एक पाऊस बलिदानाचा ! पार्ट 4

.

रात्री शिवाने महाराजांना भेटण्याची परवानगी मागितली. परवानगी भेटली. बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्यासोबतच होते.


" बोल शिवा. काही समस्या ?" महाराजांनी विचारले.

महाराजांना सर्वच सैनिकांची नावे तोंडपाठ होती.

" ते ते. काही नाही. " शिवा खिरीचा डब्बा लपवत म्हणाला.

महाराजांनी ते हेरले. शिवाच्या हातून अलगदपणे डब्बा घेतला.

" महाराज , बायकोने खीर दिली होती तुमच्यासाठी." घामाघूम अवस्थेत शिवा म्हणाला.

महाराजांनी डब्बा उघडला. खिरीचा एक घास खाल्ला.

" पाहिलत बाजी , हा लबाड वहिनीसाहेबांनी आमच्यासाठी दिलेली खीर स्वतः खाऊ पाहत होता." महाराज म्हणाले.

बाजीप्रभू हसले.

" महाराज , तुम्ही गरिबाच्या बायकोला वहिनी म्हणालात ?" शिवाचे डोळे पाणावले.

" खूप चविष्ट खीर आहे. अगदी आऊसाहेब बनवतात तशी. " महाराज म्हणाले.

हे शब्द शिवाचे डोळे ओले करून गेले. रयतेवर इतकी माया करणारा राजा युगात एकदाच निपजतो.
शिवाने महाराजांचे चरणस्पर्श केले. माझा राजा किल्लेच नाही तर माणसेही जिंकत होता.

***

महाराज देवघरात शिवलिंगासमोर हात जोडून बसले.

" हे स्वराज्य म्हणजे तुझीच इच्छा ना ? मग का अशी परीक्षा घेतोय महादेवा ? तो शाहिस्तेखान रयतेस छळतोय. मार्ग दाखव शंकरा. मार्ग दाखव. लहानपणी अश्याच एका वेढ्यात अडकलो होतो. तेव्हा सुटलो पण निजामशाह पकडला गेला. निजामशाही संपली. आता स्वराज्य नको संपू देऊस निलकंठा. " महाराज कळवळीने म्हणाले.

अचानक पाऊस सुरू झाला. ऐकली. शंकराने प्रार्थना ऐकली. भूमीपुत्राच्या हाकेला मायसह्याद्रीने " ओ " दिली. महाराजांना वाटले किमान आता तरी सिद्दी वेढा कमी करेल. पण सिद्दी बुद्धिमान आणि चिवट होता. त्याने छताच्या चौक्या उभ्या केल्या. कुठेच ठिसाळपणा आणू दिला नाही. महाराज निराश झाले. त्यांनी सर्व मुत्सद्दी लोकांना बोलावले.

" काळ कठीण. गडावरची शिबंदीही संपत आलेली आहे. आता तातडीने गड सोडून विशाळगड जवळ करणे गरजेचे. " महाराज म्हणाले.

" बांदल सेनेला सोबत येण्याचा हुकूम करावा. " बाजीप्रभू देशपांडे गर्जले.

" महाराज , गडावरून दोन पालख्या निघतील. एकात तुम्ही बसा आणि ती पालखी अवघड वाटेवरून जाईल. दुसऱ्यात कुणितरी सोंग घेतलेला बसवू. म्हणजे शत्रूला गुंगारा देता येईल. " बहिर्जी म्हणाले.

" होय. आमच्याही मनात तशीच योजना होती. पण सुरुवातीला गंगाधर पंतांना वकील म्हणून पाठवू. शत्रू एकदा गाफील झाले की मग आपण निसटून जाऊ." महाराज म्हणाले.

***

गंगाधर पंत वकील म्हणून सिद्दी जौहरला भेटले. जर आदिलशाह सर्व गुन्हे माफ करत असेल तर महाराज जिंकलेला मुलूख परत करतील अशी याचना गंगाधरपंतांनी केली. आदिलशाही छावणीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण आता प्रश्न होता की महाराजांचे सोंग घेणार कोण ? बहिर्जी आणि महाराजांनी शिवा काशिदला एकांतात बोलावले. प्रस्ताव मांडला. काय बोलला असेल शिवा ? गोदा , ज्योतिबा त्याला आठवले नसतील ? सिद्दीला भेटणे म्हणजे मृत्यूला स्वतःहून मिठी मारणे.

पण क्षणार्धात तो म्हणाला ,

" महाराज , मी घेतो सोंग. पण तुम्ही वेढ्यातून निसटून जा. " शिवा काशीद म्हणाला.

" शिवा , हे बघ. बळजबरी नाही. नकार दिला तरी नात्यात कटुता येणार नाही. या प्रकरणी मृत्यूही येऊ शकतो. " महाराज म्हणाले.

