरादपणे हसला.

***

सकाळी सकाळी शिवा सामान घेऊन पाटलांच्या वाड्यात गेला. पाटील वाटच बघत होते. मग शिवाने वस्तर हातात घेतले आणि तो पाटलांची दाढी करण्यात व्यग्र झाला.

" मग मालक , स्वराज्य आणि बादशाहीत फरक आढळतो का नाही ?" शिवाने विचारले.

" फरक ? जमीन आस्मानचा फरक. बादशाही म्हणजे लुटालूट नुसती. शेतकऱ्यांना लूट. आयाबहिणींची अब्रू लूट. मंदिरे तोड. मूर्ती फोड. स्वराज्य म्हणजे महाराज रयतेला पोटच्या लेकराप्रमाणे वागवतात. स्वराज्यात स्त्री रात्रीअपरात्रीही न घाबरता फिरली पाहिजे , शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का नको लागायला असे महाराज म्हणतात. रामराज्य म्हणजे जर काही असलं तर ते हेच. " पाटील म्हणाले.

सर्व काम आटोपल्यावर पाटलांनी काही रुपये शिवाच्या हातावर ठेवले.

" मालक हे नको. " शिवा नम्रपणे म्हणाले.

" का ? तुझ्या मेहनतीची कमाई आहे. " पाटील म्हणाले.

" मालक , शिवरायांच्या फौजेत जर नोकरी भेटली तर उपकार होतील. " शिवा हात जोडून म्हणाला.

" उपकार कसले? घडली तर सेवाच घडेल स्वराज्याची. उद्या पहाटे महाराज श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात येणार आहेत. तुझी गाठ घालून देतो. पण हे रुपये ठेव. " पाटील म्हणाले.

तपश्चर्या केलेल्या भक्ताला ईश्वराचे दर्शन व्हावे तसे शिवाला झाले. तो दिवस त्याने कसा कंठला हे त्याचे त्यालाच ठाऊक. पहाटे महाराज श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात दाखल झाले. मंदिरातील पुजाऱ्याने महाराजांचे स्वागत केले. पांढरा अंगरखा , गळ्यात कवड्यांची माळ , हातात सोन्याचे कडे , बोटात मौल्यवान अंगठ्या , कपाळावर चंद्रकोर आणि मुखावर क्षात्रतेज ऐसे ते रूप होते.

" काल रात्रभर आम्ही मशालीच्या प्रकाशात गड तपासला. उत्तम गड आहे. भाग्य स्वराज्याचे की ऐसा गड हाती आला. या विजयानिमित्त एक लक्ष सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक करायचे योजले आहे. " महाराज उद्गारले.

" आपली इच्छा तीच आमच्यासाठी आज्ञा. " पुजारी हात जोडून म्हणाले.

मग मंदिरात पूजा सुरू झाली. मंत्रजप आणि घंटानाद सुरू झाला. महाराजांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक केला. वातावरण अतिशय पवित्र झाले.

क्रमश...

🎭 Series Post

View all