एक पाऊस बलिदानाचा ! पार्ट 5

.

काय ? सोंग ? सिद्दीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तातडीने शिवाला धरण्याचा आदेश दिला. सिद्दी मसूदला बोलावून त्याला शिवाजी महाराजांच्या मागावर पाठवले. जर शिवाजी महाराज सापडले तर जावई सिद्दी मसूद याला राजकीय फायदा होईल हा छुपा हेतू. असो. इकडे शिवाकडून माहिती काढण्याचा प्रयत्न झाला. हाणामारी झाली. पण शिवा तोंडातून ब्र काढत नव्हता. हे कृष्णमेघा , यवनी सेनेवर तुफान वर्षाव कर. पण माझ्या राजावर नको. अरे चांदण्या , माझ्या राजाला वाट दाखव. हीच प्रार्थना शिवा मनोमन करत होता.


" तुला हवी तेवढी जहागिर देतो. फक्त सांग शिवाजी कुठे पळाला ?" सिद्दीने आमिष दाखवले.

" अरे थू आहे तुझ्या जहागिरीवर. आमचं स्वराज्य लाख मोलाचं आहे. " शिवा म्हणाला.

सिद्दी चिडला. त्याने शिवाला मारायचा हुकूम केला. एका खांबावर शिवाला लटकवण्यात आले. दहा यवन सैनिक हातात भाले घेऊन आले. धडाधड एक-एक भाला शिवाच्या देहाच्या आरपार गेला. शिवा रक्तबंबाळ झाला.

" मी शिवरायांचे सोंग घेतले तरी तुम्हाला पाठ दाखवणार नाही. मग खऱ्या शिवरायांची तर गोष्टच सोडा. " शिवा म्हणाला आणि त्याच्या देहातून प्राणपाखरू उडून गेला.

***

तिकडे गोदाला अचानक जाग आली. बाहेर धो धो पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या. पतीच्या आठवणीने चेहऱ्यावर हास्य उमटले. ती उगाचच लाजली. देवासमोरचा दिवा मात्र अचानक विझला. त्या बिचारीला नियतीचा संकेत कळला नाही.

***

तिकडे महाराज अचानक थांबले. पायाला ठेच लागली.

" काय झाले महाराज ?" बाजीप्रभूंनी विचारले.

" कुणितरी जवळचा माणूस गमावला असे वाटले. " महाराज म्हणाले.

***

सकाळी पाटीलसह सर्व गावकरी गोदाच्या घरी आले. गोदा घाबरली.

" काय झाले पाटीलबाबा ?" तिने विचारले.

" शिवा..शिवा.." पाटील रडत म्हणाले.

" काय झाले ह्यांना ?" गोदाने थरथरत विचारले.

" स्वराज्यासाठी त्याने आत्मबलिदान दिले पोरी. इतिहासात अमर झाला तुझा नवरा. " पाटील म्हणाले.

गोदाने हंबरडा फोडला. आकाश भेदनारा आणि काळीज चिरणारा. ज्योतीबाही रडू लागला. बायकांनी गोदाचे कुंकू पुसले. मंगळसूत्र उतरवले. अवघे अवघे गाव त्या आक्रोशाने हळहळले.

***

काही दिवसानंतर..

" आऊसाहेब , गोदा आणि ज्योतीबा भेटायला आले आहेत. " एक सेविका म्हणाली.

आऊसाहेबांनी इशारा देताच सेविकेने दोघांना आत येऊ दिले. गोदा आणि ज्योतीबाने आऊसाहेबांचे चरणस्पर्श केले.

" खूप पराक्रमी होता तुझा पती. इतिहासात त्याचे नाव कायम आदराने घेतले जाईल. आम्हाला तुझी आईच समज. तुमचा सर्व खर्च आम्ही करू. " आऊसाहेब म्हणाल्या.

" आता ज्योतीबालाही सैनिक बनवायचे आहे. " गोदा म्हणाली.

" शिवबाला तुम्हाला भेटायचे होते. पण मोहिमेवर जावे लागले. उपकार करून गेला तुझा पती स्वराज्यावर. ही भेट त्याने तुला द्यायला सांगितली होती. " आऊसाहेब कपड्यात गुंडाळलेली भेट देत म्हणाल्या.

गोदाने ती भेट उघडली. त्यात सोन्याच्या बांगड्या होत्या. गोदाच्या नेत्रातून आसवे गळली आणि बांगड्या ओल्या झाल्या.

***

सेतू माधवराव पगडी म्हणतात की जिथे महाराजांनी घाम गाळला तिथे मावळ्यांनी रक्त सांडले आहे. शिवा काशिद त्या रक्त सांडणाऱ्यापैकीच एक होता. शिवरायांचे उदात्त विचार त्याला पटले. तो स्वराज्याच्या ध्येयाने पेटून उठला. नरवीर शिवा काशिद यांनी हसत हसत स्वराज्यासाठी आत्मबलिदान दिले. पुढे घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे , फुलाजी देशपांडे , रायाजी बांदल आणि बांदल सेना शौर्याने झुंजली. त्या मुसळधार पावसात फक्त पाण्याचा नाही तर बलिदानाचाही पाऊस झाला.

नरवीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा.??

संदर्भ :
1. राजा श्रीशिवछत्रपती
2. छत्रपती शिवाजी महाराज एक मागोवा : जयसिंग राव पवार

समाप्त

🎭 Series Post

View all