" महाराज , लाख शिवा मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा शिवाजीराजा जगला पाहिजे. खूप झाली हो गुलामी. आता स्वराज्य पाहिजे. जिथे आयाबहिणींची अब्रू लुटली जाणार नाही. देव देश धर्म सुरक्षित राहतील. तुम्ही खुशाल जा. मी घेतो सोंग. महालक्ष्मी तुम्हाला बळ देईल. " शिवा म्हणाला.

" तुझी काही इच्छा ? काही इनाम हवे ?" महाराजांनी विचारले.

" नको महाराज. काही नको. तुम्ही या कामासाठी मला निवडले तेच खूप आहे. इतिहास लोकांचे जीवन लक्षात ठेवतो. पण माझा मृत्यू लक्षात ठेवेल. मला माझ्या मृत्यूमुळे ओळखले जाईल. तानाजी , येसाजी , नेतोजी या रांगेत कुठेतरी खालीवरी हा शिवा काशिदही येईल. एकच काम करा. कारभारीणला ह्या सोन्याच्या बांगड्या द्याल का ? लई दिवस मागे लागली होती. वाटलं स्वतः द्यावं. पण आता जमेल की नाही ठाव न्हाय. " शिवा हसला.

महाराजांचे डोळे पाणावले. त्यांनी शिवाला घट्ट मिठी मारली. प्रभू रामचंद्राने हनुमंतास मिठी द्यावी तैसे शिवाला वाटले.

***

ठरले. 12 जुलै 1660 अमावस्येची तारीख ठरली. शिवाने " शिवाजीराजे" चे सोंग घेतले. कवड्यांची माळ घालून शिवाला शंभर हत्तीचे बळ आले. तो हुबेहूब महाराजांसारखा वाटू लागला. महाराज त्याला शेवटचे भेटले.

" कशी नजर मिळवू मी याच्या परिवारास ? किती हा स्वार्थीपणा ? की नकोच हा खेळ. " महाराज मनातल्या मनात म्हणाले.

त्यांचे डोळे पाणावले. शिवाने ते हेरले.

" महाराज , भावूक नका होऊ. तुमची या मातीला गरज आहे. मी मेलो तरी माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळाल. पण तुम्हाला काही झाले तर स्वराज्याचे काय होणार ? महाराष्ट्र अनाथ होईल. शिवरायांचे सोंग घ्यायला सात जन्माचे पुण्य लागते. भाग्य माझे की स्वराज्याचे कार्य होत आहे हातून. येतो. " शिवाने मुजरा केला.

महाराजांनी त्याला घट्ट आलींगन दिले.

***

नेहमीच्या वाटेवरून एका पालखीतून शिवा निघाला. सोबत मूठभर सैन्य होते. " राजदिंडी " मार्गातून महाराज सहाशे बांदल सेनेसह निघाले. सोबत बाजीप्रभू देशपांडे , रायाजी बांदल , फुलाजी देशपांडे , शंभुसिंग जाधव ही मंडळी होती. शिवाची पालखी नेहमीच्या वाटेवरून जात होती. विजापुरी फौजांनी त्या पालखीला पकडले. शिवाला पकडल्यावर फौजेला काय आनंद झाला तो काय वर्णावा ? शिवाला सैनिकांनी सिद्दी जौहरसमोर आणले. सिद्दी एकटक बघतच बसला. शिवा मात्र डगमगला नाही. त्याने नजरेला नजर भिडवली. ज्या व्यक्तीचे सोंग घेतले आहे त्या व्यक्तीची मर्यादा त्याने राखली.

" ये सपना तो नहीं ? अफजल को मारने वाला , फतेह खान रुस्तमे जमा को हराने वाला शिवा मेरे कब्जे में ? यकीन नहीं होता. बैठिये राजा जी. हम दुश्मन सही पर आपके बहादुरी की इज्ज़त करते है. " सिद्दी जौहर म्हणाला.

शिवा किंचित हसला आणि बैठकीवर बसला. सिद्दीने सर्व फौजेला आनंदोत्सव साजरा करायचा आदेश दिला. बहिर्जीने सांगितल्याप्रमाणे शिवा काही बोलला नाही. थोड्या गप्पा झाल्या. शिवा फक्त मान हलवत होता. थोड्या वेळाने अफजल खान याचा पुत्र फाजल खान आला.

" आओ फाजल. ये देखो. जो तुम्हारे अब्बू नहीं कर पाए वो हमने किया. शिवाजी मेरे कब्जे में आ गया. " सिद्दी जौहर हसत म्हणाला.

" हा शिवाजी नाही. मी बघितले आहे त्याला. हा कुणितरी सोंग घेतलेला आहे. " फाजल म्हणाला.

क्रमश...

🎭 Series Post

View all